महाराष्ट्राचं राजकारण बदलून टाकणाऱ्या निवडणुका…!

महाराष्ट्रातल्या ‘मिनी विधानसभा’ समजल्या जाणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत. सर्वत्र स्थिती स्पष्ट झालेली आहे. आणि निवडणुकांनंतर चा धुरळा ही आता खाली बसत चालला आहे.

या प्रसंगी आठवण होते ती चार – पाच महिन्यांपूर्वीच्या परिस्थितीची. आपल्या महाराष्ट्रात तेंव्हाची परिस्थिती कशी होती..? राज्यभरात मराठा समाजाचे मोठ मोठे मोर्चे निघत होते. राज्यभर भाजप सरकार विरोधातलं वातावरण तापवणे चालू होते. महाराष्ट्र परत जाती – बिरादरी च्या झगड्यात होरपळून निघतो की काय, असे चित्र निर्माण होत होते. मु’ख्यमंत्री ब्राम्हण आहे’, या एकाच निकषावर त्यांचा विरोध होत होता. ‘पुढील महिन्यातच भाजप चं केंद्रीय नेतृत्व, ब्राम्हण मुख्यमंत्री हटवून त्या जागी मराठा मुख्यमंत्री नेमणार’ असं छातीठोक पणे सांगणारे भाजप चे नेते ही दिसत होते. तश्यातच दिवाळी नंतर नोटबंदी झाली. त्या विरोधात शिवसेने सारखा पक्ष ही चक्क ममता बेनर्जींनी पुकारलेल्या मोर्चात शामिल झाला. एका विकसित आणि तरीही विकासोन्मुखी अश्या महाराष्ट्र राज्याचे आता पुढे काय होणार असे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले होते..!

आणि आज..? आज या साऱ्यांचा मागसुमही नाही. अगदी खणखणीतपणे भाजप ने राज्यात आपले वर्चस्व सिद्ध केलेले आहे. दहा पैकी आठ महानगर पालिका आपल्या खिशात घातल्या आहेत. जिल्हा परिषदांमधेही आपली दमदार उपस्थित नोंदवली आहे. विरोधक गपगार झालेले आहेत. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भरजरी शिरपेचात रत्नजडीत मोत्याचा तुरा खोवल्या गेला आहे..!

%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a5%a9

हे कर्तुत्व जितकं पक्षाचं, त्याहीपेक्षा जास्त, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं. अगदी एकहाती निवडणूक त्यांनी खेळली, रंगविली, लढली आणि दणदणीतपणे जिंकूनही दाखविली. ह्या निवडणुकांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला एक महत्वपूर्ण वळण दिलेलं आहे. यापुढील राज्याच्या राजकारणाचे संदर्भ पूर्णपणे बदलणार आहेत. आणि म्हणूनच ह्या निवडणुकीच्या निकालांचा सर्व पक्षांनी नीट विचार करणं आवश्यक आहे.

भाजप ला जे यश मिळालंय ते अनेकांच्या दृष्टीने आश्चर्यकारक आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर भाजप जिंकेल असं अनेक राजकीय विश्लेषकांनाही वाटलं नव्हतं. आणि म्हणूनच भाजप ने ह्या निवडणूक निकालांचे मनन करणे आवश्यक आहे.

ह्या निवडणुकीत भाजप ने अनेक ‘आयातीत’ उमेदवारांना तिकीटं दिली. अनेक गुंडांनाही पावन केलं. त्यातले अधिकांश निवडणूक जिंकले. मात्र याचा अर्थ मतदारांनी भाजपच्या या धोरणाला ‘एंडोर्स’ केलंय असा होत नाही. या निवडणुकीत मतदारांनी मुख्यमंत्र्‍यांच्या प्रतिमेला, गुड गव्हर्नेंस ला आणि भाजप च्या धोरणांना बघून मतदान केलं. राजकारणात आणि विशेषतः निवडणुकात अंतिम विजयाच्या दृष्टीने काही तडजोडी कराव्या लागतात, हे तर कोणीही समजू शकेल. पण त्यांचे प्रमाण किती..? आणि म्हणूनच भाजपच्या रणनीतीत हा प्रकार म्हणजे ‘ट्रेंड सेटर’ ठरू नये. संगठनात्मक दृष्ट्‍या मजबूत असलेल्या जागी, कार्यकर्त्यांना डावलून बाहेरच्या मंडळींना घेऊन निवडणूक लढविणे हे यापुढे योग्य होणार नाही.

दुसरे महत्वाचे म्हणजे इतक्या दणदणीत विजयानंतर भाजप समोर फार मोठी जवाबदारी आलेली आहे. या सर्व नागरी संस्थांमध्ये भाजप ला आता भ्रष्टाचार मुक्त, वेगवान प्रशासन असलेलं शासन द्यावं लागणार आहे. त्या साठी फार मोठी योजना आखावी लागेल. त्या ताकदीची, तज्ञ असलेली प्रमाणिक माणसं शोधून त्यांना कामावर लावावं लागेल, तरच मतदारांच्या या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण होतील.

शिवसेनेला जरी मुंबईत एका हाती सत्ता मिळाली नाही, तरी या पक्षाला कमी लेखून चालणार नाही. निकालानंतर ‘आमची शाखा फक्त मुंबई-ठाण्यातच..’ यासारखे विनोद झाले असले तरी हे काही खरे नाही. आज हिंदुत्वाची कास धरलेल्या, लोकांच्या मनातील मुद्द्यांवर संवेदनशील असलेला ‘शिवसेना’ हा पक्ष राज्यव्यापी आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांतही शिवसेनेचे ठळक अस्तित्व दिसून आलेले आहे. नाशिक मधे महापालिकेत जरी भाजप कडे बहुमत असले तरी जिल्हा परिषदेत ४० जाणा घेऊन शिवसेना बरीच पुढे आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत. एकट्याच्या बळावर निवडणुका लढवूनही शिवसेनेला जे यश मिळालं, ते वाखाणण्या सारखंच आहे.

%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a5%aa

मात्र बाळासाहेबांच्या काळात शिवसेनेत जशी खंद्या लढ्वैय्यांची फौज होती, तसं चित्र आज नाही. तेंव्हा मनोहर जोशी, छगन भुजबळ, प्रमोद नवलकर, दत्ताजी नलावडे, आनंद दिघे, सुधीर जोशी… असे अनेक नेते शिवसेनेला मजबूत करत होते. तशी फळी आज जाणीवपूर्वक उभारावी लागेल. हिंदुत्व वादी पक्ष असं नुसतं म्हणून होणार नाही तर त्यासाठी लढा द्यावा लागेल. हिंदुंवर होत असलेल्या अत्याचारांविरुध्द ममता बेनर्जींना खडसावून विचारावं लागेळ. शिवाय लोकांच्या लहानमोठ्या प्रश्नांवर आंदोलनं, काही सकारात्मक प्रकल्प, समाजकारण या साऱ्या गोष्टी शिवसेनेला सातत्यानं चालू ठेवाव्या लागतील तरच जवाबदार विरोधी पक्ष म्हणून त्यांचं भवितव्य आहे.

फडणवीस सरकार चा पाठिंबा शिवसेना काढून घेईल का..? मला तसं वाटत नाही. तसं केलं तर ती शिवसेनेची घोडचूक ठरेल. सध्या लोकमताचा पाठिंबा हा भाजप ला आहे. अश्या वेळी त्यांचं सरकार पाडण्याचं पाप शिवसेनेनी केलं तर ती त्यांची राजकीय आत्महत्या ठरेल. माझ्या मते विधानसभा निवडणुकीच्या सहा महिने आधी शिवसेना पाठिंबा काढून घेईल.

%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a5%a7

मग दोन्ही पक्षांचं भवितव्य काय..? दोघांची मतपेढी एकच आहे. त्यामुळे दोघांत संघर्ष हा होतच राहणार. आणि सेना जर संकुचित वृत्तीच्या आणि ‘आम्ही शाईस्तेखानाची बोटं छाटली’ असं बोलणाऱ्या वाचाळ वीरांच्या ताब्यात राहिली तर सेनेची अधोगती निश्चित आहे.

मनसे बद्दल बोलणंच योग्य नाही. त्यांनी आपला गाशा गुंडाळावा हेच योग्य. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला आपापल्या मतपेढ्या सांभाळून ठेवण्याचं भविष्य काळातलं खूप मोठं आव्हान आहे.

जाता जाता – मात्र तरीही… महाराष्ट्राच्या मनात आहे की भाजप – शिवसेनेनं बरोबर चालावं. यातच या दोन्ही पक्षांचं हित आहे, आणि पर्यायानं महाराष्ट्राचंही..!
– प्रशांत पोळ