केरळ च्या लाल दहशतवादाचा देशव्यापी धिक्कार..!

कांजीकोडे. पलक्कड जिल्ह्यातलं एक लहानसं गाव. केरळ च्या पूर्व सीमेवर असणारं. तामिळनाडू ला खेटून वसलेलं. मात्र औद्योगिक बाबतीत पुढारलेलं. केरळ चे पूर्व मुख्यमंत्री आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अच्युतानंदन यांचं हे विधानसभा क्षेत्र. पलक्कड ह्या लोकसभा क्षेत्रात असणारं. १९५७ पासून एकूण ११ वेळा ह्या जागेवर कम्युनिस्ट खासदारांचा कब्जा राहिलेला आहे. त्यातील १९९६ पासून सतत ६ वेळा मार्क्सवादी पक्षाचाच खासदार निवडून आलेला आहे.

तर अश्या ह्या मार्क्सवाद्यांचा सुरक्षित तटबंदीत, कांजीकोडे मधे, कन्नन हा संघाचा स्वयंसेवक पंचायत समितीवर भाजप तर्फे निवडून आला. त्याचा भाऊ राधाकृष्णन हा संघाचं काम करणारा हाडाचा स्वयंसेवक. कन्नन ची बायको विमला हिला संघ आणि भाजप ची ओळख झाली ती सासरी आल्यावरच. मग ती देखील हिरीरीने भाजपच्या महिला मोर्चाचं काम करू लागली. या दोन भावांचं एकत्र कुटुंब. पूर्णपणे संघ समर्पित. एका लहानश्या एकमजली बैठ्या घरात त्यांचा निवास.

मात्र कन्नन – राधाकृष्णन परिवाराचं संघ – भाजप विषयी प्रेम आणि त्यांचा वाढता प्रभाव हा मार्क्सवादी गुंडांना पचनी पडणं शक्यच नव्हतं. तश्यातच मागच्या विधानसभा निवडणुकीत फक्त २,५०० मतं मिळविणाऱ्या भाजप ने ह्या विधानसभा निवडणुकीत चमत्कार केला. चक्क ४६,००० मतं घेऊन भाजप दुसऱ्या स्थानावर आला. अच्युतानंदन च्या समर्थकांना हे सहन होणं शक्यच नव्हतं. त्यांनी आधी धमक्या दिल्या. पण हे दोघेही भाऊ बधले नाहीत. पक्षाचं काम करतच राहिले.

अश्या ह्या स्वाभिमानी, राष्ट्रभक्त परिवाराला अद्दल घडविण्यासाठी मार्क्सवादी गुंडांनी २८ डिसेंबर च्या अगदी पहाटे, अडीच वाजता, त्यांच्या घरावर पेट्रोलबॉम्ब फेकला आणि घराचे दरवाजे बाहेरून बंद केले.मार्क्सवादी हिंसाचार - १

त्या भडकलेल्या आगीत हे कुटुंब अक्षरशः होरपळून निघालं. आणि पुढील आठ – दहा दिवसात हे तिघंही, ह्या मार्क्सवादी हिंसेत हुतात्मे झाले…! त्या विमलेचा दोष इतकाच होता की त्या माउलीने संघ समर्पित, राष्ट्रभक्त कुटुंबात विवाह केला..!

मार्क्सवादी गुंडांनी, त्यांची सत्ता केरळ मधे पुनः स्थापित झाल्यानंतर घातलेल्या हैदोसाचा हा फक्त एक नमुना आहे.

पलक्कड मधल्या कांजीकोडे हल्ल्याची शाई वाळलीही नसेल तर मार्क्सवाद्यांनी या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मल्लपुरम जिल्ह्यात आपल्या क्रौर्याची आणखी एक चुणूक दाखवली.

सुरेश हा मल्लपुरम जिल्ह्यातला भाजप चा सक्रीय कार्यकर्ता. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या ‘मोपल्यांचे बंड’ ह्या पुस्तकात वर्णन केलेला मलाबार भाग तो हाच. पूर्णपणे मुस्लिम बहुल. येथील ‘मुस्लिम लीग’ चे खासदार ई. अहमद यांचा नुकताच मृत्यू झालाय. येथील आमदारही मुस्लिम लीग चाच आहे. या जिल्ह्यात मुस्लिम लीग खालोखाल चलती असते ती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची. मात्र २०१४ च्या लोकसभेत भाजप ने चांगलीच मुसंडी मारली आणि ६४,००० मतं मिळविली. मे, २०१६ मधे झालेल्या विधानसभा निवडणुकांतही भाजप ची कामगिरी फारच छान होती. म्हणजे पुढील निवडणुकीत मार्क्सवादी पक्षाला बाजूला सारून, भाजप हा पक्ष मुस्लिम लीग बरोबर टक्कर देऊ लागेल अशी चिन्ह निर्माण झाली.

झालं. मार्क्सवादी खवळले. त्यांनी संघ आणि भाजप ला अद्दल घडविण्यासाठी सुरेश ह्या भाजप च्या कार्यकर्त्यावर हल्ला केला. सुरेश आपल्या परिवारा सोबत कार ने जात असताना ह्या मार्क्सवादी गुंडांनी मल्लपुरम जिल्ह्याच्या तिरूर जवळ त्याची कार थांबवली. जबरदस्तीनं कार चा दरवाजा उघडला. सुरेश च्या १० महिन्यांच्या लहान बाळाला पायाला धरून रस्त्यावर फेकून दिलं आणि सर्वांसमोर सुरेश ला भोसकलं…!

मार्क्सवादी हिंसाचार - ५

सुरेश चा गुन्हा काय होता..? तर तो मल्लपुरम जिल्ह्यात प्रामाणिकपणे भाजप चं काम वाढविण्याचा प्रयत्न करत होता.

अशी अनेक उदाहरणं आहेत. मे, २०१६ मधे यु डी एफ चं राज्य आल्यावर आणि ‘पिनरई विजयन’ मुख्यमंत्री झाल्यावर हे मार्क्सवादी गुंड अक्षरशः चेकाळले आहेत.

पिनरई विजयन मुख्यमंत्री झाल्यापासून, आजपर्यंत, अर्थात फक्त नऊ महिन्यांच्या कालावधीत बारा संघ स्वयंसेवकांची / भाजप कार्यकर्त्यांची निर्मम हत्या झालीय. शंभर च्या आसपास संघ स्वयंसेवकांना कायमचं अपंगत्व आलंय. आणि ह्या नऊ महिन्यात संघ स्वयंसेवकांच्या एकूण पाचशे पेक्षा जास्त घरांवर हल्ले झालेले आहेत…!

हे भयानक आहे. फार जास्त भयानक आहे. आणि दुर्दैवाने ह्याची दखल न राष्ट्रीय मिडियात घेतली जातेय, न प्रादेशिक. ‘असहिष्णुते’ वरून देश सोडण्याच्या धमक्या देणारे, अवार्ड वापस करणारे सारे चिडीचूप बसलेत. बरखा दत्त, राजदीप सरदेसाई, अरुंधती रॉय वगैरे ‘बुद्धिवंतांनी’ केरळ च्या लाल दहशतवादा विरुध्द ‘ब्र’ देखील उच्चारलेला नाही.

केरळ मधे कम्युनिस्टांनी संघाच्या स्वयंसेवकांवर आक्रमणं करण्याचा इतिहास तसा जुना आहे. संघाच्या विचारसरणी बद्दल लोकांचं आकर्षण वाढू लागलं आणि कम्युनिस्टांची अस्वस्थताही वाढू लागली. कारण कम्युनिस्ट पक्षाचे अनेक कार्यकर्ते संघाचे चांगले स्वयंसेवक झाले. आणि येथूनच संघर्षाला सुरुवात झाली.

जानेवारी १९४८ मधे, संघ बंदी पूर्वी काही दिवस, श्री गुरुजी केरळ च्या प्रवासात होते. एर्नाकुलम मधे स्वयंसेवकांची बैठक घेत असताना त्या बैठकीवर मार्क्सवादी गुंडांनी हल्ला केला. मात्र स्वयंसेवकांनी तो परतवून लावला. पुढे संघ बंदी हटल्या नंतर जेंव्हा श्री गुरुजींचा पहिला केरळ प्रवास झाला, तेंव्हाही अलपुझ्झा मधे त्यांच्या कार्यक्रमात हल्ला करण्यात आला. अर्थात स्वयंसेवकांच्या सावधतेने विपरीत काही घडू शकले नाही.

१९६७ च्या जनसंघाच्या कालिकत अधिवेशनानंतर, कम्युनिस्ट अधिकच आक्रमक झाले. १९६९ मधे चिन्मय मिशन चे संस्थापक स्वामी चिन्मयानंद, विद्यार्थी परिषदेच्या एका कार्यक्रमात भाग घेण्यास त्रिशूर च्या केरलवर्मा कॉलेजात आले असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. मात्र सुदैवाने परिषद कार्यकर्त्यांनी तो ही परतवून लावला.

१९६९ मधे आताचे मुख्यमंत्री पिनरई विजयन हे कण्णुर मधे एस एफ आय चे सचिव होते. अत्यंत आक्रमक आणि क्रूर अशी त्यांची प्रतिमा होती. कण्णुर मधे कम्युनिस्टांच्या ‘लाल दहशतवादाला’ सुरुवात झाली ती प्रामुख्याने याच काळात. २८ एप्रिल १९६९ ला कण्णुर मधे, टेलरिंग चा व्यवसाय करणारे संघ स्वयंसेवक, वडिक्कल राधाकृष्णन यांची निर्घुण हत्या झाली. पोलिसांनी जे आरोपी पकडले त्यातील दोन प्रमुख नावे होती – पिनरई विजयन आणि कोडियारी बाळकृष्णन. मात्र सहा महिन्यांच्या मामुली कैदेनंतर ती दोघंही पुराव्या अभावी निर्दोष सुटली..! महत्वाचे म्हणजे यातील पिनरई विजयन हे सध्या केरळ चे मुख्यमंत्री आहेत, तर कोडियारी बाळकृष्णन हे केरळ मधे अनेक वर्ष मंत्री होते आणि सध्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केरळ शाखेचे महामंत्री आहेत..! गेल्या मे महिन्यात, कम्युनिस्ट परत सत्तेवर आल्यावर संघ स्वयंसेवकांवरचे हल्ले का वाढले, हे यातून स्पष्ट होतं..!!

कण्णुर लोकसभा क्षेत्रातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे दोनदा खासदार राहिलेल्या ए. पी. अब्दुल्लाकुट्टी यांचं एक पुस्तक प्रसिध्द आहे – ‘निंगलेने कॉंग्रेस अक्की’ (अर्थात ‘तुम्ही मला काँग्रेसी बनविलं’ कारण २००९ नंतर हे अब्दुल्लाकुट्टी कॉंग्रेस मधे शामिल झाले). यात अब्दुल्ला कुट्टी नी पिनरई विजयन बरोबर काम करताना चे अनेक अनुभव दिलेले आहेत. एका ठिकाणी ते लिहितात, “पिनरई विजयन यांनी पश्चिम बंगाल च्या मार्क्सवादी साथीदारांची प्रशंसा करत आम्हाला समजावलं की आपल्या वैचारिक विरोधकांना इतक्या शिताफीने नष्ट केले पाहिजे की त्यांचा कुठलाही मागमूस उरता कामा नये”. अब्दुल्लाकुट्टी पुढे लिहितात, “विजयन म्हणत होते की तुमचा विरोधक तुम्हाला जिवंत मिळाला तर त्याला बांधून पोत्यात घाला. नंतर जमिनीत खोल खड्डा खणून ते पोतं त्यात टाका. वरून भरपूर मीठ घालून तो खड्डा बुजवा. कोणाला काही कळणार ही नाही..!

अश्या क्रूर काळजाचा माणूस आज केरळ चा मुख्यमंत्री आहे..!

गेल्या साठ – सत्तर वर्षांची कम्युनिस्टांची शैली ही भयानक दहशतवादाची राहिलेली आहे. कम्युनिस्टांना फक्त हत्या करायची नसते, तर अत्यंत क्रूर, पाशवी आणि बीभत्स पद्धतीने करायची असते, ज्या द्वारे एक जबरदस्त दहशत लोकांमध्ये पसरेल. त्यामुळे त्यांनी केलेल्या सर्व हत्या या अश्या नृशंस आणि निर्घृण प्रकारातच मोडतात.

साधारण दर पाच वर्षानंतर केरळात डाव्यांची सत्ता येते. अशी सत्ता आल्यावर त्यांच्या क्रौर्याला उधाण येतं अन संपूर्ण प्रशासन तंत्र ते या कामासाठी वापरतात. सध्याचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी गृहखाते स्वतःजवळ ठेवलंय ते या साठीच..! या संदर्भातलं एक उदाहरण सांगता येईल –

के. टी. जयकृष्णन हा तरुण भाजयुमो चा प्रदेश उपाध्यक्ष होता, शिवाय शाळेत शिकवणारा लोकप्रिय शिक्षक ही. त्याने अनेक तरुणांना भाजयुमो च्या कामात आणले, ज्यात मार्क्सवादी तरुणही होते. झालं. मार्क्सवादी चवताळले. आणि पाच मार्क्सवादी गुंडांनी भरदिवसा, शाळेत शिरून, जयकृष्णन शिकवत असताना, त्या लहान मुलांसमोर त्याचा निर्घृण खून केला. भर वर्गात केलेल्या ह्या खुनामुळे केरळ हादरलं. सरकारला काही एक्शन घेणं भाग होतं. ते ५ मार्क्सवादी गुंड पकडल्या गेले. २००३ मधे जिल्हा न्यायालयाने त्यांना आजन्म कैदेची शिक्षा सुनावली. २००५ मधे केरळ उच्च न्यायालयानेही हीच शिक्षा कायम ठेवली. अपिलात प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. २००६ मधे न्याय देताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने केरळ पोलिसांवर भरपूर ताशेरे ओढले. न्यायमूर्तींनी म्हटलं की ‘पोलिसांपेक्षा जास्त हिंमत त्या वर्गातल्या लहानश्या विद्यार्थ्यांनी दाखविली. मात्र पोलिसांनी या प्रकरणात कुठंही गंभीरतेनं काम केल्याचं दिसत नाही’. आणि पाच पैकी चार आरोपी पुराव्या अभावी निर्दोष सुटले. दिल्लीत तेंव्हा डाव्यांच्या मदतीने चालणारे युपीए सरकार होते. त्यात मार्क्सवाद्यांनी चावी फिरवली अन फक्त सहा महिन्यात तो पाचवा आरोपी ही निर्दोष सुटला.

भर वर्गात जयकृष्णन या शिक्षकाचा निर्घृण पणे खून करणारे पाचही मार्क्सवादी गुंड, आज उजळ माथ्यानं केरळ मधे हिंडत आहेत..!

मार्क्सवाद्यांची हीच कार्यशैली आहे. शासकीय यंत्रणेचा पुरेपूर वापर करत, आपल्या कार्यकर्त्यांना ते अलगद वाचवतात.

हा हिंसाचार बंद करण्यासाठी संघाने, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी बोलणी करण्याचे तीन प्रयत्न केले.

पन्नास च्या दशकात, आधी केरळ मधे प्रांत प्रचारक असणाऱ्या दत्तोपंत ठेंगडींनी पुढाकार घेतला. त्या काळचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते राममूर्ती यांच्याशी एर्नाकुलम येथे सविस्तर चर्चा झाली. पण नंतरही कम्युनिस्टांचे हल्ले चालूच राहिले. दुसरा प्रयत्न केला, तत्कालीन ‘भारतीय विचार केंद्राचे’ संयोजक असलेल्या पी. परमेश्वरन यांनी. त्यांच्या पुढाकाराने संघाचे दोन वरिष्ठ प्रचारक, भास्कर राव कळंबी आणि रंगा हरी, हे केरळ चे तत्कालीन मुख्यमंत्री के. नयनार यांना दिल्लीत भेटले. मात्र या बैठकीचाही फार काही लाभ झाला नाही.

तिसरा प्रयत्न केला, न्यायमूर्ती व्ही. आर. कृष्णा ऐय्यर यांनी. मात्र ह्या सर्व बैठकींतून हेच निष्पन्न होत होतं की मार्क्सवाद्यांचं ‘कॅडर’ हे शांती वार्ते साठी तयार नाही. मुळात मार्क्सवाद हाच ‘संघर्ष’ ह्या संकल्पनेवर आधारित असल्यामुळे त्यांना संघर्षाचीच ‘ओढ’ जास्त होती. एका प्रसंगी तर मार्क्सवादाचे अर्ध्वयू म्हणवले जाणारे ई एम एस नंबुदरीपाद म्हणाले, “We will take up arms against RSS”

संघ ह्या हल्ल्यांना तोंड देऊ शकतो का..? जास्त स्पष्टपणे मांडायचं तर संघ ह्या हल्ल्यांचा प्रतिकार करू शकतो का..? याचं सरळ उत्तर आहे, होय. संघटीत शक्तीच्या रुपात संघाची ताकद केरळ मधे जबरदस्त आहे. त्यामुळे संघाने मनात आणलं तर केरळ मधे मार्क्सवादी कार्यकर्त्यांना पळता भुई थोडी होईल, हे निश्चित..!

पण मुळात संघाचा तो मार्गच नाही. संघाचा उद्देश स्पष्ट आहे. संघाला साम्यवाद संपवायचा आहे, साम्यवादी नाहीत ! गेल्या चार – पाच वर्षात संघाजवळ आलेल्या अधिकांश कार्यकर्त्यांमधे अधिकतर हे जुने कम्युनिस्ट आहेत. कम्युनिझम च्या विचारधारेला आणि त्यांच्या कार्यशैली ला कंटाळून ते सारे, संघ स्वयंसेवक झालेले आहेत. त्यामुळे ‘प्रत्यक्ष प्रतिकाराचा’ मार्ग हा संघाचा मार्ग नाही हे निश्चित..!

आणि म्हणूनच संघाने केरळच्या ह्या लाल दहशतवादा विरुध्द एक राष्ट्रव्यापी आंदोलन छेडायचे ठरविले. त्यापूर्वी २४ जानेवारी ला दिल्लीत केरळ भवन वर जनाधिकार समिती तर्फे एक धरना आंदोलन झाले, ज्यात संघाचे सह-सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे शामिल झाले. मात्र हे सर्व होऊनही संघ स्वयंसेवकांच्या हत्येचं सत्र थांबलं नाही म्हणून १ मार्च ला संघाने देशव्यापी धरणे आंदोलन करायचा निर्णय घेतला. हे प्रदर्शन ‘जनाधिकार समिती’ आणि तिच्या सहयोगी मंचांद्वारे होणार होते.

आणि १ मार्च ला कम्युनिस्टांच्या विरोधात देश भर जे प्रदर्शन झाले, ते फार जबरदस्त होते. अभूतपूर्व होते. देशाच्या काना कोपऱ्यात, अक्षरशः प्रत्येक जिल्ह्यात हे प्रदर्शन झाले. या निमित्ताने केरळ चा ‘लाल आतंक’ लोकांसमोर आला.

बंगळुरू - १

पूर्ण देशभरात, साधारण एक हजार ठिकाणी झालेल्या ह्या प्रदर्शनांमध्ये बारा लाखांपेक्षा जास्त लोकं शामिल झाले. नागपुर ला संघाचे सरकार्यवाह मान. भैय्याजी जोशी यांच्या नेतृत्वात भव्य ‘धिक्कार रैली’ काढण्यात आली. भोपाळ ला संघाचे सह प्रचार प्रमुख जे. नंदकुमार यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन झाले. बंगळूर ला क्षेत्रीय संघचालक नागराज आणि भाजप च्या दिल्ली च्या खासदार मिनाक्षी लेखी यांनी केरळ च्या कम्युनिस्टांचे क्रौर्य लोकांसमोर आणले. भुवनेश्वर, चेन्नई, कोलकाता, शिमला, इंदूर, जयपूर, गुवाहाटी, जम्मू, अहमदाबाद… या सर्व ठिकाणी केरळ च्या लाल दहशतवादाला विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

मार्क्सवादी हिंसाचार - ४

सोशल मिडिया मधे ही ह्या लाल दहशतवादा विरोधात मोठे आंदोलन उभे राहिले. १ मार्च ला ट्विटर वर #EndViolanceCPM हा हेश टेग पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत होता.

संघाच्या ह्या देशव्यापी आंदोलनाने मार्क्सवादी खवळले आहेत. याचा प्रतिशोध म्हणून गेल्या आठवड्याभरात संघ आणि भाजप कार्यकर्त्यांवरचे हल्ले वाढले आहेत. केंद्र शासनाची अगतिकता अशी की एका विशिष्ट सीमेबाहेर ते राज्य शासनाच्या कारभारात हस्तक्षेप करू शकत नाहीत. मग त्या वेळेस राज्य शासनाची बरखास्ती हा एकच मार्ग उरतो.

मात्र ह्या सर्व विषम परिस्थितीत एक मात्र निश्चित की केरळ चा स्वयंसेवक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही ठामपणे उभा आहे. आजुबाजूला मृत्यू चे तांडव चालू असतानाही अत्यंत समर्पित भावनेने आणि निर्भयपणे काम करणारा केरळ चा स्वयंसेवक म्हणजे हिंदुत्वाचे खरे-खुरे, चालते बोलते प्रतीक आहे. त्यांच्या ह्या विजीगिषु वृत्तीने लवकरच केरळ मधे कम्युनिस्टांना फार मोठे वैचारिक हादरे बसायला लागणार आहेत, हे स्पष्टपणे दिसतंय..!
– प्रशांत पोळ

श्री यंत्राचे रहस्य…?

गूढ वाटत असलेल्या ‘श्री यंत्रावर’ एक प्रकाशझोत.

त्या घटनेला आता २६ – २७ वर्षे होऊन गेलेली आहेत. मधल्या काळात ती घटना परत तिथे घडल्याचं ऐकिवात नाही. पण १९९० च्या ऑगस्ट महिन्यात, अमेरिकेतला उन्हाळा आपलं उग्र रूप दाखवत असताना, अमेरिकेच्या ओरेगॉन प्रांतात ती घटना घडली. एका कोरड्या ठक्क पडलेल्या तळ्याच्या मातीवर भारतीय ‘श्री यंत्राची’ प्रतिकृती उमटलेली दिसली. अन वेगवेगळ्या कथा, कल्पनांना ऊत आला…!

बरं, ही घटना कोणी एखाद्या चेष्टेखोर माणसाने गंमत म्हणून सांगितलेली नव्हती, तर अमेरिकन एयर फोर्स च्या ‘एयर नेशनल गार्ड’ च्या पायलट ने ती घटना बघितलेली होती. आणि नुसतीच बघून तिचे रिपोर्टिंग केलेले नव्हते, तर त्या ‘श्री यंत्राच्या’ आकृतीचे फोटो ही काढले होते..!

%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%af%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a5%a7
इडाहो, ह्या शेजारच्या लागून असलेल्या प्रांताच्या ‘बॉईस एयर बेस’ वर ‘बिल मिलर’ हा पायलट तैनात होता. १० ऑगस्ट १९९० ला तो आपल्या नियमित उड्डाणावर होता. उड्डाण करताना, खाली बघत असताना त्याला ओरेगॉन च्या कोरड्या, वाळलेल्या सरोवरात एक आकृती दिसली. आता इतक्या उंच विमानातून दिसणारी आकृती तशी मोठीच असणार..! बिल च्या म्हणण्याप्रमाणे ती साधारण पाव मैल तरी लांब असावी. म्हणजे जवळपास अर्धा किलोमीटर लांब..!

आता इतकी मोठी आकृती तिथे आधीपासून असणं हे संभव नव्हतं. कारण एयर नेशनल गार्ड च्या पायलटांच्या नजरेतून ती सुटणं शक्यच नव्हतं. अर्थात ती आकृती नवीनच बनलेली होती हे निश्चित..!

परत आपल्या तळावर आल्यावर लेफ्टीनेंट बिल मिलर ने ही बातमी आपल्या वरिष्ठांना सांगितली. ओरेगॉन प्रांताच्या ‘सिटी ऑफ बर्न्स’ पासून साधारण सत्तर मैलांवर ही रहस्यमय आकृती आहे, असे त्याने सांगितले.

ओरेगॉन, इडाहो, नेवाडा . . . हा अमेरिकेतला तसा डोंगराळ आणि काही प्रमाणात वाळवंटी भाग. मात्र ह्या राज्यांचे आकार आणि विस्तार प्रचंड आहेत. ओरेगॉन मधे १९८१ ते १९८५ या काळात ओशो रजनीश वास्तव्याला होते, म्हणून अनेक भारतीयांना ‘ओरेगॉन’ हे नाव परिचित आहे.

त्या बिल मिलर ला हिंदू धर्म, श्री यंत्र वगैरे गोष्टी माहीत असण्याचं काहीच कारण नव्हतं. म्हणून त्याने त्या आकृतीला एखाद्या मशीन ची (अर्थातच यंत्राची) आकृती म्हटले.

अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन त्या प्रकाराची पुष्टी केली. ती आकृती प्रत्यक्षात दिसल्यावर त्या जागेला ‘सील’ करण्यात आलं. ती आकृती जमिनी च्या पृष्ठभागात तीन ते दहा इंच दाबून / खणून तयार केलेली होती. त्या सर्व रेषांची लांबी मोजली तर ती साधारण साडे तेरा मैल होत होती. बरं, त्या आकृती शेजारी कसल्याही प्रकारचे बुटांचे किंवा टायर्स चे निशाण नव्हते. ही अशी रहस्यमय आकृती कश्या प्रकारे आणि कशी निर्माण झाली हे न समजल्याने तेथील अधिकाऱ्यांनी प्रारंभी ही बातमी दाबून ठेवली.

या घटने नंतर साधारण महिन्याभराने, अर्थात १५ सप्टेंबर, १९९० ला डॉन न्यूमन आणि एलेन डेकर या दोन संशोधकांनी ह्या जागेला भेट दिली. तेंव्हा पर्यंत ती आकृती तशीच होती. सुरुवातीला शास्त्रज्ञांना वाटलं की उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत, जिथे मैलन मैल पसरलेली शेतं असतात, तिथे पिकं चांगली येण्यासाठी ‘क्रॉप सर्कल्स’ तयार करण्याची पध्दत आहे, त्याच प्रकारची ही आकृती असेल. मात्र निरीक्षणा नंतर त्यांच्या लक्षात आलं की ही आकृती हिंदूंशी संबंधित आहे. पुढे त्यांना ही आकृती म्हणजे ‘श्री यंत्र’ आहे, हे देखील कळालं. मात्र ही अशी अत्यंत प्रमाणबध्द आणि अतिशय विशाल आकृती जमिनीवर तयार होताना आजूबाजूला बुटांच्या, टायर्स च्या कसल्याही खुणा नाहीत, हे जरा आश्चर्यकारक होतं. म्हणून या संशोधनानंतर त्यांच्या मित्राने, डॉ. जेम्स डियरडोर्फ ने, ‘यु. एफ. ओ.’ (अन आयडेंटीफाईड ऑबजेंक्ट्स) मासिकात या घटनेवर एक स्टोरी केली आणि ही आश्चर्यकारक घटना साऱ्या जगासमोर आली.

अर्थातच ‘अंतराळातल्या काही अदृश्य शक्तींनी ही आखणी केली असावी’ अश्या प्रकारच्या किश्श्यांना ऊत आला. तश्यातच ओरेगॉन मधल्या दोन तरुणांनी सांगितले की ह्या आकृत्या आम्हीच काढल्या आहेत. त्यांना जेंव्हा विचारले की ‘ही इतकी प्रमाणबध्द आकृती तुम्ही दोघं इतक्या विशाल प्रमाणावर कशी काय आखू शकलात..? तर जमिनीवर राहू द्या, ह्या कागदावर तरी ही आकृती काढून दाखवा.’

अर्थात दोघांनाही ते जमले नाही आणि त्यांनी तेथून पळ काढला.

तेंव्हा पासून आजपर्यंत ह्या प्रमाणबध्द, आखीव-रेखीव आणि विशाल श्री यंत्राच्या आकृतीचं रहस्य गुलदस्त्यातच आहे…!

‘श्री यंत्र’ हा शब्द ‘गुगल’ केला तर आपल्याला धार्मिक, तांत्रिक अश्या प्रकारचे रिझल्ट मिळतात. नेट वर ‘श्री यंत्र’ विकत मिळतात. अगदी वीस – पंचवीस हजारांचे ‘श्री यंत्र’ ही उपलब्ध आहेत. ‘श्री यंत्राच्या’ वापरामुळे मनुष्याला पैसा आणि इतर हवं ते कसं मिळवता येतं याच्याच जाहिराती दिसतात. थोडक्यात काय, तर ‘श्री यंत्र’ हे श्रद्धा किंवा अंधश्रद्धा पसरविण्याचं मोठं दुकान झालेलं आहे. आणि दुर्दैवाने ‘श्री यंत्राच्या’ होणाऱ्या बुवाबाजी पायी, त्याचे खरे सामर्थ्य, त्याची ताकद, त्यातील लपलेलं गूढ हे लोकांपर्यंत पोहोचतच नाही.

गेल्या दीड – दोनशे वर्षात भौतिक शास्त्रात एक नवीन शब्द ‘कॉईन’ झालाय – ‘सिमेटीक्स’. ग्रीक शब्दापासून तयार झालेल्या ह्या शास्त्राचा संबंध, ध्वनी लहरींपासून निर्माण होणाऱ्या फॉर्मेशन्स च्या संबंधात आहे. सतराव्या शतकात अर्न्स्ट क्लाड्नी ने ह्या शास्त्रावर प्रारंभिक काम केले. मात्र स्विस शास्त्रज्ञ ‘हांस जेनी’ (१९०४ – १९७२) ने ह्याला संपूर्ण आकार दिला.

%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%af%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a5%a7

त्याने पाणी, रेती, माती सारख्या वेगवेगळ्या माध्यमांवर काही ध्वनी लहरी सोडून त्याचे प्रयोग केले. अत्यंत शास्त्रशुध्द रीतीने केलेल्या ह्या प्रयोगांना जगभर मान्यता मिळाली. वेगवेगळ्या ध्वनी लहरींमुळे निर्माण होणाऱ्या पेटर्न्स चा त्याने अभ्यास केला. हे पेटर्न्स निर्माण करण्यासाठी त्याने क्रिस्टल ऑसिलेटर्स वापरून ‘टोनोस्कोप’ हे यंत्र तयार केले.

खरी गंमत तर पुढेच आहे….

हे टोनोस्कोप वापरून त्याने काही भारतीय साधुंना, स्वामींना ॐ शब्दाचा उच्चार करायला लावला. आणि गंमत म्हणजे पाण्यात आणि रेतीवर ॐ मुळे ज्या लहरी निर्माण झाल्या त्यांनी ‘श्री यंत्राचे’ फॉर्मेशन तयार केले. अगदी तसेच. प्रमाणबध्द…!

%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%af%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a5%a9

हांस जेनी ने अनेकांकडून ॐ म्हणवून घेतले. ॐ चा जितका जास्त शुध्द उच्चार, तितकीच प्रमाणबध्द ‘श्री यंत्राची’ आकृती निर्माण होत होती…!

अर्थातच ‘श्री यंत्रात’ जबरदस्त ताकद लपलेली आहे आणि ती आपल्या पूर्वजांना काही हजार वर्षे आधी माहीत होती…!

%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%af%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%93%e0%a4%ae-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%9f%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0

‘श्री यंत्र’ ही अत्यंत जटील आणि व्यामिश्र (कॉम्प्लेक्स) रचना आहे. सामान्य माणसाला त्याचे आरेखन करणे कठीण आहे. या यंत्राच्या केंद्रात एक बिंदू आहे. ह्या बिंदूच्या चारी कडे, एकात एक अडकलेले असे ९ त्रिकोण आहेत. ह्यातील चार वरच्या दिशेने, तर पाच खालच्या दिशेने आहेत. ह्या ९ त्रिकोणांच्या गुंतण्याने एकूण ४३ लहान त्रिकोण तयार होतात, आणि ते अत्यंत प्रमाणबध्द आहेत.

मात्र ‘श्री यंत्राचं’ वैशिष्ठ्य इतकेच नाही. या त्रिकोणांमध्ये ‘फाईबोनेची संख्येचे’ सूत्र आणि ‘गोल्डन रेशो’ मिळतात. ही ‘फाईबोनेची संख्या’ काय आहे..? इटली मधल्या ‘पिसा’ शहराच्या ‘फाईबोनेची’ नावाच्या गणितज्ञाच्या नावावर जगभर चालत आलेली ही संख्या आहे. सन १२०२ मधे ‘फाईबोनेची’ ने ह्या वर पुस्तक लिहिले. आपल्या भारतीयांचे दुर्दैव असे की ही संख्या प्रणाली मुळात भारतीयांनी शोधलेली असली, तरी जगाला मात्र त्याची ओळख आहे ती फाईबोनेची या नावाने. या फाईबोनेची ने, भारतीय गणित शास्त्राची जी पुस्तकं तत्कालीन अरबांनी अनुवादित केली होती, त्या पुस्तकावरून ही संख्या प्रणाली घेतलेली आहे, असे त्यानेच म्हणून ठेवलेले आहे.

फाईबोनेची च्या दीड हजार वर्षं आधी, महर्षि पिंगल शास्त्रींनी त्यांच्या ‘छंद शास्त्राच्या’ पुस्तकात अश्या प्रकारच्या गणितीय संख्येचा विस्ताराने उल्लेख केलेला आहे. त्यांच्या नंतर ६ व्या शतकात विरहंका, सन ११३५ मधे गोपाळ आणि सन ११५० मधे हेमचंद्र शास्त्रींनी ह्या संख्येवर अनेक समीकरणं मांडली आहेत.

तर मुद्दा असा की पिंगल शास्त्रींनी जी गणितीय श्रेणी यात मांडलेली आहे, त्याच्याच अनुसार ‘श्री यंत्राचे’ त्रिकोण निर्माण होताहेत. ‘मेरू प्रस्तर’ (मेरू पर्वत चढण्याच्या पायऱ्या) च्या प्रमाणे हे त्रिकोण तयार झाले आहेत, ज्याला अनेक शतकांनतर ‘पास्कल त्रिकोण’ म्हटल्या गेले. ‘श्री यंत्रात’ मध्यभागी (खालच्या दिशेने असलेला) त्रिकोण आहे. ह्या त्रिकोणाच्या ३ भुजा एकूण ५४ बिंदूंना छेदतात. संयोग म्हणजे संस्कृत मधे ५४ मुळाक्षरं आहेत.

गोल्डन रेशो हा संख्यांचा अनुपात आहे. याची किंमत १.६१८०३ आहे. दोन संख्याचा अनुपात आणि ह्या दोन संख्यांची बेरीज आणि यातील मोठ्या संख्येचा अनुपात हे जर समान असतील तर त्याला गोल्डन रेशो (सुवर्ण अनुपात) म्हणतात. पाय आणि फाय चा अनुपात हा सुवर्ण अनुपात म्हणवला जातो. इजिप्त च्या पिरामिड च्या रचनेत या सुवर्ण अनुपाताचा उपयोग झालेला आहे. आणि विशेष म्हणजे या ‘श्री यंत्रात’ जे त्रिकोण निर्माण होतात, त्या त्रिकोणांच्या बाजूंमध्ये हा ‘सुवर्ण अनुपात’ अर्थात १.६१८०३, आढळून येतो..!

हे सारंच अद्भुत आहे…! अत्यंत व्यामिश्र अश्या गणितीय रचनेतून ‘श्री यंत्र’ तयार होते. तेच ‘श्री यंत्र’ ॐ ध्वनीच्या लहरींनी तयार होते आणि अमेरिकेतल्या ओसाड, वाळलेल्या सरोवरात कोणीतरी भव्य आणि विशाल असे प्रमाणबध्द ‘श्री यंत्र’ काढून ठेवते…!

साधारणतः पौराणिक मान्यतांमधे ‘श्री यंत्राची’ अधिष्ठात्री देवी त्रिपुर सुंदरी मानली जाते. शं‍कराचार्यांपासून अनेकांनी याचा उल्लेख केलेला आहे. ‘श्री यंत्राला’ समृध्दी चं प्रतीक मानल्या जातं.

हे ‘श्री यंत्र’ किंवा ‘श्री चक्र’ भारतातील आणि दक्षिण-पूर्व आशियातील अनेक मंदिरांमधे आहे. चेन्नई चं कामाक्षी मंदिर, कलिकंबल मंदिर, श्रीरंगपट्टणम चं निमिशंबा मंदिर, जयपुर चं काली मंदिर इत्यादी. यातील सर्वात शास्त्रशुध्द पद्धतीने ‘श्री यंत्रावर’ बांधलेलं मंदिर आहे, शं‍कराचार्यांचे आद्य पीठ असलेल्या शृंगेरी मठात…!

तर असं आहे ‘श्री यंत्रा’ चं गूढ. पूर्णपणे वैज्ञानिक आणि गणितीय सिद्धान्तांवर आधारलेलं अत्यंत प्राचीन असं ‘श्री यंत्र’ आज बुवाबाजीच्या विळख्यात अडकलंय, आणि त्यामुळे याची खरी ताकद जगापर्यंत पोहोचतच नाहिये, हीच खंत आहे…!
– प्रशांत पोळ

महाराष्ट्राचं राजकारण बदलून टाकणाऱ्या निवडणुका…!

महाराष्ट्रातल्या ‘मिनी विधानसभा’ समजल्या जाणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत. सर्वत्र स्थिती स्पष्ट झालेली आहे. आणि निवडणुकांनंतर चा धुरळा ही आता खाली बसत चालला आहे.

या प्रसंगी आठवण होते ती चार – पाच महिन्यांपूर्वीच्या परिस्थितीची. आपल्या महाराष्ट्रात तेंव्हाची परिस्थिती कशी होती..? राज्यभरात मराठा समाजाचे मोठ मोठे मोर्चे निघत होते. राज्यभर भाजप सरकार विरोधातलं वातावरण तापवणे चालू होते. महाराष्ट्र परत जाती – बिरादरी च्या झगड्यात होरपळून निघतो की काय, असे चित्र निर्माण होत होते. मु’ख्यमंत्री ब्राम्हण आहे’, या एकाच निकषावर त्यांचा विरोध होत होता. ‘पुढील महिन्यातच भाजप चं केंद्रीय नेतृत्व, ब्राम्हण मुख्यमंत्री हटवून त्या जागी मराठा मुख्यमंत्री नेमणार’ असं छातीठोक पणे सांगणारे भाजप चे नेते ही दिसत होते. तश्यातच दिवाळी नंतर नोटबंदी झाली. त्या विरोधात शिवसेने सारखा पक्ष ही चक्क ममता बेनर्जींनी पुकारलेल्या मोर्चात शामिल झाला. एका विकसित आणि तरीही विकासोन्मुखी अश्या महाराष्ट्र राज्याचे आता पुढे काय होणार असे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले होते..!

आणि आज..? आज या साऱ्यांचा मागसुमही नाही. अगदी खणखणीतपणे भाजप ने राज्यात आपले वर्चस्व सिद्ध केलेले आहे. दहा पैकी आठ महानगर पालिका आपल्या खिशात घातल्या आहेत. जिल्हा परिषदांमधेही आपली दमदार उपस्थित नोंदवली आहे. विरोधक गपगार झालेले आहेत. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भरजरी शिरपेचात रत्नजडीत मोत्याचा तुरा खोवल्या गेला आहे..!

%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a5%a9

हे कर्तुत्व जितकं पक्षाचं, त्याहीपेक्षा जास्त, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं. अगदी एकहाती निवडणूक त्यांनी खेळली, रंगविली, लढली आणि दणदणीतपणे जिंकूनही दाखविली. ह्या निवडणुकांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला एक महत्वपूर्ण वळण दिलेलं आहे. यापुढील राज्याच्या राजकारणाचे संदर्भ पूर्णपणे बदलणार आहेत. आणि म्हणूनच ह्या निवडणुकीच्या निकालांचा सर्व पक्षांनी नीट विचार करणं आवश्यक आहे.

भाजप ला जे यश मिळालंय ते अनेकांच्या दृष्टीने आश्चर्यकारक आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर भाजप जिंकेल असं अनेक राजकीय विश्लेषकांनाही वाटलं नव्हतं. आणि म्हणूनच भाजप ने ह्या निवडणूक निकालांचे मनन करणे आवश्यक आहे.

ह्या निवडणुकीत भाजप ने अनेक ‘आयातीत’ उमेदवारांना तिकीटं दिली. अनेक गुंडांनाही पावन केलं. त्यातले अधिकांश निवडणूक जिंकले. मात्र याचा अर्थ मतदारांनी भाजपच्या या धोरणाला ‘एंडोर्स’ केलंय असा होत नाही. या निवडणुकीत मतदारांनी मुख्यमंत्र्‍यांच्या प्रतिमेला, गुड गव्हर्नेंस ला आणि भाजप च्या धोरणांना बघून मतदान केलं. राजकारणात आणि विशेषतः निवडणुकात अंतिम विजयाच्या दृष्टीने काही तडजोडी कराव्या लागतात, हे तर कोणीही समजू शकेल. पण त्यांचे प्रमाण किती..? आणि म्हणूनच भाजपच्या रणनीतीत हा प्रकार म्हणजे ‘ट्रेंड सेटर’ ठरू नये. संगठनात्मक दृष्ट्‍या मजबूत असलेल्या जागी, कार्यकर्त्यांना डावलून बाहेरच्या मंडळींना घेऊन निवडणूक लढविणे हे यापुढे योग्य होणार नाही.

दुसरे महत्वाचे म्हणजे इतक्या दणदणीत विजयानंतर भाजप समोर फार मोठी जवाबदारी आलेली आहे. या सर्व नागरी संस्थांमध्ये भाजप ला आता भ्रष्टाचार मुक्त, वेगवान प्रशासन असलेलं शासन द्यावं लागणार आहे. त्या साठी फार मोठी योजना आखावी लागेल. त्या ताकदीची, तज्ञ असलेली प्रमाणिक माणसं शोधून त्यांना कामावर लावावं लागेल, तरच मतदारांच्या या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण होतील.

शिवसेनेला जरी मुंबईत एका हाती सत्ता मिळाली नाही, तरी या पक्षाला कमी लेखून चालणार नाही. निकालानंतर ‘आमची शाखा फक्त मुंबई-ठाण्यातच..’ यासारखे विनोद झाले असले तरी हे काही खरे नाही. आज हिंदुत्वाची कास धरलेल्या, लोकांच्या मनातील मुद्द्यांवर संवेदनशील असलेला ‘शिवसेना’ हा पक्ष राज्यव्यापी आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांतही शिवसेनेचे ठळक अस्तित्व दिसून आलेले आहे. नाशिक मधे महापालिकेत जरी भाजप कडे बहुमत असले तरी जिल्हा परिषदेत ४० जाणा घेऊन शिवसेना बरीच पुढे आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत. एकट्याच्या बळावर निवडणुका लढवूनही शिवसेनेला जे यश मिळालं, ते वाखाणण्या सारखंच आहे.

%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a5%aa

मात्र बाळासाहेबांच्या काळात शिवसेनेत जशी खंद्या लढ्वैय्यांची फौज होती, तसं चित्र आज नाही. तेंव्हा मनोहर जोशी, छगन भुजबळ, प्रमोद नवलकर, दत्ताजी नलावडे, आनंद दिघे, सुधीर जोशी… असे अनेक नेते शिवसेनेला मजबूत करत होते. तशी फळी आज जाणीवपूर्वक उभारावी लागेल. हिंदुत्व वादी पक्ष असं नुसतं म्हणून होणार नाही तर त्यासाठी लढा द्यावा लागेल. हिंदुंवर होत असलेल्या अत्याचारांविरुध्द ममता बेनर्जींना खडसावून विचारावं लागेळ. शिवाय लोकांच्या लहानमोठ्या प्रश्नांवर आंदोलनं, काही सकारात्मक प्रकल्प, समाजकारण या साऱ्या गोष्टी शिवसेनेला सातत्यानं चालू ठेवाव्या लागतील तरच जवाबदार विरोधी पक्ष म्हणून त्यांचं भवितव्य आहे.

फडणवीस सरकार चा पाठिंबा शिवसेना काढून घेईल का..? मला तसं वाटत नाही. तसं केलं तर ती शिवसेनेची घोडचूक ठरेल. सध्या लोकमताचा पाठिंबा हा भाजप ला आहे. अश्या वेळी त्यांचं सरकार पाडण्याचं पाप शिवसेनेनी केलं तर ती त्यांची राजकीय आत्महत्या ठरेल. माझ्या मते विधानसभा निवडणुकीच्या सहा महिने आधी शिवसेना पाठिंबा काढून घेईल.

%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a5%a7

मग दोन्ही पक्षांचं भवितव्य काय..? दोघांची मतपेढी एकच आहे. त्यामुळे दोघांत संघर्ष हा होतच राहणार. आणि सेना जर संकुचित वृत्तीच्या आणि ‘आम्ही शाईस्तेखानाची बोटं छाटली’ असं बोलणाऱ्या वाचाळ वीरांच्या ताब्यात राहिली तर सेनेची अधोगती निश्चित आहे.

मनसे बद्दल बोलणंच योग्य नाही. त्यांनी आपला गाशा गुंडाळावा हेच योग्य. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला आपापल्या मतपेढ्या सांभाळून ठेवण्याचं भविष्य काळातलं खूप मोठं आव्हान आहे.

जाता जाता – मात्र तरीही… महाराष्ट्राच्या मनात आहे की भाजप – शिवसेनेनं बरोबर चालावं. यातच या दोन्ही पक्षांचं हित आहे, आणि पर्यायानं महाराष्ट्राचंही..!
– प्रशांत पोळ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इस्लाम

बाबासाहेब आंबेडकरांचा भारताच्या एकूण राष्ट्रीय प्रवाहाबद्दल भरपूर अभ्यास होता. त्यांच्या प्रबंधाचा विषयच होता, “भारताचा राष्ट्रीय लाभांश – इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन (The National Divident of India – A Historical and Analytical Study)” अर्थातच भारताचा इतिहास, त्यातून आलेले सामाजिक प्रवाह, त्यात आलेल्या विकृती, मुस्लिम आक्रांता, त्यांनी केलेला विध्वंस या सर्वांबद्दल बाबासाहेबांनी विस्तृत आणि सखोल अध्ययन तर केलं होतंच, पण या सर्व विषयांवर त्यांनी नेहमीच आपली रोखठोक मतं मांडलेली आहेत.

२८ डिसेंबर, १९४० ला त्यांचं Thought on Pakistan हे पुस्तक प्रकाशित झालं. तेंव्हापर्यंत पाकिस्तान चा मुद्दा तापला होता, पण ऐरणीवर आलेला नव्हता. पुस्तक प्रकाशित होताना दुसरं महायुध्द सुरु झालेलं होतं. या पुस्तकात बाबासाहेबांनी इस्लाम बद्दल आणि पाकिस्तान च्या निर्मिती बद्दल काहीही आडपडदा न ठेवता अत्यंत स्पष्टपणे आणि निर्भीडपणे आपली मतं मांडलेली आहेत. त्यांनी फाळणीच्या समर्थनाची भूमिका घेतली आहे. इस्लाम पासून ‘सुटका’ करून घेण्यासाठी फाळणी किती आवश्यक आहे, याचं वारंवार समर्थन केलेलं आहे. मुसलमानांबरोबर हिंदुंचं सहअस्तित्व शक्य नाही, हे त्यांनी दमदारपणे मांडलं आहे. आणि म्हणूनच फाळणी होताना लोकसंख्येच्या अदलाबदली चं तत्व त्यांनी आवश्यक म्हटलेलं आहे.

महत्वाचं म्हणजे, पुढे हिंदू – मुसलमान दंगली, नंतर फाळणी, स्वातंत्र्य, संविधानाची निर्मिती ह्या सर्व प्रक्रियांनंतरही त्यांची मतं या विषयावर ठाम आहेत. फाळणी होताना लोकसंख्येची अदलाबदल होऊ शकली नाही, तरीही बाबासाहेबांना फाळणी होणं ही चांगली घटना वाटतेय. पाकिस्तानावरील पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर, पंधरा वर्षांनी त्यांनींच लिहिलेल्या एका लेखात ते मुसलमानांना चक्क ‘शाप’ ह्या शब्दाने संबोधतात. महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या त्यांच्या Dr. Babasaheb Ambedkar – Writing and Speeches ह्या ग्रंथ साहित्याच्या पहिल्या खंडात १४६ व्या पानावर याचा स्पष्ट उल्लेख आहे. बाबासाहेब लिहितात –
”When partition took place, I felt that God was willing to lift his curse and let India be one, great and prosperous” (जेंव्हा फाळणी झाली, तेंव्हा मला वाटले की परमेश्वराने या देशावरील शाप काढून घेतला असून हा देश एकसंघ, महान आणि वैभवशाली बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे..!)

%e0%a4%86%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a5%a9

इथे ‘शाप’ हा शब्द कोणत्या अर्थी त्यांनी वापरला आहे, हे स्पष्ट आहे. इस्लामी आक्रमकांचा इतिहास त्यांना फार चांगला ठाऊक आहे. हिंदू आणि बौध्द धर्मियांवर मुसलमानांनी केलेले पाशविक अत्याचार त्यांना चांगल्याने माहीत आहेत. त्या अत्याचारांचा ते स्पष्टपणे उल्लेखही करताहेत. अर्थात या इस्लामी प्रजेपासून वेगळ होऊनच भारताचा विकास होऊ शकतो हे त्यांना ठामपणे जाणवतंय.

हे पुढे लक्षातही येतंय. त्यांच्या मृत्युच्या फक्त सहा महिन्यांपूर्वी, अर्थात २३ जून, १९५६ ला अखिल भारतीय बौध्दजन समितीच्या दिल्ली च्या सभेत बाबासाहेबांनी आपले हेच विचार अधिक स्पष्टपणे मांडले आहेत –
“I was glad that India was seperated from Pakistan. I was the philosopher so to say, of Pakistan. I advocated Pakistan because I felt that it was only by partition that Hindus would not only be independent, but free.”

त्यांच्या पाकिस्तान वरील ग्रंथात या सर्व बाबींचे सखोल विवेचन केलेले आढळते. त्यांच्या वकिली शैलीत त्यांनी पाकिस्तान विषयक लिहिताना दोन्ही बाजू मांडलेल्या आहेत.

‘मुस्लिम केस फॉर पाकिस्तान’ ह्या शीर्षकांतर्गत तीन प्रकरणं आहेत. त्यात ‘मुस्लिम लीग च्या मागण्या’, ‘राष्ट्राला ‘घर’ हवे’, ‘दुर्दशेपासून पलायन’ या सारख्या विषयांवर लिहिलेली प्रकरणं आहेत.

विशेषतः मुसलमानांनी, ‘मुसलमान हे वेगळे राष्ट्र असल्यानेच त्यांना भौगोलिक परिवेश हवा’ ही मागणी केल्यानंतर, राष्ट्रा संबंधी बरेच विवेचन केलेले आहे. मुसलमान जर स्वतंत्र राष्ट्र मागत असतील / मानत असतील तर मुळात भारत हे राष्ट्र राहतच नाही आणि मग ह्या सिद्धांताचा कसा जोरदार प्रतिवाद केला पाहिजे याविषयी समरसून लिहिलं आहे.

पुस्तकातली पुढील तीन प्रकरणं ही ‘हिंदू केस अगेन्स्ट पाकिस्तान’ ह्या शीर्षकाखाली आहेत. ‘ऐक्याचा बिमोड’, ‘संरक्षणाची दुर्बलता’, ‘पाकिस्तान आणि धार्मिक ऐक्य’ ह्या प्रकरणात पाकिस्तान निर्मिती च्या विरोधात हिंदूंची बाजू मांडलेली आहे.

पुढे ‘पाकिस्तान नाही झाले तर’ ह्या शीर्षकाखाली तीन प्रकरणे आहेत. यात पाकिस्तान चा पर्याय हा हिंदू आणि मुसलमानांच्या दृष्टीकोनातून दिलेला आहे.

शेवटची तीन प्रकरणे ही ‘पाकिस्तान निर्मितीची अस्वस्थता’ ह्या शीर्षकाखाली आहेत. यात सामाजिक बाबी, जातीय तेढ, राष्ट्रीय वैफल्य, या विषयांचा ऊहापोह केलेला आहे. आणि सर्वात शेवटी या संपूर्ण ग्रंथाचा गोषवारा त्यांनी उपसंहारात दिलेला आहे.

हे पुस्तक अनेक अर्थाने महत्वाचे आहे. बाबासाहेबांसारख्या कुशाग्र बुध्दिच्या माणसाने, हिंदू-मुस्लिम प्रश्नावर सांगोपांग विचार करून, विवेचन करून लिहिलेला हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ एखाद्या हिंदुत्वनिष्ठ चिंतकाने लिहिलेला नाही. तेंव्हा यात एकांगी विचार येण्याचा प्रश्नच नाही. उलट त्यांनी हिंदू धर्मावर अनेकदा प्रखर टीका केलेली आहे. त्यामुळे भारताचे संविधान बनविणाऱ्या, अत्यंत संयमित विचारांच्या माणसाने हा ग्रंथ लिहिलेला आहे, हे महत्वाचे आहे.

%e0%a4%86%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a5%a8

यात बाबासाहेब लिहितात, ‘भारतात हिंदू – मुसलमान एकता कधीच नव्हती. मुसलमान हे नेहमी शासक म्हणून भारतात राहिलेले आहेत, त्यामुळे ते त्याच मानसिकतेत सतत वावरत असतात. १८५७ चं ‘बंड’ हे देखील हिंदू – मुस्लिम ऐक्याचं उदाहरण नव्हतं, तर मुसलमानांनी आपली गेलेली ‘शासकाची’ भूमिका परत मिळविण्यासाठी ब्रिटीश सत्तेविरुध्द केलेलं हे बंड होतं.’ बाबासाहेब मुस्लिम धर्मा विषयी सविस्तर लिहितात – ‘मुसलमानांमध्येही समता नाही. त्या धर्मात स्त्रियांना वाईट वागणूक मिळते. मुसलमानांशिवाय अन्य ते सारे काफिर आणि या काफिरांना मुस्लिम देशात / समाजात अत्यंत हीन वागणूक मिळायला हवी, हे त्यांच्या धर्मातच लिहिलंय.’ या संदर्भात बाबासाहेब अनेक उदाहरणं देतात. अगदी तैमूरलंगाचं उदाहरण ही दिलेलं आहे, ज्यात त्याने केलेल्या बर्बर अत्याचारांचं वर्णन आहे.

मग अश्या मुसलमानांसोबत हिंदुंचं ऐक्य शक्य आहे का..? असेल तर ते कसे..? या संदर्भात या पुस्तकाच्या उपसंहारात बाबासाहेब लिहितात, ‘हिंदू – मुस्लिम ऐक्य हे अनुनय (appeasement) किंवा तडजोड (settlement) याच दोन मार्गांनी शक्य आहे.’ (If Hindu – Moslem unity is possible, should it be reached by appeasement or settlement..? – Chapter IV, Page 264).

ह्यात आलेला अनुनय (appesement) हा शब्द बाबासाहेबांनी मुसलमानांच्या संदर्भात, या ग्रंथात अनेक वेळा वापरला आहे. ‘कॉंग्रेस हा पक्ष मुसलमानांचा अनुनय (लांगुलचालन) करतो, जे देश हिताला घातक आहे.’ हे म्हणताना बाबासाहेब लिहितात –
Congress has failed to realize is the fact that there is a difference between appeasement and settlement and that the difference is an essential one (Chapter IV, Page 264).

याच प्रकरणात बाबासाहेब ‘अनुनय’ ह्या शब्दाची व्याख्या करतात. ते लिहितात –
‘अनुनय (लांगुलचालन) म्हणजे आक्रामकाचे हृदय जिंकण्यासाठी त्यांनी केलेल्या खून, बलात्कार आणि निष्पापांच्या लूटमारी कडे दुर्लक्ष करणे’’ (Appeasement means to offer to buy off the aggressor bu convincing at or collaborating with him in the rape, murder and arson on innocent Hindus, who happen for the moment to be the victims of his displeasure).

बाबासाहेब पुढे लिहितात –
Appeasement sets no limits to the demands and aspirations of the aggressor. अर्थात ‘कितीही अनुनय केला, आक्रामकाचे कितीही लांगुलचालन केले तरीही त्याच्या मागण्यांची सीमा नसते’.

जिन्नांच्या मागण्यांच्या संदर्भात बाबासाहेबांचे म्हणणे फार रोखठोक आहे. ते लिहितात –
‘जेंव्हा जिन्ना म्हणतात, मुसलमान हे वेगळे राष्ट्र आहे, तेंव्हा त्यांच्याशी भांडण्यात काही अर्थ नसतो. जेंव्हा जिन्ना म्हणतात, मुसलमानांना तर पाकिस्तान हवेच, कारण ते स्वतः एक स्वतंत्र राष्ट्र आहे, तेंव्हा मी म्हणतो, तुम्ही हिंदू लोकांच्या एका मोठ्या समूहाला घेऊन पाकिस्तान बनवू शकत नाही. कारण तुमच्याच सिद्धांताप्रमाणे ते ही एक स्वतंत्र राष्ट्र आहे’ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर – लेखन आणि व्याख्याने / खंड १७ / पुष्ठ ३२६)

येथे बाबासाहेब फार आग्रहाने लोकसंख्येच्या अदलाबदली चे प्रतिपादन करतात. पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानात सर्व मुसलमान आणि हिंदुस्तानात सर्व हिंदू ही त्यांची आग्रही भूमिका आहे आणि त्यांनी ठाम पणे ती मांडली आहे.

बाबासाहेबांची ही भूमिका पुढेही कायम राहिली आहे. भारत स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असताना २० जुलै, १९४७ चे त्यांचे प्रकाशित झालेले वक्तव्य आहे –
‘बंगाल आणि पंजाब चे विभाजन हा फक्त त्या प्रांतातील स्थानिकांचा प्रश्न नाही. हा राष्ट्रीय प्रश्न आहे. या प्रांतांच्या सीमारेषा ठरविणे हे संरक्षण आणि व्यवस्थापन या आधारावरच शक्य आहे. लोकसंख्येची अदलाबदली हे तत्व कॉंग्रेस ने आणि मुस्लिम लीग ने मानले असते तर ह्या समस्या निर्माण झाल्याच नसत्या. (खंड १७ / पृष्ठ ३५५).

पुढे ५ जून, १९५२ ला अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाने त्यांना ‘डॉक्टर ऑफ लॉज’ ही मानद उपाधी दिली. ह्या प्रसंगी बोलताना डॉ. आंबेडकर म्हणाले, ‘अमेरिकेतील सामान्य जनता पाकिस्तान मुळे प्रभावित आहे. अमेरिका ही पाकिस्तान कडे झुकलेली आहे.’

बाबासाहेबांनी १९३६ मधे धर्मांतराची घोषणा केली होती. दरम्यान त्यांनी अनेक धर्मांचा अभ्यास केला. त्या काळात ‘हैदराबाद संस्थान च्या नवाबाने त्यांना मुस्लिम धर्मात येण्या संबंधी काही कोटी रुपयांचे आमिष दिले होते’ असे धनंजय कीर यांनी बाबासाहेबांवर लिहिलेल्या चरित्रात म्हटले आहे. मात्र पुढे बाबासाहेबांचा कल बौध्द धर्माकडे गेल्यावर त्यांनी ‘इस्लाम आणि बौध्द’ संबंधांवर बरेच विवेचन केलेले आहे. इस्लामी आक्रमकांनी किती पाशविक पद्धतीने बौध्द भिक्खुंचा नाश केला, बुध्द विहारांना उध्वस्त केले या बद्दल सविस्तर लिहिले आहे. बाबासाहेब लिहितात, ‘बुत शिकन या शब्दाला मुस्लिम धर्मात आदराचे स्थान आहे. याचा अर्थ ‘मूर्ती फोडणारा’ असा होतो. यात ‘बुत’ हा ‘बुध्द’ शब्दाचा अपभ्रंश आहे.

बौध्द धर्म संपविण्यात मुस्लिम आक्रमकांचा मोठा वाटा आहे, असे बाबासाहेबांनी अनेक ठिकाणी म्हटलेले आहे.

पाकिस्तान आणि इस्लाम संदर्भात बाबासाहेबांची ही अशी सरळ आणि सुस्पष्ट भूमिका आहे. यात कुठेही संभ्रम नाही, की आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर भूमिका बदलणे नाही. हिंदू – मुस्लिम सह अस्तित्व शक्य नाही आणि म्हणूनच भारताची फाळणी योग्य आहे, असे सरळसोट प्रतिपादन आहे.

आजच्या संदर्भात मागे वळून बघितलं की फाळणी संबंधी बाबासाहेबांची भूमिका पटेल किंवा पटणार नाही, पण त्याचे द्रष्टेपण बघून मन थक्क होते…!

प्रशांत पोळ

कळसाला पोहोचलेली भारतीय शिल्पकला

सन १९५७ ची घटना आहे. उज्जैन ला राहणारे आणि पुरातत्व खात्याशी संबंधित असलेले डॉ. श्रीधर विष्णु वाकणकर हे आगगाडीने दिल्ली हून इटारसी ला जात होते, भोपाळ गेल्यावर त्यांना पर्वतांमध्ये काही फॉर्मेशन्स दिसली. डॉ. वाकणकरांना ती फॉर्मेशन्स ओळखीची वाटली, कारण त्यांनी तशीच फॉर्मेशन्स स्पेन आणि फ्रांस मधे बघितली होती. त्यामुळे डॉ. वाकणकरांचे कुतूहल जागृत झाले आणि पुरातत्व खात्याची एक टीम घेऊनच ते त्या पर्वतांमध्ये आले.

त्यांच्या ह्या प्रयत्नांनी इतिहासाचं, भारतीय कलेचं, शिल्पशास्त्राचं एक गवाक्ष काहीसं किलकिलं झालं. ही जागा म्हणजे भीमबेटका. येथे, सुमारे ४०,००० वर्षांपूर्वी भिंतींवर काढलेली चित्रं मिळाली. प्राचीन भारतीय कलेचा हा पहिला प्राप्त नमुना..!!

आज हे भीमबेटका, युनेस्को च्या संरक्षित स्मारकाच्या यादीत येतं. इथे साडे सातशे शैलाश्रयं किंवा शैलगृहं (सोप्या भाषेत ‘गुहा’) आहेत. यातील पाचशे शैलगृहांमध्ये चित्रकारी केलेली दिसते. या चित्रांमध्ये वाघ आहे, हरीण आहे, हत्ती आहेत, बैल, मोर वगैरे ही आहेत. मुख्य म्हणजे घोडा ही आहे. त्यामुळे घोडा भारतात अतिप्राचीन काळापासून होता हे सिद्ध झाले आहे. अन्यथा काही इतिहासकार, अरब आक्रमकांनी घोडे भारतात आणले असं सांगत होते.

भारतात जगाच्या इतर भागांच्या तुलनेने फार चांगली आणि शास्त्रशुध्द मूर्तीकला विकसित झाली. पण ती बऱ्याच नंतर. जगातल्या पहिल्या म्हणून म्हटलेल्या ज्या मूर्ती सापडलेल्या आहेत, त्यातील एकही मूर्ती भारतातली नाही. ‘लॉवेनमेंश फिगरीन’ म्हणून नावाजलेली जगातली पहिली म्हणवली जाणारी मूर्ती जर्मनी च्या आल्पस जवळच्या भागात सापडलेली आहे. ही साधारण तीस ते पस्तीस हजार वर्षे जुनी असावी, असं कार्बन डेटिंग चे परिणाम सांगताहेत.

इजिप्त मधे आढळलेले स्फिंक्स आणि इतर मूर्ती तश्या बऱ्याच नंतरच्या, म्हणजे इसवी सनापूर्वी अडीच हजार वर्षांच्या. रशियाच्या सैबेरिया भागात लाकडाची जी प्रतिमा सापडलेली आहे, तिला ‘शिगीर आयडॉल’ म्हटले जाते. ही मूर्ती सुमारे अकरा हजार वर्षांपूर्वी (अर्थात इसवी सनाच्या नऊ हजार वर्षांपूर्वी) लाकडावर कोरलेली आहे. तुर्कस्तानांत सापडलेल्या मूर्ती ह्या सहा हजार वर्षांपेक्षा जास्त प्राचीन आहेत. या मूर्त्यांमध्ये भारतीय शैली झळकते असे म्हटले जाते.

मुळात माती हे सहज सोपे माध्यम अगदी प्राचीन मूर्तींमध्ये आढळते. मात्र ‘माती’ ही चिरकाल टिकणारी नसल्याने मातीच्या जास्त मूर्ती सापडत नाहीत. फ्रान्स मध्ये आदिमानवांच्या गुहांमध्ये (Tuc d’ Audoubert) सुमारे पंधरा हजार वर्षांपूर्वीच्या मातीत बनलेल्या रानरेड्याच्या आकृती सापडतात. भारतात सिंधू घाटी मधील उत्खननात, भाजलेल्या मातीची काही चांगली शिल्पं सापडली. सिंधू घाटी, अर्थात मोहन-जो-दडो / हडप्पा, ह्यांचा काळ साडे पाच हजार वर्षांपूर्वीचा मानला जातो.

%e0%a4%ae%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a5%a9

भारतात मधमाश्यांच्या पोळ्यांमधील मेणाने तयार केलेल्या प्रतिमा ही आढळतात. मात्र पुढे ह्या मेणाच्या माध्यमातून मातीचे साचे तयार होऊ लागले आणि ओतकामातून धातूंच्या मूर्ती तयार होऊ लागल्या. मोहन-जो-दडो येथील नृत्यांगनेची छोटी मूर्ती हे प्राचीनतम भारतीय धातूशिल्पाचे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. ही मूर्ती पंचधातूंची असून वैशिष्ठ्यपूर्ण आहे. मोहन-जो-दडो आणि हडप्पा येथे सापडलेल्या मूर्ती आणि मेसोपोटेमिया येथे सापडलेल्या मूर्ती यात बरीच समानता आढळते. या मूर्ती शिल्पात सर्वात सुरक्षित मूर्ती एका माणसाची आहे. सुमारे सात इंच उंच डोकं आणि खांदे असलेले हे ‘बस्ट’ एखाद्या पुजाऱ्याचं वाटतं. याच्या चेहऱ्यावर छोटीशी दाढी असून शरीर एका शालीत आच्छादित आहे.

याच उत्खननात अनेक मुद्रा (Seal) मिळाल्या. या चौकोनी असून यावर बैल आणि तत्सम गोष्टी कोरलेल्या आहेत. ह्या, बैल किंवा जनावरांच्या आकृत्या, अगदी कलात्मक रीतीने कोरलेल्या आहेत. चारशे पेक्षा जास्त आकार असलेल्या ह्या मुद्रांची संख्या दोन हजारांपेक्षा जास्त आहे.

%e0%a4%ae%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a5%aa

भारतात मूळ प्रतिमा मेणामध्ये घडवून त्याचा साचा तयार करण्याची पध्दत रूढ होती. या तंत्राला प्राचीन शिल्पसाहित्यात ‘मधूच्छिष्टविधान’ म्हटले आहे. प्रथम मातीऐवजी मधाच्या पोळ्याचे मऊ मेण वापरून प्रतिमा बनविली जाते. माती, शेण व तांदळाचा कोंडा यांच्या मिश्रणात पाणी घालून केलेल्या लगद्याने ती आच्छादली जाते. प्रतिमेला आधीच एक मेणाची जाडसर वळी जोडलेली असते, जिचे दुसरे टोक प्रतिमेला आच्छादणाऱ्या साच्याच्या पृष्ठभागावर राहील, याची काळजी घ्यावी लागते. हा साचा वाळवून भट्टीत गेला की, त्यामधील सर्व मेण वितळून त्या वळीच्या वाटे वाहून जाते आणि साच्याच्या आत प्रतिमेच्या आकाराची पोकळी निर्माण होते. या पोकळीत वितळविलेल्या धातूचा (ब्राँझ, पितळ किंवा तांबे, क्वचित सोने-चांदी सुद्धा) रस ओतून मूळ मेणाच्या प्रतिमेची प्रतिकृती मिळविता येते. साच्यातून काढलेल्या प्रतिमेला नक्षीदार धातुपत्रांनी सजविण्याची किंवा धातूच्या तगडालाच ठोकून ठोकून मूर्ती घडविण्याची परंपरा प्राचीन काळात दिसून येते.

%e0%a4%ae%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a5%a7

आपल्या देशात कास्य शिल्पाची किंवा धातूच्या शिल्पाची परंपरा ही जुनी आहे. ‘यजुर्वेदात’ चांदी, शिसे आणि कथिल या धातुंचे उल्लेख लोखंडा सारख्या इतर धातूंबरोबर येतात. अर्थातच हे धातू कसे वापरायचे याची माहिती तत्कालीन लोकांना होती. काही वर्षांपूर्वी औरंगाबाद जवळ असलेल्या ‘दायमाबाद’ येथील उत्खननात सापडलेल्या मूर्ती ह्या पंचधातूंच्या असून कार्बन डेटिंग द्वारे यांचा कालखंड तीन हजार वर्षांपूर्वीचा सिद्ध झालेला आहे. या उत्खननात मिळालेल्या प्राण्यांच्या भरीव प्रतिमांना खेळण्यांसारखी चाके आहेत. एक दुचाकी बैलगाडीही यात सापडलेली आहे.

चौथ्या शतकापासून मात्र ओतकामांच्या अर्थात धातूंच्या मूर्ती आणि इतर वस्तू मुबलक स्वरूपात मिळतात. साधारण तीन प्रकारच्या धातूंच्या वस्तू निर्माण होत होत्या –
1. प्रत्यक्ष देव-देवतांच्या मूर्ती
2. पूजा विधीची उपकरणे. उदाहरणार्थ दीपलक्ष्मी, पुजेची घंटा, उभे / टांगते / हातात धरण्याचे दिवे इत्यादी
3. दैनंदिन उपयोगाच्या वस्तू. उदाहरणार्थ विविध प्रकारची भांडी, हत्यारांच्या मुठी इत्यादी
तंजावर जिल्ह्यातील ‘नाचीर कोइल’ हे गाव, ओतकामासाठी प्रसिध्द होते, कारण तिथे कावेरी नदीची पिवळी वाळू मुबलक मिळत होती, जी साचे बनविण्यासाठी उपयुक्त होती. याच कारणामुळे गुवाहाटी, आसाम मधील सार्तबरी, मणिपूर, वाराणसी इत्यादी ठिकाणे धातूंच्या मूर्ती आणि वस्तूंसाठी प्रसिध्द होती.

%e0%a4%ae%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a5%a8

मात्र त्याचबरोबर शिल्पशास्त्रात भारताचे कौशल्य विकसित होत होते. पुढे याच कौशल्याच्या आधारावर अवघ्या दक्षिण-पूर्व आशियात भारतीय शिल्प तंत्रज्ञांनी अद्भुत शिल्पं उभारून दाखविली. गांधार शैली आणि मथुरा शैली अश्या दोन प्रकारच्या प्रवाहांमधून भारतीय शिल्पशास्त्र विकसित झाले.

मात्र हडप्पन संस्कृती आणि पुढील मौर्य शासन, या मधील सुमारे दोन हजार वर्षांची शिल्पं आपल्याला सापडलेली नाहीत. मौर्य साम्राज्यात उभारलेल्या शिल्पांविषयी, त्या शिल्पांच्या भव्यते विषयी आणि प्रमाणबध्दते विषयी सिकंदर च्या काळात भारतात आलेल्या ग्रीक इतिहासकार मेगस्थेनीज ने बरेच लिहून ठेवले आहे. त्याच्या ‘इंडिका’ ह्या पुस्तकात पाटलीपुत्राच्या वेगवेगळ्या शिल्पांविषयी आणि नगराच्या भव्यते विषयी बरेच लिहिलेले आहे.

सम्राट अशोकाचा कालखंड हा इसवी सनापूर्वी ३०४ वर्ष ते २३२ वर्ष, अर्थात आज पासून साधारण साडे बावीसशे वर्ष मागे, असा आहे. त्याच्या काळातील अनेक प्रतिमा, अनेक शिल्प आजही आपल्याला पहायला मिळतात. अशोकाने बौध्द धर्माचा स्वीकार केला आणि बौध्द धर्माच्या प्रसारासाठी त्याने माध्यम बनविले, शिल्पकले ला. अनेक स्तंभ, अनेक स्तूप, अनेक शिलालेख, अनेक शिल्पं, अनेक मूर्त्या त्याने बनविल्या. त्याच्या काळात बनविल्या गेलेले चार सिंहांचे प्रतीक, आज ‘अशोक चिन्ह’ म्हणून आपली राष्ट्रीय ओळख आहे. हे अशोक चिन्ह. सारनाथ येथे सापडले होते. सुमारे बावीसशे वर्षानंतरही ते शिल्प व्यवस्थित होते. अगदी असेच चार सिंहांचे प्रतीक चिन्ह थायलंड मधे ही आढळले आहे.

मात्र भारतीय शिल्प शास्त्राचा कळसाध्याय आपल्याला बघायला मिळतो, तो बऱ्याच पुढे, सातव्या / आठव्या शतकात. वेरूळ येथील ‘कैलास लेणे’ हे ते अद्भुत आश्चर्य आहे. एकाच शिलाखंडात कोरलेले हे शिल्प म्हणजे मानवी शिल्पकलेचा अप्रतिम आणि विश्वास न बसावा असा नमुना आहे. साधारण सन ६०० ते ७५० च्या दरम्यान ह्या लेण्यांची निर्मिती झाली असावी असे अनुमान काढले जाते. मात्र काही पुरातत्ववेत्त्यांच्या मते याचा काल बऱ्याच आधीचा असावा. तरीही उपलब्ध पुराव्यांच्या अनुसार ह्या शिल्पांच्या निर्मितीचा काळ हा राष्ट्रकुटांच्या शासनाचा आहे. राजा कृष्ण (प्रथम) याने आठव्या शतकाच्या सुरुवातीला ह्या लेण्यांची निर्मिती प्रारंभ केली असे मानले जाते. मात्र एच. गोझ ह्या इतिहासकाराच्या अनुसार कृष्ण राजाचा पुतण्या दान्तिदुर्ग (सन ७३५ – ७५६) ह्याने अगदी युवावस्थेत ह्या लेण्यांचे काम सुरु केले. मात्र एम. के. ढवळीकर ह्या इतिहास तज्ञांचे मत कृष्ण राजाच्या बाजूचे आहे.

%e0%a4%ae%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a5%ab

मात्र त्या काळात जे काही निर्माण झाले, ते अद्भुत आहे. मानवी बुध्दीला अचंभित करणारे आहे. जगाच्या पाठीवर कोठेही, एकाच दगडाला कोरून, वर पासून खाली खोदकाम करत बनविलेले असे भव्य शिल्प नाही..!

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ह्या पूर्ण मंदिरातील सर्वच शिल्पं अत्यंत प्रमाणबध्द आणि रेखीव आहेत. कसलेल्या, कुशल मूर्तिकारांनी / कारागिरांनी कोरून काढलेली ही शिल्पं..! काही पिढ्यांच्या प्रयत्नांतून घडवलेली ही शिल्पं..! आपले दुर्दैव असे, की आज आपल्याजवळ ह्या मूर्तिकारांची, कलाकारांची, योजनाकारांची कसलीही माहिती उपलब्ध नाही..!!

हे मंदिर, पट्टडकल (कर्नाटक) येथील विरुपाक्ष मंदिरा सारखे आहे, जे कांची च्या कैलास मंदिराची प्रतिकृती आहे. २७६ फूट लांब, १५४ फूट रुंद आणि ९० फूट उंच असे हे मंदिर सर्वार्थाने वैशिष्ठ्यपूर्ण आहे. युनेस्को ने ह्याचा जागतिक संरक्षित स्मारकांच्या यादीत समावेश केलेला आहे.

पुढे अकराव्या / बाराव्या शतकात पश्चीमेतून येणारी मुसलमानी आक्रमणं तीव्र झाल्यावर मंदिरांच्या बांधकामाचा वेग मंदावला आणि त्याच बरोबर उन्नत असलेल्या भारतीय शिल्पकलेला उतरती कळा लागली. कालांतराने जगाला अचंभित करणारे शिल्प बांधणारे आम्ही, त्या शिल्पकलेला पूर्णपणे विसरलो..!!

प्रशांत पोळ

प्राचीन भारतीय ज्ञानपीठं

इसवी सनाच्या दहाव्या शतकात, अर्थात इ. स. १००० मधे, भारत हा जगातली सर्वात मोठी आर्थिक शक्ती होता. जागतिक व्यापारात भारताचा वाटा हा २९% पेक्षा जास्त होता असे प्रख्यात अर्थशास्त्री प्रोफेसर अंगस मेडिसन यांनी लिहून ठेवलं आहे. (सध्या जागतिक व्यापारात १४.४% वाटा असलेला चीन पहिल्या क्रमांकावर आहे. अर्थात या बाबतीत भारताचा ‘विक्रम’ कोणीही मोडू शकलेला नाही..!) ‘बेरेनाईक प्रकल्पा’ सारख्या ठिकाणांमधून भारताच्या ह्या जागतिक व्यापाराचे अनेक प्रत्यक्ष पुरावे मिळतात.

याचा दुसरा अर्थ, भारताची निर्यात क्षमता प्रचंड होती. ‘फक्त भारतातून केलेल्या आयातीच्या ‘कमिशन’ मधून युरोपातली शहरं समृध्द होत होती’ असं युरोपियन इतिहासकारांनीच लिहून ठेवलं आहे.

अर्थातच त्या काळात भारतात तश्या क्षमतेची माणसं, तंत्रज्ञ, कामगार, व्यापारी, संशोधक असतील, तेंव्हाच तर जागतिक व्यापारातील हे स्थान भारताला प्राप्त करता आले. आणि जर ही अशी कुशल माणसं भारतात असतील, तर ती तयार कशी होत असतील..? त्यांच्या प्रशिक्षणाची काय व्यवस्था असेल..? असे अनेक प्रश्न समोर उभे राहतात.

इंग्रज इतिहासकारांनी असे चित्रं निर्माण करून ठेवलंय की त्यांनीच भारतात शिक्षण पद्धत रुजवली. शाळा काढल्या, कॉलेजं उभारली वगैरे. इंग्रज येण्यापूर्वी भारतात फक्त संस्कृतचं आणि पौरोहित्याचं शिक्षण मिळत होतं असा (गैर) समज फार मोठ्या प्रमाणात समाजात पसरलाय. या शिवाय ‘इंग्रज येण्यापूर्वी शिक्षण फक्त ब्राम्हणांना आणि तेही पुरुषांना उपलब्ध होतं’ असाही एक खूप मोठा (गैर) समज पसरवून ठेवण्यात आलाय. दुर्दैवानं काही भारतीय इतिहासकारांनी आणि समाजात काम करणाऱ्या तथाकथित ‘सेक्युलर’ लोकांनीही, इतिहासाचा धांदोळा न घेता याच विचारांची री ओढलेली दिसते. आता हे जर खरं असेल तर एक हजार वर्षांपूर्वी भारताचा जागतिक व्यापारात जवळपास एक तृतीयांश वाटा कसा काय असू शकतो, या बाबत कोणीच काही सांगत नाही…!

मात्र इतिहासाचे एक एक पुरावे बघत आपण पुढे जाऊ लागलो की जे चित्र दिसते, ते फारच वेगळे, भव्य आणि आभिमान वाटावा असे आहे. इंग्रज आणि मुस्लिम आक्रमक येण्यापूर्वी या देशात जी शिक्षण पध्दती होती, तिची तोड जगात कुठेही दिसत नाही. अत्यंत व्यवस्थित रचलेली ही पध्दत, आवश्यक त्या सर्व क्षेत्रात ज्ञान आणि प्रशिक्षण देत होती.

जगातले पहिले विद्यापीठ (विश्वविद्यालय – युनिव्हर्सिटी) हे भारतात प्रारंभ झाले, हे किती लोकांना माहीत आहे..? त्या काळात भारतात ‘अशिक्षित’ असा प्रकारच नव्हता, हे ही किती लोकांना माहीत आहे..? आज आपली मुलं शिकायला वेगवेगळ्या देशात जातात. मात्र त्या काळात वेगवेगळ्या देशातली मुलं भारतात शिकायला येत होती परंतु एकही भारतीय मुलगा शिकायला बाहेर जात नव्हता, हे ही किती लोकांना माहीत आहे..?

%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%be-%e0%a5%a8

प्रख्यात सूफी संगीतकार, गायक, कवी आणि ‘कव्वाली’ चा जनक अमीर खुस्रो (सन १२५२ – १३२५) हा जेंव्हा भारताच्या विद्यापीठांमध्ये आला, तेंव्हां भारतावर मुस्लिम आक्रामकांचे आक्रमण होऊन त्यांचा जम बसायला लागला होता. साहजिकच तो काळ, भारतीय विद्यापीठांचा पडता काळ होता. मात्र तरीही अमीर खुस्रो ने भारतीय शिक्षणाबद्दल आणि येथील विद्यापीठांबद्दल जे लिहून ठेवलंय, ते अफाट आहे. भारतीय शिक्षण पद्धतीची, खुस्रो ने बरीच प्रशंसा केलेली आहे.

मुलांच्या ‘अरबी सुरस आणि चमत्कारिक’ गोष्टींचा नायक, हारून अल रशीद हा बऱ्याच आधीचा. सन ७५४ ते सन ८४९ ह्या काळातला. याने आणि अरबी सुलतान अल मन्सूर ने भारतीय विद्यापीठांतून हुशार मुलांना घेऊन येण्यासाठी आपले दूत पाठवले होते अश्या नोंदी बऱ्याच ठिकाणी आढळतात. हा भारतातला पहिला ज्ञात ‘कॅम्पस इंटरव्ह्यू’..! सुमारे बाराशे वर्षांपूर्वीचा..!!

मुस्लिम आक्रमक भारतात येण्याआधी भारतात परिपूर्ण शिक्षण प्रणाली होती. या संदर्भात अनेक पुरावे उपलब्ध आहेत. मुला / मुलींना साधारण आठव्या वर्षापर्यंत घरीच शिकवलं जायचं. आठव्या वर्षी त्याचा उपनयन संस्कार झाला की त्याला गुरुकुलामध्ये किंवा गुरूकडे पाठविण्याची पध्दत होती. येथे ‘गुरु’ म्हणजे फक्त संस्कृत शिकविणारे ऋषी असा अर्थ कदापि नाही. ‘गुरु’ हा त्या त्या क्षेत्रातला दिग्गज माणूस असायचा. समुद्र किनाऱ्यावरच्या बऱ्याच कुटुंबांमधील मुलं ही जहाज बांधणाऱ्या आपल्या गुरूकडे राहून, जहाज बांधणीचं प्रत्यक्ष शिक्षण घेत. हीच पध्दत धनुर्विद्या, मल्लविद्या, लोहारकाम, वास्तुविद्या वगैरे सारख्या गोष्टी शिकण्यासंबंधी होती. साधारण ८ – १० वर्षे गुरु कडे शिक्षण घेतल्यानंतर यातील काही विद्यार्थी, विद्यापीठात पुढील उच्च शिक्षणासाठी जात. या विद्यापीठांमध्ये वेगवेगळी शास्त्र आणि कला शिकण्याची व्यवस्था होती. पुढे मुसलमान आक्रमकांनी ही विद्यापीठं नष्ट केली. त्यामुळे इ. सन १२०० – १३०० नंतर ह्या विद्यापीठांचं अस्तित्वच नष्ट झालं. मात्र तरीही गुरूगृही शिकण्याची परंपरा बऱ्याच अंशी कायम राहिली.

या आक्रमणापूर्वीच्या काळात स्त्रियांनी शिकण्याची पध्दत आणि परंपरा होती. ऋग्वेदात स्त्री शिक्षणाचे उल्लेख अनेक ठिकाणी आढळतात. प्रारंभिक शिक्षण घेतलेल्या स्त्रियांना ‘ऋषिका’ आणि उच्च शिक्षण घेतलेल्या स्त्रियांना ‘ब्रम्ह्वादिनी’ म्हटले जायचे. ऋग्वेदात अश्या ऋषिका आणि ब्रम्ह्वादिनी स्त्रियांची नावेच दिलेली आहेत – रोमासा, लोपमुद्रा, अपला, कद्रू, घोष, जुहू, वागंभ्रिनी, पौलोमी, जरिता, श्रध्दा, कामायनी, उर्वशी, सारंगा, यमी, इंद्रायणी, सावित्री, देवजयी, नोधा, सिकातनीबावरी, अक्रीष्ट्भाषा, गौपयना इत्यादी. अशी २३ नावं दिलेली आहेत.

पाणिनी ने त्याच्या ग्रंथात मुलींच्या शिक्षणासंबंधी लिहून ठेवलंय. मुलींकरिता वसतिगृहं (होस्टेल्स) होती. त्या साठी पाणिनी ने ‘छत्रीशाळा’ हा शब्द वापरलाय. उपनिषद काळात गार्गी आणि मैत्रेयी या विदुषीन्चा उल्लेख येतो. एकुणात काय, तर मुस्लिम आक्रमणापूर्वीच्या भारतात स्त्री शिक्षणाचे प्रमाण फार चांगले होते. स्त्रियां मोकळेपणी समाजात मिसळत होत्या.

शिक्षकांची किंवा गुरूंची ही मोठी परंपरा होती, जी शतकानुशतकं चालत आलेली होती. आचार्य / उपाध्याय / चरक / गुरु / यौजनासातिका / शिक्षक अश्या वेगवेगळ्या उपाध्या गुरुंसाठी होत्या.

विद्यापीठांमधे शिक्षण सत्र प्रारंभ होण्याचा तसेच सत्र संपण्याचाही मोठा उत्सव असायचा. सत्रारंभ सोहोळ्याला ‘उपकर्णमन’ आणि सत्र समापन सोहोळ्याला ‘उत्सर्ग’ म्हटले जायचे. उपाधी प्रदान सोहोळ्याला (ज्याला आपण ‘ग्रेज्युएशन सेरेमनी’ म्हणतो), ‘समवर्तना’ म्हणायचे. सुट्ट्यांसाठी ‘अनध्याय’ हा शब्द वापरला जायचा. वर्षभरातील प्रमुख अनध्याय होते – महिन्यातील दोन्ही अष्टम्या, दोन्ही चतुर्दशी, अमावस्या, पौर्णिमा आणि चातुर्मासातला शेवटचा दिवस. या नित्य अनध्याना शिवाय नैमित्तिक अनध्यान ही असायचे. अर्थातच आजच्या सारखी ‘रविवारी सुटी’ ही भानगड नव्हती. गंमत म्हणजे, भारतीय संस्कृतीचा प्रसार ज्या दक्षिण पूर्व आशियाई देशांमध्ये, उदा – लाओस, कंबोडिया, जावा-सुमात्रा (इंडोनेशिया), सयाम (थायलंड), झाला, त्या सर्व देशांमध्ये अगदी अलिकडल्या काळापर्यंत अनध्यानाचे दिवस हे प्राचीन भारतीय पध्दती प्रमाणेच होते.

तक्षशीला विद्यापीठ
जगातील पहिले विश्वविद्यालय (विद्यापीठ) हे ‘तक्षशिला’ मानले जाते. आजच्या पाकिस्तानात (रावलपिंडी पासून १८ मैल उत्तरेकडे) असलेले हे विद्यापीठ इसवी सनाच्या सातशे वर्ष पूर्वी स्थापन करण्यात आले. पुढे इसवी सन ४५५ मधे ‘पूर्व युरोप’ च्या आक्रामकांनी, अर्थात ‘हुणांनी’ ते नष्ट केले. जागतिक स्तरावर ख्याती असलेल्या ह्या विद्यापीठाने सुमारे १२०० वर्ष ज्ञानदानाचे मोठे काम केले. श्रेष्ठ आचार्यांची परंपरा निर्माण केली. अनेक जगप्रसिध्द विद्यार्थी दिले.

%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%b6%e0%a5%80%e0%a4%b2%e0%a4%be

तक्षशीला विद्यापीठ बंद पडल्यानंतर काही वर्षातच मगध राज्यात (आजच्या बिहार मधे), नालंदा विद्यापीठ स्थापन झाले. ही दोन्हीही नामांकित विद्यापीठं एकाच वेळेस कधीही कार्यरत नव्हती.

असे म्हणतात, तक्षशीला ह्या नगरीची स्थापना भरताने त्याच्या मुलाच्या, ‘तक्षाच्या’ नावावर केली. पुढे येथेच विद्यापीठ स्थापन झाले. जातक कथांमध्ये तक्षशीला विद्यापीठा संबंधी बरीच माहिती मिळते. ह्या कथांमध्ये १०५ ठिकाणी ह्या विद्यापीठाचे संदर्भ मिळतात. त्या काळात, अर्थात सुमारे हजार वर्ष, तक्षशीला ही संपूर्ण भरतखंडाची बौध्दिक राजधानी होती. तिची ही ख्याती ऐकूनच ‘चाणक्य’ सारखी व्यक्ति मगध (बिहार) हून इतक्या दूर तक्षशिलेला आली. बौध्द ग्रंथ ‘सुसीमजातक’ आणि ‘तेलपत्त’ मधे तक्षशीलेचे अंतर काशी पासून २००० कोस सांगितले आहे.

इसवी सनाच्या पाचशे वर्षांपूर्वी, जेंव्हा ‘चिकित्सा’ शास्त्राचे नाव सुध्दा जगात कुठेच नव्हते, तेंव्हा तक्षशीला विद्यापीठ हे चिकित्सा शास्त्राचे फार मोठे केंद्र मानल्या जात होते. येथे ६० पेक्षा जास्त विषय शिकवले जात होते. एका वेळेस १०,५०० विद्यार्थ्यांना शिकण्याची सोय होती.

तक्षशीला विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची फार उज्ज्वल परंपरा आहे –
• या विद्यापीठाच्या स्थापने नंतर, अर्थात इसवी सनापूर्वी ७०० वर्ष, येथून शिकून गेलेला पहिला प्रसिध्द विद्यार्थी म्हणजे पाणिनी, ज्याने संस्कृत चे व्याकरण तयार केले.
• इसवी सनापूर्वी सहाव्या शतकात, चिकित्सा शास्त्र शिकलेला ‘जीवक’ (किंवा ‘जिबाका’), पुढे जाऊन मगध राजवंशाचा राजवैद्य झाला. याने अनेक ग्रंथ लिहिले.
• इसवी सनापूर्वी चौथ्या शतकातील अर्थशास्त्राचा विद्यार्थी ‘चाणक्य’, जो पुढे ‘कौटिल्य’ नावाने प्रसिध्द झाला.
चिनी यात्री आणि विद्यार्थी, ‘फाह्यान’ हा सन ४०५ मधे तक्षशीला विद्यापीठात आला. हा काळ ह्या विद्यापीठाचा पडता काळ होता. पश्चिमेकडून होणाऱ्या आक्रमकांच्या संख्येत वाढ झाली. अनेक आचार्य विद्यापीठ सोडून गेले. अर्थातच फाह्यान ला तेथे फार काही ज्ञानाचा लाभ झाला नाही. त्याने तसं लिहून ठेवलंय. पुढे सातव्या शतकात, तक्षशीला संबंधी वर्णनं ऐकून आणखी एक चीनी यात्री, ‘युवान च्वांड’ तेथे गेला, तर त्याला विद्याभ्यासाची कसलीही खूण आढळली नाही.

नालंदा विद्यापीठ
हूण आक्रामकांनी ज्या काळात तक्षशीला विद्यापीठ उध्वस्त केले, जवळपास त्याच काळात मगध साम्राज्यात नालंदा विद्यापीठाची मुहुर्तवेढ रोवली जात होती. मगधाचे महाराज ‘शकादित्य’ (अर्थातच गुप्त वंशीय सम्राट कुमार गुप्त : सन ४१५ ते ४५५) यांनी आपल्या अल्प काळात नालंदा मधील जागेला विद्यापीठाच्या रुपात विकसित केले. या विद्यापीठाचे सुरुवातीचे नाव होते – ‘नलविहार’. पुढे इसवी सन ११९७ मधे बख्तियार खिलजी ने हे विद्यापीठ जाळून टाकेपर्यंत सुमारे सातशे वर्ष, हे जगातील सर्वोकृष्ट विद्यापीठ होते.

%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%be-%e0%a5%a7

ह्या विद्यापीठात प्रवेशासाठी कठोर परीक्षा द्यावी लागत असे. अनेक दुर्लभ आणि दुर्मिळ ग्रंथांचा प्रचंड मोठा संग्रह ह्या विद्यापीठात होता. चिनी यात्री ‘ह्युएन त्सांग’ येथे दहा वर्ष अध्ययन करत होता. त्याचा गुरु शीलभद्र हा आसाम चा होता. ह्युएन त्सांग ने ह्या विद्यापीठाबद्दल भरभरून आणि खूप चांगले लिहिले आहे.

नालंदा विद्यापीठ हे अनेक इमारतींचे एक फार मोठं संकुल होतं. यातील प्रमुख भवनं होती – रत्नसागर, रत्नोदधी आणि रत्नरंजक. सर्वात उंच प्रशासकीय भवन होतं – ‘मान मंदिर’.

विक्रमशील विद्यापीठ
आठव्या शतकात बंगाल च्या पाल वंशीय राजा धर्मपाल ने ह्या विद्यापीठाची स्थापना आजच्या बिहार मधे केली होती. ह्या विद्यापीठाच्या अंतर्गत ६ विद्यालयं होती. प्रत्येक विद्यालयात १०८ शिक्षक होते. दहाव्या दशकातील प्रसिध्द तिब्बती लेखक तारानाथ ने ह्या विद्यापीठाचं विस्तृत वर्णन केलेलं आहे. ह्या विद्यापीठात प्रत्येक दाराला एक एक प्रमुख आचार्य नियुक्त होते. नवीन प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्याची ही आचार्य परीक्षा घ्यायचे. त्यांच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच, विद्यापीठात प्रवेश मिळत असे. हे आचार्य होते – पूर्व द्वार – पं. रत्नाकर शास्त्री, पश्चिम द्वार – वर्गाश्वर कीर्ती, उत्तरी द्वार – नारोपंत आणि दक्षिणी द्वार प्रज्ञाकर मित्रा. यातील नारोपंत हे महाराष्ट्रातून आलेले होते. आचार्य दीपक हे विक्रमशील विद्यापीठाचे सर्वाधिक प्रसिध्द आचार्य झालेले आहेत.

%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%be-%e0%a5%a9

बाराव्या शतकात येथे ३,००० विद्यार्थी शिकत होते. हा या विद्यापीठाचा पडता काळ होता. पूर्वेत आणि दक्षिणेत मुसलमान आक्रमक पोहोचत होते आणि मिळेल ती ज्ञानाची साधनं आणि स्थानं उध्वस्त करत होते. म्हणूनच उत्खननात जे अवशेष सापडले आहेत, त्यावरून असं लक्षात येतं की विद्यापीठाच्या मोठ्या सभागृहात ८,००० लोकांची बसायची व्यवस्था होती.

या विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांमध्ये तिब्बती विद्यार्थ्यांची संख्या सर्वात जास्त होती. त्याचं एक कारण म्हणजे बौध्द धर्माच्या ‘वज्रयान’ संप्रदायाच्या अभ्यासाचं हे महत्वाचं आणि अधिकृत केंद्र होतं.

नालंदा विद्यापीठ उध्वस्त झाल्यानंतर, सुमारे सहा वर्षांनी, अर्थात सन १२०३ मधे, नालंदा जाळणाऱ्या बख्तियार खिलजी ने च ह्या विद्यापीठालाही जाळून टाकलं.

उड्डयंतपुर विद्यापीठ
पाल वंशाची स्थापना करणाऱ्या राजा गोपाळ ने ह्या विद्यापीठाची स्थापना बौध्द विहाराच्या रुपात केली होती. याच्या विशाल भवनांना बघून बख्तियार खिलजी ला वाटलं की हा एखादा किल्लाच आहे. म्हणून त्याने यावर आक्रमण केलं. वेळेवर सैनिकी मदत मिळू शकली नाही. फक्त विद्यार्थी आणि आचार्यांनीच शर्थीनं झुंज दिली. पण सर्वच्या सर्व मारल्या गेले..!

सुलोटगी विद्यापीठ
कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील हे महत्वाचे विद्यापीठ. अकराव्या शतकाच्या शेवटी उभे राहिले. राष्ट्र्कुटांचे शासन असताना कृष्ण (तृतीय) ह्या राजाचा मंत्री नारायण याने हे विद्यापीठ बांधले. मात्र विद्यापीठ म्हणून काही करून दाखविण्याच्या आतच यावर मुसलमानी आक्रामकांनी कब्जा केला आणि ह्याला उध्वस्त केलं.

येथील पविट्टागे हे संस्कृत महाविद्यालय अल्पावधीतच, संस्कृत शिक्षणासाठी चर्चित झाले होते. देशभरातली निवडक २०० विद्यार्थ्यांना भोजन – निवासा सह शिक्षण देणारे हे विद्यापीठ वैशिष्ट्यपूर्ण होते.

सोमपुर महाविहार
बांगला देशाच्या नवगांव जिल्ह्यात बादलगाझी तालुक्यातील पहाडपुर गावात महाविहार म्हणुन स्थापित झालेले हे शिक्षा केंद्र, पुढे विद्यापीठ म्हणुन नावारूपाला आले. पाल वंशाचा दुसरा राजा, धर्मपाल देव ह्याने आठव्या शतकाच्या शेवटी ह्या विहाराचे निर्माण कार्य केले. जगातील सर्वात मोठे बौध्द विहार म्हणता येईल, अशी याची रचना होती. चीन / तिब्बत / मलेशिया / जावा / सुमात्रा येथील विद्यार्थी येथे शिकण्यासाठी येत होते.

दहाव्या शतकातील प्रसिध्द विद्वान अतीश दिपशंकर श्रीज्ञान हे ह्याच विद्यापीठाचे आचार्य होते.

रत्नागिरी विद्यापीठ, ओडिशा
सहाव्या शतकात बौध्द विहाराच्या रुपात स्थापन झालेले हे स्थान पुढे शिक्षणाचे मोठे केंद्र झाले. तिबेट मधील अनेक विद्यार्थी येथून शिकून गेले. तिबेटीयन इतिहासात या विद्यापीठाचा उल्लेख ‘कालचक्र तंत्राचा विकास करणारे विद्यापीठ’ असा केलेला आहे. कारण येथे खगोलशास्त्राचा अभ्यास व्हायचा.

अखंड भारताच्या अक्षरशः कानाकोपऱ्यात शिक्षणाची ही केंद्र वसलेली होती. अगदी लहान – लहान विद्याकेंद्र तर किती होती त्याची गणतीच नाही.

जबलपुर ला, भेडाघाट मधे चौसष्ठ योगिनींचे मंदिर आहे. त्याला ‘गोलकी मठ’ असेही म्हणतात. ह्या ‘गोलकी मठ’ चा उल्लेख ‘मलकापुर पिलर’ म्हणून प्रसिध्द असलेल्या खोद्कामातही झालेली आहे.

‘मटमायुर वंश’ हा कलचुरी वंशांपैकीच एक आहे. या वंशाच्या युवराजदेव (प्रथम) ह्याने ह्या मठाची स्थापना केली. मुळात हे तांत्रिक आणि इतर विषयांचं विद्यापीठ होतं. ह्या गोलकी मठाच्या अर्थात विद्यापीठाच्या आधीन अनेक विद्यालयं ही आंध्र प्रदेशात होती.

बंगाल मधील ‘जगद्द्ल’, आंध्र प्रदेशातील ‘नागार्जुनकोंडा’, काश्मीर मधील ‘शारदापीठ’, तामिळनाडू मधील ‘कांचीपुरम’, ओडिशा मधील ‘पुष्पगिरी’, उत्तर प्रदेशातील ‘वाराणसी’… अशी किती नावं घ्यावीत..? ही सारी ज्ञानमंदिरं होती, ज्ञानपीठं होती. अगदी वनवासी अन (आजच्या भाषेत) मागास भागातही आवश्यक ते शिक्षण सर्वांना मिळत होते. संस्कृत ही फक्त राजभाषाच नव्हती तर ती लोकभाषा होती. पुरुषपुर (पेशावर चे प्राचीन नाव) पासून ते कंबोडिया, लाओस, जावा – सुमात्रा पर्यंत संस्कृत हीच भाषा चालत होती. इसवी सनापूर्वी शंभर / दोनशे वर्षांपासून ते इसवी सन अकराशे पर्यंत या संपूर्ण भूभागावर संस्कृत ही राजभाषा आणि लोकभाषा म्हणुन प्रचलित होती. भारतीय विद्यापीठांची कीर्ती जगभरात पसरली होती. शिक्षणाच्या क्षेत्रात भारत सर्वोच्च स्थानावर होता, आणि म्हणूनच व्यापारातही होता..!

आज ह्या साऱ्या गोष्टी परीकथेतल्या वाटतात. एक हजार वर्षांच्या मुस्लिम आणि इंग्रजी राजवटी मुळे आपलं समृध्द असं ज्ञान तर आपण विसरलोच, पण शिक्षणाच्या बाबतीतही पूर्णपणे मागासलो.

शिक्षणाचा आपला समृध्द वारसा आठवायला आपल्याला पाश्चात्य चिंतकांची आणि संशोधकांची मदत लागते, हीच आपली शोकांतिका आहे..!

प्रशांत पोळ

सिरी भूवलय’ – अद्भुत आणि चमत्कारिक ग्रंथ

आपल्या भारताच्या ज्ञानभांडारात इतक्या जबरदस्त आणि चमत्कारिक गोष्टी लपलेल्या आहेत की त्या बघून मन अक्षरशः थक्क होतं..! ‘हे ज्ञान आपल्या जवळ आलंच कुठून’ अश्या प्रश्नात आपण गुरफटले जातो. मग, ‘त्या काळात हे असलं भारी ज्ञानभांडार आपल्या जवळ होतं, मग आता कां नाही..? कुठं गेलं हे ज्ञान..?’ हे प्रश्न आपल्याला सतावत राहतात…!

याच श्रेणीतला असा अद्भुत ग्रंथ आहे – ‘सिरी भूवलय’. किंवा श्री भूवलय. जैन मुनि आचार्य कुमुदेंदू ह्यांनी रचलेला. कर्नाटकात जेंव्हा राष्ट्रकुटांचं शासन होतं, मुस्लिम आक्रमक यायला बरीच वर्ष होती आणि सम्राट अमोघवर्ष नृपतुंग (प्रथम) हे जेंव्हा राज्य करत होते, त्या काळातला हा ग्रंथ. अर्थातच सन ८२० ते ८४० च्या काळात केंव्हा तरी लिहिला गेलेला..!

मात्र मागील हजार वर्षे हा ग्रंथ गायब होता. कुठे कुठे याचा उल्लेख यायचा. पण ग्रंथ मात्र विलुप्तावस्थेतच होता. हा ग्रंथ मिळाला कसा, याचीही मजेदार गोष्ट आहे –

राष्ट्रकुटांच्या काळात कोण्या मल्लीकब्बेजी या बाईने या ग्रंथाची एक प्रत नकलून घेतली आणि आपले गुरु माघनंदिनीजी यांना शास्त्रदान केली. या ग्रंथाची प्रत, हस्ते परहस्ते सुप्रसिध्द आयुर्वेद चिकित्सक धरणेन्द्र पंडितांच्या घरी पोहोचली. हे धरणेन्द्र पंडित, बंगळूर – तुमकुर रेल्वे मार्गावरील दोड्डबेले नावाच्या लहानश्या गावात रहायचे. या ग्रंथाबद्दल त्यांना फारशी माहिती नसली, तरी याचं महत्त्व ते जाणून होते. म्हणूनच आपले मित्र, चंदा पंडितांबरोबर ते ‘सिरी भूवलय’ या ग्रंथावर कन्नड भाषेत व्याख्यानं द्यायचे.

4x5 original

या व्याख्यानांमुळे, बंगळूर च्या ‘येल्लप्पा शास्त्री’ ह्या तरुण आयुर्वेदाचार्याला, हा ग्रंथ धरणेन्द्र शास्त्रींकडे आहे हे समजले. या ग्रंथासंबंधी येल्लप्पा शास्त्रींनी बरेच काही ऐकले होते. तेंव्हा हा ग्रंथ मिळवायचाच, हा निश्चय पक्का होता. मग काहीही करून ह्या ग्रंथाचे हस्तलिखित मिळविण्यासाठी येल्लप्पा शास्त्रींनी, दोड्डाबेला ला जाऊन धरणेन्द्र शास्त्रींच्या पुतणीशी विवाह केला.

पुढे १९१३ मधे धरणेन्द्र शास्त्रींचे निधन झाले. पूर्ण वेळ विद्याभ्यासात दिल्याने त्यांच्या घराची आर्थिक स्थिती फारच खराब झालेली होती. म्हणून त्यांच्या मुलाने, धरणेन्द्र शास्त्रींच्या काही वस्तू विकावयास काढल्या. त्यात ‘सिरी भूवलय’ हा ग्रंथ ही होता. अर्थातच आनंदाने येल्लप्पा शास्त्रींनी हा ग्रंथ विकत घेतला. त्या साठी त्यांना बायकोचे दागिने विकावे लागले. मात्र ग्रंथ हातात आल्यावरही शास्त्रींना त्याची उकल करता येत नव्हती. १२७० पानांच्या ह्या हस्तलिखितात सारेच अगम्य होते. पुढे १९२७ ला प्रख्यात स्वातंत्र्य सेनानी करमंगलम श्रीकंठय्याजी बंगळुरात आले. त्यांच्या मदतीने ह्या ग्रंथाची किवाडं काहिशी किलकिली झाली.

या हस्तलिखितातील माहितीच्या आधारे प्रयत्न करत करत, त्यातील सांकेतिक माहितीची फोड करायला तब्बल ४० वर्षे जावी लागली. सन १९५३ मधे कन्नड साहित्य परिषदेनं ह्या ग्रंथाचं पहिल्यांदा प्रकाशन केलं. ग्रंथाचे संपादक होते – येल्लप्पा शास्त्री, करमंगलम श्रीकंठय्या आणि अनंत सुब्बाराव. यातील अनंत सुब्बाराव हे तंत्रज्ञ होते. त्यांनीच पहिला कन्नड टाईपरायटर तयार केला होता.

असं काय महत्वाचं होतं ह्या ग्रंथात, ज्या साठी लोकं आपलं आख्खं आयुष्य वेचायला तयार होती..?

हा ग्रंथ, इतर ग्रंथांसारखा एखाद्या लिपीत लिहिलेला नाही. तर हा अंकांमधे लिहिलेला आहे. हे अंक ही १ ते ६४ मधील आहेत. हे अंक किंवा आकडे विशिष्ट पद्धतीने वाचले की एखाद्या विशिष्ट भाषेत, विशिष्ट ग्रंथ वाचता येतो. ग्रंथ कर्त्याच्या, अर्थात मुनि कुमुदेन्दुंच्या मते हा ग्रंथ १८ लिप्या आणि ७१८ भाषांमध्ये वाचता येतो.

%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%b5%e0%a4%b2%e0%a4%af-%e0%a5%a8

हा ग्रंथ म्हणजे अक्षरशः विश्वकोश आहे. ह्या एका ग्रंथात अनेक ग्रंथ दडलेले आहेत. रामायण, महाभारत, वेद, उपनिषदे, अनेक जैन ग्रंथ या एका ग्रंथात सामावलेले आहेत. गणित, खगोलशास्त्र, रसायन शास्त्र, इतिहास, वैद्याक, तत्वज्ञान सारख्या अनेक विषयांवरील ग्रंथ ही या एकाच ग्रंथात वाचता येतात.

या ग्रंथाची १६,००० पाने होती असा ग्रंथातच कुठे उल्लेख आहे. त्यातील फक्त १२७० पानेच सध्या उपलब्ध आहेत. एकूण ५६ अध्याय असलेल्या ह्या ग्रंथाच्या फक्त तीन अध्यायांचीच उकल करणे सध्या शक्य झाले आहे. १८ लिप्या आणि ७१८ भाषांपैकी सध्या कन्नड, तामिळ, तेलुगु, संस्कृत, मराठी, प्राकृत इत्यादी भाषांमधुनच हा ग्रंथ वाचता येतो. एखाद्या संगणकीय विश्वकोशा सारखे या ग्रंथाचे स्वरूप आहे. ह्या ग्रंथाची संपूर्ण संहिता जेंव्हा उलगडली जाईल, तेंव्हा त्याची प्रमुख वैशिष्ठ्ये स्पष्ट होऊ शकतील.

हा ग्रंथ लिपीत नसून आकड्यात आहे, हे आपण बघितलंच. त्यातही फक्त १ ते ६४ अंकांचाच वापर केलेला आहे. आता कुमुदेंदू मुनिंनी फक्त ६४ पर्यंतच आकडे कां घेतले..? तर ६४ हे ध्वनींचे संकेत आहेत, ज्यात ऱ्हस्व, दीर्घ आणि लुप्त मिळून २५ स्वर, क, च, न, प सारखे २५ वर्गीय वर्ण, य, र, ल, व सारखे अवर्गीय व्यंजन इत्यादी मिळून ६४ ही संख्या होते.

%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%b5%e0%a4%b2%e0%a4%af-%e0%a5%a9

या संख्यांना २७ X २७ च्या चौकोनांमध्ये मांडल्या जाते. आता हे जे ७२९ अंक चौकोनांमध्ये येतात, त्यांना ग्रंथात दिलेल्या निर्देशांनुसार खालून-वर, वरून-खाली, उभे-आडवे वगैरे करून लिहिले आणि त्यांना त्या भाषेच्या वर्ण क्रमानुसार मांडले (उदा – ४ हा अंक असेल तर मराठी तील वर्ण ‘घ’ येईल. क, ख, ग, घ.. प्रमाणे), तर छंदोबध्द काव्य अथवा धर्म, दर्शन, कला.. वगैरे प्रकारचा ग्रंथ तयार होतो..!

काय अफाट आहे हे…!

आणि किती अद्भुत..! आपण आपल्या ‘सुडोकू’ चा लहानसा चौकोन तयार करायला संगणकाची मदत घेतो. अन इथे हजार / बाराशे वर्षांपूर्वी एक जैन मुनि आपल्या कुशाग्र आणि अद्भुत बुध्दीचा परिचय देऊन फक्त अंकांमधून विश्वकोश तयार करतात..!

सारंच अतर्क्य..!!

या ग्रंथाचं प्रत्येक पान म्हणजे २७ X २७ असा ७२९ अंकांचा भला मोठा चौकोन आहे. या चौकोनाला चक्र म्हणतात. अशी १२७० चक्र सध्या उपलब्ध आहेत. या चक्रांमध्ये ५६ अध्याय आहेत आणि एकूण श्लोकांची संख्या सहा लाखांच्या वर आहे. या ग्रंथाचे एकूण ९ खंड आहेत. उपलब्ध असलेले १२७० चक्र हे पहिल्या खंडातीलच आहेत, ज्याचं नाव आहे – ‘मंगला प्रभृता’. एक प्रकारे हा खंड म्हणजे इतर ८ खंडांची फक्त ओळख आहे. अंकांच्या स्वरूपात यात १४ लाख अक्षरं आहेत. यातून ६ लाख श्लोक तयार होतात.

या प्रत्येक चक्रात काही ‘बंध’ आहेत. बंध म्हणजे अंकांना वाचण्याची पध्दत किंवा एका चक्राच्या आत अंक मांडण्याची पध्दत. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर ‘बंध’ म्हणजे तो श्लोक, किंवा तो ग्रंथ वाचण्याची किल्ली (किंवा पासवर्ड) आहे. या बंधामुळे आपल्याला त्या चक्रातील ७२९ अंकांमधला पेटर्न कळतो आणि मग त्या त्या भाषेप्रमाणे तो ग्रंथ उलगडू लागतो. या बंधाचे वेगवेगळे प्रकार आहेत. जसे – चक्र-बंध, नवमांक-बंध, विमलांक-बंध, हंस-बंध, सारस-बंध, श्रेणी-बंध, मयूर-बंध, चित्र-बंध इत्यादी.

गेल्या अनेक वर्षांपासून ह्या भूवलय ग्रंथाला ‘डी-कोड’ करण्याचे काम चालू आहे. अनेक जैन संस्थांनी हां ग्रंथ, प्रकल्प म्हणून स्वीकारला आहे. इंदूर ला जैन साहित्याच्या संशोधनाचं ‘कुन्द्कुंद ज्ञानपीठ’ उभं राहिलंय, जिथे डॉ. महेंद्र कुमार जैन यांनी या विषयावर बरेच काम केले आहे. आय. टी. क्षेत्रातल्या काही जैन तरुणांनी या विषयावरील वेबसाईट तर चालू केलीच आहे, पण संगणकाची मदत घेऊन या ग्रंथाला ‘डी-कोड’ करण्याचं काम केलं जातंय. अगदी लहान प्रमाणात त्याला यश ही आलंय.

मात्र तरीही. . . .

आज एकविसाव्या शतकाचं सोळावं वर्ष संपत असतानाही, जगभरातले अनेक जैन विद्वान या ग्रंथावर काम करत असतानाही, प्रगत संगणक प्रणालीचे अल्गोरिदम वापरूनही……

ह्या ग्रंथाची उकल झालेली नाही..! ५६ पैकी फक्त तीनच अध्याय ‘डी-कोड’ होऊ शकले आहेत…

मग हजार – बाराशे वर्षांपूर्वी, आजच्या सारखी कसलीही साधनं हाताशी नसताना, मुनि कुमुदेन्दुंनी इतका क्लिष्ट ग्रंथ कसा रचला असेल..? बरं, मुनिवर्य कन्नड भाषिक होते. मग त्यांना इतर भाषांचे असे अवजड अल्गोरिदम्स तयार करणं कसं जमलं असेल..?

आणि मुळात इतकी कुशाग्र आणि अफाट बुध्दिमत्ता त्यांच्याजवळ कुठून आली असेल..?

‘इंडोलॉजी’ च्या क्षेत्रातलं, भारतातलं आदरानं घेतलं जाणारं नाव आहे, श्री एस. श्रीकांत शास्त्रींचं (१९०४ – १९७४). त्यांनी ‘भूवलय’ ह्या ग्रंथाबद्दल लिहून ठेवलंय – “हा ग्रंथ कन्नड भाषा, कन्नड साहित्य, तसेच संस्कृत, प्राकृत, तमिळ, तेलगु साहित्याच्या अभ्यासाच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. हा ग्रंथ भारताच्या आणि कर्नाटक च्या इतिहासावर प्रकाश टाकतो. भारतीय गणिताच्या अभ्यासासाठी हा ग्रंथ म्हणजे महत्वाचा संदर्भ ग्रंथ आहे. भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र आणि जीवन विज्ञानाच्या विकासाच्या अभ्यासासाठी हा ग्रंथ उपयुक्त आहे. तसेच तो शिल्पे आणि प्रतिमा, प्रतीके यांच्या अभ्यासासाठी देखिल उपयुक्त आहे. यातील रामायण, महाभारत, भागवत गीता, ऋग्वेद आणि इतर ग्रंथांची फोड करता आली तर त्यांची आणि सध्या उपलब्ध असलेल्या ग्रंथांची तुलना अभ्यासाच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल. नष्ट झालेले अनेक जैन ग्रंथ सिरी भूवलय मध्ये सापडू शकतात”.

ह्या ग्रंथाची माहिती जेंव्हा आपले पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद ह्यांना मिळाली, तेंव्हा त्यांचे उस्फूर्त उद्गार होते – ‘हा श्री भूवलय ग्रंथ म्हणजे जगातलं आठवं आश्चर्य आहे..!’

एका अर्थानं हे खरंय. कारण जगाच्या पाठीवर कुठेही असा ‘एकात अनेक ग्रंथ’ असलेला, कूट पद्धतीनं लिहिलेला विश्वकोश आढळत नाही.

आपलं दुर्दैव इतकंच की भारतीय ज्ञानाचा हा अमोल खजिना आपल्याला तरी कुठे माहीत होता..?
– प्रशांत पोळ