‘शोध’ – एक मस्त कादंबरी..!

आज पहाटे ‘शोध’ ही कादंबरी वाचून संपवली आणि बऱ्याच दिवसांनंतर एखादी छान, मस्त आणि उत्कंठावर्धक कादंबरी वाचल्याचा फील आला.

साधारण १० दिवसांपूर्वी माझ्या फ्रेंकफर्ट मध्ये राहणाऱ्या मुलाने, इंद्रनील ने, मला या कादंबरी विषयी सांगितले. राजहंस प्रकाशनाचे ई-कॉमर्स साईट नाही. त्यामुळे माझ्या पुण्याला राहणाऱ्या मुलीने मला हे पुस्तक कुरियर केले, आणि आज पहाटे मी ते वाचून संपवले.

नाशिक च्या मुरलीधर खैरनार ह्यांची ही कादंबरी. कदाचित त्यांचे हे पहिलेच पुस्तक. पण नवखेपणाची एकही खूण नाही. डेन ब्राऊन ची शैली पुरेपूर वापरलेली. पण लोकमत मधील लेखात खैरनारांनी तशी प्रांजळ कबुलीही दिलेली. डेन ब्राऊन, फेड्रिक फोरसिथ आणि जॉन ग्रिशम हे त्यांचे आवडते लेखक. माझेही..!!

कादंबरी ची कल्पना तशी भन्नाट. शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा (म्हणजे १६७० मधे) सुरत लुटली तेंव्हा लुटलेला अर्धाज ऐवज स्वराज्यात पोहोचला. आता आपण लवकरच मोंगलांच्या ताब्यात जाणार, हे लक्षात आल्यावर उरलेला खजिना राजांच्या विश्वासू सरदाराने नाशिक जवळ कुठेतरी लपवून ठेवला. त्या खजिन्याच्या शोधाची ही कादंबरी. ऐतिहासिक नसलेली, तरी इतिहासाच्या पार्श्वभूमीवर घडणारी. रहस्य, रोमांच, कूट प्रश्न, उत्कंठा, यांनी भरपूर असलेली. मराठीत अश्या ‘ऑफ-बीट’ कादंबऱ्या तशा कमीच. त्यामुळे ही ह्या ‘शोध’ चे महत्त्व वाढते.

ही कादंबरी प्रकाशित होऊन महिनाभर ही झालेला नाही. तरी मिळेल तिथून ही अवश्य वाचा. मुरलीधर खैरनारांचे आणि राजहंस प्रकाशनाचे अभिनंदन..!शोध

कटपयादी संख्येचे गूढ

Pieकटपयादी संख्या कटपयादि संख्ये चे गूढ

एक विस्तीर्ण पसरलेलं तळं आहे. त्याच्या किनाऱ्या वर एक झाड आहे. तळ्यात गोपी स्नान करताहेत आणि किनाऱ्या जवळच्या झाडावर गोपींची वस्त्रे घेतलेला कृष्ण बसलेला आहे. हे  तसे अनेक चित्रांत / चित्रपटात दिसलेले दृश्य. मात्र येथे नारद मुनींचा प्रवेश होतो. ते त्या गोपिंशी संवाद साधतात. त्यांना विचारतात की कृष्ण हा लंपट, त्रास देणारा, खोड्या काढणारा वाटतो काय ?

प्रत्येक गोपिके शी वेगवेगळा संवाद साधताना नारदांना जाणवतं, ह्या गोपी कृष्णा ला लंपट वगैरे मानत नाहीत, तर त्यांना कृष्ण हा अत्यंत प्रिय आहे. तो त्यांच्या जवळ आहे. अगदी जवळ. म्हणजे किती ? तर प्रत्येक गोपिके पासून समान अंतरावर आहे. मध्ये उभा असलेला कृष्ण अन त्याच्या भोवती समान अंतरावर उभ्या असलेल्या गोपिका. अर्थात त्या सर्व गोपिका एका वर्तुळाच्या स्वरूपात उभ्या आहेत, ज्या वर्तुळाचा केंद्र बिंदू आहे, कृष्ण..! ह्या अश्या रचनेबद्दल संस्कृत मधे एक श्लोक आहे. असं म्हणतात हा श्लोक महाभारताच्या काही ‘हरवलेल्या’ श्लोकांपैकी आहे –

गोपीभाग्यमधुव्रात-शृङ्गिशोदधिसन्धिग । खलजीवितखाताव गलहालारसंधर ॥

ह्या श्लोकाची गंमत आहे. हा श्लोक वाटतो तर श्रीकृष्णाच्या स्तुतीचा. पण त्याचबरोबर ह्या श्लोकात  शंकराची स्तुती पण दडलेली आहे. पूर्वीच्या शैव – वैष्णव वादाच्या पार्श्वभूमीवर हे महत्वाचं आहे. पण याहून ही महत्वाचं एक गूढ ह्या श्लोकात लपलंय. श्रीकृष्ण आणि गोपिंमध्ये जे केंद्र – वर्तुळाचं सुरेख नातं तयार झालं आहे, त्या नात्याची गणितीय परिभाषा ह्या श्लोकात लपलेली  आहे. आणि या परिभाषेतून π (पाय) ची बिनचूक किंमत समोर येतेय..!

गोपिकांनी निर्माण केलेल्या वर्तुळाचा परीघ काढायचा असेल तर आजच्या गणितात सूत्र आहे परीघ = 2 π r r म्हणजे वर्तुळाची त्रिज्या. अर्थात कृष्ण आणि गोपिंमधलं समसमान अंतर. यात π (पाय pie) ची निश्चित संख्या अनेक शतकं माहीत नव्हती. π ला 22/7 असंही लिहिलं जातं. अर्थात 3.14. मात्र ह्या श्लोकात π (पाय) ची किंमत दशांशाच्या पुढे ३१ आकड्यांपर्यंत दिलेली आहे. (एकतीसंच कां ? तर एकतीस आकड्यांनंतर त्याच आकड्यांची पुनरावृत्ती होत जाते). आता श्लोकात लपलेले हे आकडे कसे बघायचे ? याचं उत्तर आहे – कटपयादि संख्या. कटपयादि ही अगदी प्राचीन काळापासून एखाद्या संख्येला अथवा आकड्यांना कूटबध्द  (encrypt) करण्याची पध्दत आहे. संस्कृत च्या वर्णमालेत जी अक्षरं आहेत, त्यांना १ ते ० अश्या आकड्यांबरोबर जोडलं तर कटपयादि संख्या तयार होते. या कटपयादि संख्येतील कूट भाषा समजण्यासाठी ह्या श्लोकाची मदत होते –

का दि नव, टा दि नव पा दि पंचक, या दि अष्टक क्ष शून्यम्.

याचा अर्थ असा – सर्व अक्षरांना प्रत्येकी एक अंक दिला आहे. त्याचे कोष्टक पुढील प्रमाणे: क पासून नऊ असे क्रमाने १ ते ९: क = १ ख = २ ग = ३ घ = ४ ङ = ५ च = ६ छ = ७ ज = ८ झ = ९ ट पासून नऊ असे क्रमाने १ ते ९: ट = १ ठ = २ ड = ३ ढ = ४ ण = ५ त = ६ थ = ७ द= ८ ध = ९ प पासून पाच असे क्रमाने १ ते ५: प = १ फ = २ ब = ३ भ = ४ म = ५ य पासून आठ असे क्रमाने १ ते ८: य = १ र = २ ल = ३ व = ४ स = ५ श = ६ ष = ७ ह = ८ क्ष = ०

म्हणजे आता आपल्या श्लोकाची संख्या येते –

गोपीभाग्यमधुव्रात –  गो – ३, पी – १, भा – ४,  ग्य (यात मूळ अक्षर ‘य’ आहे) – १, म – ५, धु – ९ . . . . म्हणजेच ३.१४१५९ . . . ही किंमत आहे, π ची. अर्थात शेकडो वर्षांपूर्वी वर्तुळाचा परीघ काढण्यासाठी π (पाय) ह्या गुणोत्तराची (ratio ची) किंमत इतक्या खोलात जाऊन कशी काय काढता आली, हा प्रश्न शिल्लक राहतोच. पृथ्वीचा परीघ, चंद्राचा परीघ यांच्या संख्या भारतीय ग्रंथांमध्ये हजारो वर्षांपूर्वी पासून आढळतात. आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे काढले गेलेले परीघ किंवा व्यास, हे वेद्ग्रंथांच्या विभिन्न श्लोकांमधून / सूक्तांमधून काढलेल्या संख्येच्या अगदी जवळ आहेत. उदा. आर्यभट ने पृथ्वीचा व्यास ४,९६७ योजने अर्थात ३९,९६८ किमी आहे हे सांगितले होते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हा व्यास ४०,०७५ किमी आहे, हे सिध्द झाले आहे.

π (पाय) ही संकल्पना किती जुनी आहे ? इसवी सनापूर्वी साधारण अडीचशे वर्षांपूर्वी कोपर्निकस ने याचा वापर केलेला आढळतो. त्याही पूर्वी, म्हणजे इसवी सना पूर्वीच्या सहाव्या शतकात मिस्र मधे पाय चा उल्लेख आढळतो. पाश्चिमात्य विज्ञानाचा बराच इतिहास जतन करून ठेवला असल्याने तेथे असे पुरावे आढळतात. आक्रमकांनी ह्या पुराव्यांना नष्ट केले नसल्याने आजही जुन्या बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत. आपल्या भारतात मात्र असे नाही. येणाऱ्या आक्रमकांनी येथील ज्ञानाची साधनेच नष्ट केल्यामुळे जुन्या खुणा सापडणं अत्यंत कठीण आहे. तरीही π (पाय) चा उल्लेख इसवी सनापूर्वी सहाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या शल्ब सूत्रात आढळतो. मात्र π (पाय) ह्या संकल्पनेचे अस्तित्व आणि त्याची अचूकता ही बऱ्याच पूर्वी पासून भारतीयांना माहीत असावी, असं वाटण्याला भरपूर जागा आहे. बऱ्याच नंतर, म्हणजे पाचव्या शतकाच्या सुरवातीला आर्यभट ने π (पाय) ची किंमत दशांश चिन्हाच्या चार आकड्यापर्यंत बरोबर शोधून काढली असल्यामुळे पाय च्या शुध्द रूपातील संख्येचा मान आर्यभट कडे जातो.

पुढे कटपयादि सूत्र वापरून केलेला श्लोक हाती आला अन पाय ची किंमत दशांशा नंतर ३१ आकड्यापर्यंत मिळाली. कटपयादि संख्येचा उपयोग केवळ गणितामध्ये होतो असे नाही, तर रागदारी, खगोलशास्त्र अश्या अनेक ठिकाणी कटपयादि चा वापर झालेला आहे. दाक्षिणात्य संगीतात, विशेषतः कर्नाटक संगीतात, कटपयादि चा उपयोग मोठ्या प्रमाणावर झाला आहे. कटपयादि च्या मदतीने वेगवेगळे राग व त्यांच्या स्वरमालिका लक्षात ठेवणे सोपे जाते.

इसवी सनाच्या पाचशे वर्षांपूर्वी झालेल्या पिंगलाचार्यांनी कटपयादि संख्येचे प्रयोग वेगळ्या पद्धतीने केले. पिंगलाचार्य हे व्याकरण महर्षी पाणिनींचे बंधू होते. त्यांनी वेद मंत्रातील छंदांचा अभ्यास करण्यासाठी छंदशास्त्राची रचना केली.यात आठ अध्याय आहेत. याला पिंगलसुत्र असेही म्हणतात. वेदांच्या वृत्तांमध्ये लघु – गुरु पध्दत वापरली जाते. ही काहीशी आजच्या संगणकामध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘बायनरी’ पध्दती सारखी आहे. मात्र यात लघु हा १ आणि गुरु हा ० या आकड्याने दर्शवला जातो. याचा वापर करून, पिंगलाचार्यांनी तयार केलेली कटपयादि सूत्रे आहेत –

म     ०००               य     १०० र     ०१०               स     ११० त     ००१               ज    १०१ भ     ०११               न     १११

अर्थात, कटपयादि संख्येच्या माध्यमातून आपल्या देशात हजारो वर्षांपासून गणित, खगोलशास्त्र, छंदशास्त्र, संगीत यांचा अभ्यास होत आलेला आहे. आणि अश्या ह्या संख्येच्या मदतीने π (पाय) ची किंमत दशांशाच्या ३१ व्या स्थानापर्यंत काढणं आणि ती एखाद्या श्लोकात लपविणं (एम्बेड करणं) हे अद्भूताच्याच श्रेणीत येतं..!

प्रशांत  पोळ 

लोह स्तंभ

लोह स्तंभ - संस्कृत
लोह स्तंभावरील ब्राम्ही लिपीत लिहिलेल्या मजकुराची देवनागरी आवृत्ती

Lohe Stambh Dehli दक्षिण दिल्लीत आपण मेहरोली च्या दिशेने जाऊ लागलो की दुरूनच आपल्याला कुतुब मिनार दिसू लागते. २३८ फूट उंच असलेली ही मिनार म्हणजे जवळपास २३ मजली उंच इमारत. पूर्ण जगात विटांनी बांधलेली ही सर्वोच्च वास्तू आहे. जगभरातले पर्यटक ही मिनार बघायला येत असतात.

साधारण ९०० वर्ष जुनी असलेली ही इमारत युनेस्को नं जागतिक वारसा म्हणून घोषित केली आहे. आज जिथे ही मिनार उभी आहे, तिथे पूर्वी, म्हणजे पृथ्वीराज चौहान च्या काळात, त्याची राजधानी ‘ढिल्लीका’ ही होती. ह्या ढिल्लीका मधील लालकोट ह्या किल्लेवजा गढीला पाडून मोहम्मद घोरीच्या सेनापतीने, म्हणजे कुतुबुद्दीन ऐबकाने ही मिनार बांधली. पुढे इल्तुतमिष आणि मोहम्मद तुगलकाने याचं बाधकाम पूर्ण केलं असं तिथे सापडलेले शिलालेख सांगतात.

मात्र ह्या ‘ढिल्लीका’ च्या परिसरात, ह्या कुतुब मिनार पेक्षा कितीतरी जास्त विलक्षण गोष्ट अनेक शतकं उभी आहे. कुतुब मिनार पेक्षाही त्या गोष्टीचे महत्त्व अनेक पटींनी जास्त आहे. कुतुब मिनार ला लागुनच, साधारण शंभर, दीडशे फूट अतंरावर एक लोह स्तंभ उभा आहे. कुतुब मिनार पेक्षा बराच लहान. फक्त ७.३५ मीटर्स किंवा २४.११ फूट उंच. कुतुब मिनार च्या एक दशांश..! पण हा स्तंभ कुतुब मिनार पेक्षा बराच जुना आहे. इसवी सन ४०० च्या आसपास बनलेला. हा स्तंभ म्हणजे भारतीय ज्ञानाच्या रहस्याचा खजिना आहे.

ह्या लोह स्तंभात ९८% लोखंड आहे. इतकं लोखंड म्हणजे हमखास गंजण्याची शाश्वती. मात्र गेली सोळा-सतराशे वर्ष सतत उन्हा-पावसात उभं राहूनही ह्याला अजिबात गंज चढलेला नाही. विज्ञानाच्या दृष्टीने हे एक मोठं आश्चर्य आहे. आजच्या एकविसाव्या शतकातही, प्रगत तंत्रज्ञानाच्या काळात, धातुशास्त्रात अनेक प्रयोग, शोध आणि संशोधनं होऊनही ९८% लोखंड असलेला स्तंभ, गंजल्या वाचून  राहत नाही. त्या स्तंभावर एखादं ‘कोटिंग’ केलं तर तो स्तंभ फक्त काही काळ गंजल्या वाचून राहू शकतो. मग ह्या लोह स्तंभात असं काय वैशिष्ट्य आहे, की हा स्तंभ आजही जसाच्या तसा उभा आहे..?

आय. आय. टी. कानपुर च्या ‘मटेरियल्स एंड मेटालर्जीकल इंजिनिअरिंग’ विभागाचे प्रमुख प्रोफेसर आर. सुब्रमण्यम यांनी या वर बरंच काम केलेले आहे. इंटरनेट वर ही त्यांचे ह्या विषया संबंधी अनेक पेपर्स मिळतात.

प्रो. सुब्रमण्यम यांच्या मतानुसार लोह-फॉस्फोरस संयुगाचा उपयोग इसवी सना च्या चारशे वर्षांपूर्वी, म्हणजे अशोकाच्या काळात, भरपूर व्हायचा. आणि ह्या पध्दती नेच हा लोह स्तंभ तयार करण्यात आलेला आहे.

प्रो. सुब्रमण्यम आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी ह्या स्तंभावर वेगवेगळे प्रयोग करून हे सिध्द करून दाखवलंय. त्यांच्या म्हणण्यांनुसार लोखंडाला गंज निरोधन करणं आजच्या तंत्रज्ञानापुढचं मोठं आव्हान आहे. बांधकाम व्यवसाय, मेकेनिकल शी संबंधित उद्योग यात अश्या गंजरोधक लोखंडाची आवश्यकता असते आणि त्यासाठी इपोक्सी कोटिंग, कॅडोडिक प्रोटेक्शन पध्दत इत्यादी वापरल्या जातात. मात्र या साऱ्या पध्दति गंज लागणं लांबवतात. पूर्णपणे थांबवत नाहीत. गंज लागु द्यायचा नसेल तर त्या लोखंडातच गंजरोधक थर निर्माण करण्याची क्षमता असली पाहिजे. आज एकविसाव्या शतकात असे लोखंड निर्माण होऊ शकलेले नाही, जे स्वतः च असा गंजरोधक थर निर्माण करते..!

पण भारतात चौथ्या शतकात असे लोखंड निर्माण होत होते, आणि त्याचा प्रत्यक्ष पुरावा म्हणजे दिल्लीचा लोह स्तंभ. हा लोह् स्तंभ मुळात दिल्लीसाठी बनलेलाच नव्हता. चंद्रगुप्त मौर्य या प्रसिध्द राजाने इसवी सन ४०० च्या आसपास हा स्तंभ, मथुरेतील विष्णु मंदिराच्या बाहेर लावण्यासाठी बनवला होतं. या स्तंभावर गरुडाची मूर्ती पुर्वी विराजित झाली असावी. त्यामुळे याला ‘गरुड स्तंभ’ असेही म्हटले जाते.

ह्याला आधार आहे, ह्या स्तंभावर ब्राम्ही लिपीत कोरलेला एक संस्कृत श्लोक. चंद्र नावाच्या राजाच्या स्तुतीने भरलेला हा श्लोक विष्णुमंदीरा समोरच्या ह्या स्तंभाचं महत्त्व सांगतो. चंद्र नावावरून आणि चौथ्या शतकात हा स्तंभ तयार केला गेला असावा असा विचार करून, चंद्रगुप्त मौर्याने हा स्तंभ बांधला असावा असा तर्क काढण्यात आला. या कोरलेल्या श्लोकाची शैली ही गुप्तकालीन वाटत असल्याने ह्या तर्काला बळकटी मिळते. मथुरे जवळ असलेल्या विष्णुपद ह्या पर्वतावरील विष्णु मंदिरा समोर बांधण्यासाठी हा स्तंभ तयार करण्यात आल्याची नोंद ह्या श्लोकात मिळते.

(मात्र अनेक इतिहासतज्ञांचे मत असे नाही. त्यांच्या मते इसवी सनापूर्वी ९१२ मधे हा स्तंभ बनवण्यात आला आहे.)

७ मीटर उंच असलेला हा स्तंभ, ५० सेंटीमीटर (म्हणजे साधारण पावणे दोन फूट) जमिनीखाली आहे. ४१ सेंटीमीटर चा व्यास खाली तळाशी तर ३० सेंटीमीटर चा व्यास वर टोकाला आहे. पूर्वी, म्हणजे सन १९९७ पर्यंत, पर्यटक ह्या स्तंभाला पाठीमागून कवेत पकडण्याचा प्रयत्न करायचे. अश्या प्रकारे स्तंभ कवेत आला तर आपल्या मनोकामना पूर्ण होतात असं मानलं जायचं. पण त्यामुळे स्तंभाच्या लोखंडाला ठोकणे, त्यावर कोरण्याचे प्रयत्न करणे असं सगळं व्हायला लागल्या मुळे सन १९९७ पासून आर्कियोलोजिकल सर्व्हे ऑफ़ इंडियाने या स्तंभाभोवती एक संरक्षक फेंसिंग उभारले. त्यामुळे आता ह्या लोहस्तंभाला प्रत्यक्ष स्पर्श करणं शक्य नाही.

इतिहासातून बाहेर निघालेला हा एकटाच लोहस्तंभ अपवाद म्हणून आपल्याला दिसतो कां..? तर तसे नाही. इतरही काही ठिकाणी असे न गंजलेले लोहस्तंभ उभे राहिलेले दिसतात.

भारतात ही कला इसवी सनापूर्वी सहाशे, सातशे वर्ष (किंबहुना त्या ही पूर्वी), होती असे अनेक पुरावे मिळालेले आहेत. सोनभद्र जिल्ह्यांत राजा नाल-का-टीला, मिर्जापूर जिल्ह्यातील मल्हार आणि पश्चिम बंगाल मधील पांडुराजार धिबी व मंगलकोट ह्या जिल्ह्यांत उत्तम प्रतीच्या लोखंडाचे अनेक अवशेष सापडले आहेत. आणि हे सर्व पुरावे नि:संशयपणे हेच सांगताहेत की लोखंडाचं धातुकर्म भारतात विकसित झालं. अत्यंत उच्च प्रतीचं लोखंड भारतात तयार व्हायचं, असं त्या काळातल्या विदेशी प्रवाश्यांनीही  लिहिलेलं आढळत.

भारतात त्या काळापासून लोखंड तयार करणारे विशिष्ट समूह आहेत. त्यापैकी ‘आगरिया लोहार’ समाज हा आजही, कोणतीही आधुनिक यंत्रे न वापरता, जमिनीतील खाणींमधून लोखंडाची माती गोळा करतो. मातीतून लोखंडाची दगडे वेचून त्या दगडांवर प्रक्रिया करतो आणि या सर्व प्रक्रियेतून शुध्द लोखंड तयार करतो. लोखंड निर्माण करण्याची ही आगरिया लोहार समाजाची परंपरागत पध्दत आहे.

‘आगरिया’ हा शब्द ‘आग’ ह्या शब्दा पासून तयार झाला आहे. लोखंडाच्या भट्टीचे काम म्हणजे आगीचे काम. म्हणूनच ‘आगरिया’ हा शब्द. मध्यप्रदेशातल्या मंडला, शहडोल, अनुपपूर आणि छत्तिसगढच्या बिलासपुर आणि सरगुजा ह्या जिल्ह्यांत हा समाज आढळतो. हा समाज म्हणजे गोंड समाजाचे च अंग समजले जाते. ह्या समाजात दोन पोट-जाती आहेत – ‘पथरिया’ आणि ‘खुंटीया’. यापैकी लोखंडाची भट्टी तयार करताना जे दगडाचा उपयोग करतात, ते झाले पथरिया (पथ्थर म्हणजे दगड) आणि जे भट्टी तयार करताना खुंटी चा वापर करतात, ते झाले खुंटीया. आजही ह्या समाजाच्या उपजीविकेचे साधन हे लोखंड ‘तयार’ करून त्यापासून अवजारं आणि हत्यारं तयार करण्याचं आहे. भोपाळ च्या संगीत वर्मा ह्या दिग्दर्शकाने ह्या आगरिया लोकांवर एक वृत्तचित्र तयार केलं आहे. ह्या वृत्तचित्रात जंगलातल्या मातीतून लोखंडाचे दगड निवडण्या पासून तर लोखंडाची अवजारं तयार करण्यापर्यंत पूर्ण चित्रण केलेलं आहे.

म्हणजे दोन, अडीच हजार वर्षांपासूनची ही धातुशास्त्राची परंपरा, फक्त या जमातीत कां होईना, झिरपत, झिरपत शिल्लक राहिलेली आहे. मग राजाश्रय आणि लोकाश्रय असताना अडीच हजार वर्षांपूर्वी ह्या धातूशास्त्राच्या कलेचं स्वरूप कसं असेल..?

नुसत्या कल्पनेनंच मन थक्क होतं..!

प्रशांत पो

भ्रमण ध्वनी : ०९४२५१५५५५१      ई-मेल : telemat@bsnl.in

भारतीय ज्ञानाचा खजिना – १ बाण स्तंभ

इतिहास हा फार चकवणारा विषय आहे. आणि इतिहासाचा मागोवा घेता घेता आपण एखाद्या अश्या जागी येऊन उभे राहतो की मन अक्षरशः थक्क होऊन जाते. हे असं शक्य आहे कां, या विषयी मनात गोंधळ उडतो. दीड हजार वर्षांपूर्वी हे इतकं प्रगत ज्ञान आपल्यापाशी होतं यावर विश्वासच बसत नाही.
गुजराथ च्या सोमनाथ मंदिरापाशी येऊन आपली अशीच परिस्थिती होते. मुळात सोमनाथ मंदिराचा इतिहासच विलक्षण. बारा ज्योतिर्लिंगांतील हे एक देखणं, वैभवशाली शिवलिंग. इतकं समृध्द की उत्तर पश्चिमेतून येणाऱ्या प्रत्येक आक्रमकाचं लक्ष सोमनाथ कडे गेलं आणि अनेकवार सोमनाथ लुटल्या गेलं. सोनं, नाणं, चांदी, हिरे, माणकं, रत्न. . . सर्व गाडे भरभरून नेलं. आणि इतकी संपत्ती लुटल्या जाऊन ही दर वेळी सोमनाथ चं शिवालय परत तश्याच वैभवानं उभं राहायचं.
मात्र फक्त ह्या वैभवासाठी सोमनाथ महत्वाचं नाही. सोमनाथ चं मंदिर भारताच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावर आहे. विशाल पसरलेला अरबी समुद्र रोज सोमनाथाचे पादप्रक्षालन करत असतो. आणि गेल्या हजारो वर्षांच्या ज्ञात इतिहासात ह्या सागराने कधीही सोमनाथाचा उपमर्द केलेला नाही. कोणत्याही वादळामुळे सोमनाथाचे गौरवशाली मंदिर कधी उध्वस्त झाले नाही.
ह्या सोमनाथाच्या मंदिराच्या आवारात एक स्तंभ आहे. हा ‘बाण स्तंभ’ म्हणून ओळखला जातो. हा केंव्हापासून त्या ठिकाणी आहे, हे सांगणं अवघड आहे. इतिहासाचा धांदोळा घेत घेत मागे गेलो की कुठेतरी सहाव्या शतकापाशी आपण पोहोचतो, जिथे ह्या बाण स्तंभाचा उल्लेख आढळतो. पण म्हणजे हा सहाव्या शतकात उभारल्या गेलाय असं सिध्द होत नाही. हा स्तंभ किती जुना आहे, याबद्दल नक्की सांगणं शक्य नाही.
हा बाण स्तंभ म्हणजे दिशादर्शक स्तंभ आहे. यावर एक बाण उभारलाय आणि खाली लिहिलंय –
‘आसमुद्रान्त दक्षिण धृव पर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग’
याचा अर्थ असा – या बिंदुपासून दक्षिण धृवा पर्यंत सरळ रेषेत एकही अडथळा नाही. अर्थात या मार्गात एकही जमिनीचा तुकडा नाही.
ज्याक्षणी सर्वप्रथम मी हा स्तंभ बघितला अन हा शिलालेख वाचला, तो वाचून डोक्यात त्याचा अर्थ जाता क्षणीच अंगावर काटा उभा राहिला ! हे ज्ञान इतक्या पूर्वी आपल्याला होतं..? कसं शक्य आहे हे? आणि जर हे खरच असेल तर किती समृध्दशाली ज्ञानाचा वैश्विक वारसा आपण बाळगतोय..!
संस्कृत मधे कोरलेल्या ह्या एका ओळीच्या अर्था मधे अनेक गूढ अर्थ सामावलेले आहेत. ह्या ओळीचा सरळ अर्थ आहे, सोमनाथ मंदिराच्या त्या बिंदुपासून दक्षिण धृवा पर्यंत (म्हणजे अन्टार्टिक पर्यंत) एक सरळ रेघ ओढली तर मधे एकही भूखंड लागत नाही. आता हे खरं कश्यावरून..? आजकालच्या ह्या तंत्रज्ञानाच्या युगात हे शोधणं सोपं व्हावं. मात्र हे तितकंसं सोपं नाही. गुगल मेप वरून बघितलं तर वर वर बघता भूखंड दिसत नाही. मात्र तो मोठा भूखंड. एखादा लहान भूखंड शोधायचा असेल तर त्या पूर्ण मार्गाला ‘एन्लार्ज’ करत करत पुढे जायचे. हे तसं किचकट काम. मात्र संयम ठेऊन, चिकाटीने हळू हळू बघत गेलं की मार्गात एकही मोठा भूखंड, म्हणजे 10 Km X 10 Km चा, लागत नाही. त्या खालचा भूखंड हा विशेष तंत्रज्ञानानेच शोधावा लागेल. थोडक्यात, तो संस्कृत श्लोक खरा आहे असं धरून चालू.
पण मूळ प्रश्न तसाच राहतो. अगदी सन ६०० मधे हा बाण स्तंभ उभारला असं जरी म्हटलं, तरी त्या काळात पृथ्वीचा दक्षिण गोलार्ध आहे, हे ज्ञान कुठून मिळालं ? बरं, दक्षिण गोलार्ध माहीत होता हे गृहीत धरलं तरी सोमनाथ मंदिरापासून दक्षिण धृवापर्यंत सरळ रेषेत गेलं की मध्ये कोठेही एकही भूखंड येत नाही, हे ‘मेपिंग’ कोणी केलं ? सारंच अद्भुत..!
याचाच अर्थ, बाण स्तंभ उभारण्याच्या काळात, भारतीयांना पृथ्वी गोल आहे हे माहीत होतं आणि फक्त तितकंच नाही, तर ह्या पृथ्वीला दक्षिण धृव आहे (म्हणजेच अर्थात उत्तर धृव ही आहेच), हे ज्ञान ही होतं. हे कसं काय शक्य झालं ? त्यासाठी पृथ्वीचा ‘एरियल व्ह्यू’ घेण्याचं काही साधन होतं कां ? नसल्यास पृथ्वीचा नकाशा त्या काळी अस्तित्वात होता कां ?
नकाशाशास्त्र (इंग्रजीत ‘कार्टोग्राफी’ – मूळ फ्रेंच भाषेतून उचललेला शब्द) हे फार प्राचीन शास्त्र. ख्रिस्तपूर्व सहा ते आठ हजार वर्षांपूर्वी गुहेत कोरलेल्या आकाशस्थ ताऱ्यांचे नकाशे मिळाले आहेत. मात्र पहिल्यांदा पृथ्वीचा नकाशा कोणी काढला, यावर एकमत नाही. भारतीय ज्ञानाचे पुरावे मिळाले नसल्याने ‘एनेक्झीमेंडर’ ह्या ग्रीक शास्त्रज्ञाकडे हा मान जातो. ख्रिस्तपूर्व ६११ ते ५४६ हा त्याचा कालखंड. मात्र त्याचा नकाशा हा अत्यंत ढोबळ आहे. त्या काळात जिथे जिथे ज्ञात मनुष्यवस्ती आहे, तो भाग या नकाशात दाखविण्यात आलेला आहे. या नकाशात उत्तर आणि दक्षिण धृव दिसण्याचं ही काही कारण नाही.
आजच्या वास्तविक जगाच्या जवळ जाणारा पृथ्वीचा नकाशा हेनरीक्स मार्टेलस ने साधारण सन १४९० च्या आसपास केलेला आढळतो. असं म्हणतात, कोलंबस ने ह्याच नकाशा चा आधार घेतलेला होता.
‘पृथ्वी गोल आहे’ हे मत युरोपातील काही शास्त्रज्ञांनी ख्रिस्तपूर्व काळात व्यक्त केलेले आढळते. एनेक्झीमेंडर ने ख्रिस्तपूर्व ६०० वर्षांपूर्वी पृथ्वीला एका ‘सिलेंडर’ च्या स्वरूपात बघितले होते. एरिस्टोटल ने ही पृथ्वीला गोल म्हटलेले आहे.
मात्र भारता जवळ हे ज्ञान फार आधीपासून होते ह्याच्या अनेक खुणा मिळतात. याच ज्ञानाच्या आधारावर सन ५०० च्या आसपास आर्यभट्ट ने फक्त पृथ्वी गोल आहे, हेच सांगितले नाही, तर पृथ्वीचा व्यास ४,९६७ योजने आहे (म्हणजे नवीन मापना प्रमाणे ३९,९६८ कि. मी.) हे देखील ठासून सांगितले. आज सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून पृथ्वीचा काढलेला व्यास ४०,०७५ कि. मी. आहे. अर्थात आर्यभट्ट च्या आकलनात चूक होतेय ती फक्त ०.२६ %. सोळाशे वर्षांपूर्वी आर्यभट्ट जवळ हे ज्ञान आले कोठून..?
सन २००८ मधे जर्मन इतिहासतज्ञ जोसेफ श्वार्टझबर्ग ने हे सिध्द केले की ख्रिस्तपूर्व दोन / अडीच हजार वर्षांपूर्वी पासून भारतात नकाशाशास्त्र अत्यंत विकसित होते. नगर रचनेचे नकाशे तर त्या काळात उपलब्ध होतेच, पण नौकानयना साठी आवश्यक असे नकाशे असल्याचे ही पुरावे आढळतात.
भारतात नौकानयन शास्त्र फार पूर्वीपासून विकसित होतं. संपूर्ण दक्षिण आशियात ज्या प्रकारे हिंदू संस्कृतीच्या पाउलखुणा आढळतात, त्यानुसार भारताची जहाजं पार पूर्व टोकापर्यंत, म्हणजे जावा, सुमात्रा, यवद्वीप ओलांडून जापान पर्यंत समुद्रात विहार करत होती याचे भरभक्कम पुरावे मिळाले आहेत. १९५५ साली शोधण्यात आलेल्या गुजरात च्या लोथल मधे अडीच हजार वर्षांपूर्वीचे अवशेष सापडले आहेत. यात भारताच्या प्रगत नौकानयना विषयी अनेक पुरावे दिसतात.
अर्थात सोमनाथ मंदिर उभारण्याच्या काळात दक्षिण धृवापर्यंत चे दिशादर्शन त्या काळातील लोकांना असेल हे निश्चित. दुसरा अजून एक विचार समोर येतो की दक्षिण धृवा पर्यंत सरळ रेषेबाण स्तंभ - सोमनाथत जमीन नसलेला समुद्र आहे हे नंतर शोधून काढण्यात आलं की दक्षिण धृवापासून जमीन नसलेल्या सरळ रेषेची सांगता भारतात जिथे होते, तिथे सोमनाथ हे ज्योतिर्लिंग उभारण्यात आलं..? त्या बाण स्तंभावर लिहिलेल्या ओळीत उल्लेख केलेला आहे, (‘आसमुद्रान्त दक्षिण धृव पर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग’) तो ज्योतीर्मार्ग म्हणजे नेमकं काय..?

सध्या तरी हे गूढच आहे..!

प्रशांत पोळ

शार्ली एब्दो च्या हल्ल्या नंतर

अकरा जानेवारीला पेरीस मधे इतिहास घडत असताना शार्ली एब्दो च्या इमारतीबाहेर लाखोंचा जमाव जमला होता. ही सर्व माणसं ‘शार्ली एब्दो च्या मागे आम्ही भक्कमपणे उभे आहोत’ हे सांगण्या करता जमली होती. एका स्वरात समूह गर्जना होत होती – शार्ली.. शार्ली.. ‘ला फ्रांस, इस्ट शार्ली’ (पूर्ण फ्रांस शार्ली बरोबर आहे). या उत्तेजित जमावाला पुढे काय करावं तेच कळत नव्हतं. अन तश्यातच त्या जमावाची नजर, इमारती च्या गच्चीवर उभ्या असलेल्या पोलिसावर गेली. जमावानं हात हलवले अन त्याला प्रतिसाद म्हाणून पोलिसाने जमावाला सेल्युट केला. झालं. जमाव अक्षरशः पागल झाला. तो पोलीस फ्रेंच स्वातंत्र्याचे, प्रशासनाचे आणि अभिव्यक्ती चे प्रतीक बनला. लाखोंचा तो जमाव त्या पोलिसाकडे बघून शार्ली.. शार्ली.. अश्या आरोळ्या ठोकत होता आणि त्या पोलिसाने दर पाच-पाच मिनिटाला सेल्युट केला की उसळत होता. ’थेंक यू मिस्टर पोलीसमन’ असं ओरडत होता.

ही घटनाच फ्रेंच जनतेचा मूड सांगते. कडाक्याच्या थंडीत, पंधरा लाखांपेक्षा जास्त लोकांचा जमाव पेरीस च्या रस्त्यांवर येतो. दहशतवादाच्या विरुध्द बुलंद गर्जना करत अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी एकजूट असल्याचा संदेश देतो. पन्नास पेक्षा जास्त देशांचं नेतृत्व, फ्रेंच राष्ट्रपती फ्रान्क्वा ओलांद ला पाठिंबा देण्यासाठी पेरीस मध्ये येते. तेथे इस्राईल चे पंतप्रधान असतात तसेच पेलेस्ताइन चे ही. हे सारंच अद्भुत आहे. इतिहासाला एक मोठं वळण देण्याची ताकत ह्या प्रसंगात आहे. राष्ट्रपती ओलांद च्या म्हणण्याप्रमाणे रविवारी ११ जानेवारी ला पेरीस ही जगाची राजधानी झालेली होती.

पेरीस च्या ह्या ‘मिलियन मार्च’ ने जगाला आणि विशेषतः मुस्लिम जगताला फार स्पष्ट आणि कडक संदेश दिलेला आहे की हा धार्मिक कट्टरपणा, हा दहशतवाद मुळीच सहन केला जाणार नाही. शनिवारी आणि रविवारी फ्रांस च्या जवळपास प्रत्येक शहरात मोठमोठे मोर्चे निघाले. शनिवारी पेरीस वगळता उर्वरित फ्रांस मधे सात लाखांपेक्षा जास्त लोकं रस्त्यावर आले. नीस, लिले सारख्या शहरांमध्ये तर ही संख्या मोठी होतीच, पण मार्सेलिस ह्या फ्रांस च्या दुसऱ्या क्रमांकाच्या अन मुस्लिम प्रभावाखाली असलेल्या शहरातही तीस हजारांचा मोर्चा निघाला. पावणे सात कोटी लोकसंख्या असलेल्या फ्रांस मधे २२ ते २५ लाख लोकं फक्त दोन दिवसात रस्त्यावर येणं हे अभूतपूर्व आहे.

फक्त फ्रान्सच कशाला ? पूर्ण युरोपात शार्ली एब्दो वरील हल्ल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. जर्मनी, इटली, निदरलंड, इंग्लंड, स्पेन वगैरे देशांमध्येही मोठमोठे मोर्चे निघाले. मात्र सर्वात महत्वाची घटना म्हणजे पन्नास देशांचे प्रमुख ह्या घटनेचा निषेध करण्या साठी पेरीस मध्ये एकत्र जमले. इतक्या संख्येने राष्ट्रप्रमुख एकत्र येतील अशी कोणीच कल्पना केली नव्हती. प्रारंभीचा अंदाज १० ते १५ राष्ट्रप्रमुखांचा होता. अगदी रविवार दुपार पर्यंत चाळीस देशांचे प्रमुख येताहेत असं टी व्ही चेनल्स वर सांगितल्या जात होतं. मात्र प्रत्यक्षात आले ते पन्नास पेक्षा जास्त देशांचे प्रमुख.

पेरिस च्या ह्या ‘मिलियन मार्च’ मधे अजुन एक गोष्ट ठळकपणे उठून दिसली. इस्त्राईल चा इतर देशांद्वारे होत असलेला बहिष्कार, किमान या घटनेच्या संदर्भात तरी, संपला असं म्हणता येईल. दहशतवाद्यांनी पेरीस मधे ज्युईश बाजारावर केलेला हल्ला आणि त्यात मरण पावलेले ४ नागरिक, यामुळे इस्त्राईल च्या बाजूने सहानुभूती निर्माण झाली. फ्रांस चे राष्ट्रपती ओलांद स्वतः इस्त्राईल चे प्रधानमंत्री बेन्जामिन नेतान्याहू यांना सिनेगॉग मधे घेऊन गेले. हा सुध्दा मुस्लीम जगताला दिलेला कडक इशाराच होता की आम्ही इस्त्राईल ला वाऱ्यावर सोडणार नाही.

सध्या सारा युरोप ढवळून निघालाय. इस्लाम विरुध्द मोठ्या प्रमाणावर धृवीकरण झालेले आहे. त्यामुळे इस्लाम विरुध्द ख्रिश्चन (किंवा इतर) असा संघर्ष न पेटो ही चिंता प्रत्येक राष्ट्रप्रमुखाला आहे. म्हणुन राष्ट्रपती ओलांद सहित प्रत्येक राष्ट्रप्रमुख आपापल्या नागरिकांना एकजूट राहण्यास सांगताहेत, धार्मिक तेढ कमी करावी असा संदेश देताहेत. इस्लाम हा शांती चा धर्म आहे आणि त्याचं दहशतवादाशी काही एक घेणं देणं नाही असं सांगण्यात येतंय. पण प्रत्यक्षात युरोपियन नागरिकांमध्ये आणि विशेषतः फ्रेंच नागरिकांमध्ये, इस्लाम म्हणजेच दहशतवाद हे समीकरण घट्ट होत चाललंय.

याला कारणही आहे. शार्ली एब्दो च्या हल्ल्यानंतर, युरोप ने दाखवलेली भक्कम एकजूट बघूनही रविवारी, अकरा जानेवारी च्या (म्हणजे ‘मिलियन मार्च डे’ च्या) सकाळी जर्मनीच्या हंबर्ग मार्गेनपोस्ट ह्या दैनिकावर हल्ला झाला. ह्या हल्ल्याचे कारण म्हणजे या दैनिकाने शार्ली एब्दो च्या व्यंगचित्राचे पुनर्मुद्रण केले होते. रविवारी संध्याकाळीच बेल्जियम च्या दैनिकाला बॉंब हल्ल्याची धमकी मिळाली, कारण त्यानेही शार्ली एब्दो चे व्यंगचित्र छापले होते. ह्या घटनांची प्रतिक्रिया पण होतेय. युरोपात दहशतवादी हल्ल्यातच नव्हे, तर इतरही गुन्ह्यात जे आरोपी पकडले गेले आहेत, त्यांच्यात मुसलमानांची सख्या जास्त आहे. एकट्या फ्रांस मधेच, तुरुंगात बंदी असलेल्या एकूण कैद्यांपैकी ७०% कैदी मुस्लीम आहेत. शार्ली एब्दो च्या निमित्ताने ह्या सर्व गोष्टी लोकांसमोर येताहेत आणि यामुळे ध्रुवीकरण अधिकच बळकट होतेय. ७ जानेवारी च्या हल्ल्यानंतर फ्रांस मध्ये काही मशि‍दींवर हल्ले झाले. आणि मुस्लीम विरोधाची ही भावना बळकट होताना दिसतेय. अकरा जानेवारी ला पेरीस मधील मार्च मध्ये अनेक नागरिकांच्या ज्या मुलाखती दाखवल्या, त्यातूनही हे दिसून येत होतं.

हे सर्व कुठपर्यंत चालणार? सामान्य जनतेचा उत्साह पुढच्या सात-आठ दिवसात थंड होणार. मग हे संपूर्ण प्रकरण इतिहासाचा एक भाग म्हणुन पुस्तकात बंद होऊन राहणार का..?

सध्या तरी तसे दिसत नाही. हे प्रकरण धुमसत राहणार हे निश्चित. युरोपियन देशातील राष्ट्रप्रमुख, राजकीय नेतृत्व आणि प्रशासक गंभीरपणे विचार करायला लागले आहेत की अमेरिके ला दहशतवाद्यांकडून इतक्या धमक्या मिळत असतानाही, ९/११ नंतर अमेरिकीत एकही दहशतवादी हल्ला करणे अतिरेक्यांना शक्य झाले नाही. मग युरोपियन देशांमधे काय चुकलं, की असा हल्ला झाला. यामुळे, यापुढे सर्वच युरोपियन देशांत सुरक्षा व्यवस्था अधिक जास्त आवळल्या जाणार हे निश्चित.

ज्याप्रमाणे जगाच्या इतिहासात अमेरिके वरील ९/११ चा हल्ला महत्वाचा ठरला, त्याचप्रमाणे हा अकरा जानेवारी चा हल्ला ही युरोप च्या इतिहासात एक ‘टर्निंग पॉइंट’ बनताना दिसतोय.Million March - 2

प्रशांत पोळ

जबलपुर 

०९४२५१ ५५५५१

ज्याप्रमाणे जगाच्या इतिहासात अमेरिके वरील ९/११ चा हल्ला महत्वाचा ठरला, त्याचप्रमाणे हा अकरा जानेवारी चा हल्ला ही युरोप च्या इतिहासात एक ‘टर्निंग पॉइंट’ बनताना दिसतोय.

प्रशांत पोळ

जबलपुर 

०९४२५१ ५५५५१