मध्य प्रदेशातून प्रेरणा घेतलेला श्री गणरायांचा हा दहा दिवसांचा उत्सव आता साऱ्या भारतभर उत्साहाने साजरा होतोय. सन १८९१ मध्ये पुण्याचे वैद्य खाजगीवाले हे कामाने ग्वाल्हेर आले होते. तिथे त्यांनी गणरायाच्या उत्सवाचे शिंदेशाही स्वरूप बघितले. राजाश्रयानं साजरा होणारा, पण लोक सहभागातून साकारलेला गणेशोत्सव त्यांना खूप भावला.
पुण्यात परतल्यावर त्यांनी ह्या ग्वाल्हेर च्या उत्सवा संबंधी ची माहिती श्रीमंत दगडू हलवाई आणि भाऊ रंगारी यांना सांगितली. पुण्यातही अश्याच प्रकारचा गणेशोत्सव सुरु करावा असा विचार झाला. अन त्यानुसार १८९२ मधे पहिले तीन सार्वजनिक गणपती बसविण्यात आले. त्यांच्या विसर्जन मिरवणुकीला लोकमान्य टिळकांना बोलावण्यात आले. लोकमान्यांनी लोकांच्या उत्साहाचा तो अविष्कार बघितला आणि म्हटले, ‘हे तर आमचे राष्ट्रीय उत्सव’. पुढच्याच वर्षी, अर्थात १८९३ ला लोकमान्यांनी, ते राहत असलेल्या विंचूरकर वाड्यात गणपती बसविला आणि स्वातंत्र्य चळवळी साठी काही भाषणाचे कार्यक्रम आणि मेळ्याचे कार्यक्रम ठेवले.
आज महाराष्ट्रातल्या गणेशोत्सवाचं स्वरूप काहीसं बदललं असेलही. पण मध्य प्रदेशातील मराठी मंडळी ते पारंपरिक स्वरूप बऱ्याच प्रमाणात टिकवून आहेत. आजही अनेक गणेशोत्सव मंडळात भाषणाचे कार्यक्रम होतात. यंदा इंदूर ला महाराष्ट्र समाज, राजेंद्र नगर आणि तरुण मंचाच्या सार्वजनिक गणेशोत्सवात दिल्लीचे प्रसिध्द पत्रकार आणि राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे याचं ३१ ऑगस्ट ला भाषण आहे.
गणेशोत्सव म्हणजे महाराष्ट्रा बाहेरच्या मराठी माणसांचा सर्वात मोठा उत्सव. एक सळसळतं चैतन्य या दिवसात मराठी समाजात दिसतं. श्रावणाची चाहुल लागण्याच्या आधीच वेगवेगळ्या मराठी मंडळात हालचाली सुरु झालेल्या असतात. पावसानं तृप्त झालेली, हिरवाकंच शालू ल्यालेली धरित्री या उत्साहाला हातभार लावत असते. कार्यक्रम ठरत असतात. पत्रिका छापण्याची लगबग असते. त्यासाठी जाहिराती गोळा करणं हा एक मोठा कार्यक्रम असतो. मग रोज संध्याकाळी / रात्री कोणाच्या तरी घरी जमणे किंवा संस्थेच्या आवारात गप्पांचा फड रंगविणे… यात दिवस आणि रात्री कश्या जातात ते कळतही नाही. या गप्पांमधे समाजातले प्रतिष्ठित जसे असतात, तसे नवसे / गवसे / तरुण मुलं वगैरे सर्वच असतात. हे दहा दिवस फक्त मराठी म्हणून ही सर्व मंडळी एकत्र येतात. म्हणूनच यांच्यात वयाची किंवा आर्थिक परिस्थितीची कुठलीही भिंत उभी नसते.
आजही येथील गणेशोत्सवांमध्ये भजनाचा कार्यक्रम असतोच. एखादं नाटक, नाटुकलं किंवा एकांकिका ही होतेच. भाषणाचा किंवा वादविवादाचा कार्यक्रमही अनेक ठिकाणी असतो. मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात अनेक हौसे, गवसे, नवसे यांना चांगलं व्यासपीठ मिळतं. आणि यापैकी ज्यांच्याजवळ प्रतिभा असते ते मग पुढेही जातात.
इंदूर, जबलपुर, भोपाळ, ग्वाल्हेर, उज्जैन वगैरे तर मराठी गणेशोत्सवांची मोठी ठिकाणं. पण मध्यप्रदेशात जिथे म्हणून शंभर च्या वर मराठी कुटुंब राहतात, तिथे तिथे सार्वजनिक गणेशोत्सव हा हमखास साजरा होतोच. धार, देवास, बैतुल, हरदा, सतना, सागर, रीवा, छिंदवाडा, रतलाम, बऱ्हाणपूर, छतरपूर, गुना, गंजबासौदा, इटारसी, खंडवा, खरगोन, महू, मंडलेश्वर, नागदा, राजगढ, टिमरणी, शाजापुर… किती नावं घ्यावी..? या सर्व ठिकाणी मराठी माणसं अत्यंत उत्साहाने गणेशोत्सव साजरा करतात.
मध्यप्रदेशात हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होण्याचं मुख्य कारण म्हणजे येथे मराठी माणसांची असलेली संख्या आणि पुर्विच्या काळी मध्यप्रदेशाच्या पश्चिम भागात असलेली मराठी संस्थानं. सन १९८५ पर्यंत मध्यप्रदेशाची दुसऱ्या क्रमांकाची अधिकृत भाषा (second language) ही मराठी होती, हे कदाचित अनेकांना माहीत नसेल. मात्र १९८५ साली अर्जुनसिंह मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी उर्दू ही दुसऱ्या क्रमांकाची भाषा घोषित केली आणि हळू हळू सरकार दरबारी मराठीची पीछेहाट सुरु झाली. मात्र मध्यप्रदेशात भाजप ची सत्ता आल्यावर मराठीला जरा बरे दिवस आले. ‘मराठी अकॅडमी’ ची स्थापना झाली. त्या निमित्ताने मध्यप्रदेशात मराठी चे कार्यक्रम होऊ लागले. अकॅडमी चे वर्तमान संचालक अश्विन खरे यांनी सध्या या कामाला चांगलीच गती दिलेली आहे.
मध्यप्रदेशात सर्वात जास्त ‘मराठी’ गणेशोत्सव साजरे होतात ते इंदूर ला. तेथे किमान वीस पेक्षा जास्त ठिकाणी मराठी माणसं सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतात. राजेंद्र नगर परिसरातला गणेशोत्सव हा तसा उत्साहाने सळसळता असतो कारण ‘तरुण मंचाचा’ त्यात सहभाग असतो. अगदी शिस्तबध्द रीतीने गणेश मूर्तीची वाजत गाजत मिरवणूक काढून स्थापना करण्यात येते. पुढले दहाही दिवस भरगच्च कार्यक्रम असतात. प्रशांत बडवे, सुनील धर्माधिकारी, उल्हास देशपांडे ही सर्व उत्साही मंडळी नवनवीन कल्पना राबवत असतात.
इंदूर मधलाच ‘सुखालीया मराठी मंडळाचा’ ही उत्सव दिमाखदार असतो. लोकमान्य नगर, वासुदेव नगर आणि रामबाग हे पूर्वीपासून चे मराठी ‘मोहोल्ले’. या तिन्ही ठिकाणचा उत्सव प्रेक्षणीय असतो. याशिवाय ‘मेघदूत महाराष्ट्र मंडळ’, समर्थ मठ संस्थानात आणि समर्थ रामदास सेवा मंडळात साजरा होणारा उत्सवही आगळा वेगळा असतो. दत्त मंदिर संस्थान, परस्पर नगर, नारायण बाग, जेल रोड येथील मराठी गणेशोत्सव ही गाजत राहतात.
भोपाळ मधे गेल्या काही वर्षांपासून मराठी मंडळांचे वेगवेगळे कार्यक्रम जोमाने साजरे होताहेत. येथील गिरीश जोशी हे या मंडळांमध्ये समन्वय ठेवण्याचं काम करतात. त्यामुळे आजकाल येथेही ‘मराठी’ गणेशोत्सवाची धमाल असते. तुलसी नगर आणि दत्त मंदिर परिसरातले गणेशोत्सव हे तसे जुने. मात्र त्याच बरोबर आदर्श नगर, पिपलानी, गौतम नगर, कोलार येथेही महाराष्ट्र मंडळांद्वारे हा उत्सव दणक्यात साजरा होतो. लोणारी कुणबी समाजाचा बरखेडा मधील लालबाग गणेश उत्सव हा आकर्षणाचा केंद्रबिंदु असतो.
जबलपूरच्या महाराष्ट्र समाजाचा गणेशोत्सव हा फार जुना. यंदा त्याचे ११८ वे वर्ष आहे. सुनील परांजपे या स्थानीय मूर्तीकाराने बनविलेली अत्यंत भव्य मूर्ती, दर्जेदार कार्यक्रम आणि अनेक स्पर्धांनी रंगलेला हा उत्सव, महाराष्ट्र विद्यालयात साजरा होतो. यंदा पुण्याच्या अमोल शेवडेंचा ‘सुंदर मी होणार’ हा एकपात्री कार्यक्रम, मराठी गीत संध्या आणि नीरजा बोधनकर यांच्या समूहाचे ‘नदी गाथा’ हे नृत्य-नाट्य, हे कार्यक्रम प्रामुख्याने होणार आहेत. येथील गोलबाजारातील दत्त मंदिरात साजरा होणाऱ्या ‘बाल तरुण समाजाच्या’ उत्सवाचे हे ५१ वे वर्ष आहे. यंदाच्या भरगच्च कार्यक्रमात ‘वैदर्भीय गीत गंगा’ हा विदर्भातील कवी आणि संगीतकार यांच्या रचनेवर आधारित कार्यक्रम आकर्षणाचे केंद्र आहे. या शिवाय विजय नगर परिसरातील ‘मराठी संस्कृती मंडळ’ आणि गढा क्षेत्रात राहणारी मंडळी ही गणेशोत्सव धडाक्याने साजरा करतात.
हे सर्व उत्सव अत्यंत पारंपरिक पद्धतीने आणि अत्यंत उत्साहाने साजरे होतात. स्थापना करण्यासाठी श्री गजाननाच्या मूर्तीची वाजत गाजत मिरवणूक म्हणजे कार्यक्रमांची सुरुवात असते. धोतर-कुर्ता, फेटा / पगडी या वेशात पुरुष मंडळी तर नऊवारी साडी आणि नथ घालून अगदी तरुण मुलीही या मिरवणुकीत चालत असतात. उत्सवात रोज भजन असतेच. संध्याकाळच्या आरतीचे मानकरी ठरवले जातात. आणि शहर भर, गाव भर मराठी आरत्यांचे स्वर, लाऊड स्पीकर्स वरून निनादत असतात. आरती झाल्यावर मग निरनिराळे कार्यक्रम सुरु होतात. गाण्यांचे कार्यक्रम तर सर्वच मराठी मंडळात हमखास होतात. पण नृत्य – नाट्य यांचीही रेलचेल असते.
जसे सार्वजनिक, तसेच मध्यप्रदेशात घरोघरी ही गणराय विराजित झालेले असतात. यासाठी अनेक घरांमधून गणपती साठी विशेष आरास केली जाते. मध्यंतरी गणपती पूजेसाठी गुरुजी मिळण्याची थोडी समस्या होती. मात्र गेल्या काही वर्षात तरुण पिढीने भिक्षुकीच्या कामात प्रवेश केला आहे. नोकरीची शाश्वती नाही आणि व्यवसाय जमत नाही, ही अनेक मराठी तरुणांची स्थिती आहे. मात्र भिक्षुकीच्या कार्याला आजकाल चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे बरेच मराठी तरुण या क्षेत्राकडे वळले आणि श्रींच्या स्थापनेसाठी घरोघर शोडषोपचारे, मंत्रोच्चारांनी पूजा करणारे ब्राम्हण उपलब्ध झाले.
विदर्भ जवळ असल्याने आणि पूर्वी एकाच प्रांताचा हिस्सा असणारा मध्यप्रदेशाचा महाकोशल हा भाग ‘महालक्ष्मी’ सण जोमाने साजरा करतो. साऱ्या कुटुंबाचा हा उत्सव असतो आणि दूरदूरचे पाहुणे-रावळे या सणासाठी खास सुट्टी काढून येतात. मुखवट्यांच्या जेष्ठा-कनिष्ठा आणि त्यांची ती दोन लोभस बाळे त्या दोन दिवसात जीव लावतात. हा सण पुर्ण मध्य प्रदेशातच कमी अधिक प्रमाणात साजरा होतो. मात्र महाराष्ट्रा प्रमाणे गौरींबरोबर गणपतीचे विसर्जन होत नाही. गणपती, काही मोजक्या घरात दीड दिवसांचे तर काही ठिकाणी पाच दिवसांचे असतात. मात्र जवळपास सर्व मराठी उत्सवां मधे आणि अधिकांश मराठी घरांमध्ये दहा दिवसांचे गणपती असतात.
गणपतींच्या विसर्जनाचाही सोहळा असतो. अगदी वाजत गाजत गणरायाला निरोप दिल्या जातो. जबलपुर सारख्या ठिकाणी महाराष्ट्र समाज आणि बाल तरुण समाज एकत्र येऊन संयुक्त पणे गणेश विसर्जनाची शोभायात्रा अगदी पारंपरिक मराठी पद्धतीने काढतात.
मध्यप्रदेशातला गणेशोत्सव हा असा आहे. अजूनही बराचसा पारंपरिक पद्धतीला चिकटून राहणारा. सांस्कृतिक कार्यक्रमांनी भरगच्च असलेला. काही अंशी समाज प्रबोधनाचा वारसा जपणारा. आणि मराठी चैतन्याने रसरसलेला..!
- प्रशांत पोळ