अद्वितीय आयुर्वेद..!

हायडलबर्ग हे जर्मनीतलं तसं लहानसं गाव. अवघ्या दीड लाख लोकवस्तीचं. मात्र हायडलबर्ग प्रसिध्द आहे ते शिक्षणाचं माहेरघर म्हणूनही. युरोपातलं पाहिलं विद्यापीठ याच शहरात सुरु झालं, सन १३८६ मध्ये.

या हायडलबर्ग शहरात, शहराजवळच, एका पर्वती सारख्या टेकडीवर बांधलेला किल्ला आहे. या किल्ल्याला ‘हायडलबर्ग कासल’ किंवा ‘श्लोस’ म्हणूनही ओळखला जातो. (जर्मनीत किल्ल्याला ‘कासल’ किंवा ‘श्लोस’ म्हटलं जातं). तेराव्या शतकात बांधलेला हा किल्ला व्यवस्थित देखरेखी खाली आहे. आणि म्हणूनच पर्यटकांच्या आकर्षणाचं एक मोठं केंद्र ही आहे. या किल्ल्याच्या एका भागात एक नितांत सुंदर संग्रहालय आहे – ‘अपोथीकरी म्युझियम’ किंवा ‘औषधांचं संग्रहालय’. अत्यंत कलात्मक पद्धतीने, नीट / नेटक्या स्वरूपात, सुबक अश्या बरण्यांमधून आणि बाटल्यांमधून, आकृत्या, पुतळे आणि जुन्या यंत्रांमधून त्यांनी औषध निर्मितीचा इतिहास जिवंतपणे समोर उभा केला आहे. जर्मनीतला हा औषधांचा इतिहास उण्या – पुऱ्या आठशे / नऊशे वर्षांचा. मात्र त्यांच्या मते जगातील औषध शास्त्राचे अग्रणी जर्मनच आहेत.

20170410_134043

या संग्रहालयात अगदी लाजे काजेस्तव भारताचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि तो ही असा की, ‘वास्को-डी-गामाच्या भारत भेटीनंतर भारतातल्या जडी-बुटींच्या औषधांची ओळख युरोप ला झाली.’

20170410_134313

गेल्या महिन्यात मी या हायडलबर्ग च्या किल्ल्यातल्या औषधी संग्रहालयाला भेट द्यायला गेलो होतो, तेंव्हा तिथे आसपासच्या कुठल्यातरी शाळेतली मुलं आली होती. चौथी – पाचवीतली ती पोरं, त्या संग्रहालयात बागडत होती, चिवचिवत होती. मात्र ती पोरं फार सूक्ष्मतेने प्रत्येक गोष्ट बघत होती, आपापसात जोरजोरात चर्चा करत होती. आणि गंमत म्हणजे प्रत्येकाच्या हातात कागद होता आणि ती पोरं त्या कागदावर काही तरी लिहित होती. जरा विचारल्यावर कळलं की ही सहल म्हणजे त्या मुलांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाचा भाग आहे आणि त्या मुलांना ह्या संग्रहालयाच्या भेटीवर नोट्स काढायच्या आहेत. ह्या नोट्स च्या आधारावर त्यांची युनिट टेस्ट होणार आहे.
खरं सांगतो, माझ्या काळजात लक्कन काही तरी हाललं…!

20170410_134326

आपल्या देशात असं होऊ शकेल..?

ती मुलं काय मत घेऊन बाहेर पडतील..? की जगामधे औषधांच्या / चिकित्सा शास्त्राच्या जगात (फक्त एक हजार वर्षांचा या संबंधात इतिहास असलेली) ‘जर्मनी’ सर्वात पुढे आहे. भारत तर त्यांच्या खिजगणतीलाही नसेल..!
आणि आपण इतके कर्मदरिद्री, की तीन हजार वर्षांचा, चिकित्सा शास्त्राचा, औषधी विज्ञानाचा खणखणीत इतिहास असणारे आपण….

यातलं काहीही आपल्या नवीन पिढीला दाखवू शकत नाही..!!

साऱ्या जगाला जेंव्हा चिकित्सा, मेडिसिन, अपोथिके, फार्मेसी सारखे शब्द ही माहीत नव्हते, त्या काळात, म्हणजे इसवी सनाच्या सातशे वर्ष आधी, जगातील पहिल्या (तक्षशीला) विद्यापीठात चिकित्साशास्त्र नावाचा सुव्यवस्थित विभाग होता..! इसवी सनाच्या सहाशे वर्ष आधी सुश्रुताने ‘सुश्रुत संहिता’ हा चिकित्सा शास्त्रा वरचा परिपूर्ण ग्रंथ लिहिला होता. सुश्रुत हा जगातील पहिला ज्ञात ‘शल्य चिकित्सक’ (सर्जन) आहे. ह्या शल्य चिकित्सेसाठी तो १२५ प्रकारची उपकरणे वापरायचा. या सर्व उपकरणांची यादी सुध्दा त्याने दिली आहे. सुश्रुताने ३०० प्रकारच्या वेगवेगळ्या ‘शल्य चिकित्सा’ (ऑपरेशन्स) केल्याचे लिहून ठेवले आहे. अगदी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेचे सुध्दा त्याने सविस्तर वर्णन केले आहे. लक्षात घ्या, हे सारे पावणे तीन हजार वर्षांच्या आधीचे आहे..! युरोप सकट साऱ्या जगाला या शब्दांची तोंड ओळख होण्याच्या कितीतरी आधीचे !

आजच्या विद्यार्थ्यांना तर जाऊच द्या, पण जाणत्या पिढीला तरी यातलं कितीसं माहीत आहे..?

चिकित्सा शास्त्राच्या प्राचीनते संदर्भात तीन प्रकारच्या प्रणालींचा विचार केल्या जातो –
1. भारतीय चिकित्सा पद्धती – प्रामुख्याने आयुर्वेद
2. इजिप्शियन प्रणाली
3. ग्रीक प्रणाली

यातील इजिप्शियन प्रणालीत, पिरामिड मध्ये ‘ममीज’ ठेवण्याचं शास्त्र त्यांना माहीत असल्याने प्राचीन मानलं जातं. या प्रणालीत ‘इमहोटेप’ (Imhotep) हा अनेक विषयात पारंगत असलेला गृहस्थ, इजिप्शियन चिकित्सा प्रणाली चा मूळ पुरुष मानला जातो. इसवी सनापूर्वी सत्तावीसशे वर्ष, हा त्याचा कार्यकाळ मानला जातो. अर्थात आजपासून सुमारे पावणे पाच हजार वर्ष जूना. मात्र शास्त्रशुध्द रित्या रोगांचे निवारण आणि त्या प्रकारची औषधांची रचना त्या काळात उपलब्ध नव्हती. प्रामुख्याने वाईट शक्तींपासून (भूता–खेतां पासून) वाचविण्यासाठी काही औषधं वापरण्यावर भर होता.
ग्रीक चिकित्सा प्रणाली हे देखील बरीच जुनी. आजचे डॉक्टर्स ज्या ‘हिप्पोक्रेट’ च्या नावाने, व्यवसाय सुरु करण्या आधी, शपथ घेतात, तो हिप्पोक्रेट हा ग्रीसचाच. सुश्रुत च्या सुमारे दीडशे वर्ष नंतरचा.

सुश्रुत - १

ह्या हिप्पोक्रेट च्या काळात भारतात चिकित्सा शास्त्र विकसित स्वरूपात वापरले जात होते. ख्रिस्तपूर्व सातव्या – आठव्या शतकात तक्षशीला विद्यापीठातील चिकित्सा शास्त्राचा अभ्यासक्रम शिकायला अनेक देशांचे विद्यार्थी येत होते. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की हिप्पोक्रेट च्या लेखांमधे सुश्रुत संहितेचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो.

पुढे येशू ख्रिस्ताच्या काळात ‘केलसस’ (Aulus Cornelius Celsus – ख्रिस्तपूर्व २५ ते ख्रिस्तानंतर ५० वर्षे) ने चिकित्सा शास्त्रा संबंधी ‘डी मेडीसिना’ हा आठ भागांचा मोठा ग्रंथ लिहिला. यात सातव्या भागात काही शस्त्रक्रियांची माहिती दिलेली आहे. आणि गंमत म्हणजे यात वर्णन केलेल्या मोतीबिंदुंच्या शस्त्रक्रियेची माहिती ही या ग्रंथाच्या सहाशे वर्ष आधी सुश्रुत ने लिहिलेल्या ‘सुश्रुत संहिता’ मधील मोतीबिंदुंच्या शस्त्रक्रियेच्या माहितीशी तंतोतंत जुळणारी आहे..!

सुश्रुत - २
मुळात भारतात आयुर्वेदाची सुरुवात कोठून झाली हे कोणालाच ठामपणे सांगता यायचं नाही. ऋग्वेदात आणि अथर्ववेदात या संबंधी उल्लेख सापडतात. अथर्ववेदात तर चिकित्सा शास्त्रा संबंधी अनेक टिपण्या आढळतात. आणि म्हणूनच आयुर्वेदाला, अथर्ववेदाचा उपवेद समजले जाते. आता अथर्ववेदाचा निश्चित कालखंड कोणता..? कठीण आहे सांगणं. कोणी ख्रिस्तपूर्व १२०० वर्षे सांगतात तर कोणी ख्रिस्तपूर्व १८०० वर्षे.

आणि या ग्रंथामधूनही ‘आयुर्वेद’ हा नवीन शोधलेला प्रकार आहे, असं जाणवत नाहीच. त्या काळात असलेल्या ज्ञानाला अथर्ववेदा सारखा ग्रंथ शब्दबध्द करतोय असंच दिसतंय. याचाच अर्थ, आपली चिकित्सा पद्धत ही अति प्राचीन आहे.

मुळात आयुर्वेद हे अत्यंत सुव्यवस्थित पणे रचलेलं चिकित्सा / आरोग्य शास्त्र आहे. चरक आणि सुश्रुतांच्या परंपरेला त्यांच्या शिष्यांनी पुढे नेलं. पुढे इसवी सनाच्या सातव्या शतकात सिंध प्रांतातील वाग्भटांनी चरक, सुश्रुत आणि कश्यप यांच्या ग्रंथांना एकत्र करून, त्यांच्या आधाराने एक ग्रंथ लिहिला. त्यालाच ‘अष्टांग हृदय’ असे म्हटले जाते.
यातील रोग / विकारांवर अधिक काम करून आठव्या शतकात वैद्य माधव ऋषी यांनी ‘निदान ग्रंथ’ लिहिला. या ग्रंथाची ७९ प्रकरणं आहेत, ज्यात रोग, त्यांची लक्षणं आणि त्यावरील उपचार याबाबत सखोल विवेचन केलेले आहे. या नंतर ‘भावप्रकाश’, ‘योग रत्नाकर’ हे ग्रंथ तयार झाले. शारंगधरांनी औषध निर्मिती च्या प्रक्रीये संबंधी बरेच लिहिले. पुढे अकराव्या शतकात मुस्लिम आक्रांतांची आक्रमणं सुरु झाल्यानंतर भारतात ही आयुर्वेदाची परंपरा क्षीण झाली.
मात्र आज जगात इजिप्शियन चिकित्सा पध्दती अस्तित्वात नाही. ग्रीक चिकित्सा पद्धत (यूनानी) काही प्रमाणात आहे. मात्र त्यातील ‘शुध्द युनानी’ औषधं किती, हा प्रश्नच आहे. जगात आज बोलबाला आहे तो एलोपेथीक पद्धती चा, जी साधारण आठशे / नऊशे वर्षांपासून विकसित होत आलेली आहे. होमियोपेथी तर अगदी अलीकडची. १७९० मध्ये जर्मनीत सुरु झालेली.

या सर्व पार्श्वभूमीवर किमान तीन / चार हजार वर्ष जुनी असणारी आणि आजही जगभर प्रचंड मागणी असणारी ‘आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती’ ही अद्वितीय ठरते. फक्त आपल्याला त्याची जाणीव नाही, हेच काय ते दुःख आहे..!
– प्रशांत पोळ

Author: प्रशांत पोळ

I am an Engineer by profession. Consultant in Telecom and IT. Interested in Indology, Arts, Literature, Politics and many more. Nationalistic views. Hindutva is my core ideology.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s