युध्द – आकाशातील लहरींसाठी..!

गेल्या पंधरवड्यात, दूरसंचार च्या क्षेत्रातील प्रतिस्पर्धी कंपन्या व्होडाफोन आणि आयडिया सेल्युलर यांनी हात मिळवला अन देशाच्या व्यावसायिक वर्तुळात अक्षरशः खळबळ उडाली. कारण हे फक्त एकत्र येणं नव्हतं तर विलीनीकरण होतं. ‘मर्जर’ होतं. आणि असं भलं मोठं मर्जर आपल्या देशानच काय, पण इतरही देशांनी फारसं बघितलेलं नव्हतं. या विलीनीकरणामुळे ही ‘जोड कंपनी’ देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी झालेली आहे. देशातील एकूण मोबाईल ग्राहकांच्या ३४.५% ग्राहक या एका कंपनी जवळ असणार आहेत. आणि म्हणूनच सध्या तरी ही ‘जोड कंपनी’ देशातील बलाढ्य दूरसंचार कंपनी झालेली आहे.

गंमत म्हणजे हे विलीनीकरण तसं असमान आहे. व्होडाफोन सारख्या ताकतवर ब्रिटीश दूरसंचार कंपनीने तुलनेने लहान अश्या, भारतीय असलेल्या, आयडिया बरोबर हिस्सेदारी करावी, हेच मुळात अप्रूप आहे. कारण व्होडाफोन नेहमी दुसऱ्या कंपनीला ‘एक्वायर’ करते. विकत घेते. किंवा स्पष्ट शब्दात सांगायचं तर ‘गिळंकृत’ करते. पण तसं काही इथे झालेलं नाही. याचा अर्थ, ‘भारतातले मार्केट डायनामिक्स इतर देशांपेक्षा वेगळे आहेत’ हे व्होडाफोन ला पटलंय असं दिसतंय.

व्होडाफोन चे वार्षिक उत्पन्न ४१ बिलियन स्टर्लिंग पाउंड आहे. (माहितीसाठी – मायक्रोसॉफ्ट चे वार्षिक उत्पन्न ६० बिलियन स्टर्लिंग पाउंड आहे. यावरून अंदाज यावा.) एक लाख आठ हजार कर्मचारी त्यांच्या जगभरातल्या वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये काम करतात. त्या मानाने आयडिया ही लहान कंपनी आहे. या कंपनी चे वार्षिक उत्पन्न फक्त ४ बिलियन स्टर्लिंग पाउंड आहे. म्हणजे व्होडाफोन च्या एक दशांश..!

मात्र आयडिया ची मुळं भारतातल्या निमशहरी आणि ग्रामीण क्षेत्रात घट्ट रुजली आहेत. म्हणून शहरी क्षेत्रात वरचष्मा असणाऱ्या व्होडाफोन ने, आयडिया ला आपला पार्टनर निवडले. एकप्रकारे या दोन्ही कंपन्या एक दुसऱ्याला, ग्राहकांच्या बाबतीत, पूरक आहेत.

आयडिया - व्होडाफोन - १

हे विलीनीकरण, सुखासुखी किंवा उगीचच झालेले नाही. याला कारण आहे ते जगातील सर्वात मोठ्या मोबाईल टेलिफोनी च्या बाजारात मुसंडी मारत असलेले ‘रिलायंस जिओ’..! फक्त सहा महिन्यात रिलायंस जिओ ने बाजाराची सर्व समीकरणे बदलली. डिसेंबर मधे संपलेल्या तिमाहीत आयडिया चे उत्पन्न ३.८ टक्क्यांनी घसरले तर व्होडाफोन चे १.९ टक्क्यांनी. आता, ही टक्केवारी फारशी जास्त दिसत नसली तरी जिथे मोबाईल चे मार्केट अत्यंत वेगाने वाढते आहे, तिथे वाढी मधे फरक न होता, जर ग्राहकांची संख्या खाली जात असेल तर ती निश्चितच चिंतेची बाब आहे. आणि म्हणूनच, बिहार च्या निवडणुकीत ज्या प्रमाणे भाजप विरुध्द, एकमेकांचे हाडवैरी असलेले पक्ष एकत्र आले, तसाच काहीसा हा प्रकार आहे. रिलायंस जिओ च्या विरुध्द टक्कर देण्यासाठी ह्या कंपन्या एकवटलेल्या आहेत.

आयडिया - व्होडाफोन - २

आणि याला कारण ही तसेच आहे. रिलायंन्स समूहाचे जेंव्हा वाटे-हिस्से झाले, तेंव्हा रिलायन्स कम्युनिकेशन्स हे अनिल अंबानींकडे आले. मुळात रिलायंस समूहाने दूरसंचार व्यवसायात यावे, ही मुकेश अंबानींची कल्पना होती. त्यामुळे त्यांचे ‘ब्रेन चाईल्ड’ असलेले रिलायंस कम्युनिकेशन जेंव्हा अनिल अंबानींकडे गेले, तेंव्हाच केंव्हातरी मुकेश नी भविष्यात या क्षेत्रात परत येण्या संबंधी विचार करून ठेवला असेल.

आणि म्हणूनच, सुमारे वीस वर्षांपूर्वी ज्या प्रमाणे रिलायंस ने मागील दाराहून का होईना, पण मोबाईल च्या क्षेत्रात प्रवेश केला, तो असाच धडाकेबाज होता. त्या मागे कल्पना होती धीरूभाईंची, की गरिबाला सुध्दा परवडेल अश्या दरात मोबाईल सेवा पुरवता आली पाहिजे. त्यांनी लक्ष्य ठेवले होते पोस्टकार्डाचे. तेंव्हा १५ पैशांना मिळणारे पोस्टकार्ड हे गरिबांसाठी सर्वात स्वस्त असणारे संवाद साधण्याचे साधन होते. तितक्या पैशात मोबाईल वरून बोलता आलं पाहिजे अश्या आग्रहानी त्यांनी सेवा सुरु केली. अत्यंत स्वस्तात, इतरांकडे नसणारे, किंवा इतर देशात फारसे लोकप्रिय नसलेले ‘सी डी एम ए’ हे तंत्रज्ञान त्यांनी वापरले. मोठ्या प्रमाणावर ग्राहक तयार केले. मात्र पुढे जाऊन ‘मुख्य धारेतले’ तंत्रज्ञान नसल्याने रिलायंस च्या मोबाईल व्यवसायाला मर्यादा पडल्या.

नेमकं हेच हेरून मुकेश अंबानींनी नवीन, बदललेल्या मोबाईल च्या बाजारात अत्यंत विचारपूर्वक पाउल टाकले. पूर्वी झालेल्या काही चुकांची त्यांना जाणीव होती म्हणून त्यांनी त्या चुका टाळल्या. या वेळी त्यांनी मुख्य धारेतील तंत्रज्ञान वापरले. जगभरात 4G सेवेसाठी LTE (Long Term Evolution) हे तंत्रज्ञान वापरले जाते. यातील अत्याधुनिक व्हर्शन रिलायंस जिओ ने वापरले.

गेल्या २ – ३ वर्षात मोबाईल कंपन्यांच्या उत्पन्नाच्या प्रकारामध्ये आमुलाग्र बदल झालेला आहे. पूर्वी ह्या कंपन्यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन हे ‘व्हॉईस कॉल’ होते. इंटरनेट वापरामुळे मिळणारे उत्पन्न हे कमी असायचे. मात्र हळू हळू हे चित्र बदलत गेले. व्हॉईस कॉल मुळे मिळणाऱ्या उत्पन्नात घट होत गेली आणि इंटरनेट च्या वापरामुळे मिळणारे उत्पन्न वाढत गेले. आज मोबाईल कंपन्यांचा महसूल हा प्रामुख्यानं इंटरनेट च्या वापरातून येतोय. सर्वसामान्य माणसाचं जीवन ही इंटरनेट ने व्यापून टाकलंय. डेन्मार्क, स्वीडन सारख्या देशांमध्ये तर इंटरनेट चा वापर हा त्यांच्या नागरिकांच्या मुलभूत हक्कांमध्ये शामिल केला गेलाय. सोशल मिडिया ने इंटरनेट वरील गर्दी वाढविण्यास चांगलाच हातभार लावलाय.

आणि आता तर व्हॉईस कॉल सुद्धा इंटरनेट वरून होताहेत. हा बदल लक्षणीय आहे. म्हणजे आता, हळू हळू, दूरसंचार कंपन्यांचं महसुलाचं जे मुख्य साधन होतं, तेच बंद होणार आहे आणि दूरसंचार च्या सर्व गरजां करता इंटरनेट हे एक मात्र साधन राहणार असे चित्र समोर आहे. हे नेमकं हेरलं मुकेश अंबानींनी. आणि म्हणूनच आधीच्या नेटवर्क्स चा (म्हणजे ‘लेगसी’ नेटवर्क्स, अर्थात 2G, 3G), चा विचार न करता त्यांनी सरळ 4G मधे उडी मारली. यात व्हॉईस कॉल साठी 2G, 3G प्रमाणे वेगळे स्विच ठेवण्याची गरज नसते. आणि हे तंत्रज्ञान मुख्यत्वे इंटरनेट च्या वापराला समोर ठेऊनच विकसित करण्यात आलेले आहे.

या सर्व गोष्टींचा विचार मुकेश अंबानींनी किमान सात – आठ वर्ष आधीच केला होता. जून २०१० मधे मुकेश अंबानींच्या रिलायंस इंडस्ट्रीज ने ४,८०० कोटी रुपयांमध्ये ‘इंफोटेल ब्रॉडबेंड सर्व्हीसेज लिमिटेड’ ही कंपनी विकत घेतली. या कंपनीचं वैशिष्ट्य म्हणजे 4G च्या लिलावाच्या एक वर्ष आधी भारताच्या सर्व २२ सर्कल्स मधे (दूरसंचार च्या दृष्टीने भारताला २२ सर्कल्स मधे वाटलेले आहे. साधारणतः प्रत्येक प्रदेश म्हणजे एक सर्कल आहे. पण सर्वच बाबतीत तसे ते नाही. उत्तर प्रदेशात २ सर्कल्स आहेत तर मध्य प्रदेश आणि छत्तिसगढ मिळून एक सर्कल आहे. आपल्या महाराष्ट्रात मुंबई वेगळे सर्कल आहे तर उर्वरित महाराष्ट्र आणि गोवा मिळून एक सर्कल आहे.) ब्रॉडबेंड स्पेक्ट्रम जिंकणारी ही एकमेव कंपनी होती. या कंपनी वर स्वामित्व मिळवल्या मुळे रिलायन्स ला स्वाभाविकच इंटरनेट च्या क्षेत्रात मोठी झेप घेण्याचे ‘प्लेटफ़ॉर्म’ तयार झाले. याला जोड दिली ती 4G च्या LTE ह्या तंत्रज्ञानाची. त्याचबरोबर मुकेश अंबानींनी मतभेद बाजूला ठेऊन भावाच्या दूरसंचार कंपनी बरोबर हात मिळवणी केली आणि मोबाईल नेटवर्क च्या पायाभूत सुविधांसाठी लागणाऱ्या टावर्स ची व्यवस्था केली.

4G

मुकेश अंबानींनी, मागील वेळेचा अनुभव लक्षात घेता, या वेळेस मोबाईल संचांच्या उत्पादना वर त्यांचे नियंत्रण असेल अशी व्यवस्था केली. त्या साठी LYF (लाईफ) ही कंपनी दोन वर्षांपूर्वी उभी केली. ही कंपनी रिलायन्स जिओ ची सहायक कंपनी आहे. आतापर्यंत या कंपनीने वाटर – १, वाटर – २, अर्थ आणि फ्लेम या ब्रांड चे हँण्डसेट विक्रीला आणले आहेत.

रिलायन्स जिओ चा ग्राहकांना आकर्षित करण्याचा वेग इतका जबरदस्त आहे, की पहिल्या ८३ दिवसात त्यांनी ५ कोटी ग्राहकांचा टप्पा ओलांडला आणि या २१ फेब्रुवारी ला त्यांच्या नेटवर्क मधे १० कोटी ग्राहक होते. जिओ येण्यापूर्वी ब्रॉडबेंड वापरण्याच्या बाबतीत भारताचा जगामधे १५० वा क्रमांक होता. आता मात्र मोबाईल डेटा वापरण्याच्या बाबतीत भारत जगामधे पहिल्या क्रमांकावर आला आहे..! गेल्या महिन्याची सरासरी काढली तर जिओ च्या ग्राहकांनी रोज ३.३ कोटी गिगाबाईट डेटा वापरला. जिओ चे ग्राहक मोबाईल वर सरासरी रोज साडे पाच तास व्हिडियो बघण्यात घालवतात.

आणि या सर्व आकडेवारी मुळे व्होडाफोन आणि आयडिया सारख्या कंपन्यांना हादरे बसणं स्वाभाविकच होतं. यातूनच मग विलीनीकरणाची कल्पना पुढे आली.

या नवीन कंपनी जवळ सुरुवात करतानाच जवळपास ४० कोटी ग्राहक आहेत. त्यामुळे जगातील सर्वांत मोठ्या अश्या दूरसंचार कंपनीं पैकी एक असे स्थान निर्माण झाले आहे. भारती एयरटेल ही, ह्या कंपनीच्या थोडी मागे असून त्यांची ग्राहक संख्या आहे – ३२ कोटी. या विलीनीकरणाचा फायदा, जास्त स्पेक्ट्रम उपलब्ध झाल्याने, सेवेचा दर्जा सुधारण्यात होईल. सध्या आयडिया कडे २० सर्कल्स मधे 4G तर १५ सर्कल्स मधे 3G चे लायसेन्स आहे. तर व्होडाफोन कडे १६ सर्कल्स मधे 4G आणि १७ सर्कल्स मधे 3G चे लायसेन्स आहे.

आता खेळाला खरी सुरुवात झालेली आहे. ही नवीन कंपनी, एयरटेल आणि रिलायन्स जिओ यांच्यात खरा खेळ रंगणार आहे. दुर्दैवानं एकेकाळची सर्वात मोठी सरकारी दूरसंचार कंपनी ‘बी एस एन एल’ ह्या खेळात कुठेच नाही..! काही काळानंतर किमतींमध्ये भडकलेलं युध्द थांबेल, कारण कोणालाच ते परवडणारं नाही. ‘पेमेंट बँकिंग’ सारखे उत्पन्नाचे नवीन एव्हेन्यू समोर येतील. स्पर्धात्मक वातावरणामुळे अनेक नवनवीन सेवा सुरु होतील. रेल्वे गाड्यांमध्ये, वोल्वो बस मधे लौकरच मोबाईल वर इंटरनेट वापरता येईल. असं बरंच काही होईल..

आणि या सर्वांचा फायदा तुमच्या – आमच्या सारख्या सामान्य ग्राहकाला होईल, हे निश्चित..!
– प्रशांत पोळ

Author: प्रशांत पोळ

I am an Engineer by profession. Consultant in Telecom and IT. Interested in Indology, Arts, Literature, Politics and many more. Nationalistic views. Hindutva is my core ideology.

4 thoughts on “युध्द – आकाशातील लहरींसाठी..!”

 1. whoah this blog is magnificent i like studying your posts. Stay up the good paintings! You recognize, a lot of people are hunting round for this information, you can help them greatly.

  Like

 2. Wow, wonderful weblog layout! How lengthy have you ever been blogging for? you make blogging glance easy. The overall glance of your site is magnificent, let alone the content material!

  Like

 3. You actually make it seem really easy along with your presentation however I find this matter to be actually one thing which I believe I might never understand. It sort of feels too complicated and very large for me. I am taking a look forward in your subsequent post, I’ll try to get the cling of it!

  Like

 4. व्होडाफोन सारख्या ताकतवर ब्रिटीश दूरसंचार कंपनीने तुलनेने लहान अश्या, भारतीय असलेल्या, आयडिया बरोबर हिस्सेदारी करावी, हेच मुळात अप्रूप आहे. कारण व्होडाफोन नेहमी दुसऱ्या कंपनीला ‘एक्वायर’ करते. विकत घेते. किंवा स्पष्ट शब्दात सांगायचं तर ‘गिळंकृत’ करते. पण तसं काही इथे झालेलं नाही. याचा अर्थ, ‘भारतातले मार्केट डायनामिक्स इतर देशांपेक्षा वेगळे आहेत’ हे व्होडाफोन ला पटलंय असं दिसतंय.
  Wrong.
  Due to Price compitition Vodafone India is facing Loss. As being parent of this company and holding large stake in Vodafone India, Vodafone PLC is supposed to show that loss on account. Not good for them. And that is why Parent Vodafone PLC is DECONSOLIDATING it’s India business

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s