सन १९५७ ची घटना आहे. उज्जैन ला राहणारे आणि पुरातत्व खात्याशी संबंधित असलेले डॉ. श्रीधर विष्णु वाकणकर हे आगगाडीने दिल्ली हून इटारसी ला जात होते, भोपाळ गेल्यावर त्यांना पर्वतांमध्ये काही फॉर्मेशन्स दिसली. डॉ. वाकणकरांना ती फॉर्मेशन्स ओळखीची वाटली, कारण त्यांनी तशीच फॉर्मेशन्स स्पेन आणि फ्रांस मधे बघितली होती. त्यामुळे डॉ. वाकणकरांचे कुतूहल जागृत झाले आणि पुरातत्व खात्याची एक टीम घेऊनच ते त्या पर्वतांमध्ये आले.
त्यांच्या ह्या प्रयत्नांनी इतिहासाचं, भारतीय कलेचं, शिल्पशास्त्राचं एक गवाक्ष काहीसं किलकिलं झालं. ही जागा म्हणजे भीमबेटका. येथे, सुमारे ४०,००० वर्षांपूर्वी भिंतींवर काढलेली चित्रं मिळाली. प्राचीन भारतीय कलेचा हा पहिला प्राप्त नमुना..!!
आज हे भीमबेटका, युनेस्को च्या संरक्षित स्मारकाच्या यादीत येतं. इथे साडे सातशे शैलाश्रयं किंवा शैलगृहं (सोप्या भाषेत ‘गुहा’) आहेत. यातील पाचशे शैलगृहांमध्ये चित्रकारी केलेली दिसते. या चित्रांमध्ये वाघ आहे, हरीण आहे, हत्ती आहेत, बैल, मोर वगैरे ही आहेत. मुख्य म्हणजे घोडा ही आहे. त्यामुळे घोडा भारतात अतिप्राचीन काळापासून होता हे सिद्ध झाले आहे. अन्यथा काही इतिहासकार, अरब आक्रमकांनी घोडे भारतात आणले असं सांगत होते.
भारतात जगाच्या इतर भागांच्या तुलनेने फार चांगली आणि शास्त्रशुध्द मूर्तीकला विकसित झाली. पण ती बऱ्याच नंतर. जगातल्या पहिल्या म्हणून म्हटलेल्या ज्या मूर्ती सापडलेल्या आहेत, त्यातील एकही मूर्ती भारतातली नाही. ‘लॉवेनमेंश फिगरीन’ म्हणून नावाजलेली जगातली पहिली म्हणवली जाणारी मूर्ती जर्मनी च्या आल्पस जवळच्या भागात सापडलेली आहे. ही साधारण तीस ते पस्तीस हजार वर्षे जुनी असावी, असं कार्बन डेटिंग चे परिणाम सांगताहेत.
इजिप्त मधे आढळलेले स्फिंक्स आणि इतर मूर्ती तश्या बऱ्याच नंतरच्या, म्हणजे इसवी सनापूर्वी अडीच हजार वर्षांच्या. रशियाच्या सैबेरिया भागात लाकडाची जी प्रतिमा सापडलेली आहे, तिला ‘शिगीर आयडॉल’ म्हटले जाते. ही मूर्ती सुमारे अकरा हजार वर्षांपूर्वी (अर्थात इसवी सनाच्या नऊ हजार वर्षांपूर्वी) लाकडावर कोरलेली आहे. तुर्कस्तानांत सापडलेल्या मूर्ती ह्या सहा हजार वर्षांपेक्षा जास्त प्राचीन आहेत. या मूर्त्यांमध्ये भारतीय शैली झळकते असे म्हटले जाते.
मुळात माती हे सहज सोपे माध्यम अगदी प्राचीन मूर्तींमध्ये आढळते. मात्र ‘माती’ ही चिरकाल टिकणारी नसल्याने मातीच्या जास्त मूर्ती सापडत नाहीत. फ्रान्स मध्ये आदिमानवांच्या गुहांमध्ये (Tuc d’ Audoubert) सुमारे पंधरा हजार वर्षांपूर्वीच्या मातीत बनलेल्या रानरेड्याच्या आकृती सापडतात. भारतात सिंधू घाटी मधील उत्खननात, भाजलेल्या मातीची काही चांगली शिल्पं सापडली. सिंधू घाटी, अर्थात मोहन-जो-दडो / हडप्पा, ह्यांचा काळ साडे पाच हजार वर्षांपूर्वीचा मानला जातो.
भारतात मधमाश्यांच्या पोळ्यांमधील मेणाने तयार केलेल्या प्रतिमा ही आढळतात. मात्र पुढे ह्या मेणाच्या माध्यमातून मातीचे साचे तयार होऊ लागले आणि ओतकामातून धातूंच्या मूर्ती तयार होऊ लागल्या. मोहन-जो-दडो येथील नृत्यांगनेची छोटी मूर्ती हे प्राचीनतम भारतीय धातूशिल्पाचे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. ही मूर्ती पंचधातूंची असून वैशिष्ठ्यपूर्ण आहे. मोहन-जो-दडो आणि हडप्पा येथे सापडलेल्या मूर्ती आणि मेसोपोटेमिया येथे सापडलेल्या मूर्ती यात बरीच समानता आढळते. या मूर्ती शिल्पात सर्वात सुरक्षित मूर्ती एका माणसाची आहे. सुमारे सात इंच उंच डोकं आणि खांदे असलेले हे ‘बस्ट’ एखाद्या पुजाऱ्याचं वाटतं. याच्या चेहऱ्यावर छोटीशी दाढी असून शरीर एका शालीत आच्छादित आहे.
याच उत्खननात अनेक मुद्रा (Seal) मिळाल्या. या चौकोनी असून यावर बैल आणि तत्सम गोष्टी कोरलेल्या आहेत. ह्या, बैल किंवा जनावरांच्या आकृत्या, अगदी कलात्मक रीतीने कोरलेल्या आहेत. चारशे पेक्षा जास्त आकार असलेल्या ह्या मुद्रांची संख्या दोन हजारांपेक्षा जास्त आहे.
भारतात मूळ प्रतिमा मेणामध्ये घडवून त्याचा साचा तयार करण्याची पध्दत रूढ होती. या तंत्राला प्राचीन शिल्पसाहित्यात ‘मधूच्छिष्टविधान’ म्हटले आहे. प्रथम मातीऐवजी मधाच्या पोळ्याचे मऊ मेण वापरून प्रतिमा बनविली जाते. माती, शेण व तांदळाचा कोंडा यांच्या मिश्रणात पाणी घालून केलेल्या लगद्याने ती आच्छादली जाते. प्रतिमेला आधीच एक मेणाची जाडसर वळी जोडलेली असते, जिचे दुसरे टोक प्रतिमेला आच्छादणाऱ्या साच्याच्या पृष्ठभागावर राहील, याची काळजी घ्यावी लागते. हा साचा वाळवून भट्टीत गेला की, त्यामधील सर्व मेण वितळून त्या वळीच्या वाटे वाहून जाते आणि साच्याच्या आत प्रतिमेच्या आकाराची पोकळी निर्माण होते. या पोकळीत वितळविलेल्या धातूचा (ब्राँझ, पितळ किंवा तांबे, क्वचित सोने-चांदी सुद्धा) रस ओतून मूळ मेणाच्या प्रतिमेची प्रतिकृती मिळविता येते. साच्यातून काढलेल्या प्रतिमेला नक्षीदार धातुपत्रांनी सजविण्याची किंवा धातूच्या तगडालाच ठोकून ठोकून मूर्ती घडविण्याची परंपरा प्राचीन काळात दिसून येते.
आपल्या देशात कास्य शिल्पाची किंवा धातूच्या शिल्पाची परंपरा ही जुनी आहे. ‘यजुर्वेदात’ चांदी, शिसे आणि कथिल या धातुंचे उल्लेख लोखंडा सारख्या इतर धातूंबरोबर येतात. अर्थातच हे धातू कसे वापरायचे याची माहिती तत्कालीन लोकांना होती. काही वर्षांपूर्वी औरंगाबाद जवळ असलेल्या ‘दायमाबाद’ येथील उत्खननात सापडलेल्या मूर्ती ह्या पंचधातूंच्या असून कार्बन डेटिंग द्वारे यांचा कालखंड तीन हजार वर्षांपूर्वीचा सिद्ध झालेला आहे. या उत्खननात मिळालेल्या प्राण्यांच्या भरीव प्रतिमांना खेळण्यांसारखी चाके आहेत. एक दुचाकी बैलगाडीही यात सापडलेली आहे.
चौथ्या शतकापासून मात्र ओतकामांच्या अर्थात धातूंच्या मूर्ती आणि इतर वस्तू मुबलक स्वरूपात मिळतात. साधारण तीन प्रकारच्या धातूंच्या वस्तू निर्माण होत होत्या –
1. प्रत्यक्ष देव-देवतांच्या मूर्ती
2. पूजा विधीची उपकरणे. उदाहरणार्थ दीपलक्ष्मी, पुजेची घंटा, उभे / टांगते / हातात धरण्याचे दिवे इत्यादी
3. दैनंदिन उपयोगाच्या वस्तू. उदाहरणार्थ विविध प्रकारची भांडी, हत्यारांच्या मुठी इत्यादी
तंजावर जिल्ह्यातील ‘नाचीर कोइल’ हे गाव, ओतकामासाठी प्रसिध्द होते, कारण तिथे कावेरी नदीची पिवळी वाळू मुबलक मिळत होती, जी साचे बनविण्यासाठी उपयुक्त होती. याच कारणामुळे गुवाहाटी, आसाम मधील सार्तबरी, मणिपूर, वाराणसी इत्यादी ठिकाणे धातूंच्या मूर्ती आणि वस्तूंसाठी प्रसिध्द होती.
मात्र त्याचबरोबर शिल्पशास्त्रात भारताचे कौशल्य विकसित होत होते. पुढे याच कौशल्याच्या आधारावर अवघ्या दक्षिण-पूर्व आशियात भारतीय शिल्प तंत्रज्ञांनी अद्भुत शिल्पं उभारून दाखविली. गांधार शैली आणि मथुरा शैली अश्या दोन प्रकारच्या प्रवाहांमधून भारतीय शिल्पशास्त्र विकसित झाले.
मात्र हडप्पन संस्कृती आणि पुढील मौर्य शासन, या मधील सुमारे दोन हजार वर्षांची शिल्पं आपल्याला सापडलेली नाहीत. मौर्य साम्राज्यात उभारलेल्या शिल्पांविषयी, त्या शिल्पांच्या भव्यते विषयी आणि प्रमाणबध्दते विषयी सिकंदर च्या काळात भारतात आलेल्या ग्रीक इतिहासकार मेगस्थेनीज ने बरेच लिहून ठेवले आहे. त्याच्या ‘इंडिका’ ह्या पुस्तकात पाटलीपुत्राच्या वेगवेगळ्या शिल्पांविषयी आणि नगराच्या भव्यते विषयी बरेच लिहिलेले आहे.
सम्राट अशोकाचा कालखंड हा इसवी सनापूर्वी ३०४ वर्ष ते २३२ वर्ष, अर्थात आज पासून साधारण साडे बावीसशे वर्ष मागे, असा आहे. त्याच्या काळातील अनेक प्रतिमा, अनेक शिल्प आजही आपल्याला पहायला मिळतात. अशोकाने बौध्द धर्माचा स्वीकार केला आणि बौध्द धर्माच्या प्रसारासाठी त्याने माध्यम बनविले, शिल्पकले ला. अनेक स्तंभ, अनेक स्तूप, अनेक शिलालेख, अनेक शिल्पं, अनेक मूर्त्या त्याने बनविल्या. त्याच्या काळात बनविल्या गेलेले चार सिंहांचे प्रतीक, आज ‘अशोक चिन्ह’ म्हणून आपली राष्ट्रीय ओळख आहे. हे अशोक चिन्ह. सारनाथ येथे सापडले होते. सुमारे बावीसशे वर्षानंतरही ते शिल्प व्यवस्थित होते. अगदी असेच चार सिंहांचे प्रतीक चिन्ह थायलंड मधे ही आढळले आहे.
मात्र भारतीय शिल्प शास्त्राचा कळसाध्याय आपल्याला बघायला मिळतो, तो बऱ्याच पुढे, सातव्या / आठव्या शतकात. वेरूळ येथील ‘कैलास लेणे’ हे ते अद्भुत आश्चर्य आहे. एकाच शिलाखंडात कोरलेले हे शिल्प म्हणजे मानवी शिल्पकलेचा अप्रतिम आणि विश्वास न बसावा असा नमुना आहे. साधारण सन ६०० ते ७५० च्या दरम्यान ह्या लेण्यांची निर्मिती झाली असावी असे अनुमान काढले जाते. मात्र काही पुरातत्ववेत्त्यांच्या मते याचा काल बऱ्याच आधीचा असावा. तरीही उपलब्ध पुराव्यांच्या अनुसार ह्या शिल्पांच्या निर्मितीचा काळ हा राष्ट्रकुटांच्या शासनाचा आहे. राजा कृष्ण (प्रथम) याने आठव्या शतकाच्या सुरुवातीला ह्या लेण्यांची निर्मिती प्रारंभ केली असे मानले जाते. मात्र एच. गोझ ह्या इतिहासकाराच्या अनुसार कृष्ण राजाचा पुतण्या दान्तिदुर्ग (सन ७३५ – ७५६) ह्याने अगदी युवावस्थेत ह्या लेण्यांचे काम सुरु केले. मात्र एम. के. ढवळीकर ह्या इतिहास तज्ञांचे मत कृष्ण राजाच्या बाजूचे आहे.
मात्र त्या काळात जे काही निर्माण झाले, ते अद्भुत आहे. मानवी बुध्दीला अचंभित करणारे आहे. जगाच्या पाठीवर कोठेही, एकाच दगडाला कोरून, वर पासून खाली खोदकाम करत बनविलेले असे भव्य शिल्प नाही..!
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ह्या पूर्ण मंदिरातील सर्वच शिल्पं अत्यंत प्रमाणबध्द आणि रेखीव आहेत. कसलेल्या, कुशल मूर्तिकारांनी / कारागिरांनी कोरून काढलेली ही शिल्पं..! काही पिढ्यांच्या प्रयत्नांतून घडवलेली ही शिल्पं..! आपले दुर्दैव असे, की आज आपल्याजवळ ह्या मूर्तिकारांची, कलाकारांची, योजनाकारांची कसलीही माहिती उपलब्ध नाही..!!
हे मंदिर, पट्टडकल (कर्नाटक) येथील विरुपाक्ष मंदिरा सारखे आहे, जे कांची च्या कैलास मंदिराची प्रतिकृती आहे. २७६ फूट लांब, १५४ फूट रुंद आणि ९० फूट उंच असे हे मंदिर सर्वार्थाने वैशिष्ठ्यपूर्ण आहे. युनेस्को ने ह्याचा जागतिक संरक्षित स्मारकांच्या यादीत समावेश केलेला आहे.
पुढे अकराव्या / बाराव्या शतकात पश्चीमेतून येणारी मुसलमानी आक्रमणं तीव्र झाल्यावर मंदिरांच्या बांधकामाचा वेग मंदावला आणि त्याच बरोबर उन्नत असलेल्या भारतीय शिल्पकलेला उतरती कळा लागली. कालांतराने जगाला अचंभित करणारे शिल्प बांधणारे आम्ही, त्या शिल्पकलेला पूर्णपणे विसरलो..!!
प्रशांत पोळ