सिरी भूवलय’ – अद्भुत आणि चमत्कारिक ग्रंथ

आपल्या भारताच्या ज्ञानभांडारात इतक्या जबरदस्त आणि चमत्कारिक गोष्टी लपलेल्या आहेत की त्या बघून मन अक्षरशः थक्क होतं..! ‘हे ज्ञान आपल्या जवळ आलंच कुठून’ अश्या प्रश्नात आपण गुरफटले जातो. मग, ‘त्या काळात हे असलं भारी ज्ञानभांडार आपल्या जवळ होतं, मग आता कां नाही..? कुठं गेलं हे ज्ञान..?’ हे प्रश्न आपल्याला सतावत राहतात…!

याच श्रेणीतला असा अद्भुत ग्रंथ आहे – ‘सिरी भूवलय’. किंवा श्री भूवलय. जैन मुनि आचार्य कुमुदेंदू ह्यांनी रचलेला. कर्नाटकात जेंव्हा राष्ट्रकुटांचं शासन होतं, मुस्लिम आक्रमक यायला बरीच वर्ष होती आणि सम्राट अमोघवर्ष नृपतुंग (प्रथम) हे जेंव्हा राज्य करत होते, त्या काळातला हा ग्रंथ. अर्थातच सन ८२० ते ८४० च्या काळात केंव्हा तरी लिहिला गेलेला..!

मात्र मागील हजार वर्षे हा ग्रंथ गायब होता. कुठे कुठे याचा उल्लेख यायचा. पण ग्रंथ मात्र विलुप्तावस्थेतच होता. हा ग्रंथ मिळाला कसा, याचीही मजेदार गोष्ट आहे –

राष्ट्रकुटांच्या काळात कोण्या मल्लीकब्बेजी या बाईने या ग्रंथाची एक प्रत नकलून घेतली आणि आपले गुरु माघनंदिनीजी यांना शास्त्रदान केली. या ग्रंथाची प्रत, हस्ते परहस्ते सुप्रसिध्द आयुर्वेद चिकित्सक धरणेन्द्र पंडितांच्या घरी पोहोचली. हे धरणेन्द्र पंडित, बंगळूर – तुमकुर रेल्वे मार्गावरील दोड्डबेले नावाच्या लहानश्या गावात रहायचे. या ग्रंथाबद्दल त्यांना फारशी माहिती नसली, तरी याचं महत्त्व ते जाणून होते. म्हणूनच आपले मित्र, चंदा पंडितांबरोबर ते ‘सिरी भूवलय’ या ग्रंथावर कन्नड भाषेत व्याख्यानं द्यायचे.

4x5 original

या व्याख्यानांमुळे, बंगळूर च्या ‘येल्लप्पा शास्त्री’ ह्या तरुण आयुर्वेदाचार्याला, हा ग्रंथ धरणेन्द्र शास्त्रींकडे आहे हे समजले. या ग्रंथासंबंधी येल्लप्पा शास्त्रींनी बरेच काही ऐकले होते. तेंव्हा हा ग्रंथ मिळवायचाच, हा निश्चय पक्का होता. मग काहीही करून ह्या ग्रंथाचे हस्तलिखित मिळविण्यासाठी येल्लप्पा शास्त्रींनी, दोड्डाबेला ला जाऊन धरणेन्द्र शास्त्रींच्या पुतणीशी विवाह केला.

पुढे १९१३ मधे धरणेन्द्र शास्त्रींचे निधन झाले. पूर्ण वेळ विद्याभ्यासात दिल्याने त्यांच्या घराची आर्थिक स्थिती फारच खराब झालेली होती. म्हणून त्यांच्या मुलाने, धरणेन्द्र शास्त्रींच्या काही वस्तू विकावयास काढल्या. त्यात ‘सिरी भूवलय’ हा ग्रंथ ही होता. अर्थातच आनंदाने येल्लप्पा शास्त्रींनी हा ग्रंथ विकत घेतला. त्या साठी त्यांना बायकोचे दागिने विकावे लागले. मात्र ग्रंथ हातात आल्यावरही शास्त्रींना त्याची उकल करता येत नव्हती. १२७० पानांच्या ह्या हस्तलिखितात सारेच अगम्य होते. पुढे १९२७ ला प्रख्यात स्वातंत्र्य सेनानी करमंगलम श्रीकंठय्याजी बंगळुरात आले. त्यांच्या मदतीने ह्या ग्रंथाची किवाडं काहिशी किलकिली झाली.

या हस्तलिखितातील माहितीच्या आधारे प्रयत्न करत करत, त्यातील सांकेतिक माहितीची फोड करायला तब्बल ४० वर्षे जावी लागली. सन १९५३ मधे कन्नड साहित्य परिषदेनं ह्या ग्रंथाचं पहिल्यांदा प्रकाशन केलं. ग्रंथाचे संपादक होते – येल्लप्पा शास्त्री, करमंगलम श्रीकंठय्या आणि अनंत सुब्बाराव. यातील अनंत सुब्बाराव हे तंत्रज्ञ होते. त्यांनीच पहिला कन्नड टाईपरायटर तयार केला होता.

असं काय महत्वाचं होतं ह्या ग्रंथात, ज्या साठी लोकं आपलं आख्खं आयुष्य वेचायला तयार होती..?

हा ग्रंथ, इतर ग्रंथांसारखा एखाद्या लिपीत लिहिलेला नाही. तर हा अंकांमधे लिहिलेला आहे. हे अंक ही १ ते ६४ मधील आहेत. हे अंक किंवा आकडे विशिष्ट पद्धतीने वाचले की एखाद्या विशिष्ट भाषेत, विशिष्ट ग्रंथ वाचता येतो. ग्रंथ कर्त्याच्या, अर्थात मुनि कुमुदेन्दुंच्या मते हा ग्रंथ १८ लिप्या आणि ७१८ भाषांमध्ये वाचता येतो.

%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%b5%e0%a4%b2%e0%a4%af-%e0%a5%a8

हा ग्रंथ म्हणजे अक्षरशः विश्वकोश आहे. ह्या एका ग्रंथात अनेक ग्रंथ दडलेले आहेत. रामायण, महाभारत, वेद, उपनिषदे, अनेक जैन ग्रंथ या एका ग्रंथात सामावलेले आहेत. गणित, खगोलशास्त्र, रसायन शास्त्र, इतिहास, वैद्याक, तत्वज्ञान सारख्या अनेक विषयांवरील ग्रंथ ही या एकाच ग्रंथात वाचता येतात.

या ग्रंथाची १६,००० पाने होती असा ग्रंथातच कुठे उल्लेख आहे. त्यातील फक्त १२७० पानेच सध्या उपलब्ध आहेत. एकूण ५६ अध्याय असलेल्या ह्या ग्रंथाच्या फक्त तीन अध्यायांचीच उकल करणे सध्या शक्य झाले आहे. १८ लिप्या आणि ७१८ भाषांपैकी सध्या कन्नड, तामिळ, तेलुगु, संस्कृत, मराठी, प्राकृत इत्यादी भाषांमधुनच हा ग्रंथ वाचता येतो. एखाद्या संगणकीय विश्वकोशा सारखे या ग्रंथाचे स्वरूप आहे. ह्या ग्रंथाची संपूर्ण संहिता जेंव्हा उलगडली जाईल, तेंव्हा त्याची प्रमुख वैशिष्ठ्ये स्पष्ट होऊ शकतील.

हा ग्रंथ लिपीत नसून आकड्यात आहे, हे आपण बघितलंच. त्यातही फक्त १ ते ६४ अंकांचाच वापर केलेला आहे. आता कुमुदेंदू मुनिंनी फक्त ६४ पर्यंतच आकडे कां घेतले..? तर ६४ हे ध्वनींचे संकेत आहेत, ज्यात ऱ्हस्व, दीर्घ आणि लुप्त मिळून २५ स्वर, क, च, न, प सारखे २५ वर्गीय वर्ण, य, र, ल, व सारखे अवर्गीय व्यंजन इत्यादी मिळून ६४ ही संख्या होते.

%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%b5%e0%a4%b2%e0%a4%af-%e0%a5%a9

या संख्यांना २७ X २७ च्या चौकोनांमध्ये मांडल्या जाते. आता हे जे ७२९ अंक चौकोनांमध्ये येतात, त्यांना ग्रंथात दिलेल्या निर्देशांनुसार खालून-वर, वरून-खाली, उभे-आडवे वगैरे करून लिहिले आणि त्यांना त्या भाषेच्या वर्ण क्रमानुसार मांडले (उदा – ४ हा अंक असेल तर मराठी तील वर्ण ‘घ’ येईल. क, ख, ग, घ.. प्रमाणे), तर छंदोबध्द काव्य अथवा धर्म, दर्शन, कला.. वगैरे प्रकारचा ग्रंथ तयार होतो..!

काय अफाट आहे हे…!

आणि किती अद्भुत..! आपण आपल्या ‘सुडोकू’ चा लहानसा चौकोन तयार करायला संगणकाची मदत घेतो. अन इथे हजार / बाराशे वर्षांपूर्वी एक जैन मुनि आपल्या कुशाग्र आणि अद्भुत बुध्दीचा परिचय देऊन फक्त अंकांमधून विश्वकोश तयार करतात..!

सारंच अतर्क्य..!!

या ग्रंथाचं प्रत्येक पान म्हणजे २७ X २७ असा ७२९ अंकांचा भला मोठा चौकोन आहे. या चौकोनाला चक्र म्हणतात. अशी १२७० चक्र सध्या उपलब्ध आहेत. या चक्रांमध्ये ५६ अध्याय आहेत आणि एकूण श्लोकांची संख्या सहा लाखांच्या वर आहे. या ग्रंथाचे एकूण ९ खंड आहेत. उपलब्ध असलेले १२७० चक्र हे पहिल्या खंडातीलच आहेत, ज्याचं नाव आहे – ‘मंगला प्रभृता’. एक प्रकारे हा खंड म्हणजे इतर ८ खंडांची फक्त ओळख आहे. अंकांच्या स्वरूपात यात १४ लाख अक्षरं आहेत. यातून ६ लाख श्लोक तयार होतात.

या प्रत्येक चक्रात काही ‘बंध’ आहेत. बंध म्हणजे अंकांना वाचण्याची पध्दत किंवा एका चक्राच्या आत अंक मांडण्याची पध्दत. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर ‘बंध’ म्हणजे तो श्लोक, किंवा तो ग्रंथ वाचण्याची किल्ली (किंवा पासवर्ड) आहे. या बंधामुळे आपल्याला त्या चक्रातील ७२९ अंकांमधला पेटर्न कळतो आणि मग त्या त्या भाषेप्रमाणे तो ग्रंथ उलगडू लागतो. या बंधाचे वेगवेगळे प्रकार आहेत. जसे – चक्र-बंध, नवमांक-बंध, विमलांक-बंध, हंस-बंध, सारस-बंध, श्रेणी-बंध, मयूर-बंध, चित्र-बंध इत्यादी.

गेल्या अनेक वर्षांपासून ह्या भूवलय ग्रंथाला ‘डी-कोड’ करण्याचे काम चालू आहे. अनेक जैन संस्थांनी हां ग्रंथ, प्रकल्प म्हणून स्वीकारला आहे. इंदूर ला जैन साहित्याच्या संशोधनाचं ‘कुन्द्कुंद ज्ञानपीठ’ उभं राहिलंय, जिथे डॉ. महेंद्र कुमार जैन यांनी या विषयावर बरेच काम केले आहे. आय. टी. क्षेत्रातल्या काही जैन तरुणांनी या विषयावरील वेबसाईट तर चालू केलीच आहे, पण संगणकाची मदत घेऊन या ग्रंथाला ‘डी-कोड’ करण्याचं काम केलं जातंय. अगदी लहान प्रमाणात त्याला यश ही आलंय.

मात्र तरीही. . . .

आज एकविसाव्या शतकाचं सोळावं वर्ष संपत असतानाही, जगभरातले अनेक जैन विद्वान या ग्रंथावर काम करत असतानाही, प्रगत संगणक प्रणालीचे अल्गोरिदम वापरूनही……

ह्या ग्रंथाची उकल झालेली नाही..! ५६ पैकी फक्त तीनच अध्याय ‘डी-कोड’ होऊ शकले आहेत…

मग हजार – बाराशे वर्षांपूर्वी, आजच्या सारखी कसलीही साधनं हाताशी नसताना, मुनि कुमुदेन्दुंनी इतका क्लिष्ट ग्रंथ कसा रचला असेल..? बरं, मुनिवर्य कन्नड भाषिक होते. मग त्यांना इतर भाषांचे असे अवजड अल्गोरिदम्स तयार करणं कसं जमलं असेल..?

आणि मुळात इतकी कुशाग्र आणि अफाट बुध्दिमत्ता त्यांच्याजवळ कुठून आली असेल..?

‘इंडोलॉजी’ च्या क्षेत्रातलं, भारतातलं आदरानं घेतलं जाणारं नाव आहे, श्री एस. श्रीकांत शास्त्रींचं (१९०४ – १९७४). त्यांनी ‘भूवलय’ ह्या ग्रंथाबद्दल लिहून ठेवलंय – “हा ग्रंथ कन्नड भाषा, कन्नड साहित्य, तसेच संस्कृत, प्राकृत, तमिळ, तेलगु साहित्याच्या अभ्यासाच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. हा ग्रंथ भारताच्या आणि कर्नाटक च्या इतिहासावर प्रकाश टाकतो. भारतीय गणिताच्या अभ्यासासाठी हा ग्रंथ म्हणजे महत्वाचा संदर्भ ग्रंथ आहे. भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र आणि जीवन विज्ञानाच्या विकासाच्या अभ्यासासाठी हा ग्रंथ उपयुक्त आहे. तसेच तो शिल्पे आणि प्रतिमा, प्रतीके यांच्या अभ्यासासाठी देखिल उपयुक्त आहे. यातील रामायण, महाभारत, भागवत गीता, ऋग्वेद आणि इतर ग्रंथांची फोड करता आली तर त्यांची आणि सध्या उपलब्ध असलेल्या ग्रंथांची तुलना अभ्यासाच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल. नष्ट झालेले अनेक जैन ग्रंथ सिरी भूवलय मध्ये सापडू शकतात”.

ह्या ग्रंथाची माहिती जेंव्हा आपले पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद ह्यांना मिळाली, तेंव्हा त्यांचे उस्फूर्त उद्गार होते – ‘हा श्री भूवलय ग्रंथ म्हणजे जगातलं आठवं आश्चर्य आहे..!’

एका अर्थानं हे खरंय. कारण जगाच्या पाठीवर कुठेही असा ‘एकात अनेक ग्रंथ’ असलेला, कूट पद्धतीनं लिहिलेला विश्वकोश आढळत नाही.

आपलं दुर्दैव इतकंच की भारतीय ज्ञानाचा हा अमोल खजिना आपल्याला तरी कुठे माहीत होता..?
– प्रशांत पोळ

Author: प्रशांत पोळ

I am an Engineer by profession. Consultant in Telecom and IT. Interested in Indology, Arts, Literature, Politics and many more. Nationalistic views. Hindutva is my core ideology.

One thought on “सिरी भूवलय’ – अद्भुत आणि चमत्कारिक ग्रंथ”

  1. अहो आश्चर्य..धन्य ते स्वामी जी

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s