भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा – २

‘भारतीय ज्ञानाचा इतिहास’ ह्या लेखमालेतील मागील महिन्यात लिहिलेला लेख हा प्रामुख्याने भारतीय संस्कृतीच्या पाउलखुणा, भारताच्या पश्चिम दिशेला शोधण्याचा केलेला एक प्रयत्न होता. ‘बेनेरिक प्रकल्पा’ सारख्या उत्खननातून, केल्टिक आणि येझिदी संस्कृतींच्या प्रदर्शनातून आणि पश्चिमेच्या अनेक पुराणवस्तु संग्रहात ठेवलेल्या भारतीय वस्तूंच्या अवशेषातून, भारतीयांच्या पाउलखुणा अगदी ठळकपणे दिसलेल्या आहेत.

मात्र भारताच्या पूर्व भागातली परिस्थिती थोडी वेगळी आहे. त्या भागात भारतीयांच्या प्राचीन अस्तित्वाच्या खुणा शोधण्याची गरजच शिल्लक नाही. ‘अंगकोर वाट’ सारखं जगातलं सर्वात मोठं प्रार्थनास्थळ अगदी भक्कमपणे अवघ्या जगासमोर ह्या अस्तित्वाचे पुरावे देतोय. अन कंबोडिया सारखा देश ही, ‘अंगकोर वाट’ सारख्या हिंदू मंदिराला आपल्या राष्ट्रध्वजावर ठेऊन हे पुरावे अभिमानाने मिरवतोय…!

अक्षरशः हजारो मंदिरं, हजारो शिलालेख, हजारो शिल्पं, अनेक कागदपत्रं, हे सर्व, ह्या आग्नेय आशियात पसरलेल्या भारतीय संस्कृतीचे पुरावे ठामेठोक पणे जगासमोर मांडताहेत.

आग्नेय आशियातली हिंदू मंदिरं

आपलं दुर्दैव इतकंच की आपल्या शाळेत जाणाऱ्या मुलाला कोलंबस माहीत असतो, त्याने शोधलेली अमेरिका माहीत असते, अमेरिकेतली शहरं माहीत असतात, नेपोलियन माहीत असतो, वास्को-डी-गामा ही माहीत असतो. मात्र आपल्याच संस्कृतीला अभिमानाने मिरवणाऱ्या कंबोडियाची राजधानी माहीत नसते..! जावा-सुमात्रा, यवद्वीप, श्रीविजय, यशवर्मन, अंगकोर वाट.. वगैरे शब्द म्हणजे त्यांना ग्रीक किंवा हिब्रू भाषेतले शब्द वाटतात. कारण त्यांना कधी आपल्या विशाल सांस्कृतिक – धार्मिक साम्राज्या बद्दल सांगितलंच जात नाही..!

दक्षिण – पूर्व (म्हणजेच आग्नेय) आशियात आपली भारतीय संस्कृती आजही ठळकपणे दिसते, जाणवते. मात्र भारतीय संस्कृतीचा प्रभाव या भागावर केंव्हापासून पडायला लागला याबद्दल नक्की माहिती कुठेच उपलब्ध नाही. काही शिलालेखांमधून माहिती मिळते. पण या भागात पहिला भारतीय माणूस केंव्हा आला, याचा पुरावा मिळत नाही.

कंबोडिया हा देश, भारतातून जमिनीच्या मार्गे, आणि समुद्रातूनही जाता येण्यासारखा देश आहे. भारताच्या पूर्वेला असणारा ब्रम्हदेश. त्याला लागून थायलंड आणि त्याच्या पुढे कंबोडिया. पूर्वी ‘कंबुज’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह्या देशात भारतीयांचा प्रवेश कसा झाला याबद्दल एक कथा सांगितली जाते, जी ह्या भागात बरीच प्रचलित आहे.

इसवी सनाच्या साधारण दोनशे वर्षांपूर्वी कौडिण्य नावाचा एक भारतीय ब्राम्हण, काही लोकांना घेऊन येथे आला. या ‘शैलराज कौडिण्य’ ला युध्द करायचे नव्हते. तेथील नाग लोकांना याचे फार आश्चर्य वाटले. त्या नाग लोकांची राजकन्या ह्या कौडिण्य च्या प्रेमात पडली. हा कौडिण्य त्या देशाचा जावई झाला. पुढे राजा झाला आणि त्यानेच आपली हिंदू संस्कृती त्या देशाला दिली असे म्हटले जाते. या कौडिण्य ने स्थापन केलेल्या राज्याची राजधानी होती – व्याधपूर. या संदर्भात काही शिलालेख तेथे मिळाले आहेत. अंगकोर वाट ह्या जगप्रसिध्द मंदिरात आढळलेल्या शिलालेखावर लिहिलं गेलंय –
कुलासीद भूजगेन्द्र कन्या सोमेती सा वंशकरी पृथिव्याम I
कौडिन्यनाम्ना द्विजपुंगवेन कार्य्यार्थ पत्नीत्व मनायियापी II

चिनी इतिहासकारांनी ही ह्या कौडिण्य बद्दल बरेच लिहून ठेवले आहे. त्यामुळे ही केवळ काल्पनिक कथा राहत नाही.

कौडिण्य ने स्थापन केलेल्या राज्याचे चिनी नाव आहे, ‘फुनान साम्राज्य’. त्याचे हिंदू नाव उपलब्ध नाही. त्यामुळे जागतिक इतिहासात ते ‘फुनान साम्राज्य’ या नावानेच ओळखले जाते. साधारण इसवी सन ६१३ पर्यंत हे फुनान साम्राज्य होते असे उल्लेख सापडले आहेत. या काळात, भारतातील अनेक युवक या साम्राज्यात स्थायिक झाले आणि त्यांनी स्थानिक नाग युवतींशी विवाह केले अश्या नोंदी सापडल्या आहेत. याच काळात, या भारतीयांनी आपले शेतीतील ज्ञान वापरून या साम्राज्यात कालवे खोदले आणि चांगल्या शेतीने देशात समृध्दी आणली. हे खोदलेले कालवे आजही कंबोडिया वरून घेतलेल्या उपग्रह चित्रात स्पष्ट दिसतात.

साधारण सातव्या शतकाच्या सुरुवातीला या फुनान राजवंशात अराजक निर्माण झाल्याने ‘कंबू’ नावाच्या, भारतातून तिथे गेलेल्या क्षत्रियाने शासनाची सूत्र आपल्या हातात घेतली. तेंव्हा पासून हा देश ‘कंबुज’ म्हणून ओळखला जाऊ लागला. पुढे याचेच ‘कंबोडिया’ झाले. या कंबुज वंशाने तीन / साडे तीनशे वर्षांपर्यंत या देशावर राज्य केले. यांच्याच काळात भववर्मन, महेंद्रवर्मन यांच्या सारखे महापराक्रमी राजे निर्माण झाले.

पुढे नवव्या शतकात, जयवर्मन (दुसरा) याने खमेर साम्राज्याची स्थापना केली. त्याचा नातू यशवर्मन ने यशोधरपुर नावाची नवीन राजधानी स्थापन केली. याच वंशातील सम्राट सूर्यवर्मन याने जगातले सर्वात मोठे हिंदू मंदिर, ‘अंगकोर वाट’ बांधले.

म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून ते पुढे हजार / बाराशे वर्ष, या विशाल साम्राज्यात हिंदू संस्कृती अत्यंत अभिमानाने आणि वैभवाने नांदली, बागडली. भारतापासून दूर, ह्या देशात सहाशे / सातशे वर्ष संस्कृत ही राजभाषा म्हणून मानाने मिरवली. सुमारे एक हजार वर्ष, वेदांच्या ऋचा ह्या देशात घुमल्या. मोठमोठे यज्ञयाग झाले. भव्य मंदिरं बांधली गेली. उपनिषदं, पुराण, रामायण, महाभारत, गीता हे सर्व पवित्र ग्रंथ येथील प्रत्येक घराचा अविभाज्य भाग झाले. सामर्थ्यशाली, वैभवशाली, ज्ञानशाली असलेलं हे हिंदू राष्ट्र, हजार, बाराशे वर्ष सुखा-समाधानाने नांदलं. मात्र आपण इतके करंटे, आपल्याला यातलं काहीही कधी कोणी सांगीतलं नाही की शिकवलं नाही..! युरोपच्या लहान, लहान देशांचा इतिहास – भूगोल पाठ करणारे आपण, आपल्याला आपलाच हा तेजस्वी इतिहास कळू शकला नाही..!!

हे जसं कंबुज देशाबद्दल, तसंच यव द्वीपाबद्द्ल. यवद्वीप म्हणजे जावा. आजच्या इंडोनेशियाचा एक भाग. कोणे एके काळी संपूर्ण हिंदू असलेला. अगदी रामायणात आणि ब्रम्हपुराणात उल्लेख असलेलं हे यव द्वीप. येथेही भारतीय नेमके केंव्हापासून आले, याचा निश्चित इतिहास उपलब्ध नाही. मात्र काही हजार वर्षांपासून येथे हिंदू संस्कृतीचा प्रादुर्भाव आहे हे निश्चित. जावा च्या लोकांची ही मान्यता आहे की ‘आजिशक’ ह्या भारतातून आलेल्या पराक्रमी योद्ध्याने तेथील राक्षस देवतेच्या राजाला मारून, सामर्थ्यशाली राजवंश निर्माण केला.

जसे जावा, तसेच सुमात्रा. प्राचीन काळात सुवर्णभूमि किंवा सुवर्णद्वीप म्हणून प्रसिध्द असलेला भाग. आजचं इंडोनेशियातलं सर्वात मोठं बेट. या बेटावर साधारण सातव्या शतकापासून ते तेराव्या शतकापर्यंत हिंदूंचे ‘श्रीविजय साम्राज्य’ होते. अत्यंत वैभवशाली आणि संपन्न असलेल्या ह्या साम्राज्याबद्दल आधुनिक जगाला सन १९२० पर्यंत काहीच माहिती नव्हती, हे आपलं फार मोठं दुर्दैव आहे. १९२० मधे एका फ्रेंच संशोधकाने ह्या साम्राज्याची माहिती लोकांसमोर आणली. त्यानंतर मात्र ह्या साम्राज्याकडे लोकांचं लक्ष गेलं आणि बऱ्याच माध्यमातून माहिती समोर येऊ लागली.

इत्सिंग नावाचा चिनी बौध्द प्रवासी, बौध्द धर्माचं अध्ययन करण्यासाठी सातव्या शतकात (इसवी सन ६७१ मधे) भारतातल्या नालंदा येथे जायला निघाला. मात्र तिथे अध्ययन करायचं असेल तर संस्कृत भाषा आवश्यक आहे ही माहिती त्याला होती. म्हणून तो चीन च्या ‘ग्वांझावू’ प्रांतातून निघून श्रीविजय येथे थांबला आणि संस्कृत मधे पारंगत झाला. आपल्या एकूण २५ वर्षांच्या प्रवासात, इत्सिंग ने ६ ते ७ वर्ष श्रीविजय साम्राज्यात काढली. या साम्राज्याबद्दल इत्सिंग ने बरंच लिहून ठेवलंय.

श्रीविजय साम्राज्य

श्रीविजय साम्राज्याच्या काळातच त्रिमूर्ति प्रमबनन (‘परब्रम्ह’ चा अपभ्रंश) हे भव्य हिंदू मंदिर, जावा बेटावर इसवी सन ८५० मधे उभे राहिले. दुर्गादेवी, गणपती आणि अगस्त्य ऋषींच्या त्री मूर्ती चे हे मंदिर अत्यंत भव्य असून आजही तिथे व्यवस्थित उपासना चालते..!

जगातील सर्वात जास्त मुस्लीम लोकसंख्या असलेला इंडोनेशिया हा देश आजही अत्यंत अभिमानाने आपल्या हिंदू खुणा मिरवतोय. याचं ‘दीपांतर’ (समुद्रा पलीकडला भारत) हे नाव आजही अनेक ठिकाणी प्रचलित आहे. यांच्या नोटांवर (स्थानिक चलनां वर) गणेशाचे चित्र असते. यांच्या विमानसेवेचे नाव ‘गरुडा एयरवेज’ असते. ते बँकेला कोषागार म्हणू शकतात. आणि त्यांच्या ‘बहासा (भाषा) इंडोनेशिया’ या अधिकृत भाषेत सत्तर टक्के संस्कृत शब्द येऊ शकतात. इंडोनेशियाचे राष्ट्रीय बोध वाक्य ‘भिन्नेका तुंगल इका’ (विविधतेत एका) हे असू शकते..!

इंडोनेशियातील हिंदू उत्सव

इंडोनेशियातलं बाली द्वीप हे निसर्ग सौदर्यानं नटलेलं विख्यात पर्यटन स्थळ आहे. आज ही बाली ची ९०% लोकसंख्या हिंदू आहे आणि हिंदू आचार-विचारांवरच जगतेय. बालीत आढळलेला पहिला हिंदू शिलालेख ब्राम्ही लिपीत आहे आणि तो इसवी सनाच्या १५० वर्षांपूर्वीचा आहे.

व्हिएतनाम या देशाला आपण ओळखतो ते एक कम्युनिस्ट राष्ट्र, ज्याने सत्तर च्या दशकात अमेरिके सारख्या बलाढ्य राष्ट्राला नमविले. मात्र हे व्हिएतनाम, कोणे एके काळी पूर्ण हिंदू राष्ट्र होतं. या देशाचं नाव तेंव्हा ‘चंपा’ होतं. आणि याचे पाच प्रमुख विभाग होते –
1. इंद्रपुर
2. अमरावती (चंपा)
3. विजय (चंपा)
4. कौठर आणि
5. पांडुरंग (चंपा)

इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून पुढे जवळपास एक हजार वर्ष हा देश हिंदू आचार, विचार वागवत समृध्द होत होता. श्री भद्रवर्मन, गंगाराज, विजयवर्मन, रुद्रवर्मन, ईशानवर्मन सारख्या महापराक्रमी राजांनी हा देश भरभराटीला आणला. इसवी सनाच्या पाचव्या शतकात सुरुवातीला भद्रवर्मन चा मुलगा गंगाराज याने सिहांसनाचा त्याग करून जीवनाची शेवटची वर्षे भारतात येऊन गंगा किनारी व्यतीत केली. पुढे पांडुरंग वंशाने बरीच वर्षे राज्य केले.

व्हिएतनाम मधे सापडलेला प्राचीन गणपती

या संपूर्ण कालावधीत, ‘चंपा’ च्या इतिहासात, भारतीय संस्कृती खऱ्या अर्थाने राबविली गेली. भारतीय पध्दती प्रमाणे सेनापती, पुरोहित, ब्राम्हण, पंडित वगैरे रचना होती. महसूल व्यवस्था ही भारता प्रमाणेच ठेवण्यात आली होती. मंदिरं भव्य नव्हती, पण कलात्मक होती. यज्ञ, याग, अनुष्ठानं मोठ्या प्रमाणात व्हायची. भारतीय ग्रंथ, पुराण यांना विशेष महत्त्व होतं. या ‘चाम’ संस्कृतीचे काही अवशेष आजही शिल्लक आहेत, जे ‘चम’ या नावाने ओळखले जातात. मुळात ही ‘चम’ म्हणजे हिंदू रीतीरिवाज पाळणारी माणसं आहेत. कंबोडिया आणि व्हिएतनाम या दोन देशात ह्या ‘चम’ लोकांना अल्पसंख्यांकांचा दर्जा मिळालेला आहे.

लाओस हा देश ही एकेकाळी हिंदू संस्कृतीला मानणारा देश होता. लाओस च्या इतिहासात पहिल्यांदा उल्लेख होणारा हिंदू राजा होता, श्रुतवर्मन. याने वसवलेली राजधानी होती, श्रेष्ठपुर. सर्व हिंदू उत्सव लाओस मधे अत्यंत उत्साहाने आणि भव्यतेने साजरे व्हायचे. आजही लाओस मधे आणि व्हिएतनाम, कंबोडिया सारख्या शेजारच्या देशांमध्ये हिंदू पद्धतीचे कॅलेंडर चालते. बुध्दीस्ट कॅलेंडर मधे भारतीय महिने (चैत्र, वैशाख, जेष्ठ, आषाढ….) असतात आणि या भागातल्या अनेक देशांमध्ये हे कॅलेंडर चालते. गंमत म्हणजे आपल्या वर्षप्रतिपदेच्या (गुढीपाडव्याच्या) वेळेसच लाओस चा नवीन वर्षारंभाचा उत्सव असतो आणि संपूर्ण लाओस भर तो अक्षरशः प्रत्येक घरात साजरा केला जातो..!

पूर्वीचे सयाम, म्हणजे आजचे थायलंड. या सयाम देशातही एक अयोध्या (त्यांच्या भाषेत ‘अयुथ्या’) आहे आणि त्यांना तीच मूळ अयोध्या वाटते. येथे प्रभू रामाचा प्रचंड प्रभाव आज ही आहे. थायलंड चे राजे स्वतः ला रामाचे वंशज म्हणवून घेतात. बँकॉक मधील प्रमुख रस्त्यांच्या नावात सुध्दा ‘राम’ आहे.

आग्नेय आशियातील रामायण

सिंगापुर चं मूळ नावच मुळी ‘सिंहपुर’ आहे. स्वतः सिंगापुरकरांनाही याचा सार्थ अभिमान आहे. त्यांच्या अधिकृत गाईड मधे तसा स्पष्ट उल्लेख आहे. पूर्वीच्या सिंहपुरात संस्कृत चा वापर कसा व्हायचा हे ही सिंगापुर सरकार अभिमानाने सांगते. सिंहपुर हे नाव असल्यानेच सिंगापुर ने ‘सिंह’ ही स्वतः च्या देशाची खुण म्हणून स्वीकारली आहे.

एकुणात काय, तर हा संपूर्ण दक्षिण-पूर्व आशिया सुमारे हजार – बाराशे वर्ष हिंदुत्वाची सूक्तं गात होता. हिंदू पद्धतीनं जीवन यापन करत होता. भव्य आणि कलात्मक मंदिरं उभारत होता. यज्ञ-याग करत होता. देवाला आळवत होता. वेद, उपनिषद, पुराण यांच्या ऋचांनी आसमंत भारून टाकत होता. जगाला शांततेचे संस्कार देणारी हिंदू आणि बौध्द संस्कृती, त्या सर्व देशांना सुख समाधानाने, शांतीने जगायला शिकवत होती..!

या सर्व प्रवासात भारताने आपली वर्ण व्यवस्था तिथे नेली नाही. आपली खाद्य संस्कृती ही त्या देशांवर लादली नाही. त्या देशांना आपल्या वसाहती समजल्या नाही. व्यापारासाठी त्या देशांना वेठीला धरलं नाही. तिथल्या लोकांना तुच्छ लेखलं नाही. तिथे कुठेही युध्द करून त्यांना जिंकलं नाही..!

हे सर्व फार महत्वाचं आहे, कारण पुढे सहाशे – सातशे वर्षानंतर इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच, स्पेनिश या लोकांनी आशिया खंडात ज्या वसाहती उभारल्या, त्यांत वरील पैकी एकही गोष्ट त्यांनी पाळली नाही..!

आपलं दुर्दैव इतकंच, की ह्या वैभवशाली, उदात्त आणि अभिमानास्पद इतिहासाविषयी आम्हाला काहीही माहिती नाही आणि आजवर आमच्या राज्यकर्त्यांनी ती माहिती करून देण्याची इच्छा ही दाखवली नाही..!!

प्रशांत पोळ

Author: प्रशांत पोळ

I am an Engineer by profession. Consultant in Telecom and IT. Interested in Indology, Arts, Literature, Politics and many more. Nationalistic views. Hindutva is my core ideology.

2 thoughts on “भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा – २”

 1. खूप छान
  आज भारतीय असल्याचा गर्व आणि अभिमान वाटतोय.
  खरंच आपल्याला जो इतिहास शिकवला गेला तो खूप चुकीचा शिकवला आपल्या संस्कृतीच्या पाऊल खुणा प्राचीन काळात एवढ्या दूर वर पसरल्या होत्या ते वाचून खूप आनंद वाटतोय.
  मंगेश देशमुख
  पुणे.
  महाराष्ट्र.
  भारत.

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s