भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा – १

‘भारतीय ज्ञानाचा इतिहास’ ह्या लेखमालेतील पहिला लेख होता – बाणस्तंभ, जो सोशल मिडिया मधे बराच व्हायरल झाला. त्या लेखात सोमनाथ मंदिराच्या बाणस्तंभावर कोरलेला श्लोक दिला होता –

आसमुद्रांत दक्षिण धृव पर्यंत
अबाधित ज्योतीर्मार्ग…!
(या मंदिरा पासून दक्षिण धृवापर्यंतच्या रस्त्यात एकही अडथळा (जमीन) नाही. येथून ज्योतीचा मार्ग (प्रकाश) सरळ तिथपर्यंत पोहोचू शकेल.)

अर्थात दीड, दोन हजार वर्षांपूर्वी आपल्या भारतीयांना जर दक्षिण धृव माहीत असेल तर त्यांनी नक्कीच पृथ्वी प्रदक्षिणा केलेली असणार. म्हणजे जगाच्या पाठीवर भारतीयांच्या पाउलखुणा निश्चितच असतील. आज पासून एक हजार वर्षापूर्वी पर्यंत जागतिक व्यापारात भारत २७% ते ३०% हिस्सा घेऊन पहिल्या क्रमांकावर होता. आता व्यापाराला जाणारा माणूस त्या त्या क्षेत्रात आपल्या अगदी लहानश्या का होईना, वसाहती निर्माण करतोच. जसं भारतात राजस्थान च्या मारवाडी समुदायानी अगदी बांगलादेशा पासून ते आसाम, दक्षिण भारतापर्यंत अनेक ठिकाणी लहान लहानश्या वसाहती निर्माण केल्या.

मात्र अश्या प्राचीन भारतीयांच्या जागतिक पाउलखुणा बद्दल फारसं डॉक्युमेंटेशन कुठं आढळत नाही. अंबेजोगाई च्या डॉ. शरद हेबाळकरांनी एक छानसं पुस्तक लिहिलंय – ‘भारतीय संस्कृती चा विश्व संचार’. साधारण १९८० मधे लिहिल्या गेलेल्या ह्या पुस्तकानंतर अनेक ठिकाणी उत्खनन होऊन बरीच नवीन माहिती मिळाली आहे. त्यामुळे ह्या विषयावर बरेच संशोधन होणे आवश्यक आहे. डॉ. रघुवीर यांनी जगातील भारतीय लोकांच्या उपस्थिती विषयी भरपूर लेखन केले आहे. विशेषतः मंगोलियातील हिंदू संस्कृतीचा प्रभाव हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. डॉ. चमनलाल यांचे ‘हिंदू अमेरिका’ हे पुस्तक देखील प्रसिध्द आहे.

या सर्व पुस्तकांमधून हिंदू अथवा भारतीय संस्कृतीचा जगभर झालेला प्रवास दिलेला आहे. पण इतिहास संशोधकाला पुरावे लागतात. तसे पुरावे गोळा करण्याचे काम गेल्या वीस / पंचवीस वर्षात फारसे झालेले नाही.

डॉ. विष्णु श्रीधर (हरिभाऊ) वाकणकर हे नावाजलेले पुरातत्व वेत्ता. मध्यप्रदेशातील आदिम खुणा असलेल्या ‘भीमबेटका’ गुहांचा शोध यांनीच लावला आहे. डॉ. शरद हेबाळकरांच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहीताना हरिभाऊंनी त्यांच्या १९८४ सालच्या अमेरिका आणि मेक्सिको प्रवासाचा अनुभव दिलेला आहे. तो सांगताना त्यांनी अमेरिकेच्या सन डियागो च्या पुरातत्व संग्रहालयाचे अध्यक्ष बेरीफेल यांचा उल्लेख केला आहे. या बेरीफेल महोदयांनी मेक्सिकोच्या उत्तर पश्चिमेला असणाऱ्या युकाटन प्रांतात तावसुको नावाच्या जागी, माया संस्कृतीच्या मंदिरांमधे मिळालेल्या ‘वासुलून’ नावाच्या भारतीय महानाविकाच्या भाषा आणि लिपी मधे लिहिलेल्या मजकुराचा उल्लेख केला आहे. आणि या पुराव्यावरून बेरीफेल यांनी निर्विवाद पणे सांगीतले आहे की आठव्या / नवव्या शतकात तिथे भारतीय जात होते. दुर्दैवाने ह्या ‘वासुलून’ महानाविकाच्या शिलालेखाचा फोटो कुठेच उपलब्ध नाही. म्हणजे तो शिलालेख तिथल्या संग्रहालयात नक्कीच असेल. पण कोणी तेथे जाऊन त्याचा फोटो प्रकाशित करण्याचा प्रयत्न केलेला नाही. एखादे प्रतिपादन करायला ठाम पुरावे लागतात. ते गोळा करण्याचं मोठं काम करण्याची फार आवश्यकता आहे.

मात्र आता असे पुरावे मिळताहेत. भारतीय / हिंदू / वैदिक, अगदी कुठलंही नाव आपण दिलं तरी आपल्या प्राचीन संस्कृतीचं अस्तित्व जगभर सापडतंय.

भारताच्या पूर्वेला तर आपल्या संस्कृतीचे अंश आजही बऱ्याच प्रमाणात बघायला मिळतात. पण भारताच्या पश्चिमेला विशेषतः इजिप्त, युरोप इथेही दोन – तीन हजार वर्षांपूर्वीचे वैदिक संस्कृतीचे अस्तित्व उठून दिसते.

मध्यंतरी Out of India Theory (OIT), मांडल्या गेली होती. या सिद्धांता प्रमाणे, भारतातील काही सुसंस्कृत पंथ / जमाती / समूह, वेगवेगळ्या कारणांनी युरोपात, आफ्रिकेत स्थलांतरीत झाले.

यात एक प्रमुख नाव आहे, केल्टिक (Celtic) लोकांचं.

यज्ञ करणारे केल्टिक

केल्टिक ही युरोपात बोलली जाणारी भाषा आहे. ही भाषा (किंवा भाषासमूह) बोलणारे लोक हे ख्रिस्तपूर्व एक हजार वर्षापूर्वी युरोपात होते असं संशोधनाने सिद्ध झाले आहे. ख्रिस्तपूर्व सातव्या आणि आठव्या शतकातले त्यांच्या अस्तित्वाचे बरेच पुरावेही मिळाले आहेत. त्या काळात रोमन त्यांना ‘गल्ली’ म्हणत, तर ग्रीक ‘केल्टोई’ म्हणत. ह्या दोनही शब्दांचा अर्थ बार्बेरिक असा होतो. साधारण ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकात हे केल्टिक लोकं ब्रिटेन च्या आजूबाजूला आले आणि स्थिरावले. आजही आयर्लंड, स्कॉटलंड, वेल्स, कॉर्नवॉल, ब्रिटन या भागात चार प्रकारच्या केल्टिक भाषा, ह्या मातृभाषा म्हणून बोलल्या जातात.

एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वी ह्या केल्ट मंडळींचे मूळ हे फ्रांस आणि जर्मनीच्या आसपास मानल्या गेले होते. मात्र नंतर त्यांच्या मूळ जागेबद्दल अनेक सिद्धांत मांडल्या गेले.

द्रुईस बेलेनोईस आतेग्नातोस (Druuis Belenois Ategnatos) ह्या पुरातत्व संशोधकाने केल्टिक ही जमात हिंदू / वैदिक जमातींपैकी एक असल्याचे प्रतिपादन केले आहे. त्याच्या सिद्धांताप्रमाणे ह्या केल्टिक लोकांचे मूळ हे ‘उत्तर कुरु’ ह्या राज्यात होते. उत्तर कुरु म्हणजे हिमालयाचा उत्तर – पश्चिम भाग. अनेक इतिहास संशोधकांच्या मते हिमालयाच्या उत्तरेतही, पूर्वी वैदिक संस्कृतीच होती. विशेषतः डावीकडे किर्गीस्तान पासून ते उजवीकडील तिबेट पर्यंतच्या फार मोठ्या प्रदेशात वैदिक संस्कृती नांदत होती. पुढे बौध्द धर्माच्या प्रभावामुळे या जमातीतील काही लोकांनी बौध्द धर्माचा स्वीकार केला. ते तिथेच राहिले आणि ज्यांनी सनातन वैदिक धर्माची कास सोडली नाही, ते युरोप च्या दिशेने स्थलांतरित झाले. तेच हे केल्टिक लोक..!

Celtic - 1

आजही त्यांच्या नैमित्तिक गोष्टींमधील अनेक प्रथा आणि पद्धती वैदिक प्रकाराच्या जवळ जाणाऱ्या आहेत. अनेक युरोपियन इतिहास तज्ञांनी ह्या केल्टिक लोकांना ‘युरोपातील ब्राम्हण’ हे नाव दिले आहे. कारण वैदिक धर्माप्रमाणे चालणाऱ्या अनेक प्रथा, ही मंडळी आजही पाळतात. पीटर बेरेस्फोर्ड एलिस (Peter Berresford Ellis) ह्या इतिहास तज्ञाने देखील केल्टिक समूह म्हणजे प्राचीन वैदिक संस्कृती मानणारा हिंदुंचाच समूह आहे, जो पुढे कालांतराने युरोपात स्थलांतरित झाला, असे म्हटले आहे.

श्री श्रीकांत तलगेरी ह्या इतिहास विषयक अभ्यासकांचे या विषयावर विपुल लेखन उपलब्ध आहे. तलगेरींच्या सिद्धांताप्रमाणे ऋग्वेद पूर्वीच्या काळापासून अनेक हिंदू समूहांनी अफगाणिस्तान आणि युरोप च्या दिशेला स्थलांतर करायला सुरुवात केली होती. त्यामुळे अनेक युरोपियन संस्कृतींच्या मुळाशी हिंदू संस्कृतीच्या लहान-मोठ्या पाउलखुणा आढळतात.

तलगेरींच्या मते ऋग्वेद लिहिण्याचा काळ हा दोनशे ते तीनशे वर्षांचा आहे. ‘द ऋग्वेद – ए हिस्टॉरिकल एनालिसिस’ या आपल्या ग्रंथात ते ऋग्वेदात वर्णन केलेल्या राजवंशांचा मागोवा घेतात. त्यांच्या मताप्रमाणे भारताबाहेर स्थलांतरीत झालेले इतर हिंदू समूह आहेत –

पार्थस किंवा पार्थवस (ऋग्वेद ७ – ८३ – १) – पार्थियन्स
पार्सस किंवा पर्सवास (ऋग्वेद ७ – ८३ – १) – पर्शियन (पारसी)
पख्तास (ऋग्वेद ७ – १८ – ७) – पख्तून
भालानास (ऋग्वेद ७ – १८ – ७) – बलुची
शिवस (ऋग्वेद ७ – १८ – ७) – किवास

कोनराड इस्ट (Koenraad Eist) ह्या संशोधकानेही श्रीकांत तलगेरींचे मत उचलून धरलेले आहे.

असाच एक समूह आहे, जो इराक, सिरीया, जर्मनी, आर्मेनिया, रशिया येथे राहतो. हा ‘येझिदी’ समूह मुस्लीम नाही. ख्रिश्चन ही नाही. पारशी धर्म मानणारा पण नाही. यांचा स्वतः चा ‘येझिदी पंथ’ आहे. मात्र हा पंथ, हिंदू धर्माच्या अगदी जवळ जाणारा आहे. अनेक संशोधकांनी ह्या ‘येझिदी’ पंथाला, हिंदूंचा एक पश्चिम आशियात हरवलेला पंथ म्हटले आहे. यांच्या नेमक्या संख्येबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत. अनेक लोकांच्या मते ह्या पंथाची संख्या १५ लाख आहे. हा पंथ मानणारे लोकं प्रामुख्याने इराक आणि सिरीया मधे राहतात.

येझीदींनी चितारलेली प्राचीन स्त्री

गंमत म्हणजे, पाकिस्तान चे एक पोर्टल आहे – ‘पाकिस्तान डिफेन्स’ नावाचे (www.defence.pk). ह्या पोर्टल वर त्यांनी एक सविस्तर लेख दिलाय, ज्याचं शीर्षक आहे – ‘The Yazidi Culture is Very Similar to a Hindu sect’. या लेखात दिलेल्या माहिती प्रमाणे जगात फक्त ७ लाख येझिदी शिल्लक राहिलेले आहेत आणि ते मुख्यतः इराक जवळच्या कुर्दिश भागात राहताहेत. या लेखात अनेक पुरावे देऊन हे सांगण्याचा प्रयत्न केला गेलाय की येझिदी म्हणजे प्राचीन हिंदूंचा एक स्थलांतरित झालेला समूह आहे.

यज्ञ करताना येझिदी भाविक

या येझिदिंची प्रार्थनास्थळे ही अगदी हिंदूंच्या देवळा सारखी दिसतात. त्यांच्या मंदिरांवर नागाचे चित्र चितारलेले असते. सर्वात महत्वाचे म्हणजे येझिदी लोकांची जी पवित्र खूण आहे, त्यात पिसारा फुलवलेला मोर प्रामुख्याने आहे. गंमत म्हणजे इराक, सिरीया वगैरे ठिकाणी कुठेही मोर हा प्राणीच आढळत नाही. आणि ह्या मोराचं साम्य, तामिळ भगवान सुब्रमण्यम यांच्या परंपरागत चित्राशी / प्रतिमेशी आहे. पिवळा सूर्य हा येझिदिंचं प्रतीक आहे. या सूर्याची २१ किरणं आहेत. २१ ही संख्या हिंदू धर्मात पवित्र मानली जाते. आपल्या सारख्याच समया, तसंच दीप प्रज्वलन, स्त्रियांच्या कपाळावर पवित्रतेची बिंदी, तीच पुनर्जन्माची श्रद्धा… हिंदूंच्या अनेक चाली-रिती येथे ठळकपणाने उठून दिसतात.

हिंदूंप्रमाणे हात जोडून देवाला नमस्कार करणारा येझिदी भाविक
आपल्या हिंदूंसारखेच ते ही हात जोडून त्यांच्या देवाला नमस्कार करतात. आपल्या सारखेच ते ही यज्ञ करतात. आपल्या सारखीच पूजा करतात, आरतीची ताट तयार करतात. अशी कितीतरी साम्यस्थळे ह्या दोन संस्कृतीत दिसून येतात.

येझिदी महिलांच्या हातात आरतीचे ताट

याचा अर्थ स्पष्ट आहे. अत्यंत संपन्न अन वैभवशाली अश्या हिंदू / वैदिक संस्कृतीचे पाईक, हे समूह, ख्रिस्तपूर्व दोन हजार / तीन हजार वर्षांआधी निरनिराळ्या कारणांनी स्थलांतर करून जगातल्या वेगवेगळ्या भागात गेले. काहींनी आजूबाजूच्या परिस्थितीशी / वातावरणाशी मिळतं जुळतं घेतलं अन थोडीफार तरी संस्कृती टिकविली, तर काहींनी थोडी जास्त..!

त्यांच्या ह्या प्रवासाच्या पाउलखुणा, शोधल्या तर सापडतात.

रशियाच्या दक्षिणेला युक्रेन हा देश आहे, जो पूर्वी रशियाचाच एक भाग होता. या युक्रेन मधे, काळ्या समुद्र किनारी एक मोठं शहर आहे, ओदेसा (ओडीसा..?) नावाचं. या शहरात पुष्किन संग्रहालय आहे. या संग्रहालयात भारतीय देवतांच्या तीन प्रतिमा ठेवलेल्या आहेत, ज्या अगदी जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रे सारख्याच दिसतात…!
या ओदेसा शहरात, काही वर्षांपूर्वी, अगदी प्राचीन आणि मोडकळीस आलेल्या, हजार वर्ष जुन्या स्मारकाच्या जागी खोदकाम करताना ह्या प्रतिमा सापडल्या. धातूच्या ह्या प्रतिमा, हुबेहूब जगन्नाथ पुरीच्या देवांसारख्या आहेत..!

भारतीयांच्या विश्वव्यापी पाउलखुणा ठसठशीत पणे बघायच्या असतील तर बेरेनाईक (Berenike) प्रकल्पाचा अभ्यास करणं आवश्यक होऊन जातं. बेरेनाईक हे इजिप्त मधले अतिशय प्राचीन असे बंदर आहे. सुवेझ कालव्याच्या दक्षिणेला ८०० किलोमीटर वर असलेले हे बंदर लाल समुद्राच्या पश्चिम तटावर आहे.

हा बेरेनाईक प्रकल्प, पुरातत्व उत्खनन प्रकल्पांपैकी एक मोठा प्रकल्प आहे. १९९४ मधे सुरु झालेला हा प्रकल्प, अजूनही चालूच आहे. नेदरलंड फाउंडेशन फॉर साइंटिफिक रिसर्च, नेशनल जिओग्राफी, नेदरलंड चे विदेश मंत्रालय, युनिव्हर्सिटी ऑफ डेलावेर आणि अमेरिकन फिलोसोफिकल सोसाइटी यांनी संयुक्त पणे या प्रकल्पाला पैसा पुरवला आहे.

ख्रिस्तपूर्व २७५ वर्षांपूर्वी, टोलेमी – द्वितीय (Ptolemy II) ह्या इजिप्त च्या राजाने लाल समुद्राच्या किनाऱ्यावर हे बंदर बांधले आणि त्याला आपल्या आईचे नाव दिले – बेरेनाईक. हे बेरेनाईक, स्वाभाविक बंदर तर होतेच, पण हवामानाच्या दृष्टीने ही व्यापारी मालासाठी अनुकूल होते. या बंदरा पासून, उंटांच्या द्वारे मालाचे दळणवळण इजिप्त च्या आणि शेजारील देशांच्या इतर भागात सहजतेने होत होते.

भारताच्या दृष्टीने ह्या प्रकल्पाचे महत्त्व म्हणजे, येथे भारतीयांच्या प्राचीन वैश्विक व्यापाराचे खणखणीत पुरावे मिळाले आहेत. या उत्खननात त्यांना सुमारे ८ किलो काळी मिरी सापडली, जी निर्विवाद पणे दक्षिण भारतातच उगवली जायची. या शिवाय भारतातून निर्यात झालेले काही कपडे, चटया, आणि पिशव्या मिळाल्या. कार्बन डेटिंग मधे हे सर्व सामान इसवी सन ३० ते इसवी सन ७० चे निघाले.

या उत्खननात संशोधकांना एक रोमन पेटी मिळाली, ज्यात भारताच्या ‘बाटिक प्रिंट’ चे कपडे आणि भारतीय शैलीतले चित्र काढलेले कपडे मिळाले.

या सर्व उत्खननातून संशोधकांनी हा निष्कर्ष काढला की भारताचा हा समुद्री ‘स्पाईस रूट’, लोकप्रिय आणि प्रचलित असलेल्या ‘सिल्क रूट’ पेक्षाही आधीचा होता. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरून बेरेनाईक च्या बंदरा पर्यंत समुद्री मार्गाने भारताच्या जहाजांची ये – जा होत होती. पुढे इसवी सन ५०० च्या नंतर बेरेनाईक मधे प्लेग ची साथ उद्भवल्याने ह्या बंदराचा व्यापार, जवळ जवळ बंद झाला.

एकुणात काय, तर ख्रिस्त पूर्व दोन / तीन हजार वर्षांपूर्वी, म्हणजे आजपासून चार / पाच हजार वर्षांपूर्वी हिंदू आपल्या समृध्द आणि संपन्न संस्कृती ला घेऊन जगप्रवास करत होते. व्यापार करत होते. ज्ञान – विज्ञानाचा वसा जगाला देत होते. जगातील अनेक ठिकाणी पहिल्यांदा पोहोचले ते हिंदू नाविक / व्यापारी.

दुर्दैवानं या सर्वांचा इतिहास आपल्याला जपता आला नाही. म्हणूनच कोलंबस, वॉस्को-डी-गामा, मार्को पोलो, ह्यूएनत्संग सारखी नावं जगप्रसिध्द झाली अन आपल्या पराक्रमी नाविकांची / व्यापाऱ्यांची / धाडसी राजांची नावं इतिहासाच्या काळोखात बुडून गेली..!

मग कधीतरी बेरेनाईक सारख्या उत्खनन प्रकल्पाचे गवाक्ष उघडते. प्रकाशाची तिरीप येते आणि त्या लहानश्या प्रकाश किरणात प्राचीन भारताचा वैभवशाली इतिहास झळाळून उठतो..!!

प्रशांत पोळ

Author: प्रशांत पोळ

I am an Engineer by profession. Consultant in Telecom and IT. Interested in Indology, Arts, Literature, Politics and many more. Nationalistic views. Hindutva is my core ideology.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s