– प्रशांत पोळ
२ जून ला मथुरेच्या जवाहर बाग मधे जे काय घडलं, ते सारं भयानक होतं. अगदी ऐंशी च्या दशकातल्या ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ची आठवण करून देणारं होतं. त्यात भिंडरानवाले ह्या दहशतवाद्याने (खूप मोठ्या प्रमाणावर) अशीच अस्त्र, शस्त्र सुवर्ण मंदिरात जमा करून ठेवली होती. अन सुवर्ण मंदिर हे अतिरेक्यांचा अड्डा झाले होते. लहान प्रमाणात का होईना, पण अगदी अश्याच प्रकारे ‘रामवृक्ष यादव’ ह्या माथेफिरू माणसाने जवाहर बाग मधे अस्त्र, शस्त्रांचा साठा जमा करून त्याला आपला अड्डा बनविले होते. भिंडरानवालेंना प्रारंभी इंदिरा गांधींनी मोठं केलं होतं तर इथे ह्या वेड्या रामवृक्ष यादव ला, मुख्यमंत्री अखिलेश यादवांचे काका, शिवपाल यादव यांचा पाठिंबा होता..!
मथुरेतील जवाहर बाग हे १६० एकरात पसरलेले विस्तीर्ण उद्यान. सन २०१४ ला, निवडणुकांच्या धामधुमीत सारे पक्ष आणि प्रशासन व्यस्त असताना, स्वतः ला ‘बाबा जय गुरुदेव’ ह्यांचा शिष्य अन वारसदार म्हणवणाऱ्या रामवृक्ष यादव याने या उद्यानावर कब्जा केला. त्याच्या सोबत होते तीन हजार शिष्य..! स्वतः मंत्री शिवपाल यादव यांचा वरदहस्त असल्याने सुरुवातीला ह्या रामवृक्ष यादव ला कोणी रोकले नाही, की टोकले नाही. ह्याचा फायदा घेत त्याने ह्या १६० एकरांची व्यवस्थित नाकेबंदी केली. आत झोपड्या उभारल्या, स्वच्छतागृहे उभारली आणि स्वतः चे एक स्वतंत्र संस्थान निर्माण केले. मथुरे सारख्या शहरात, तब्बल दोन वर्षे हा प्रकार चालला..!
हे सगळे कोणाच्या नावावर चालले होते..?
तर ‘बाबा जय गुरुदेव’ ह्यांच्या नावावर..! कोण होते हे बाबा जय गुरुदेव..?
ऐंशी च्या दशकात, उत्तर भारतातल्या लहानातल्या लहान गावापासून तर मोठ्यातल्या शहरापर्यंत, भिंतींवर एक घोषणा लिहिलेली असायची – ‘सतयुग आयेगा – जय गुरुदेव’
हे जय गुरुदेव नावाचं आज वाटणारं कोडं तेंव्हा झंझावात होतं. गावागावात ह्या जय गुरूदेवांचा विशाल असा शिष्य परिवार होता. अंगात तरटाचे कपडे घातलेला, मोठाच्या मोठा शिष्यांचा तांडा घेऊन हे गुरुदेव, एका शहरातून दुसऱ्या शहरात फिरत असायचे.
हे जय गुरुदेव म्हणजे मुळचे ‘तुलसीदास जी महाराज’. ह्यांच्या लहानपणीच्या किंवा तरुणपणाच्या जीवनाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. मात्र ह्यांचा जन्म उत्तर प्रदेशातल्या इटावा जिल्ह्यातल्या खितौरा ह्या लहानश्या गावात, यादव कुटुंबात झाला होता हे निश्चित. संयोग असा की मुलायमसिंह यादव हे देखील इटावा जिल्ह्याचेच आहेत..!
या तुलसीदास यादव यांनी १० जुलै १९५२ ला वाराणशी मधे पहिले धार्मिक प्रवचन दिले. यानंतर ते ‘तुलसीदास जी महाराज’ असे स्वतः ला म्हणवून घेऊ लागले. पुढे १० / १५ वर्षांनी त्यांनी, त्यांच्या गुरूच्या आज्ञेप्रमाणे ‘जय गुरुदेव’ हे नाव धारण केले. पुढे हे जय गुरुदेव, जयप्रकाश जींच्या आंदोलनात सक्रीय झाले. त्यामुळेच त्यांना आणीबाणीत, सन १९७५ मधे १९ महिन्यांचा तुरुंगवास घडला. पहिले त्यांना आग्र्याच्या च्या तुरुंगात ठेवले होते. मात्र जेल बाहेर त्यांच्या अनुयायांनी केलेल्या प्रदर्शनांमुळे त्यांना बरेली च्या तुरुंगात टाकण्यात आले. तिथे ही अनुयायांपासून होणाऱ्या उपद्रवामुळे प्रशासनाने त्यांना दक्षिणेत बंगलोर ला नेऊन ठेवले. नंतर त्यांची रवानगी दिल्लीच्या तिहार जेल मधे झाली. २३ मार्च, १९७७ ला त्यांची तुरुंगातून सुटका झाली. आणि म्हणूनच त्यांचे अनुयायी दर वर्षी २३ मार्च ला ‘मुक्ती दिवस’ साजरा करतात.
तुरुंगातून सुटल्यावर बाबांचा शिष्य परिवार वाढला आणि तोपर्यंत बाबांजवळ बऱ्यापैकी पैसा ही जमला होता. साहजिकच त्यांची महत्वाकांक्षा बळावली असणार. म्हणून त्यांनी १९८० मधे ‘दूरदर्शी पार्टी’ नावाचा राजकीय पक्ष निर्माण केला. १९८४ च्या लोकसभेच्या निवडणुकांत ह्या पक्षाने ९७ जागा लढवल्या. सर्व जागांवर पराभव झाला आणि मतांची टक्केवारी निघाली फक्त ०.२०%. १९८९ मधे २८८ जागा लढवल्या. परत संपूर्ण पराभव आणि मतं मिळाली – ०.४५% फक्त. १९९१ च्या निवडणुकात ३२१ जागांवर लढूनही पक्षाच्या पदरी सपशेल अपयशच आलं. मतांची टक्केवारी आणखी घसरली आणि उरली फक्त ०.१७%. पक्षाच्या जवळ जवळ सर्व उमेदवारांनी अमानत रकमाही गमावल्या. हे बघून वैतागानं जय गुरुदेव बाबांनी शेवटी आपला ‘दूरदर्शी पार्टी’ हा पक्षच विसर्जित करून टाकला..!
पुढे ‘सतयुग आयेगा..’ लिहिलेल्या भिंती दिसणं ही कमी झालं आणि १८ मे २०१२ ला (शिष्यांच्या म्हणण्या प्रमाणे) ११६ वर्षांच्या जय गुरुदेव बाबांनी मथुरेत आपला देह ठेवला..!
मृत्यू समयी बाबा जय गुरूदेवांची संपत्ती १,२०० कोटी रुपयां पेक्षाही जास्त होती. त्यांच्या जवळ अडीचशे पेक्षाही जास्त अलिशान देशी / विदेशी मोटारी, गाड्या होत्या. अनेक शहरात आश्रम होते. अश्या संपत्ती वरून ‘यादवी’ माजणार हे साहजिकच होतं. तशी ती माजलीही. त्यांच्या शिष्यांमध्ये तीन समूह तयार झाले. पंकज यादव, रामवृक्ष यादव आणि उमाशंकर तिवारी. मात्र या संघर्षात पंकज यादव जिंकला. आणि म्हणूनच तो जय गुरुदेव बाबांचा उत्तराधिकारी म्हणून घोषित झाला.
यातील रामवृक्ष यादव हा तसा अपराधिक वृत्तीचा. मुलायम सिंह यांच्या परिवाराला जवळ असणारा. हा देखील आणीबाणीत जेल मधे बंद होता. त्यामुळे ह्याला उत्तर प्रदेश सरकारची ‘लोकतंत्र सेनानी पेन्शन’ सुध्दा मिळतेय. राजकारणाची ह्याला प्रचंड आवड होती. ह्याने दूरदर्शी पार्टी तर्फे दोनदा लोकसभेच्या निवडणुकाही लढल्या होत्या. अर्थात दोनही वेळेला याचा सपशेल पराभव झाला होता. ह्याचे वेगवेगळे ‘कारनामे’ बघून जय गुरुदेव बाबांनी आपल्या शेवटल्या काळात ह्याला आपल्या पासून दूर केले होते.
ह्या रामवृक्ष यादव ने शेवटी आपले वेगळे दुकान उघडले. मात्र जय गुरुदेव बाबांच्या अधिकांश संपत्ती वर त्याला कब्जा करता आला नाही. म्हणून त्याने २०१४ साली, लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत, मध्य प्रदेशातल्या सागर हून आपल्या अनुयायांचा एक मोठा जथ्था बरोबर घेतला. ह्या अनुयायांपैकी अधिकांश हे भूमिहीन शेतकरी होते. ह्या सर्वांना घेऊन त्याने मथुरेच्या जवाहर बाग मधे डेरा जमवला…!
जवाहर बाग मधे हा अक्षरशः राजेशाही थाटात राहत होता. याचा स्वतः चा स्विमिंग पूल याने तयार केला होता. ह्याच्या शाही झोपडीत दारूच्या बाटल्या आणि बायकांचे कपडे ही सापडले. असं म्हणतात, ह्या तीन हजार लोकांचा खर्च चालवण्या साठी त्याला नक्षलवाद्यांकडून काही पैसे मिळत होते.
ह्या प्रकरणात, मथुरेचे एक वकील जर न्यायालयात गेले नसते, तर कदाचित मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ह्या रामवृक्ष यादव आणि त्याच्या साथीदारांना २६० एकराची जवाहर बाग, २९ वर्षाच्या लीज वर देऊनही टाकली असती. तशी सूत्रही हालली होती. पण न्यायालयाने आदेश दिला. पोलीस प्रशासन त्या आदेशाचे पालन करायला गेले अन त्यात मथुरा शहराचे एस पी, मुकुल द्विवेदी मारले गेले. त्यांना अक्षरशः लाठ्या काठ्यांनी, अत्यंत क्रूर पद्धतीनं मारण्यात आलं. त्यांच्या बरोबर असलेला पोलीस ऑफिसर, संतोष यादव मात्र उपद्रविंच्या बंदुकीने मारल्या गेला.
दुर्दैवाची गोष्ट अशी की एस पी मरण पावल्या नंतर आणि जवाहर बागेत रामवृक्ष यादव चे बेभान आणि माथेफिरू समर्थक हुडदुस घालत दंगा करत असतानाही, राजधानी लखनऊ मधे बसलेल्या अधिकाऱ्यांनी सुमारे एक ते दीड तास कार्यवाही चे आदेश थोपवून धरले. या सर्व प्रकारामुळे पोलीस दल कमालीचे संतापले होते. आणि आदेश आल्यावर त्यांनी आपल्या कप्तानाच्या मृत्यूचा चांगलाच बदला घेतला. रामवृक्ष यादव समवेत २९ लोकं मारल्या गेले अन शेकडो जखमी झाले.
हे सारं फार भयंकर होतं. हे व्हायला नको होतं. पण मुलायम सिंह यादवांच्या परिवाराने दिलेल्या पाठींब्या मुळेच रामवृक्ष यादव सारखा भस्मासुर तयार झाला. आणि म्हणूनच हे प्रकरण घडलं. राजकारणाचे गुन्हेगारीकरण करणे किती धोकादायक असते, हेच ह्या प्रकरणातून परत एकदा सिद्ध झाले..!!
– प्रशांत पोळ
ठळक घटना –
माथेफिरू आणि वेडगळ रामवृक्ष
जवाहर बागेत ठिय्या देऊन बसलेल्या (म्हणजेच दोन वर्ष आरामाने तेथे राहत असलेल्या) लोकांचा नेता असलेला रामवृक्ष हा माथेफिरू आणि वेडगळ होता. त्याच्या मते तो जवाहर बागेत सत्याग्रह करत होता. त्याच्या मागण्या ही अश्याच स्वरूपाच्या होत्या –
• सरकारने १२ रुपये तोळे सोने द्यावे.
• एका रुपयात ६० लिटर पेट्रोल मिळाले पाहिजे.
• देशात सोन्याच्या शिक्क्यांचे चलन व्हावे.
• राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांच्या निवडणुका ताबडतोप रद्द व्हाव्यातआणि अश्या बऱ्याच..!
विक्षिप्त जय गुरुदेव…
रामवृक्ष यादव चे गुरु असलेल्या बाबा जय गुरूदेवांचं ही सारंच काही विचित्र होतं. ते स्वतः ला नेताजी सुभाषचंद्र बोसांचे अवतार समजायचे. अगदी सुरुवातीला, जेंव्हा ते जय गुरुदेव बाबा झाले नव्हते, तेंव्हा त्यांनी वाराणसीला मोठा प्रचार करत घोषणा केली की ह्या अमुक अमुक तारखेला नेताजी सुभाषचंद्र बोस प्रकटणार आहेत. त्या ठराविक दिवशी खूप मोठा जमाव तिथे जमला. त्या जमावासमोर हे स्वतःच उभे राहिले आणि म्हणाले की मीच सुभाषबाबू आहे. त्यांचं ते ‘भैय्या’ स्टाईल ने बोलणं ऐकून आणि हावभाव बघून, तिथे जमलेल्या लोकांनी त्यांना जोड्यांनी बडवलं होतं..!
संघाला ओढण्याचा केविलवाणा प्रयत्न
लोकमत ने दिनांक ९ जून च्या अंकात मथुरेच्या या घटनेवर भाष्य करताना यात विनाकारण संघाला ओढून ताणून आणण्याचा प्रयत्न केला आहे. लोकमत चे संपादक लिहितात की उत्तर प्रदेशात रा. स्व. संघाने बंदुका चालविण्याचे आणि लष्करी कवायती शिकविण्याची प्रशिक्षण केंद्रे सुरु केली आहेत. थोडक्यात, लोकमत कार, मथुरेच्या त्या बेबंद घटने ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडू पाहतात..!
या सारखे तिरपागडे तर्क करायला लोकमत कारच हवेत..! मुळात मथुरेच्या त्या रामवृक्ष यादव ला पाठीशी घालणाऱ्या मुलायम सिंह यादव यांच्या परिवाराबद्दल ह्या अग्रलेखात एक चकार शब्द सुध्दा नाही. या माथेफिरू रामवृक्ष यादव ला पैसा कुठून येत होता, याबद्दल ही उल्लेख नाही. आणि कुठूनही कसलाही संबंध नसताना संघाला यात ओढण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना पत्रकारितेची कसलीही चाड देखील नाही..!