– प्रशांत पोळ
आमच्या जबलपुर ला सत्तर च्या दशकात मराठी पुस्तकं मिळण्याचं हक्काचं ठिकाण हे चालतं, फिरतं, बोलतं होतं. ते म्हणजे जोशीबुवा. साने गुरुजींसारखे दिसणारे जोशीबुवा, अगदी साने गुरुजींसारखीच गांधी टोपी घालून, पाठीवर पांढरं गाठोडं घेऊन, पायातल्या चपला घासत घरोघरी जात.
उन्हाळ्याच्या सुट्टीत जोशीबुवा हमखास घरी येत. त्यांच्या गाठोड्यात, आमच्या मुलांसाठीचं अद्भुत विश्व दडलेलं असे. २४ किंवा ३२ पानांची ती जादूची, राजा – राण्यांची पुस्तकं (त्यावरील ‘दाजी माधव जोशी बुकसेलर्स’ ह्या शिक्क्यासह) म्हणजे आमच्या साठीचं आकर्षण होतं. जोशीबुवा पुस्तकं दाखवत असतानाच, त्यातलं एखादं लहानसं पुस्तक वाचून संपवणं म्हणजे आनंद असायचा.
पुढे वय किंचित वाढलं. जादूच्या अन राजा राण्यांच्या पुस्तकांची जागा साहस कथांच्या पुस्तकांनी घेतली…
आमच्या जबलपुर ला टांकसाळे यांची एक सुरेख लायब्रेरी होती – ‘हिंदी – मराठी वाचनालय’ ह्या नावाची. तिथे मला उन्हाळ्याच्या सुट्टीतच एक बत्तीस पानांचं पुस्तक मिळालं. साहस अन रोमांच यांनी भरलेलं. ते फारच आवडून गेलं. अन तश्यातच ‘आनंद’ ह्या मराठी मासिकाचा सन ७२ किंवा ७३ चा अंक वाचायला मिळाला. त्यात एका क्रमशः कादंबरीचं प्रकरण होतं. प्रकरणाचं शीर्षक होतं – ‘शेंगात शेंग’. कादंबरी होती – ‘खजिन्याच्या बेटावर संजू राजू.’ अन लेखक होते – भा. रा. भागवत.
बस्स… त्या क्षणापासून माझं भावविश्व पूर्णपणे बदलून गेलं. त्या कादंबरीच्या नुसत्या एका प्रकरणाने मी अक्षरशः भाराऊन गेलो. आनंद च्या त्या अंकातच ती कादंबरी कोठे मिळेल ह्याचा पत्ता दिलेला होता.
आता माझे विचारचक्र सुरु झाले. कशी मिळवायची ही कादंबरी..? अन ते ही जबलपुरात..? माझे मोठे काका हे अध्यात्माच्या क्षेत्रातलं फार मोठं व्यक्तिमत्व होतं. ते नेहमीच ‘केशव भिकाजी ढवळे’ किंवा इतर ठिकाणाहून ‘व्ही. पी.’ ने पुस्तकं मागवायचे. मी ते बघितले होते. अर्थातच मला मार्ग सापडला…
मी एका पोस्टकार्ड वर पाप्युलर प्रकाशनाला सहा रुपयांचे, ‘खजिन्याच्या बेटावर संजू राजू’ हे पुस्तक पाठवायला सांगितले. मागे माझा पत्ता दिला. अन सुरु झाले वाट पाहणे….
साधारण ८ – १० दिवसांनंतर शाळेतून घरी आल्यावर आईने विचारले, “का रे, तू व्ही पी ने पुस्तक मागवले होते..?”
“हो.. आलं का ते..?”
ते पुस्तक चक्क आलेले होते. धन्य त्या पाप्युलर प्रकाशनात काम करणाऱ्यांची, ज्यांनी एका तिसरी / चौथीतल्या मुलाच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या पोस्टकार्ड वर विश्वास ठेऊन व्ही पी ने पुस्तक पाठवले… अन धन्य ती माझी माउली, जिने फारसे रागे न भरता दोन रुपये पोस्टेज सह आठ रुपयांची ती व्ही पी सोडवली…!
पण ती कादंबरी हातात पडली, अन मी आधाश्या सारखी वाचून संपवली. पुढे त्या कादंबरीची किती पारायणं केली, कुणास ठाऊक..!
तो संजूचा कोकणातला इनामदारांचा वाडा. राजू बरोबर एयरगन ने पाडलेली ती शेंग, त्या शेंगेत असलेली दुसरी शेंग. अन त्यावरून सुचलेली म्यानात म्यान ची आयडिया. त्या म्यानावर कोरलेला तो संस्कृत श्लोक. मामा, डॉक्टर काका, शास्त्रीबुवा वगैरेंबरोबर ‘वेत्रा’ ह्या डोलकाठीच्या जहाजातून जावा – सुमात्रा पर्यंत केलेला प्रवास. तो तलवारीवरचा श्लोकाचा उर्वरित भाग.. ते खजिन्याचा बेटाचे रहस्य.. तो खुशालचंद सरदारजी ऊर्फ किल्वर, लाल बदाम…
आज इतक्या वर्षांनंतरही ती सारी पात्रं लख्खपणे डोळ्यासमोर उभी राहताहेत. मुळात भा. रा. भागवतांनी ‘ट्रेझर आयलंड’ ह्या इंग्रजी कादंबरी चा केलेला हा स्वैर अनुवाद आहे. तसं अगदी प्रामाणिकपणे त्यांनी प्रस्तावनेत म्हटलं ही आहे. पण ही कादंबरी कुठूनही अनुवादित वाटत नाही, तर कुमार – किशोरांसाठीची एक परिपूर्ण साहस कादंबरी वाटते. अगदी आपल्या मातीतली. अस्सल भारतीय. हिच्या पुढे तर मला एनिड ब्लायटन च्या फेमस फाईव्ह सिरीज च्या कादंबऱ्या पण फिक्या वाटायच्या.
त्या मंतरलेल्या अन भारावलेल्या दिवसात ही अशी सुरेख कादंबरी वाचायला मिळणं हा माझ्यासाठी दैव योग होता..!
पुढे भा. रा. भागवतांच्या लेखनाच्या प्रेमात पडलो. ‘भुताळी जहाज’ सारख्या इतरही कादंबऱ्या वाचल्या. ‘विपीन बुकलवार’ ही पुढे भेटीला आला… पण ह्या कादंबरी ने एका अजून व्यक्तिरेखेपर्यंत नेऊन माझं वाचन विश्व समृध्द केलं. आणि ती व्यक्तिरेखा म्हणजे भा. रा. भागवतांचा मानसपुत्र – फास्टर फेणे..!!
– प्रशांत पोळ