– प्रशांत पोळ
पुण्याहून जबलपुर ला जाणाऱ्या गाडीत बसताना, वाचायला म्हणून ‘लोकप्रभाचा’ अंक घेतला. कार्टून विशेषांक होता. मी बघतच राहिलो… अन मग अलगद माझ्या कॉमिक्स वाचण्याच्या वयात गेलो…!
त्या काळात उन्हाळ्याची सुट्टी ही कॉमिक्स शोधण्याची अन शोधून शोधून वाचण्याची होती. कोणाच्या घरी ‘मेंड्रेक’ चे एखादे दुर्मिळ कॉमिक आहे असे समजले की पावले त्याच्याच घरी वळायची. आणि आपापसात हे असे कॉमिक्स शेअर करण्याचे व्यवहार सर्रास चालायचे. इंग्रजीतला फेंटम हां हिंदीत ‘वेताल’ किंवा ‘भूतनाथ’ बनून यायचा. या वेताल ची फक्त बच्चे मंडळीतच नाही, तर मोठ्यांमधेही प्रचंड क्रेझ असायची. तो वेताळ, त्याचा तो घोडा, जंगलात वाजणारे ड्रम्स, त्याच्या अंगठीवरील ते कवटी चे चिन्ह.. सारेच अद्भुत..! एका वेळेस चार / पाच कॉमिक्स चा बाईंड केलेला गठ्ठा कुठे मिळाला तर अक्षरशः लॉटरी लागल्याचा आनंद व्हायचा.
त्या काळात स्थानिक वर्तमानपत्रात ह्या कॉमिक्स च्या स्ट्रिप्स यायच्या. मग रोज शाळेतून आल्यावर त्या दिवसाची स्ट्रिप कापून ती रजिस्टर मधे चिकटविण्याचं आवडतं काम असायचं. कधी एखादा अंक आला नाही, किंवा ती स्ट्रिप कापणं राहिलं तर चुटपूट लागलेली असायची. अन वेताल ची किंवा मेंड्रेक ची, ती गोष्ट पूर्ण झाल्यावर त्या रजिस्टर ला असा भाव यायचा… सर्व मित्रमंडळीत ते रजिस्टर फिरायचे. अजित, सुबोध अश्या मित्रांबरोबर ही अशी रजिस्टर्स दिलेली / घेतलेली आठवतात.
माझा एक आतेभाऊ आहे. आम्ही त्याला बल्लुदादा म्हणतो. त्याच्या घरी, कांकेर ला, ह्या कॉमिक्स चा अक्षरशः गठ्ठाच्या गठ्ठा असायचा. तिथे गेलो की मी ह्या कॉमिक्स मधे पूर्णपणे बुडालेला आठवतोय.
मी साधारण तिसरीत / चौथीत असताना संपूर्ण भारतीय परिवेशातील एक हिंदी कॉमिक साप्ताहिक सुरु झाले – लोटपोट. यात मोटू – पतलू ह्या दोन व्यक्तिरेखा अवतीर्ण झाल्या आणि त्यांनी साऱ्या उत्तर भारताला वेड लावले. ह्या मोटू – पतलू ची वेगळी कॉमिक पुस्तके निघाल्याचेही आठवते. त्यातील एका भागात मोटू – पतलू वेड्यांच्या इस्पितळात जातात ही गोष्ट होती, तर दुसऱ्या भागात ते कुक्कुट पालनाचा व्यवसाय सुरु करतात, ही थीम होती. अक्षरशः धम्माल होती..! मोटू – पतलू बरोबरच डॉ. झटका, घसीटाराम वगैरे पात्रांनी त्या काळातल्या लहान मुलांवर गारुड केलेलं होतं.
लोटपोट ची लोकप्रियता बघून पुढे, त्याच्याच सारखे ‘मधु मुस्कान’ हे साप्ताहिक आले. तिकडे ‘चंपक’ मधे प्राण ने ‘चाचा चौधरी’ ही व्यक्तिरेखा निर्माण केली, जी आजही तुफान लोकप्रिय आहे.
टी व्ही आणि मोबाईल नसण्याचा तो काळ होता. माध्यमांच्या मर्यादा असल्या तरी बाल साहित्य छान समृध्द होतं. मराठीत अशोक माहिमकर ‘फुलबाग’ नावाचे पाक्षिक / मासिक काढत होते. त्यांच्या सुवाच्य अक्षरात लिहिलेल्या आणि त्यांनीच चित्रे काढलेल्या फुलबाग ची गंमत काही और होती. अगदी आमच्या जबलपुर सारख्या, महाराष्ट्रा बाहेरच्या शहरातही तेंव्हा फुलबाग मिळायचं.
त्या काळात कुठल्याही चित्रमय गोष्टीत मन रमायचं. अगदी, ‘धर्मयुग’ मधे अबीद सुरतींनी चालवलेली ‘ढब्बूजी’ ही कॉमिक स्ट्रिप सुध्दा आनंद देऊन जायची. ‘अमर चित्र कथा’ चे ते सुरवातीचे दिवस होते. अनंत पै यांच्या भारतीय परिवेशातील व्यक्तिरेखांना लोकप्रियता मिळू लागलेली होती.
ते दिवस असे मस्त, छान होते. कॉमिक्स मधे रमण्याचे होते. तेंव्हा कार्टून नेटवर्क नसलं, टी व्ही, मोबाईल नसले तरी ह्या वेताळ, मेंड्रेक, मोटू – पतलू, चाचा चौधरी.. ह्यांनी इतकं भरभरून मनोरंजन केलं…
की जगणं समृध्द करून दिलं..!!
– प्रशांत पोळ