भारतीय ज्ञानाचा खजिना
– प्रशांत पोळ
गेल्या अंकात प्रकाशित झालेल्या ‘पंचमहाभूतांच्या मंदिरांचे रहस्य’ या लेखावर प्रतिक्रियांचा अक्षरशः पाउस पडला. सोशल मिडिया च्या माध्यमातून तर हा लेख मोठ्या प्रमाणावर ‘व्हायरल’ झाला. फेसबुक मधे ह्या लेखाला काही शे लोकांनी शेअर केलं तर व्हाट्सअप च्या माध्यमातून हा लेख अनेक समुहात फिरला. एकूण काही लाख लोकांपर्यंत हा लेख पोहोचू शकला.
आलेल्या प्रतिक्रियांमधे अधिकांश लोकांचं म्हणणं होतं की आम्हाला ही अशी अद्भुत मंदिरं माहीतच नव्हती. चूक त्यांची नाही. आपल्या सर्वांचंच हे दुर्दैव आहे की आपला वैभवशाली आणि संपन्न वैज्ञानिक, सांस्कृतिक वारसा, आपल्याला माहीतच नाही. अनेक बाबतीत आपल्याला हे जाणवतं. यंदाच्या दुष्काळामुळे ही बाब ठळकपणे समोर आली आहे.
सध्या दुष्काळानं देशभरात, विशेषतः महाराष्ट्रात, थैमान घातलं आहे. पाण्यासाठी माणूस सर्व दूर वणवण भटकतोय. लातूर सारख्या ठिकाणी तर स्थिती अक्षरशः भयावह आहे. तेथे पाण्यावरून दंगली पेटल्या आहेत आणि १४४ कलम लावावे लागले आहे. या बिकट परिस्थिती वरून हे लक्षात येतं की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या इथे पाण्याचे नियोजन नीट झालेच नाही. ना नीट धरणे बांधली गेली, ना कालवे खोदले गेले आणि पाणी जमिनीत जिरविण्याचे उपायही फारसे झालेच नाहीत. म्हणूनच देशाच्या फार मोठ्या भागात, पाण्याची पातळी जमिनीपासून खूप खाली गेली आहे.
अश्या ह्या दुष्काळाच्या छायेत वावरणाऱ्या देशात अशी जीवघेणी परिस्थिती पूर्वी नव्हती. दुष्काळ पूर्वीही पडायचे. पण त्या काळात पाण्याचं नियोजन नीट होतं. किंबहुना त्या प्राचीन काळी आपल्या देशात पाण्याचं व्यवस्थापन उत्कृष्ट होतं आणि म्हणूनच आपला देश ‘सुजलाम सुफलाम’ होता..!
पाण्याचं हे नियोजन किती चांगलं असावं..? तर जगातले पहिले ज्ञात आणि सध्याही वापरात असलेले धरण हे भारतात आहे, हे आपल्यापैकी किती लोकांना माहीत असेल..? इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात, चोल राजा करिकलन याने बांधलेला ‘अनईकट्टू’ अथवा इंग्रजांच्या भाषेत ‘ग्रांड अनिकट’ (Grand Anicut) किंवा आजच्या बोली भाषेत ‘कलानाई बांध’ हा तो बांध आहे. गेली अठराशे वर्ष वापरात असलेला..!!
आज कालच्या धरणांना जिथे तीस – पस्तीस वर्षात भेगा पडतात तिथे अठराशे वर्ष सतत एखादे धरण वापरात असणं, हे एक अद्भुत आश्चर्य आहे..!
कावेरी नदीच्या मुख्य पात्रात बांधलेला हा बांध किंवा हे धरण ३२९ मीटर्स लांब आणि २० मीटर्स रुंद आहे. त्रिचीनापल्ली पासून फक्त १५ किलोमीटर्स दूर असलेला हा बांध, कावेरी नदीच्या डेल्टा प्रदेशात उभारलेला आहे. इंग्रजांनी या धरणावर इंग्रजी संस्कार करण्याचा प्रयत्न केला होता. अत्यंत ओबड-धोबड खडकांनी बांधलेले हे धरण बघून असे निश्चित वाटते, की त्या काळात धरणे बांधण्याचे शास्त्र चांगले विकसित झाले असावे. हे धरण प्रायोगिक तत्वावर बांधलेले वाटत नाही, तर कुशल आणि अनुभवी व्यक्तिंनी नदीच्या मुख्य प्रवाहात बांधलेले अनुभव सिध्द धरण वाटते. याचाच अर्थ, आपल्या देशात धरणे बांधण्याचे, म्हणजेच ‘जल व्यवस्थापनाचे’ शास्त्र फार – फार जुने असावे. अर्थात नंतर झालेल्या विदेशी आक्रमणांमुळे ह्या प्राचीन शास्त्राचे पुरावे नष्ट झाले आणि उरले ते इतिहासात डोकावणारे कलानाई धरणांसारखे गवाक्ष..!
जगाच्या इतिहासात बघितलं तर अत्यंत प्राचीन अशी धरणे बांधल्याचे उल्लेख आढळतात. नाईल नदीवर कोशेश येथे इसवी सनाच्या २९०० वर्षे आधी बांधलेले १५ मीटर उंचीचे धरण जगातील सर्वात जुने धरण मानण्यात येते. पण आज ते अस्तित्वात नाही. किंबहुना अर्वाचीन इतिहासकारांनी त्या धारणाला पाहिलेलेच नाही. त्याचे फक्त उल्लेख आढळतात.
इजिप्त मधे इसवी सनापूर्वी २७०० वर्षे च्या सुमाराला नाईल नदीवर बांधलेल्या धरणाचे काही अवशेष आजही बघायला मिळतात. साद-अल-कफारा असं त्याचं नंतर नामकरण करण्यात आलं. कैरो पासून तीस किलोमीटर अंतरावर बांधलेले हे धरण, बांधल्यानंतर काही दिवसातच कोसळले. त्यामुळे पुढे अनेक शतकं इजिप्त च्या लोकांनी धरणे बांधण्याची हिम्मतच केली नाही. चीन मधे ही इसवी सनापूर्वी २२८० वर्षां पूर्वीच्या धरणांचे उल्लेख सापडतात. मात्र प्रत्यक्षात वापरात असलेलं इतकं जुनं एकही धरण जगभरात आढळत नाही.
भारतात मात्र कलानाई धरणाच्या नंतर बांधलेली आणि वापरात असलेली धरणे आढळतात. इसवी सन ५०० ते १३०० मधे दक्षिणेतल्या पल्लव राजांनी बांधलेल्या अनेक मातीच्या धरणांपैकी काही आजही वापरात आहेत. सन १०११ ते १०३७ ह्या काळात तामिळनाडू मधे बांधलेले वीरनाम धरण हे याचे उदाहरण आहे.
जल व्यवस्थापनेच्या संदर्भात बांधलेल्या अनेक रचना आजही अस्तित्वात आहेत. पूर्वी गुजरात ची राजधानी असलेल्या ‘पाटण’ येथे बांधलेली ‘रानी का वाव’ ही विहीर (राजेशाही बारव) आता युनेस्को च्या संरक्षित स्मारकांच्या यादीत गेली आहे. भूगर्भातील पाण्याला नीट खेळवण्याचे आणि साठवण्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. इसवी सन १०२२ ते १०६३ या काळात बांधण्यात आलेली ही सात मजली विहीर आज ही सुस्थितीत आहे. सोळंकी राजवंशाच्या राणी उदयमती यांनी आपले पती भीमदेव यांच्या स्मरणार्थ ही विहीर बांधली होती. म्हणूनच हिचे नाव ‘रानी का वाव’ अर्थात ‘राणीची विहीर’ असे पडले. हाच काळ होता, जेंव्हा सोमनाथ वर महमूद गजनी ने आक्रमण केले होते. विहीर बांधल्यानंतर काही वर्षांनी गुजरात हे पूर्णपणे मुस्लीम शासकांच्या ताब्यात गेलं. त्यामुळे पुढे जवळपास सातशे वर्ष ही राजेशाही विहीर चिखलाच्या गाळात दुर्लक्षित होती..!
अर्थात भूमिगत पाण्याच्या व्यवस्थापनाची माहिती आपल्याला फार पूर्वी पासून होती, हे निश्चित.
पंचमहाभूतांच्या मंदिरां संबंधी याच लेखमालेत, या आधीच्या लेखात, उल्लेख आलेला आहे. त्यातील ‘जल’ संबंधी चे उल्लेख आणि जल व्यवस्थापनाची माहिती फार प्राचीन काळापासून आपल्याला होती याचे अनेक पुरावे आपल्या समोर आहेत. ऋग्वेदात, यजुर्वेदात आपल्याला पाण्याच्या नियोजना संबंधी अनेक सुक्त आढळतात. धुळ्याच्या श्री मुकुंद धाराशिवकरांनी यावर विपुल आणि अभ्यासपूर्ण लेखन केलेलं आहे. त्यांनीच प्राचीन जल व्यवस्थापना संबंधी स्व. गो. ग. जोशी यांचाही उल्लेख केला आहे. तारापूर मधे जेष्ठ अभियंता असलेल्या जोशी यांचा प्राचीन शास्त्रा संबंधी चांगला व्यासंग होता.
स्थापत्यवेद हा अथर्ववेदाचा उपवेद समजला जातो. दुर्दैवाने त्याची एकही प्रत भारतात उपलब्ध नाही. युरोप मधील ग्रंथालयात याच्या काही प्रती आढळतात. यातील परिशिष्टांमधे तडाग विधी (जलाशय निर्मिती) ची संपूर्ण माहिती दिलेली आहे.
मुकुंद धाराशिवकरांनी आणखी एका ग्रंथाचा उल्लेख केलाय, ज्याचे नाव दुर्दैवाने उपलब्ध नाही आणि शेवटचे पान नसल्याने तो कोणी लिहिलाय, हे देखील कळत नाही. “अथ जलाशयो प्रारम्यते…” ह्या ओळीने सुरु होणाऱ्या ह्या ग्रंथात भिंत बांधून जलाशय कसा निर्माण करावा याचे सविस्तर वर्णन आहे. हा ग्रंथ २८०० वर्षांपूर्वीचा आहे.
कृषी पाराशर, कश्यप कृषी सुक्ती, सहाव्या शतकात लिहिलेल्या ‘सहदेव भाळकी’ इत्यादी ग्रंथात पाण्याची साठवण, पाण्याचे वाटप, पावसाचे अनुमान, जलाशय निर्मिती यावर बरीच आणि सविस्तर माहिती आढळते.
नारद शिल्पशास्त्र आणि भृगु शिल्पशास्त्र यात सागरातील किल्ले, नदीतील किल्ले सारख्या विषयांपासून ते पाण्याची साठवण, पाण्याचे वाटप आणि पाण्याचा निचरा यावर सखोल विवेचन आढळते. भृगु शिल्प शास्त्रात पाण्याचे दहा गुणधर्म सांगितले आहेत. मात्र पाराशर मुनींनी पाण्याला एकोणीस गुणधर्म असल्याचे प्रतिपादन केले आहे.
पाण्या संदर्भात वेदांमधे आणि विविध पुराणांमधे अनेक उल्लेख येतात. विशिष्ट परिस्थितीत पाण्याचे नियोजन कसे करावे या बाबत सविस्तर माहिती मिळते.
सन २००७ मधे योजना आयोगाने ‘ग्राउंड वॉटर मेनेजमेंट एंड ओनरशिप’ हा रिपोर्ट तज्ञ लोकांद्वारे लिहून प्रकाशित केला. नेट वर देखील हा उपलब्ध आहे. मोन्टेक सिंह अहलुवालियांची प्रस्तावना ह्या रिपोर्ट ला आहे. या रिपोर्ट च्या सुरुवातीलाच ऋग्वेदातील पाण्या संबंधीची एक ऋचा वापरली आहे. नंतर रिपोर्ट लिहिण्याची सुरुवात करताना प्राचीन भारतीय शास्त्रानुसार जल व्यवस्थापन हे किती शास्त्रशुध्द होतं, याचं विवेचन केलं आहे..!
मात्र जल व्यवस्थापना संबंधी अत्यंत विस्तृत विवेचन केलंय ‘वराहमिहिर’ ने. हा वराहमिहिर दुसरा. पहिला वराहमिहिर ज्योतिष शास्त्रा संबंधी च्या त्याच्या ज्ञाना मुळे ओळखला जातो. मात्र हा दुसरा वराहमिहिर अनेक कलात पारंगत होता. याचे राहणे उज्जैन ला होते. तेंव्हा उज्जैन चे महाराजा होते, ‘सम्राट विक्रमादित्य’. वराहमिहिर ने सन ५०५ च्या सुमारास विविध विषयांवरील अभ्यासाला सुरुवात केली आणि सन ५८७ मधे तो वारला. याचाच अर्थ, जवळपास ऐंशी वर्ष वराहमिहिराने ज्ञानसाधनेत खर्च केले.
वराहमिहिराचे प्रमुख कार्य म्हणजे त्याने लिहिलेला ‘बृहत्संहिता’ नावाचा ज्ञानकोश. या कोशात उदकार्गल (पाण्याची साठवण) नावाचा ५४ क्रमांकाचा अध्याय आहे. १२५ श्लोकांच्या ह्या अध्यायात वराहमिहिरांनी जी माहिती दिली आहे, ती अदभूत आहे, अक्षरशः थक्क करणारी आहे.
भूगर्भामधे पाण्याचा शोध कसा घेता येऊ शकतो, या संबंधी चे श्लोक आहेत, जे आजही आपल्याला चकित करतात. वराहमिहिराने जमिनीच्या आतील पाणी शोधताना मुख्यतः तीन गोष्टींच्या निरीक्षणावर भर दिलेला आहे. यात त्या भागात उपलब्ध असलेली झाडं, झाडांजवळ असलेली वारुळे, त्या वारुळांची दिशा, त्यात राहणारा प्राणी आणि तिथल्या जमिनीचा रंग, पोत आणि तिची चव यांचा समावेश आहे..! या निरीक्षणांच्या आधारे जमिनीच्या आतील पाणी नक्की शोधता येईल असे त्याचे म्हणणे आहे. लक्षात घ्या, दीड हजार वर्षांच्याही आधी, काहीही आधुनिक संसाधने माहीत नसताना, वराहमिहिर हे ठाम प्रतिपादन करतोय..!!
मात्र हे सर्व करताना वराहमिहिराने आजच्या वैज्ञानिकांसारख्या नोंदी करून ठेवल्या, ज्या महत्वपूर्ण आहेत. त्याने पंचावन्न वृक्ष व वनस्पतींचा अभ्यास करून मांडणी केली आहे. त्याच प्रमाणे त्याने मातीचे वर्गीकरण देखील विस्ताराने केले आहे. ह्या सर्व निरीक्षणांचे निकष ही त्याने मांडून ठेवले आहेत. त्यातील काही आहेत –
1. भरपूर फांद्या व तेलकट साल असलेले ठेंगणे झाडं असेल तर पाणी आढळते.
2. उन्हाळ्यात जमिनीतून वाफा येताना दिसल्या तर पृष्ठ्भागाजवळ पाणी असते.
3. झाडाची एकच फांदी जमिनीकडे झुकलेली असेल तर तिच्या खालील भागात पाणी आढळते.
4. जेंव्हा जमीन गरम झालेली असते तेंव्हा एखाद्याच ठिकाणी ती थंड लागली तर तिथे पाणी असते.
5. काटेरी झाडांचे काटे बोथटलेले असतील तर हमखास पाणी मिळते… वगैरे.
अशी अनेक निरीक्षणे त्याने नोंदवलेली आहेत.
खरी गंमत तर पुढेच आहे.
वराहमिहिराचे हे प्रतिपादन खरं की खोटं, हे ठरविण्यासाठी आंध्र प्रदेशातल्या तिरुपती मधल्या श्री वेंकटेश्वर (एस. व्ही.) विद्यापीठाने सुमारे पंधरा – सोळा वर्षांपूर्वी प्रत्यक्ष विहिरी खोदुन पाहायचे ठरविले. वराहमिहिराच्या निरीक्षणानुसार पाणी मिळण्यास योग्य ठरतील अश्या जागा निवडल्या आणि सुमारे ३०० बोअर घेतले. (बोअरवेल खणल्या). आश्चर्य म्हणजे ९५% ठिकाणी पाणी लागले. अर्थात वराहमिहिराचे निरीक्षण योग्य होते हे सिध्द झाले. मात्र पुढे दुर्दैवाने हा प्रकल्प सरकारी लालफिताशाहीत अडकला आणि तो लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही..!
पाण्याच्या व्यवस्थापनाची अनेक उदाहरणं आपल्याला इंग्रजांचे शासन येण्याच्या आधीपर्यंत ठिकठिकाणी दिसतात. अगदी उत्तर पेशवाईत औरंगाबाद ला बांधलेले ‘थत्ते नहर’ असो, की पुण्याला पेशव्यांच्या काळात केलेली पाणी पुरवठ्याची रचना असो. बऱ्हाणपूर ला आजही अस्तित्वात असलेली, पाचशे वर्षांपूर्वीची पाणी वाहून नेण्याची रचना असो की पंढरपूर – अकलूज रस्त्यावरील वेळापूर गावात सातवाहन कालीन बांधलेली बारव असो. ‘समरांगण सूत्रधार’ ह्या ग्रंथाच्या आधाराने राजा भोज ने बांधलेला भोपाळ चा मोठा तलाव असो… अशी कितीतरी उदाहरणं देता येतील.
गढा-मंडला (जबलपुर संभाग) आणि चंद्रपूर या भागात प्राचीन काळापासून गोंडांचं राज्य होतं. अगदी मुगलांना, आदिलशाहीला किंवा कुतुबशाहीला सुध्दा त्यांना जिंकता आलं नव्हतं. मात्र तरीही आपल्या देशात हा प्रदेश म्हणजे मागासलेला मानला गेला. अर्थात खरं चित्र तसं नव्हतं. एक खूप सुरेख हिंदी पुस्तक आहे – ‘गोंड कालीन जल व्यवस्थापन’. यात सुमारे पाचशे ते आठशे वर्षांपूर्वी गोंड साम्राज्यात किती उत्कृष्टपणे पाण्याचं नियोजन केलं होतं याचं वर्णन आहे. या नियोजनाचा फायदा म्हणजे कुठल्याही दुष्काळाची किंवा अवर्षणाची झळ ह्या गोंड प्रदेशाला कधीही लागली नाही.
आमच्या जबलपुर शहरात गोंड राणी दुर्गावती च्या काळात (अर्थात पाचशे वर्षांपूर्वी) ‘बावन ताल आणि बहात्तर तलैय्या’ बांधले गेले (तलैय्या – लहान तलाव). हे तलाव नुसतेच खोदून बांधले गेले नव्हते तर जमिनीच्या ‘कंटूर’ प्रमाणे त्यांची रचना आहे. काही तलाव तर आतून एक-दुसऱ्याशी जोडले गेलेले आहेत. आज त्यातले अनेक बुजले असूनही उरलेल्या तलावांमुळे जबलपुर मधे, अगदी आज ही पाण्याची पातळी बऱ्यापैकी चागली आहे आणि येथे पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत नाही. मग त्या काळात पाण्याची, शेतीची आणि निसर्गाची काय समृध्दी असेल..!!
याचाच अर्थ, पाण्याचे महत्त्व, पाण्याचा शोध आणि पाण्याचे नियोजन याचे संपूर्ण विकसित तंत्रज्ञान आपल्या जवळ होते. काही हजार वर्षांपासून आपण ते प्रभावी पध्दतीने वापरत होतो. आणि म्हणूनच आपला देश खऱ्या अर्थाने सुजलाम – सुफलाम होता..!
मात्र आपल्यापैकी अनेकांच्या मनावर इंग्रजांचे असे जबरदस्त गारुड आहे की अनेकांना आज ही असे वाटते की आपल्या देशात पाण्याचे महत्त्व ओळखले ते इंग्रजांनी. आपल्याला धरणे बांधायला शिकवले ते इंग्रजांनी..!
दुर्दैवाने आपण आपलं प्राचीन जल व्यवस्थापन विसरलो अन आज पाण्यासाठी आपण त्राही-त्राही करतोय, १४४ कलमं लावतोय, युध्द खेळतोय..!!
आपल्यालाच आपल्या समृध्द ज्ञानाचा, वारश्याचा आणि तंत्रज्ञानाचा विसर पडला तर हे असं होणं अटळ आहे..!!
– प्रशांत पोळ
The Velapur tank was not built during the Satavahana period.
LikeLike
Historicity Research Journal Volume 2 | Issue 7 | March 2016 मधे खालील माहिती दिलेली आहे –
“पंढरपूर – अकलूज रस्त्यावर ३० कि..मी. ऄंतरावर वेळापूर हे एक खेडेगाव आहे. या गावाच्या दक्षिण दिशेला अर्धनारी
नटेश्वर मंदिर आहे. तिथेच समोर एक बारव आहे. ही बारव सातवाहन कालीन असावी कारण या मंदिराची रचना ही सातवाहन
कालीन रचना आहे. सदर बारवेची रचना देखील त्याच काळातील आहे अशी आख्यायिका या परीसरातील लोकांमध्ये आहे.”
LikeLiked by 1 person