पंच महाभूतांच्या मंदिरांचे रहस्य !

भारतीय ज्ञानाचा खजिना / १३     

‘भारतीय ज्ञानाचा खजिना’ ह्या लेख मालिकेचा उद्देश हा आपल्या देशात लपलेल्या अनेक अद्भुतरम्य आणि ज्ञानपूर्ण गोष्टींना गोष्टींना लोकांसमोर आणणे हा आहे. या लेखमालेचा प्रत्येक लेख हा प्रिंट मिडिया आणि सोशल मिडिया च्या माध्यमातून अक्षरशः काही लाख लोकांपर्यंत पोहोचतोय. आणि कदाचित म्हणूनच पत्र, फोन आणि सोशल मिडिया च्या माध्यमातून प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय.

पण अश्या अनेक गोष्टी आहेत, ज्या कळल्या तर आपण अक्षरशः थक्क होतो. थिजून जातो. आजही ज्या गोष्टी आपल्याला अशक्य वाटतात, त्या अडीच / तीन हजार वर्षांपूर्वी आपल्या भारतीयांना अश्या काय निर्माण करता आल्या असतील, कश्या काय उभारता आल्या असतील हे प्रश्नचिन्ह मोठं होत जातं.

हिंदू तत्वज्ञानामधे पंच महाभूतांचे विशेष महत्त्व आहे. पाश्चात्य जगताने देखील ह्या संकल्पना मान्य केल्या आहेत. डेन ब्राऊन सारखा लोकप्रिय लेखक सुध्दा या संकल्पनेचा उल्लेख करतो, त्यावर कादंबरी लिहितो.

ही पंच महाभूतं म्हणजे जल, वायू, आकाश पृथ्वी आणि अग्नी. आपलं सारं जीवनचक्र  या पंच महाभूतांच्या आधाराने गुंफलेलं असतं अशी  मान्यता आहे.

आपल्या देशामध्ये या पंच महाभूतांची भव्य आणि वैशिष्ठ्यपूर्ण मंदिरं आहेत हे आपल्यापैकी किती जणांना माहीत असेल ? फार थोड्या लोकांना. त्यातून ते जर शंकराचे उपासक असतील तर हे माहीत असण्याची थोडी तरी शक्यता आहे. कारण ह्या पंच महाभूतांची मंदिरं म्हणजे शिव मंदिरं, भगवान शंकराची मंदिरं आहेत. पण यात काही मोठं वैशिष्ट्य किंवा रहस्य नाही.

मग वैशिष्ट्य कशांत आहे..?

पंच महाभूतांच्या ह्या पाच मंदिरांचं वैशिष्ट्य किंवा रहस्य यात आहे की यातील तीन मंदिरं, जी एकमेकांपासून काही शे किलोमीटर लांब आहेत, ती एका सरळ रेषेत आहेत..!

होय. अक्षरशः एका  सरळ रेषेत आहेत..!!

ती तीन मंदिरं आहेत –

 • श्री कालहस्ती मंदिरपंच महाभूत मंदिर - २
 • श्री एकंबरेश्वर मंदिर, कांचीपुरम
 • श्री तिलई नटराज मंदिर, त्रिचनापल्ली

 

आपण पृथ्वीवर एखादी जागा ठरविण्यासाठी कोआर्डिनेटस चा उपयोग करतो, ज्याला आपण अक्षांश आणि रेखांश म्हणतो. यातील अक्षांश (Lattitude) म्हणजे पृथ्वीवर आडव्या मारलेल्या (काल्पनिक) रेघा. जसं विषुववृत्त, कर्कवृत्त वगैरे. आणि रेखांश (Longitude) म्हणजे उभ्या मारलेल्या (काल्पनिक) रेघा.

या तीन मंदिरांचे अक्षांश – रेखांश आहेत –

क्र. मंदिर अक्षांश रेखांश पंच महाभूत तत्व
श्री कालहस्ती मंदिर 13.76   N

 

79.41  E वायू
श्री एकंबरेश्वर मंदिर 12.50   N

 

79.41  E पृथ्वी
श्री तिलई नटराज मंदिर 11.23   N 79.41  E आकाश

 

 

यातील रेखांश हा तिन्ही मंदिरांसाठी 79.41 E आहे. अर्थात तिन्ही मंदिरं एका सरळ रेषेत आहेत. कालहस्ती आणि एकंबरेश्वर मंदिरांमधील अंतर सव्वाशे किलोमीटर आहे तर एकंबरेश्वर आणि तिलई नटराज मंदिरांमधील अंतर हे पावणे दोनशे किलोमीटर  आहे. ही तिन्ही मंदिरं नक्की केंव्हा बांधली, ते सांगता यायचं नाही. या भूभागावर राज्य केलेल्या पल्लव, चोल इत्यादी राजांनी ह्या मंदिरांचे नूतनीकरण केल्याचे उल्लेख सापडतात. पण किमान तीन हजार वर्षांपेक्षाही जास्त, ही मंदिरं जुनी असतील हे निश्चितपणे म्हणता येईल.

आता इथे खरं आश्चर्य हे आहे, की साधारण तीन हजार वर्षांपूर्वी, इतक्या लांबच्या लांब अंतरावरील ही मंदिरं एकाच उभ्या सरळ रेषेत कशी बांधली असतील..?

याचा अर्थ, त्या काळात नकाशा शास्त्र इतकं प्रगत होतं की अक्षांश – रेखांशांच ज्ञान त्यांना होतं..? पण अक्षांश – रेखांशांचं परिपूर्ण ज्ञान असलं तरी एका सरळ रेषेत मंदिर बांधण्यासाठी नकाशा शास्त्रा बरोबरच कंटूर मेप चं ज्ञान त्यांना आवश्यक होतंच ! की इतर कुठली एखादी पध्दत त्या काळात वापरली गेली, जी आज काळाच्या पडद्याआड गेलेली आहे..?

सारंच अतर्क्य..!

ही गंमत इथेच संपत नाही, तर इतर दोन मंदिरांबरोबर जेंव्हा ह्या एका सरळ रेषेत असलेल्या मंदिरांना जोडलं जातं, तेंव्हा झालेल्या रचनेतून विशिष्ट कोण निर्माण होतात.

याचा अर्थ, त्या काळातली आपल्या वास्तुविशारदांची झेप लक्षात घ्या. जमिनीच्या, काही हजार चौरस किलोमीटर पसरलेल्या भूभागावर ते पंच महाभूतांच्या पाच शैव मंदिरांचा मोठा पट मांडतात. आणि त्या रचनेतून आपल्याला काही सुचवू पाहतात. आपलं दुर्भाग्य की आपण त्यांची ती ज्ञानाची कूट भाषा समजू शकत नाही.

पंच महाभूत मंदिर

या पंच महाभूतांच्या मंदिरांपैकी एक मंदिर आंध्र प्रदेशात आहे, तर उरलेली चार, तामिळनाडू मधे आहेत. यातील वायू तत्वाचं प्रतिनिधित्व करणारं, श्री कालहस्ती मंदिर, हे आंध्र प्रदेशातल्या चितूर जिल्ह्यांत, तिरुपती हून साधारण पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे. स्वर्णमुखी या लहानश्या नदीच्या तीरावर हे मंदिर उभारलेले आहे. हजारों वर्षांपासून ह्याला ‘दक्षिण कैलास’ किंवा ‘दक्षिण काशी’ म्हटले जाते.

कालाहस्ती मंदिर

हे मंदिर अत्यंत प्राचीन असले तरी मंदिराचा आतला गाभाऱ्याचा भाग पाचव्या शतकात तर बाहेरचा, गोपुरांचा भाग हा अकराव्या शतकात बांधलेला आहे. पल्लव, चोल आणि नंतर विजयनगर च्या राजांनी ह्या मंदिराची डागडुजी आणि बांधकाम केल्याचे उल्लेख सापडतात. आदी शंकराचार्य ह्या मंदिरात येऊन गेल्याचे उल्लेख अनेक साहित्यात मिळतात. खुद्द शं‍कराचार्यांच्या ‘शिवानंद लहरी’ मधे ह्या मंदिराचा आणि येथील ‘भक्त कणप्पा’ चा उल्लेख आहे.

हे मंदिर पंच महाभूतांपैकी वायू तत्वाचे प्रतिनिधित्व करते. याचे काही चित्तवेधक संदर्भ मिळतात / दिसतात –

या मंदिरातील शिवलिंग हे पांढरे असून ते स्वयंभू आहे असे मानले जाते. या शिवलिंगाला (हे वायुतत्व असल्यामुळे) कधीही स्पर्श केला जात नाही. मंदिराचे पुजारी सुध्दा ह्या मुख्य लिंगाला कधीच स्पर्श करीत नाहीत. अभिषेकासाठी आणि पूजेसाठी एक वेगळे उत्सव लिंग बाजूला ठेवले आहे. गंमत म्हणजे  ह्या मंदिराच्या गाभार्‍यात एक दिवा सतत जळत असतो आणि तो सतत फडफडत असतो. हे थोडं नीट समजून घेतलं पाहिजे. कारण मंदिराचा गाभारा हा लहान असुन त्याला कोठेही हवा यायला जागा नाही. पुजाऱ्यांनी मुख्य व्दार बंद केलं तरी त्या दिव्याच्या ज्योतीचं फडफडणं चालूच असतं..! कुठलाही वारा नसताना, दिव्याची ज्योत फडफडत राहणं हे कां होतं..? याचं कोणतंही शास्त्रीय कारण आजतागायत मिळू शकलेलं नाही. मात्र येथील शिवलिंग हे वायुतत्व असल्याने दिव्याची ज्योत सतत फडफडत असते, असं येथील लोकांचं म्हणणं आहे !!

या मंदिरापासून साधारण सव्वाशे किलोमीटर दक्षिणेला अगदी सरळ रेषेत पंच महाभूतांपैकी दुसरे मंदिर आहे – श्री एकंबरेश्वराचे मंदिर. तामिळनाडूच्या प्रसिध्द कांचीपुरम मधे हे पृथ्वी तत्वाचे प्रतिनिधित्व करणारे मंदिर आहे.

एकंबरेश्वर मंदिर

पृथ्वी तत्व असल्याने हे शिवलिंग मातीचे बनले आहे. असे मानले जाते की शिवशंकराच्या प्राप्तीसाठी एका आंब्याच्या झाडाखाली, पार्वती ने आराधना केली. आणि ती देखील मातीच्या शिवलिंगाच्या स्वरूपाची. म्हणूनच ह्याला एकंबरेश्वर म्हणतात. तामिळ मधे एकंबरेश्वर म्हणजे आंब्याच्या झाडाचा देव. आजही मंदिराच्या आवारात एक प्राचीन आंब्याचे झाड उभे आहे. कार्बन डेटिंग ने ह्या झाडाचे वय साडे तीन हजार वर्षे निघाले आहे, असे म्हटले जाते. ह्या झाडाला चार वेदांचे प्रतीक समजले जाते. असं म्हणतात, ह्या झाडाला चार वेगवेगळ्या स्वादाचे आंबे लागतात.

हे मंदिर, ‘कांचीपुरम’ ह्या मंदिरांच्या शहरात आहे. कांचीपुरम हे ‘कांजीवरम’ साड्यांसाठी जगप्रसिध्द आहे.

ह्या मंदिरात तामिळ, तेलगु, इंग्रजी आणि हिंदीत एक फलक (बोर्ड) लावलाय की हे मंदिर ३,५०० वर्ष जुनं आहे. नेमकं किती जुनं हे सांगता येणं कठीण आहे. पुढे पाचव्या शतकात पल्लव, नंतर चोल आणि पुढे विजयनगर च्या राजांनी ह्या मंदिराची डागडुजी केल्याचे उल्लेख आढळतात.

ह्या दोन मंदिरांच्याच अगदी सरळ रेषेत, दक्षिण दिशेत, ह्या एकंबरेश्वर मंदिरापासून साधारण पावणे दोनशे किलोमीटर अंतरावर पंच महाभूतांचे तिसरे मंदिर आहे – तिलई  नटराज मंदिर. आकाश तत्वाचे प्रतिनिधित्व करणारे हे मंदिर, तामिळनाडू च्या चिदंबरम या शहरात आहे.

तिलई नटराज मंदिर

खुद्द पतंजली ऋषींनी स्थापन केलेले हे अत्यंत प्राचीन असे मंदिर आहे. नेमके केंव्हा बांधले हे सांगणं कठीण आहे. मात्र पाचव्या / सहाव्या शतकात, पल्लव आणि चोल राजांनी याची डागडुजी आणि काही नवीन बांधकाम केल्याचे उल्लेख आढळतात. ह्या मंदिरात ‘भरत नाट्यम’ च्या १०८ विभिन्न मुद्रा दगडी खांबांवर कोरलेल्या आहेत. याचाच अर्थ, अत्यंत विकसित असं भरत नाट्यम हे नृत्य शास्त्र काही हजार वर्षांपूर्वी सुध्दा अस्तित्वात होतं, हे सिध्द होतं..! मात्र कोठेही खांबांवर, शंकराच्या अनेक मुद्रा कोरल्या असल्या तरी, नटराजाची मूर्ती किंवा मुद्रा कोरलेली नाही. ती मुख्य गर्भगृहात विराजमान आहे.

येथे भगवान शंकर हे नटराजाच्या रुपात असुन सोबत शिवकामी अर्थात पार्वती ची प्रतिमा ही आहे. मात्र नटराजाच्या रूपातील शिवप्रतिमेच्या उजव्या बाजूला थोडी मोकळी जागा आहे, तिला ‘चिदंबरा रहस्यम’ असे म्हटले जाते. या मोकळ्या जागेला सोन्याच्या चकत्यांच्या हारांनी सजवले जाते. येथील मान्यतेनुसार ही मोकळी जागा, मोकळी नसून ते (आकारहीन) आकाशतत्व आहे.

पूजेच्या वेळा सोडून इतर वेळी ही मोकळी जागा लाल पडद्याने आच्छादित असते. पूजेच्या वेळेला हा लाल पडदा बाजूला करून त्या (आकारहीन) शिव तत्वाची अर्थात आकाश तत्वाची पूजा केली  जाते.

अशी मान्यता आहे की येथे शिव आणि कालीमातेच्या स्वरुपात पार्वती, ह्यांनी नृत्य केले होते.

ह्या चिदंबरम पासून साधारण चाळीस किलोमीटर अंतरावर कावेरी नदी समुद्राला जाऊन मिळते. या भागात आठव्या / नवव्या शतकात चोल राजांनी जहाजांसाठी गोदी बांधली होती. ह्या जागेचं नाव आहे – पुम्पुहार. एके काळी हे फार मोठे आणि पूर्व किनाऱ्यावरचे फार प्रसिध्द बंदर होते. आज मात्र ते एक लहानसे गाव राहिले आहे.

या पुम्पुहार मधे काही वर्षांपूर्वी पुरातत्व विभागाने उत्खनन केलं आणि त्यांना अक्षरशः खजिनाच गवसला. सुमारे दोन / अडीच हजार वर्षांपुर्वीचे एक अत्यंत समृध्द आणि विकसित शहर त्यांना सापडले. या नगराचे नियोजन, त्यातील रस्ते, घरं, नाल्या, पाण्याचा निचरा इत्यादी गोष्टी बघून आजही थक्क व्हायला होतं.

एकुणात काय, तर आजपासून किमान दोन / तीन हजार वर्षांपूर्वी ह्या परिसरात एक अत्यंत समृध्द आणि विकसित अशी संस्कृती नांदत होती, ज्या संस्कृतीने पंच महाभूतांच्या पाच मंदिरांचा एक मोठा पट, ह्या विशाल जागेत मांडला होता..!

ह्या तीन मंदिरांनी तयार केलेल्या सरळ रेषेशी विशिष्ट कोण करून उभं आहे, पंच महाभूतांपैकी चौथं मंदिर – जंबुकेश्वर मंदिर. त्रिचनापल्ली जवळ, तिरुवनाइकवल गावात हे मंदिर आहे. पंच महाभूतांपैकी जल तत्वाचे प्रतिनिधित्व करणारे, कावेरी नदीच्या उत्तर किनाऱ्यावर असलेल्या ह्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे शिवलिंगा खाली पाण्याचा लहानसा पण खळाळता झरा आहे. त्यामुळे हे शिवलिंग सतत पाण्यात बुडलेले असते.

जंबुकेश्वर मंदिर

ब्रिटीश काळात फर्ग्युसन ह्या पुरातत्ववेत्त्याने  या मंदिराबाबत बरेच संशोधन केले, जे अनेकांनी प्रमाण मानले. त्याच्या मते चोल वंशाच्या प्रारंभिक काळात या मंदिराचे निर्माण झाले. मात्र त्याची निरीक्षणं चुकीची होती हे आता समोर येतंय. मंदिरात आढळलेल्या एका शिलालेखावरून हे मंदिर इसवी सनापूर्वी काही शे वर्ष अस्तित्वात होते हे सिध्द झालेले आहे.

त्या सरळ रेषेत असलेल्या तीन मंदिरांशी विशिष्ट कोण केलेले, पंच महाभूतांच्या मंदिरांपैकी शेवटचे, मंदिर आहे – अरुणाचलेश्वर मंदिर. तामिळनाडू च्या तिरुअन्नामलई मधे असलेलं हे मंदिर, पंच महाभूतांच्या अग्नी तत्वाचे प्रतिनिधित्व करते. भारतातल्या मोठ्या मंदिरांपैकी हे एक आहे. एका पहाडावर बांधलेले हे मंदिर, विशाल परिसरात पसरलेले आहे. सातशे फुटांपेक्षा जास्त उंच असलेल्या भिंतींच्या आत बांधलेल्या ह्या मंदिराच्या गोपुरांची उंची १४ मजली इमारती च्या बरोबर आहे.

ही पाच शिव मंदिरं आणि त्यांची जमिनीवरची रचना अक्षरशः अद्भुत आहे. यातील तीन मंदिरं एका सरळ रेषेत असणं हा योगायोग असू शकत नाही. अत्यंत विचारपूर्वक, आंध्र आणि तामिळनाडू च्या विस्तीर्ण पटावर बांधलेली ही मंदिरं म्हणजे चमत्कार आहे. त्यांच्या रचनेतून निर्माण होणारी कूट भाषा आपण जर समजू शकलो तर प्राचीन काळातील ज्ञानाची अनेक रहस्यं आपल्यापुढे उलगडू शकतील..!!   

प्रशांत पोळ

Author: प्रशांत पोळ

I am an Engineer by profession. Consultant in Telecom and IT. Interested in Indology, Arts, Literature, Politics and many more. Nationalistic views. Hindutva is my core ideology.

2 thoughts on “पंच महाभूतांच्या मंदिरांचे रहस्य !”

 1. There are many factual errors in this post especially regarding the authorship of the temples and the dates of the temples. I have had a chance to read some of your posts. I have now subscribed to the blog also. Pl do not spread such wrong info regarding the greatness of our country. There are numerous things about which we can really boast but presenting unscientific data makes people not believe the authentic one also.

  Like

  1. Generally WiKipedia is considered as a reference. If the references in WiKi are wrong, people object, there itself.
   Marathi WiKi gives following information –
   पहिला वराहमिहिर हा ज्योतिष विषयक ग्रंथ लेखक होता. त्याने इ.स पूर्व पहिल्या शतकात पंचसिद्धिका या राशिगणितात्मक ग्रंथाचे लेखन केले. दुसरा वराहमिहिर हा उज्जैन येथे वास्तव्यास होता. त्याने इ.स. ५०५ मध्ये अभ्यासाची सुरुवात केली. तो इ.स. ५८७ ला वारला.[१] त्याने बृहत्संहिता या ग्रंथाचे लेखन केले.
   All my statements have references. Please give specifics. I will provide the references. Please do not make generic statements on my articles.

   Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s