हे त्रिपुरांतकारी कैलास राणा, हे मदनांतकारी ब्रम्हांडधीशा,
देवा शिवशंकरा. . .
आज महाशिवरात्र..!
आज जागोजागी तुझे पूजन / अर्चन होतेय.
तुझे भक्त तुला आळवताहेत …
तुझी महती गाताहेत..
दुष्ट / दुर्जनांपासून रक्षण करण्या साठी,
तुला आवाहन करताहेत…
आणि भोळ्या शंकरा..
तू कैलासावर स्वस्थ चित्त आहेस..
माता पार्वती सह सारीपाट मांडून बसलायस.
कां ? देवा, हे असं कां..?
या भक्तांची कणव तुला येत नाहीये ?
की त्यांची प्रार्थना तुझ्यापर्यंत पोहोचतच नाहीये ?
की तांडव करून तू थकला आहेस,
असुरांचा नाश करून दमला आहेस..?
देवा….
अती झालं रे आता…
या देशाच्या शत्रू विरुध्द तर लढू शकतो रे,
पण आतल्या देश बुडव्यांचं काय ?
बौध्दिकतेचा मुखवटा पांघरून
या देशाला अस्थिर करणाऱ्यांचं काय ?
देशावर आक्रमण करणाऱ्यांचं समर्थन करणाऱ्यांचं काय ?
नक्सलवादाने या देवभूमिला पोखरून टाकणाऱ्यांचं काय ?
देशाचे तुकडे करण्याच्या वल्गना करणाऱ्यांचं काय ?
देवा….
उघड तुझे ते ‘तिसरे’ नेत्र
आणि जाळून भस्मसात कर
या सर्व देश पोखरणाऱ्या कीटकांना..!
—- —- —- —-
होय, भक्ता…
आज महाशिवरात्र.
साऱ्या भरतभूमीवर आज माझ्या मंदिरांमध्ये
जल्लोशाने, आनंदाने आणि उत्साहाने
माझा उत्सव चालू आहे.
ह्या पवित्र देशाच्या कानाकोपऱ्यात
भक्त रांगा लाऊन माझ्या मंदिरात येताहेत.
माझी पूजा करताहेत.
मला आळवताहेत..!
पण भक्तांनो,
मी येण्याची वाट कां पाहताहेत तुम्ही..?
माझी पूजा करा, येथ पर्यंत ठीक.
पण त्या पूजेच्या, त्या भक्तीच्या, त्या नैवेद्याच्या
मोबदल्यात,
मी स्वतः येऊन
तुमच्या देशद्रोह्यांना शासन करावं
हे जरा जास्तच होतंय..
अरे देवावर सर्व हवाला टाकून
तुम्ही भक्त गपचीप बसाल काय ?
तुमच्याच भाषेत सांगतो –
‘आम्ही देवांनी काय ठेका घेतलाय
देशद्रोह्यांचा निःपात करण्याचा ?
तुम्ही काहीही न करता
फक्त आम्हाला आळवायचं..
आणि आम्ही
‘कॉन्ट्रैक्ट किलर’ प्रमाणे शत्रूंचा नायनाट करायचा..
हे आता चालणार नाही..!
लक्षात घ्या,
रावण माझा भक्त होता.
तो आसुरी प्रवृत्ती चा होता. दानव होता.
पण म्हणून फक्त माझी पूजा करून
थांबला नाही. लढला.
आणि त्याहूनही मोठं म्हणजे श्रीराम.
अरे, राम तर आम्हा देवांचे अंशच.
माझे परम भक्त.
पण म्हणून फक्त मला आळवून ते थांबले नाहीत.
त्यांनी सामान्य जनांना एकत्र केलं.
वनात राहणाऱ्या नरांना, वानरांना,
संगठीत केलं.
त्यांच्यात देवत्व निर्माण केलं.
आणि कोणत्याही चमत्काराशिवाय
रावणा सारख्या
महाबलाढ्य दानवाला परास्त केलं.
तसंच तुम्हीही करा..
त्या देशबुडव्या लोकांविरुध्द
सामान्य माणसांना संगठीत करा.
भक्तांनो,
तुम्हीच तर म्हटलं न त्यांना कीटक..?
त्या देश विघातक लोकांची लायकीच ती आहे.
या देवभूमिचे तुकडे करण्याची स्वप्नं बघताहेत ती.
ती सर्व माणसं या देशातून समूळ उखडल्या जातील.
गरज आहे,
तुम्ही संगठीत स्वरूपात
त्यांच्या विरुध्द लढा उभारण्याची.
तेंव्हा उठा…
लाज, भीड, संकोच..
सारं सोडा..
आणि या
देश बुडव्या, देश तोडणाऱ्या शक्तींविरुद्ध
मिळेल तिथे, मिळेल त्या मंचावर,
मिळेल त्या मार्गाने..
उच्च स्वरात
त्यांचा निषेध करा…
त्यांचे देशद्रोही चाळे लोकांसमोर आणा.
अरे, जरा त्या
अनुपम खेर सारखी हिम्मत दाखवा.
ही शिवशक्ती तुमच्याच मागे आहे…
हा शिवशंभो तुमच्याच बाजूने आहे..!
तेंव्हा..
उठा.. चला..!!
-प्रशांत पोळ