भारताच्या प्राचीन कला – २   

भारतीय ज्ञानाचा खजिना  

प्रशांत पोळ

छत्तीसगढ ला आपण ओळखतो ते नक्षलवादाने ग्रस्त असलेला एक अशांत प्रदेश म्हणून. पण छत्तीसगढ चे हे चित्र खरे नाही. नक्षलवादा शिवाय बऱ्याच गोष्टी या प्रदेशात आहेत, ज्या छत्तीसगढ ला संपन्न करून गेल्या आहेत. प्राचीन काळातील अनेक अवशेष येथे आढळतात. दुर्गम भाग असल्याने मुसलमानी आक्रमणाच्या काळात ह्या प्रांतात विध्वंस तुलनेने कमी झाला. आणि म्हणुनच काही महत्वाच्या जागा ह्या शिल्लक राहिल्या.

अश्या जागांपैकी एक आहे सीता बेंगारा गुफा. छत्तीसगढ ची राजधानी असलेल्या रायपुर पासून २८० कि. मी. अंतरावर असलेल्या, सरगुजा जिल्ह्यातील रामगढ गावाजवळ ही गुफा आहे. हा संपूर्ण पर्वतीय भाग आहे. मात्र रामगढ पर्यंतचा रस्ता हा बिलासपुर – अंबिकापुर मार्गावर असल्याने चांगला आहे.

इतकं विशेषत्वानं उल्लेख केलेल्या ह्या गुहेचं वैशिष्ट्य काय..?

ही गुहा, म्हणजे आशिया खंडातील (आणि कदाचित जगातील) पहिले ज्ञात नाट्यगृह आहे..!!

सीता बेंगारा

ह्या गुहेतील भित्ती चित्रांच्या आधारे ह्या गुहेचा वापरात असण्याचा कालखंड हा इसवी सनापूर्वी दोनशे ते तीनशे वर्षे असा केला जातो. ह्या गुहेत तीन कक्ष आहेत, त्यातील एक मोठा आहे. हा मोठा असलेला कक्ष म्हणजेच पन्नास ते साठ दर्शकांच्या बसण्याची जागा आणि रंगमंच आहे. अशी मान्यता आहे की कवी कालिदासाने ‘मेघदूत’ ह्या महाकाव्याची रचना येथे बसुनच केली होती.

मात्र आपलं दुर्दैव, की सामान्य माणुस तर सोडाच, पण कलेच्या क्षेत्रात मुक्त विचरण करणाऱ्या आणि वेळोवेळी ग्रीक, रोमन, फ्रेंच आणि ब्रिटीश रंगभूमी चे दाखले देणाऱ्या कलावंतांनाही ही गुफा माहीत नाही..!

ह्या गुहेचा मुख्य कक्ष ४४ फूट लांब आणि २० फूट रुंद आहे. भिंती सरळ आहेत तर प्रवेशद्वार गोल आकारात आहे. पूर्णपणे बंदिस्त असलेल्या ह्या गुहेत प्रतिध्वनी नष्ट (suppress) करण्यासाठी काही ठिकाणी भिंतींना भोकं केलेली आहेत. गुहेचा अर्धा भाग हा रंगमंचा सारखा, तर उरलेला अर्धा हा प्रेक्षक दीर्घा आहे. येथे रंगमंचाचा भाग हा खाली आणि गुहेतला अर्धगोलाकार भाग हा कापून त्याला पायऱ्या च्या स्वरूपात तयार केलेले आहे. हीच ती दर्शक दीर्घा.

सीता बेन्गारा आणि जोगीमार गुफा

ह्या गुहेत ब्राम्ही लिपीत लिहिलेला आणि पाली भाषेत असलेला एक शिलालेख आढळला आहे. त्यावरील मजकुराचा आशय आहे –

“हृदयाला देदीप्यमान करतात, स्वभावाने महान असलेले कविगण

रात्री, वासंती हून दूर

हास्य आणि विनोदात स्वतः ला हरवून

ते चमेलीच्या फुलांच्या माळेचं आलिंगन करतात..”

ही सीता बेंगरा गुफा ज्या रामगढ गावाजवळ आहे, तिथेच काही अंतरावर जोगीमारा गुफा सुध्दा आहे. या गुहेत इसवी सनापूर्वी तीनशे वर्षे काढलेली काही रंगीत भित्तीचित्रे आहेत, जी वेगवेगळ्या कलांची अभिव्यक्ती दाखवतात.

जोगीमार -२

यात एक नृत्यांगना बसलेली आहे, जी गायक आणि नर्तकांच्या गर्दीने वेढलेली आहे. याशिवाय नाट्यगृह आणि मनुष्यांच्या आकृत्या ही रेखाटलेल्या दिसतात. डॉ. टी. ब्लॉख ह्या जर्मन पुरातत्ववेत्त्याच्या अनुसार ही भित्तीचित्रे सम्राट अशोकाच्या काळातली आहेत. अर्थात अजिंठ्याच्या आधी काढलेली..!

एकुणात काय, तर रामगढ च्या क्षेत्रात असलेल्या सीता बेंगारा आणि जोगीमार ह्या गुहा तत्कालीन कलेचं केंद्र असाव्यात. सीता बेंगारा ही नाट्यगृहाच्या रुपात विकसित असलेली गुहा असावी. मात्र काही लोकांना हे मान्य नाही. त्यांच्या मते सीता बेंगारा हे कलेचं केंद्र असेलंही. पण ते नाट्यगृह नव्हतं. कां..? तर भरत मुनींनी त्यांच्या नाट्यशास्त्र ह्या ग्रंथात ‘नाट्यगृहाची’ जी मापं दिलेली आहेत, त्यानुसार या गुहेची रचना नाही म्हणून..!!

पण येथे हे लक्षात घेतले पाहिजे की भरत मुनींचा काळ हा त्याच सुमारास चा आहे. त्यामुळे भरत मुनींच्या नाट्यशास्त्रा प्रमाणे ह्या गुहेची रचना होणे शक्य नाही. आणि खाली रंगमंच व अर्धचंद्राकृती उभ्या पायऱ्यांवर बसलेले दर्शक, हीच रचना ग्रीक रंगमंचाची ही आहे.

याचा अर्थ असा की आपल्या देशात भरत मुनींच्या नाट्यशास्त्रा पुर्वी ही नाट्य आणि इतर कलांचे वास्तव्य होते. म्हणजेच भरत मुनी नाट्यशास्त्राची नवीन व्याख्या करत नाहीत, तर आधीच असलेल्या कलेच्या ह्या प्रांताला व्यवस्थितपणे, सुसूत्रपणे आपल्यासमोर ठेवताहेत. याचाच अर्थ, आपल्या देशात प्रगल्भ अशी नाट्यकला ही तीन हजार वर्षांपेक्षाही जास्त प्राचीन आहे.

आणि भरत मुनींच्या नाट्यशास्त्राचं हेच मोठं वैशिष्ट्य आहे. त्यांनी नाट्यकलेचं भारतात असलेलं अस्तित्व व्यवस्थित पणे मांडलं आणि जगानं ही ते मान्य केलं.

जोगीमार

जगात नाट्यकलेविषयी प्राचीन प्रवाह दोनच आढळतात. ग्रीक ची रंगभूमी आणि आपल्या भारतातली रंगभूमी. ग्रीक वर परकीय आक्रमणं फारशी झाली नाहीत. त्यामुळे तेथील रंगभूमीचे प्राचीन अवशेष आजही आपल्याला बघायला मिळतात.

इसवी सनापूर्वी पाचव्या शतकात ग्रीक रंगभूमीचे उल्लेख मिळतात. त्या काळात बांधलेले भव्य नाट्यगृह आजही अस्तित्वात आहे. ग्रीक वास्तुकारांनी डोंगराच्या उताराचा फायदा घेऊन टप्पे निर्माण केले व प्रेक्षकांच्या बसण्याची सोय केली. ‘एपिडोरस’ या एम्फी थिएटर मधे अश्या टप्प्यांवर सहा हजार लोकांच्या बसण्याची सोय होती (मराठी विश्वकोश).

ग्रीक व रोमन रंगमंडलात वाद्यवृन्दांसाठी मध्यवर्ती मोठी वर्तुळाकृती जागा पायऱ्यांच्या तळाशी योजण्यात येत असे. सरगुजा जिल्ह्यातील रामगढ मधे आढळलेल्या सीता बेंगरा गुफेत ही अशीच रचना आढळते.

मग प्रश्न असा पडतो की इसवी सनापूर्वी ४०० ते ५०० वर्षांपूर्वी ग्रीस मधे बांधलेल्या नाट्यगृहासारखीच रचना, फक्त पुढच्या शंभर / दोनशे वर्षांत भारतातल्या अगदी आतल्या बाजूस असलेल्या डोंगराळ आणि दुर्गम प्रदेशात कशी निर्माण झाली..?

म्हणजे भारतीय रंगमंचा विषयीच्या माहितीच्या आधारे ग्रीकांनी आपली रंगभूमी उभारली की त्याच्या अगदी उलट घडले..?

इसवी सनापूर्वी ३३३ व्या वर्षी ग्रीस च्या मॅसेडोनियाचा राजा अलेक्झांडर हा मरण पावला. तो भारतात येण्यापुर्वीच भारत आणि ग्रीस यांच्यात बरेच संबंध होते असं आता सिध्द होतंय. मीना प्रभू या लेखिकेनं जगभर प्रवास केलाय अन त्याची फार सुंदर वर्णनं त्यांच्या पुस्तकात करून ठेवली आहेत. त्यातीलच एक पुस्तक आहे – ‘ग्रीकांजली’. त्यांच्या तीन आठवड्याच्या ग्रीस प्रवासाचं. त्यात त्यांनी लिहिलंय की ज्या घरात त्या काही दिवस ‘गेस्ट’ म्हणून राहिल्या, त्या घराचा कुटुंब प्रमुखच पुरातत्ववेत्ता आणि भारताची बरीच माहिती असलेला होता. त्याने मीना प्रभूंना सांगितले की ग्रीस ने भारताकडून बरेच काही घेतलंय. अनेक प्राचीन ग्रीक विद्वानांना संस्कृत भाषा येत होती. इतकेच नाही, तर ग्रीक भाषेतील अनेक शब्द संस्कृत मधून आले आहेत. मीना प्रभूंनी त्या शब्दांची  यादीच दिलीय.

गंमत म्हणजे, ग्रीक भाषेमधे ‘शब्दाला’ समानार्थी शब्द आहे – ‘अब्द’. तो ऐकून मीना प्रभूंना मर्ढेकरांची कविता आठवते

किती पाय लागु तुझ्या

किती आठवू गा तूंते,

किती शब्द बनवू गां

अब्द अब्द मनी येते..!

थोडक्यात काय, तर संस्कृत भाषेप्रमाणेच नाट्यकले सारख्या इतरही गोष्टी ग्रीस मधे गेल्या असतील हे मानायला बरीच जागा आहे.

मात्र ही तुलना क्षणभरासाठी बाजूला जरी ठेवली, तरी आपल्या देशात हजारो वर्षांपूर्वी एक समृध्द संस्कृती नांदत होती, ज्यात गायन, वादन, नाट्य सारख्या कलाप्रकारांना महत्त्व होतं. नाट्यशास्त्राची बीजं ही ऋग्वेदात आणि सामवेदात आहेत, हे आपण मागच्या लेखात बघितलंच आहे. इसवी सनापूर्वी पाचशे वर्षांपूर्वीच्या काळात पाणिनी ने संस्कृत चे व्याकरण लिहिले. त्यात ही नाट्यशास्त्रा संबंधी उल्लेख मिळतात. यात शिलाली आणि कृशाश्व ह्या दोन नट सूत्रधारांचा उल्लेख प्रामुख्याने येतो. यातील शिलाली चा उल्लेख यजुर्वेदीय शतपथ ब्राम्हण आणि सामवेदीय अनुपद सूत्रांत मिळतो. या विषयातील तज्ञांनी ज्योतिषीय गणनेनुसार शतपथ ब्राम्हणांना चार हजार वर्षांपेक्षाही प्राचीन म्हटले आहे.

अत्यंत प्राचीन मानल्या गेलेल्या अग्निपुराणात ही नाटकांची लक्षणे वगैरे विस्ताराने दिलेली आहेत. मंगलाचरण, पूर्वरंग सारखे, नाटकांच्या रचनेतील भाग, यांचा विशेषत्वाने उल्लेख होतो. या सर्व पुराव्यांवरून, विल्सन सारख्या पाश्चात्य पुरातत्ववेत्त्यांनी हे कबुल केले आहे की भारतीय नाट्यकला ही बाहेरून आलेली नाही, तर मुळात इथेच विकसित झालेली आहे.

एक गोष्ट मात्र नक्कीच, की भरत मुनींनी नाट्यशास्त्र हा ग्रंथ लिहून भारतीय नाट्यकलेला एक सुव्यवस्थित आकार दिला. संगीत, अभिनय आणि नाटक यांचे परिपूर्ण विवेचन करणारा हा ग्रंथ इसवी सनापूर्वी साधारण ३०० ते ४०० वर्षांपूर्वी लिहिला गेला असावा. काहींच्या मते ह्या ग्रंथात ३७ अध्याय होते. आज मात्र उपलब्ध असलेल्या ग्रंथात ३६ अध्याय आढळतात.

या ग्रंथात भरत मुनींनी नाट्यशास्त्राची जी खोलात जाऊन चिकित्सा केलीय, ती बघून अक्षरशः थक्क व्हायला होतं. गंमत म्हणजे आपण नाटकांच्या लांबीसाठी दोन अंकी, तीन अंकी नाटक असे जे शब्द वापरतो, त्यातील ‘अंक’ हा शब्द याचं अर्थाने भरत मुनीही वापरतात. मात्र त्यांना त्याचा अर्थ माहीत नाही, कारण भरत मुनींच्या मते ‘अंक’ हा शब्द पूर्वीपासून चालत आलेला (रूढीबध्द) आहे. म्हणून त्यांनीही तो तसाच वापरला आहे. याचाच अर्थ, भारतीय नाट्यशास्त्र हा प्रकार, भरत मुनींच्याही कितीतरी आधीपासून चालत आलेला आहे.

नाटकातील पात्रे, सूत्रधार, नायक, नायिका, पीठमर्द (नायकाचा साथीदार, जो त्याची काळजी घेतो), वीट (धूर्त नागरिक), चेट, विदुषक इत्यादी अनेक पात्रांबद्दल भरत मुनींनी विस्ताराने लिहिले आहे. नाटकाची रचना किंवा आकृतिबंध तयार करताना भरत मुनींनी पाच अर्थप्रकृती दाखविल्या आहेत – बीज, बिंदू, पताका, प्रकरी आणि कार्य. याच प्रमाणे नाटकाच्या पाच अवस्था, पाच संधी यांचेही विस्तृत विवरण आहे.

भरत मुनींनी ज्याचा उल्लेख केला आहे, असे पहिले नाटक म्हणजे ‘समवकार अमृतमंथन’.

‘भास’ हा नाटककार, भरत मुनींच्या समकालीन किंवा शंभर वर्षे नंतर चा. भास हा कवी होता, पण त्याही पेक्षा जास्त नाटककार होता. पुढे प्रसिध्द झालेल्या कालिदासाने आणि बाणभट्टाने ही भास च्या नाटकांची प्रशंसा केलेली आढळते.

भासाचा उल्लेख जरी अनेक ठिकाणी होत असला, तरी भासाने लिहिलेली नाटके ही काळाच्या उदरात गडप झालेली होती. पुढे सन १९१२ मधे त्रावणकोर संस्थानातील एका मठात, ताडपत्रांवर मल्याळी लिपीत लिहिलेली भासाची संस्कृत नाटके, टी. गणपती शास्त्री ह्या संशोधकाला मिळाली. मिळालेल्या नाटकांची संख्या तेरा आहे. मात्र भासांनी याहूनही अधिक नाटकं लिहिली असावीत हे उपलब्ध उल्लेखांवरून समजतं. कृष्णाजी लक्ष्मण सोमण ह्यांनी भासाची ही नाटकं १९३१ साली पहिल्यांदा मराठीत आणली. आज रंगमंचावर  असणारं ‘प्रिया बावरी’ हे नाटक महाकवी भास रचित ‘मध्यमाव्यायोग’ या संस्कृत नाटकावर आधारलेले  आहे.

थोडक्यात काय, तर भारतीय नाट्यकलेला अत्यंत पुरातन, प्राचीन अशी वैभवशाली परंपरा आहे. जगातील पहिले नाटक भारतीय भाषात लिहिले गेले असावे ह्याचे पुरावे मिळताहेत. मात्र आपलं दुर्दैव असं की आजही नाट्य व्यवसायात असलेली तथाकथित बुध्दीजीवी मंडळी ग्रीक, इटालियन, फ्रेंच आणि इंग्रजी नाटकांचेच संदर्भ तोंडावर फेकतात. आजही सांत्र, शेक्सपिअर, शा, इब्सन, चेखोव्ह यांनाच नाट्य कलेतील आदर्श मानले जाते. ही सर्व मंडळी आहेतही तशी उत्तुंग. पण म्हणून कालातीत प्रतिभा असणाऱ्या भरतमुनि, भास, कालिदास, बाणभट्ट यांची उपेक्षा कां..?

नाट्यकलेचा तेजस्वी वारसा आम्ही बाळगतोय, ही जाणीव जरी आपल्याला झाली तरी पुष्कळ आहे..!

प्रशांत पोळ

Author: प्रशांत पोळ

I am an Engineer by profession. Consultant in Telecom and IT. Interested in Indology, Arts, Literature, Politics and many more. Nationalistic views. Hindutva is my core ideology.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s