भारतीय स्थापत्य शास्त्र – १

प्रशांत पोळ

जगातलं सर्वात मोठं पूजा स्थल कोणतं, असा प्रश्न विचारला की साधारण पणे त्याचं उत्तर हे व्हेटिकन सिटी मधलं एखादं चर्च / बेसिलिका किंवा स्पेन मधलं चर्च किंवा मस्कत ची मशीद वा मक्का या सारखी उत्तरं समोर येतात. पण जगातलं सर्वात मोठं पूजा स्थल हे हिंदुंचं मंदिर आहे हे अनेकांना माहीत नसतं. आणि हे मंदिर भारताबाहेरचं आहे ही माहिती तर बहुतेकांना नसतेच..!

कंबोडिया च्या उत्तर-पश्चिम सीमेवर असलेलं ‘अंगकोर वाट’ हे मंदिर म्हणजे जगातील सर्वात मोठे पूजा स्थल आहे. दक्षिण पूर्व आशियात ‘वाट’ चा अर्थ ‘मंदिर’ होतो. कित्येक मैल पसरलेल्या ह्या मंदिरात बांधलेली एक भिंतच मुळी साडे तीन किलोमीटर लांब आहे. मेरू पर्वताच्या प्रतिकृती प्रमाणे बनविलेल्या ह्या मंदिराच्या बांधकामाची लांबी-रुंदी दीड किलोमीटर बाय दीड किलोमीटर आहे. ह्या मंदिराचा एकूण परिसर चारशे चौरस किलोमीटर पसरलेला आहे.

अंगकोर वाट - ३

ह्या मंदिराचं महत्त्व किती आहे ? तर कंबोडियाच्या राष्ट्रध्वजात ह्या हिंदू मंदिराला जागा दिलेली आहे. हे मंदिर आपल्या देशाच्या हद्दीत रहावं म्हणून काही वर्षांपूर्वी कंबोडिया आणि थायलंड ह्या देशांमध्ये भलं मोठं युध्द भडकणार होतं. युनेस्को ने ह्या मंदिराचा ‘जागतिक वारश्यांच्या यादीत’ समावेश केलेला आहे. आणि जगभरातल्या पर्यटकांच्या दृष्टीने हे अत्यंत महत्वाचं आणि प्रेक्षणीय स्थळ आहे.

अंगकोर वाट - २इसवी सन अकराशे च्या प्रारंभी च्या काळात ह्या मंदिराचे निर्माण झाले आणि अकराशे च्या मध्यावर ते पूर्ण झाले. त्या काळात हा प्रदेश ‘कंबोज प्रांत’ म्हणून ओळखला जात होता. जावा, सुमात्रा, मलाय, सुवर्णव्दीप, सिंहपुर हा संपूर्ण प्रदेश हिंदू संस्कृतीच्या प्रभावाखाली होता. कंबोज चा तत्कालीन राजा सुर्यवर्मा (व्दितीय) ने ह्या विष्णु मंदिराचे निर्माण केले. मुळात हे एक मंदिर नाही तर हा मंदिरांचा समुच्चय आहे. संस्कृत मधे ‘अंगकोर’ चा अर्थ होतो – मंदिरांची नगरी. मंदिरांचा भव्य परिसर एका चौकोनी कालव्यामुळे किंवा खंदकामुळे सुरक्षित राहील अशी रचना केलेली आहे. ह्या खंदका वरचा पूल पार करून आपण मंदिरात प्रवेश करू लागलो की एका एक हजार फुट रुंदीच्या, अक्षरशः भव्य-दिव्य अश्या प्रवेशव्दाराने आपले स्वागत होते. ह्या मंदिरांच्या भिंतींवर रामायणातले प्रसंग कोरून ठेवलेले आहेत. समुद्र मंथनाचे अद्भुत दृश्य अनेक मूर्तींच्या मदतीने साकारलेले आहे. अंगकोर चे जुने नाव यशोधपूर होते. नंतर मात्र ह्या विशाल मंदिरांमुळे ते अंगकोर झाले.

ह्या मंदिराचे स्थापत्य शास्त्र आणि संपूर्ण मंदिर परिसराची रचना बघून मन थक्क होतं. सुमारे ९०० ते १,००० वर्षांपूर्वी इतके अचूक बांधकाम करणे त्या काळच्या हिंदू स्थापत्यकारांना कसे शक्य झाले असेल..? ह्या मंदिराची केंद्रीय संरचना बघून हे अनुमान निश्चित काढता येतं की त्या काळी मंदिर बांधण्यापूर्वी, ह्या मंदिर परिसराचे नकाशे काढल्या गेले असतील. त्यात ‘सिमेट्री’ साधल्या गेली असेल. अन त्याप्रमाणेच नंतर निर्माण कार्य झाले असेल. इजिप्त आणि मेक्सिको च्या स्टेप-पिरामिड प्रमाणे ही मंदिरं, जिन्यांच्या पायऱ्यांवर उठत गेली आहेत. ह्या मंदिरांवर पूर्णपणे चोल आणि गुप्त कालीन स्थापत्य शास्त्राचा प्रभाव जाणवतो. विशेषतः रामायणाचे प्रसंग ज्या नजाकतीनं दाखविले आहेत, ते बघून आपल्याला आश्चर्याचे धक्के बसत राहतात.

दुर्दैवाचा भाग इतकाच की ज्या देशाच्या राष्ट्रध्वजात जगातले सर्वात मोठे हिंदू मंदिर आहे, त्या देशाशी भारताने आजवर कसे संबंध ठेवले ? तर अगदीच कोरडे. हे जगप्रसिध्द मंदिर बघायला जगाच्या कानाकोपऱ्यातुन पर्यटक येतात. पण त्यात भारतीय पर्यटकांची संख्या अक्षरशः नगण्य असते.

पण मूळ मुद्दा तसाच राहतो, तो असा की भारतीय (किंवा त्या काळात म्हटल्या गेल्या प्रमाणे हिंदू) स्थापत्य शास्त्राची ही कमाल भारताबाहेर प्रकटली तरी तिचे मूळ किती जुने आहे ? म्हणजे स्थापत्य शास्त्रात आपण भारतीय किती काळापासून पुढारलेले आहोत ?

भारतातील अनेक देवळे विदेशी आक्रमकांनी आणि विशेषतः मुस्लीम आक्रमकांनी नष्ट केली. त्यामुळे दोन / तीन हजार वर्षांपूर्वीची स्थापत्य कला आपल्याकडे दिसणं हे तसे दुर्मिळच. मात्र त्या कलेचे अंश झिरपत आलेले आहेत. त्यामुळे अगदी हजार / दीड हजार वर्षांपूर्वी बांधलेल्या देवळांमध्ये ही स्थापत्य शास्त्राचे अद्भुत चमत्कार दिसतात. विजयनगर साम्राज्याची राजधानी ‘हम्पी’ ला होती. या साम्राज्याला तीन मुसलमान पाताशाह्यांनी मिळून पराभूत केल्या नंतर त्या सर्वांनी ह्या समृध्द हिंदू साम्राज्याला मनसोक्त लुटले. अनेक मंदिरं फोडली, नष्ट केली. मात्र जी काही उरली ती आजही स्थापत्य शास्त्राच्या अद्भुत प्रगती च्या खुणा मिरवताहेत. हम्पीच्या एका मंदिरात प्रत्येक खांबामधून संगीताचे सा, रे, ग, म . . . असे वेगवेगळे सप्तसूर निघतात. हे त्यांनी कसं केलं असेल ? या संबंधी काहीही लिहून ठेवलेलं नाही. असेल तरी ते आक्रमकांनी नष्ट केलंय. इंग्रजांनी ह्या स्थापत्य चमत्काराचे गूढ शोधण्यासाठी त्या संगीतमय सुरावटीतला एक खांब कापला (त्याचा क्रॉस सेक्शन घेतला). तो खांब पूर्ण भरीव निघाला..! त्याला बघून इंग्रजांचं ही डोकं चालेना. अगदी एकसारख्या दिसणाऱ्या खांबांमधून संगीताचे वेगवेगळे सूर कसे उमटत असतील ? जगाच्या पाठीवर भारत सोडून इतरत्र कोठेही ही अशी खांबांमधून उमटणाऱ्या स्वरांची गंमत आढळत नाही.

फक्त इतकंच नाही तर भारतातलं एकेक मंदिर म्हणजे स्थापत्य शास्त्राचं एक एक बुलंद उदाहरण आहे. ह्या मंदिरांचा वास्तुविशारद कोण, बांधकाम प्रमुख कोण होता, ही मंदिरं कशी बांधली, ह्या सर्वांबद्दल काही म्हणता काहीही माहिती मिळत नाही.

मंदिरातील स्थापत्य शास्त्राविषयी आणि त्यातील विज्ञाना विषयी तसं अनेकांनी लिहिलंय. पण पुण्याच्या श्री मोरेश्वर कुंटे आणि सौ विजया कुंटे ह्या दम्पत्तीने दुचाकीवर फिरत महाराष्ट्राच्या अनेक दुर्लक्षित आणि उपेक्षित मंदिरांमधील ‘स्थापत्य शास्त्राचा चमत्कार आणि विज्ञानाचे अधिष्ठान’ उजेडात आणले आहे. ग्रीनविच ही पृथ्वीची मध्य रेषा आहे असे इंग्रजांनी ठरविण्याच्या बरेच आधी भारतीयांनी पृथ्वीचे अक्षांश / रेखांश आणि मध्य रेषा यांची व्यवस्थित कल्पना केलेली होती. ती मध्यरेषा तेंव्हाच्या ‘वत्सगुल्म’ (म्हणजे आताच्या वाशीम) मधील मध्येश्वर मंदिरातील शंकराच्या पिंडीतून जात होती हे कुंटे यांनी उजेडात आणलंय. हीच रेषा पुढे उज्जयिनीत जात होती, जिथे मोठी वेधशाळा बांधण्यात आली. आजही उज्जैन आणि वाशीम हे एका सरळ रेषेत येतात. कोल्हापुर च्या अंबाबाईच्या मंदिरात विशिष्ट दिवशी सूर्याच्या किरणांचा प्रकाश सरळ देवीच्या मूर्तीवर पडतो हे ही ह्या स्थापत्य शास्त्राच्या परफेक्शन चं उदाहरण.

स्थापत्य शास्त्रात आपण किती पुढारलेले होतो ? तर ज्या काळात कंम्बोडीयात अंगकोर मंदिर बांधलं जात होतं, त्याच काळात चीन च्या बीजिंग ह्या राजधानी ची नगररचना एक हिंदू स्थापत्य शास्त्री करत होता..! होय. बीजिंग शहराचं आर्किटेक्ट हे एका हिंदू माणसाचं आहे. त्याचं नाव बलबाहू. सध्या नेपाळ मधे असणाऱ्या पाटण चा हा रहिवासी.

पाटण हे कांस्य आणि इतर धातूंच्या ओतकामाबद्दल प्रसिध्द होतं. या शहरातील लोकांनी घडविलेल्या बुध्द आणि हिंदू मूर्तींना तिबेट आणि चीन मधे मागणी होती. बाराव्या शतकाच्या मध्यावर चीनी राजाने केलेल्या मदतीच्या विनंतीला मान देऊन पाटण मधील ऐंशी कुशल कामगार चीन कडे निघाले. त्यांचं नेतृत्व करत होता, बलबाहू, जो तेंव्हा फक्त १७ वर्षांचा होता.

बलबाहू - आर्निको

पुढे चीन मधे बलबाहू चे आरेखन आणि बांधणीतले कौशल्य बघून चीन च्या राजाने त्याला बीजिंग शहराची रचना करण्याचे काम दिले. बलबाहू ने ते सफलतापूर्वक करून दाखवले. चीनी संस्कृती चे प्रतीक समजल्या जाणाऱ्या, उतरत्या टोकदार, डौलदार व एकाखाली एक छपरांची परंपरा बलबाहुनेच सुरु केली. चीन मधे बलबाहू, ‘आर्निको’ नावाने ओळखला जातो. चीनी शासनाने १ मे सन २००२ मधे बलबाहू (आर्निको) च्या नगर रचने मधील योगदानाबद्दल कृतज्ञता म्हणून बीजिंग मधे त्याचा मोठा पुतळा उभारलाय.

एकेकाळी जगात स्थापत्य शास्त्रात कुशल आणि पारंगत म्हणून ओळखले जाणारे आपण, आज पश्चिमेच्या स्थापत्य शास्त्राची आंधळी नक्कल करत असतो, तेंव्हा आपल्याच अज्ञानाची कीव येते..!!

प्रशांत पोळ

Author: प्रशांत पोळ

I am an Engineer by profession. Consultant in Telecom and IT. Interested in Indology, Arts, Literature, Politics and many more. Nationalistic views. Hindutva is my core ideology.

One thought on “भारतीय स्थापत्य शास्त्र – १”

  1. Hello sir, I have received your blog information from one of my friend and really your writing very much inspiring.. I am really amazed by reading your blog & our culture itself a big inspiration to all of us. Keep it up sir. Also, please share some books for reading about indian culture & Hope author should be “Nationalist”.. Thanks for your writing.. All the best…

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s