भारतीय स्थापत्यशास्त्र – २

प्रशांत पोळ

एखाद्या वस्तूची वॉरंटी, गेरंटी किंवा हमी किती असू शकते ? एक वर्ष, दोन वर्ष, पाच वर्ष, दहा वर्ष…? आपली झेप यापलीकडे जात नाही नं..? पण निर्माण किंवा स्थापत्य क्षेत्रातल्या भारतीय तंत्रज्ञांनी तयार केलेल्या वीटेची गेरंटी आहे, हमी आहे – ५,००० वर्षे..! होय. पाच हजार वर्ष. अन ह्या वीटा आहेत मोहन-जो-दारो आणि हडप्पा येथे सापडलेल्या पुरातन संस्कृतीच्या अवशेषांमधल्या !

भारतात जेंव्हा १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्य युध्दाची तयारी चाललेली होती, त्या काळात भारताच्या उत्तर पश्चिमेला (म्हणजे आजच्या पाकिस्तानात) इंग्रज रेल्वेचं जाळं उभं करण्याच्या खटपटीत होते. लाहोर ते मुलतान ही रेल्वे लाईन टाकण्याचं काम ईस्ट इंडिया रेल्वे कंपनी तर्फे चालू होतं. या कामाचे प्रमुख होते जॉन आणि विलियम ब्रुनटन हे ब्रिटीश अभियंते. यांच्या समोर मोठं आव्हान होतं की रेल्वे लाईन च्या खाली टाकण्यासाठीची खडी (गिट्टी) कुठून मिळवावी हे.

काही गावकऱ्यांनी त्यांना सांगितले की ब्राम्हनाबाद जवळ एक पुरातन शहर ‘खंडहर’ झालेल्या स्थितीत पडलंय. तिथल्या वीटा तुम्हाला मिळू शकतील.

रेल्वे अभियंता असलेल्या ह्या दोघा भावांनी मग त्या अवशेषांमधल्या वीटा शोधून काढल्या. त्या बऱ्याच होत्या. लाहोर ते कराची ह्या सेगमेंट मधील रेल्वे लायनीत जवळपास ९३ किलोमीटर ची लाईन ही या वीटांनी सावरल्या / बांधल्या गेली आहे. या दोघा अभियंत्यांना हे कळलंच नाही की एका अतिशय पुरातन आणि समृध्द अश्या हडप्पा च्या अवशेषांना आपण नष्ट करत आहोत !

हडप्पा च्या पाच हजार वर्ष जुन्या वीटा
मोहन-जो-दडो आणि हडप्पा मधल्या ह्याच त्या ऐतिहासिक वीटा 

पुढे बरीच वर्ष ह्या ऐतिहासिक वीटांनी लाहोर – मुलतान रेल्वे लाईन ला आधार देण्याचं काम केलं.
नवीन झालेल्या कार्बन डेटिंग च्या शोधाने हे सिध्द झालंय की मोहन-जो-दरो, हडप्पा, लोथल इत्यादी ठिकाणची आढळलेली पुरातन संस्कृती ही साडे सात हजार वर्ष जुनी असावी. ह्या वीटा जरा अलिकडल्या म्हटल्या तरी त्या पाच हजार वर्ष जुन्या होतात. अश्या ह्या किमान पाच हजार वर्ष जुन्या वीटा, १८५७ साली मिळाल्या तेंव्हाही मजबूत असतात आणि त्या पुढे ८० / ९० वर्ष रेल्वेचे रूळ सांभाळण्याचं काम करतात…!!

आज अश्या वीटा बनू शकतील..?

हडप्पा येथे सापडलेल्या ह्या वीटा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ह्या भट्टीत व्यवस्थित भाजलेल्या आहेत. साधारण १५ वेगवेगळ्या आकारात ह्या आढळतात. पण ह्या सर्व आकारात एक साम्य आहे – ह्या सर्व वीटांचं प्रमाण हे ४ : २ : १ असं आहे. म्हणजे ४ भाग लांबी, २ भाग रुंदी आणि १ भाग उंची (जाडी). याचाच अर्थ ह्या वीटा अत्यंत वैज्ञानिक पध्दतीने तयार झाल्या असाव्यात. मग प्रश्न निर्माण होतो की साधारण पाच ते सात हजार वर्षांपूर्वी हे बांधकाम शास्त्रातलं प्रगत ज्ञान आपल्या भारतीयांजवळ कुठून आलं..? की भारतानंच हे शोधून काढलं ?
याचं काहीसं उत्तर आपल्याला जुन्या संस्कृत ग्रंथांमध्ये मिळतं. तंत्र शास्त्राचे काही ग्रंथ वाचिक परंपरेमुळे आज उपलब्ध आहेत. त्यातील कपिल वात्सायनाचा ग्रंथ आहे, ‘मयमतम कला-मुला शास्त्रं’ नावाचा. हा ग्रंथ बांधकामा संदर्भातील अनेक बाबी स्पष्ट करतो. यातील एक श्लोक आहे –
‘चतुष्पश्चषडष्टाभिमत्रिस्तध्दिव्दिगुणायतः II
व्यासार्धार्धत्रिभागैकतीव्रा मध्ये परेsपरे I
इष्टका बहुशः शोष्याः समदग्धाः पुनश्च ताः II’

याचा अर्थ आहे – ‘ह्या वीटांची रुंदी चार, पाच, सहा आणि आठ ह्या घटकांमधे असुन लांबी ह्याच्या दुप्पट आहे. ह्यांची उंची (जाडी) ही रुंदीच्या एक व्दितीयांश किंवा एक तृतीयांश असावी. ह्या वीटा वाळवून नंतर भाजून घ्याव्यात.’

हा श्लोक ज्या ग्रंथात आहे, तो ग्रंथ लिहिला गेलाय इसवी सनाच्या सहाव्या शतकात. म्हणजे आजपासून साधारण दीड हजार वर्षांपूर्वी. आणि हडप्पा मधे याच प्रमाणात / आकारात सापडलेल्या वीटा आहेत पाच ते सात हजार वर्ष जुन्या.

याचा अर्थ स्पष्ट आहे. बांधकाम शास्त्रातलं अत्यंत प्रगत असं ज्ञान ज्ञात इतिहासाच्या काळापासून भारताजवळ होतं आणि ते शास्त्रशुध्द रित्या वापरलं जात होतं.

एक तुलनेनं अलीकडचं उदाहरण घेऊ. विजयनगर साम्राज्याच्या उत्तर काळात, म्हणजे सन १५८३ मधे बांधलं गेलेलं लेपक्षी मंदिर. असं सांगितलं जातं की जटायू ने सीतेचं हरण करणाऱ्या रावणा बरोबर संघर्ष करून येथेच देह ठेवला होता. बंगलोर पासून दीडशे किलोमीटर अंतरावर, पण आंध्र प्रदेशाच्या अनंतपुर जिल्ह्यात असलेलं हे मंदिर अनेक अर्थांनी वैशिष्ठ्यपूर्ण आहे. विजयनगर साम्राज्याच्या वीराण्णा आणि विरूपण्णा ह्या दोन सरदार भावंडांनी हे मंदिर बांधलेय. कुर्मशैल पठारावर म्हणजे कासवाच्या पाठीच्या आकाराच्या टेकडीवर बांधलेले हे मंदिर वीरभद्राचे आहे. सुमारे सव्वा पाचशे वर्ष जूने हे मंदिर मात्र एका वेगळ्याच कारणासाठी प्रसिध्द आहे. सत्तर खांबांवर आधारलेल्या ह्या मंदिराचा एक खांब हा झुलता आहे..!

लेपाक्षी मंदिर -२अर्थात तो तसा वाटत नाही. जमिनीवर टेकलेलाच वाटतो. मात्र त्याच्या खालून पातळ कापड आरपार जाऊ शकते. वरती बघितलं तर त्याला बांधून ठेवणारी अशी कोणतीही रचना तेथे दिसत नाही. बांधकाम शास्त्रातल्या दिग्गजांना आणि शास्त्रज्ञांना सतावणारे हे गूढ आहे. हा खांब (स्तंभ) कोणत्याही आधाराविना झुलता कसा राहतोय हे कोणालाही सांगता येत नाही. इंग्रजांचे शासन असताना एका इंग्रज अभियंत्याने ह्या खांबावर बरेच उपद्व्याप करून बघितले. पण त्यालाही ह्या रचनेचे रहस्य शोधता आले नाही.

लेपाक्षी मंदिर - ३म्हणजेच पाचशे वर्षांपूर्वी पर्यंत भारतात बांधकाम शास्त्रातले हे प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध होते. पुढेही ते अनेक ठिकाणी दिसते. प्रतापगड आणि रायगड तर शिवाजींच्या काळातच बांधल्या गेले. पण इंग्रजांनी मुद्दाम केलेली पडझड सोडली तर आजही हे किल्ले बुलंद आहेत.

पण नंतर इंग्रजांनी आपले सिव्हील इंजिनिअरिंग भारतात आणले आणि स्थापत्य / बांधकाम शास्त्रातील थोडेफार उरलेले भारतीय ग्रंथ बासनात गुंडाळल्या गेले आणि अडगळीत पडले.

भारतीय शिल्प शास्त्राचे (किंवा स्थापत्य शास्त्राचे) अठरा प्रमुख संहिताकार मानले जातात. ते म्हणजे भृगु, अत्रि, वशिष्ठ, विश्वकर्मा, मय, नारद, नग्नजीत, विशालक्ष, पुरंदर, ब्रम्हा, कुमार, नंदिश, शौनक, गर्ग, वासुदेव, अनिरुध्द, शुक्र व बृहस्पती. या प्रत्येकाची शिल्प शास्त्रावरील स्वतंत्र अशी संहिता होती. मात्र आज फक्त मय, विश्वकर्मा, भृगु, नारद आणि कुमार यांच्याच संहिता उपलब्ध आहेत. अर्थात शिल्पशास्त्रातील एक तृतियांश पेक्षाही कमी ज्ञान आज उपलब्ध आहे. इतर संहिता मिळाल्या तर कदाचित लेपक्षी मंदिरातील झुलणाऱ्या खांबाच्या रहस्यासारखी इतर रहस्य उघडकीला येतील.

भारतात उत्तरेकडून ज्या काळात मुसलमानांच्या आक्रमणांची तीव्रता वाढली, त्याच काळात, म्हणजे ११ व्या शतकात, माळव्याचा राज भोज याने ‘समरांगण सूत्रधार’ हा ग्रंथ संकलित केला. यात ८३ अध्याय आहेत. आणि स्थापत्य शास्त्रा पासून ते यंत्रशास्त्रा पर्यंत अनेक बाबींचे विस्तृत विवरण आहे. अगदी हायड्रोलिक शक्ती ने टर्बाईन चालविण्याची विधी ही यात दिलेली आहे –
‘धारा च जलभारश्च पायसो भ्रमणम तथा I
यथोच्छ्रायो यथाधिक्यम यथा निरन्ध्रतापिच I
एवमादिनी भूजस्य जलजानी प्रचक्षते II’
– अध्याय ३१

अर्थात जलधारा वस्तूला फिरवते. आणि उंचावरून जलधारा पडली तर तिचा प्रभाव अधिक तीव्र असतो आणि तिच्या वेगाच्या आणि वस्तूच्या भाराच्या प्रमाणात वस्तू फिरते.

या समरांगण सुत्रधारावर युरोप मधे बरेच काम चालले आहे. मात्र आपल्या देशात या बाबतीत उदासीनताच दिसून येते. साधारण ८० च्या वर वय असलेल्या डॉ. प्रभाकर पांडुरंग आपटे यांनी या ग्रंथाचा चिकाटीने, इंग्रजीत अनुवाद केला अन पाश्चात्य जगाचे लक्ष या ग्रंथाकडे गेले.

हे असं स्थापत्य शास्त्रावरचं ज्ञान प्रचंड मोठ्या प्रमाणात अडगळीत पडलंय. त्याला बाहेर आणणं आवश्यक आहे. मंदिर स्थापत्य शास्त्र आणि मूर्तीकला या विषयांवर आपल्यापर्यंत झिरपत आलेलं साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदऱ्यांचे गुरु, इतिहास संशोधक ग. ह. खरे यांचं ‘भारतीय मूर्तीविज्ञान’ या नावाचं अप्रतिम पुस्तक आहे. पण या विषयावर आजच्या काळात बरंच काम होणं आवश्यक आहे.

एकुणात काय, तर हजारो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवलेल्या ज्ञानाची कवाडं शोधणं आणि ती उघडणं याचाच हा सारा प्रवास आहे..!

प्रशांत पोळ

Author: प्रशांत पोळ

I am an Engineer by profession. Consultant in Telecom and IT. Interested in Indology, Arts, Literature, Politics and many more. Nationalistic views. Hindutva is my core ideology.

One thought on “भारतीय स्थापत्यशास्त्र – २”

  1. फार छान माहीती आहे पोळ साहेब. मध्यंतरी मी, खगोल, धातु, हवामान ई. अनेकविध शास्रांत पारंगत असलेले प्राचीन थोर शास्रज्ञ वराह मीहीर यांच्या विवीध कार्याची ओळख करुन देणारे, कॅप्टन बोडस यांचे पुस्तक वाचले होते. त्या नंतर आत्ता पुन्हा, अशा प्रकारे आपल्या उदात्त संस्कृतितील त्यावेळच्या आधुनिक विज्ञानाचे यथार्थ दर्शन आपल्या लेखांद्वारे नव्याने होत आहे !!
    अतिशय धन्यवाद पोळ साहेब !!

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s