बिहार च्या निवडणुकांचं आता कवित्वच शिल्लक राहिले आहे. दरम्यान मणिपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजप ने प्रथमच २ जागा जिंकल्या आहेत तर मध्य प्रदेशातील रतलाम-झाबुआ ची लोकसभेची जागा भाजपने पोटनिवडणुकीत गमावली आहे. ह्या पार्श्वभूमीवर विवेक साप्ताहिकाच्या ताज्या अंकात आलेला माझा हा लेख –
प्रशांत पोळ
सतराशे एकसष्ठ मधे पानिपतात मराठी फौजांचा पराभव नेमका कशामुळे झाला, ते आजपर्यंत कोणी ठामपणे सांगू शकलेलं नाही. त्या पराभवाची अनेक कारणं समोर येतात. दुपार पर्यंत मराठी फौजांची सरशी होत होती. पण नंतर पारडं फिरलं अन मराठी सेनेची कत्तल सुरु झाली. यातुनच ‘पानिपत होणं’ हा वाक्प्रचार मराठीत रूढ झाला.
जवळपास असंच बिहार मधे घडलंय. बिहार चे निकाल हे सर्वांनाच अनपेक्षित होते. जितके भाजपाला, तितकेच जद (यु) – राजद – कॉंग्रेस च्या महागठबंधन ला ही. एक्झिट पोल सर्वे हे प्रत्यक्ष निकालांच्या अगदी जवळ जातात असं म्हटलं जातं. पण बिहार च्या ह्या निवडणुकांत सारंच उलटं – पालटं झालं. एकाही सर्वेक्षणात भाजप च्या गठबंधन ला ९० पेक्षा कमी जागा दिलेल्या नव्हत्या, तर नितीश कुमारांच्या महागठबंधन ला कोणीही १३२ पेक्षा जास्त जागा दाखविलेल्या नव्हत्या. प्रत्यक्षात भाजपा च्या गठबंधन ला मिळालेल्या जागा आहेत ५८ तर नितीश कुमारांच्या महागठबंधन ला १७८ जागा मिळालेल्या आहेत..! लोकसभेच्या, महाराष्ट्राच्या आणि दिल्लीच्या निवडणुकांचे अचूक अंदाज वर्तवणाऱ्या ‘चाणक्य’ ने भाजपा गठबंधन च्या पारड्यात १५५ जागा टाकल्या होत्या !
हे असं कसं काय झालं ? वरवरचं गणित तसं सोपं होतं. लोकसभेच्या निवडणुकात भाजपा गठबंधन ला जरी ४० पैकी ३१ जागा मिळाल्या असल्या तरी मतांची टक्केवारी होती – ३८.७%. त्याच वेळेस जद (यु) + राजद + कॉंग्रेस यांच्या एकत्रित मतांची टक्केवारी होती – ४४%. भाजप गठबंधन च्या मतांपेक्षा ह्या तीन पक्षांना ३१ लाख मतं जास्त मिळालेली होती.
याच सरळसाध्या गणिताच्या आधारावर नितीश, लालू आणि कॉंग्रेस एकत्र आले. या तिघांच्या अस्तित्वाची ही लढाई होती. लोकसभेत लालूंचा पार धुव्वा उडालेला होता. फक्त ४ जागा त्यांच्या वाट्याला आल्या होत्या. नितीश कुमार आणि कॉंग्रेस ची परिस्थिती तर अजूनच गई-गुजरी होती. दोघांना प्रत्येकी २ – २ जागा जिंकता आल्या होत्या. कॉंग्रेस च्या डुबत्या नौकेला एखाद्या काडीचा आधारही पुरेसा होता.
आणि म्हणूनच सोनिया गांधींनी पुढाकार घेतला. गेली पंधरा वर्षे एकमेकांसमोर कट्टर हाडवैरी म्हणून उभ्या असणाऱ्या नितीश कुमार आणि लालू यादव यांना एकत्र आणलं. एक अगदी नवीन पायंडा पाडत नितीश कुमारांच्या जद (यु) पक्षाने, स्वतःचे ११५ निवडून आलेले आमदार असतानाही १०१ जागांवरच निवडणूक लढण्याचं मान्य केलं. एकूण भट्टी व्यवस्थित जमली होती. अंकगणित हे महागठबंधन च्या बाजूनं होतं आणि विजयाचा मार्ग प्रशस्त झालेला दिसत होता.
मात्र भाजप ला मुळात हे अंकगणितच मान्य नव्हतं. अश्या युती – महायुती, गठबंधन – महागठबंधन करून विजय मिळवणं सोपं नसतं. कारण युतीतल्या एका पक्षाची मतं, दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला ट्रान्सफर होतीलच याची खात्री नसते. विशेषतः गेली पंधरा वर्ष जे दोन पक्ष एकमेकां विरुध्द हाडवैऱ्या सारखी लढली, त्यांच्यात इतकं सामंजस्य असणंच शक्य नाही याची भाजप ला खात्री होती. पक्षाचे शीर्ष नेतृत्व एक – दुसऱ्याला सांभाळून घेईलही. पण मैदानात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं काय..? त्यांच्यात हे असं मनोमिलन होणं कसं शक्य आहे ? याच गृहितकावर भाजप चं निवडणूक गणित बेतलेलं होतं. आणि म्हणूनच भाजप च्या गोटात विजयाची शाश्वती वाटत होती.
प्रारंभीचं चित्र ही असंच होतं. नितीश – लालू च्या गोटात सारं काही आलबेल मुळीच नव्हतं. तिकीट वाटपावरून बराच असंतोष होता. खुद्द लालूंनी म्हटलं होतं की ‘मैने तो जहर पिया है.!’ तर नितीश कुमारांनी ट्वीट केलं होतं, ‘मी चंदनाच्या झाडा सारखा झालोय… भुजंगांनी वेढलेला.’ जद (यु) मधून अनेक पदाधिकारी आणि काही आमदार भाजप मधे शामिल होत होते. भाजप मधे ही बरीच धुसफूस असली तरी त्यांच्या जवळ बरंच मनुष्यबळ होतं. सर्व संसाधनं हाताशी होती. निवडणुका जाहीर व्हायच्या होत्या आणि प्रारंभी तरी भाजप चं पारडं जड दिसत होतं.
मात्र २५ जुलै ला मुज्जफरपुर मधे पंतप्रधान मोदींची एक सभा झाली. सभा प्रचंड होती. त्यात बोलता बोलता मोदी बोलून गेले की ‘नितीश कुमार जी की सोच मे कुछ खोट हैं. उनके ‘डी एन ए’ में कुछ गड़बड़ हैं.’
निवडणुकीची हवा बदलायला लागली ती ह्या सभेपासूनच..!
नितीश कुमारांबरोबर काम करणाऱ्या प्रशांत किशोर याने ही संधी झटकन पकडली. मोदींबरोबर असताना कॉंग्रेस च्या मणिशंकर अय्यर यांनी मोदींना ‘चायवाला’ म्हणून हिणवलं अन लगेच प्रशांत किशोर ने ‘चाय पे चर्चा’ सारखा कार्यक्रम जबरदस्त आखला. अगदी तशीच पुनरावृत्ती ह्या ‘डी एन ए’ च्या बाबतीतही झाली.
प्रशांत किशोर ने ह्या डी एन ए प्रकरणाला बिहार च्या अस्मितेशी जोडलं. त्याने मोठ्या प्रमाणावर पत्रकं छापली. त्यात डी एन ए चा अर्थ समजावला आणि लोकांना सांगितलं की ‘मोदींनी बिहारी अस्मितेचा, बिहार च्या अख्ख्या खानदानाचा अपमान केलाय. सर्वांनी आपापली नखं, केसं आणि रक्त जमा करा. त्यातून माणसाचा डी एन ए कळू शकतो. अशी सर्वांची नखं, केसं, रक्त आपण मोदींकडे पाठवू अन त्यांना सांगू, ‘बघा आम्हा बिहारींचा डी एन ए. प्रमाणिक पणाचा लखलखीत नमुना.. अन अश्या बिहारी डी एन ए चा तुम्ही अपमान
करता..?’
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात, साऱ्या बिहार मधे महागठबंधन ने ठिकठिकाणी ‘डी एन ए कलेक्शन सेंटर’ उघडली. डी एन ए चं जीव शास्त्रीय चित्र असलेले लाल-पांढरे लिफाफे छापून घेतले. लोकांनी पण रांगा लाऊ, लाऊ आपापले डी एन ए जमा केले. अक्षरशः लाखोंच्या संख्येत डी एन ए ची सेम्पल्स जमा झाली. त्या काळात नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान निवासात रोज सात ते आठ पोती भरून डी एन ए ची सेम्पल्स पोस्ट खातं नेऊन पोहोचवायचं !
या मोहिमेतून एक झालं. बिहारी अस्मितेचा मुद्दा अगदी खणखणीत पणे समोर आला अन ह्या मुद्यामुळे नकळत भाजप ने महागठबंधन ला अजून जास्त एकजिनसी बनवले..!
निवडणुका जाहीर झाल्यावर भाजप ने दुसरी मोठी चूक केली. पोस्टर्स, होर्डींग्स, पत्रकं आणि जाहिरातींमधे पंतप्रधान मोदी आणि अमित शहा, हे दोघंच प्रामुख्याने झळकत होते. बिहारचं भाजप चं नेतृत्व कुठेच फारसं दिसत नव्हतं. त्यांचा उपयोगच केलेला दिसत नव्हता. राजीव प्रताप रूढी तर स्वतःच स्वतःचे दौरे आखत होते. त्यातून मोठ्या प्रमाणावर बाहेरचे कार्यकर्ते प्रचारासाठी बिहार मधे अवतरले होते. एकट्या मध्यप्रदेशाला ७४ विधानसभा क्षेत्रांची जवाबदारी दिलेली होती. त्यामुळे मध्यप्रदेशातून अक्षरशः हजारो कार्यकर्ते बिहार मधे तळ ठोकून बसले होते. भाजप मधे बिहारची सूत्र होती – धर्मेंद्र प्रधान, अनंत कुमार, भूपेंद्र यादव, सी आर पाटील अश्या बिहार बाहेर च्या लोकांजवळ.
प्रशांत किशोर ने ही परिस्थिती बरोबर टिपली. अन सप्टेंबर च्या मध्यावर पोस्टर वॉर सुरु झाले – ‘बिहारी बनाम बाहरी’. आधीच्या डी एन ए अभियानाला या ‘बाहरी’ ची जोड मिळाली अन अंडरकरंट ची दिशा बदलू लागली. सप्टेंबर च्या शेवट पर्यंत चित्र असं निर्माण झालं की भाजप जवळ ‘बिहारी’ नेतृत्व नाहीच आणि पक्ष ‘बाहरी’ लोकांच्या मदतीने बिहार जिंकायला निघालाय.
मुळात ‘बिहारी अस्मिता’ हा फार संवेदनशील मुद्दा आहे. बौध्द धर्माचा उगम बिहार मधून झालाय तर जैन पंथाची सुरुवातही तेथूनच झालेली. अगदी अलीकडच्या कार्यकाळातले जयप्रकाश नारायण यांचे समग्र क्रांती अभियान सुध्दा बिहार मधूनच सुरु झालेले.
अश्या महत्वाच्या बिहार च्या निवडणुकात भाजपा चा चेहरा हा ‘बिहारी’ नव्हता. तो बिहारच्या लोकांसाठी ‘बाहरीच’ होता आणि ह्या ‘बाहरी’ मुद्याने भाजपा विरोधातली मतं एकवटू लागली. आश्चर्य म्हणजे भाजप च्या रणनीतीकारांच्या लक्षात हे आलं नाही. किंबहुना आलं असलं तरी भाजप ने ह्या मुद्द्याला गंभीरतेनं घेतलंच नाही.
मुळात भाजप ने महागठबंधन ला ‘विस्कळीत’ करणं अपेक्षित होतं. नितीश कुमारांनी दहा वर्ष ज्या ‘जंगलराज’ वर कोरडे ओढत, लालू यादवांवर जहरी टीका करत राज्य केलं, त्या मुद्द्यांना समोर आणणं अपेक्षित होतं. पण झालं उलटंच. महागठबंधन एकजिनसी होत गेलं आणि मोदी जेंव्हा ‘जंगलराज’ वर टीका करू लागले तेंव्हा ती टीका बिहारी अस्मितेच्या विरोधातली समजली जाऊ लागली.
या सर्व प्रक्रियेत भाजप चा आत्मविश्वास खंबीर नव्हता. ‘पांचजन्य’ आणि ‘ऑर्गनायझर’ मधे मुलाखत देताना सरसंघचालक श्री मोहन भागवत यांनी आरक्षणाच्या संदर्भात जाता – जाता एक मत मांडलं. मुळात ती मुलाखत आरक्षणाच्या संदर्भात नव्हतीच. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या एकात्म मानवतावादावर चर्चा चाललेली होती. ‘समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत आपण पोहोचतो आहोत कां ?’, हा मुद्दा होता. यावर उदाहरण म्हणून सरसंघचालकांनी आरक्षणाचं उदाहरण देत सांगितलं की ‘तेथे तरी शेवटच्या, गरजू माणसापर्यंत आरक्षणाचा लाभ पोहोचतो आहे कां..?’ यात कोठेही ‘समीक्षा’ हा शब्द नव्हता. यात कुठेही आरक्षणावर पुनर्विचार झाला पाहिजे अशी मांडणीही नव्हती. आरक्षण रद्द केले पाहिजे, असे शब्द तर नव्हतेच, नव्हते..!
या मुलाखतीचा लालूंनी आणि त्यांच्या महागठबंधन नी, त्यांना हवा तसा अर्थ काढला. आणि हे टीकास्त्र प्रचारात वापरायला सुरुवात झाली. यावर भाजप ची प्रतिक्रिया काय होती..? अमित शहांनी वक्तव्य दिलं, ‘भाजप आरक्षणावर ठाम आहे. आरक्षणावर पुनर्विचार करण्याची कोणतीही गरज भाजप ला वाटत नाही.’ यावरून अर्थ हा निघत होता की संघाला आरक्षणाचा पुनर्विचार हवा आहे पण भाजप मात्र आरक्षण धोरणावर ठाम आहे. मतदारांना हवा तसा संदेश देण्यात लालू सफल झाले होते. या मिडिया ट्रायल मधे भाजप टिकू शकला नाही.
मुळात सरसंघचालकांच्या वक्तव्यावर भाजप ने ठाम पणे म्हटलं असतं की, ‘हो, बरोबर आहे. आरक्षणाचा लाभ हा शेवटच्या गरजू माणसापर्यंत पोहोचलेला नाही. तो आम्ही पोहोचवणार..!’ तर भाजप चा आत्मविश्वास समोर आला असता. या उप्पर ही लालूंच्या महागठबंधन ने हाकाटी केलीच असती. पण ती फार टिकली नसती.
याउलट भाजप बचावात्मक भुमिकेत शिरला अन निवडणुकीचा एजेंडाच बदलला. यापुर्वी गेल्या लोकसभा आणि नंतर च्या महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड च्या विधानसभा निवडणुकीचा एजेंडा भाजपा ने ठरवला होता. विरोधी पक्ष त्यावर प्रतिक्रियाच देत राहिले. त्यामुळे भाजप चे पारडे जड राहिले.
मात्र दिल्लीत केजरीवाल आणि बिहार मधे नितीश – लालूंनी निवडणुकीचा अजेंडा सेट केला अन भाजप पूर्ण निवडणूक होई पर्यंत बचावात्मक भुमिकेत राहिला..!
बिहार हा राजकीय दृष्ट्या प्रचंड जागरूक आणि त्याचं बरोबर जातीयतावादाने पोखरलेला प्रदेश आहे. या निवडणुकात मागासवर्गीय आणि अति-मागासवर्गीय जाती नितीश – लालूंच्या मागे उभ्या राहिल्या आणि भूमिहार, सवर्ण भाजप च्या बरोबर गेले असं म्हटलं जातं. पण हे अर्धसत्य आहे. भूमिहार आणि राजपुतांचं प्राबल्य असलेल्या काही जागा सुध्दा कॉंग्रेस च्या पारड्यात गेल्या आहेत. मुळात लोकसभे सारखंच या विधानसभा निवडणुकीतही जातींच्या वर जाऊन मतदान झालं आहे. मुस्लिम मतं मात्र अक्षरशः एकगठ्ठा महागठबंधन च्या पारड्यात पडली आहेत. ओवेसींच्या एम आय एम ला भोपळाही फोडता आला नाही.
बिहार च्या ह्या निकालांनी भारतीय राजकारणात बरीच उलथापालथ घडवून आणली आहे. विरोधी पक्षांचं मनोबल बरंच उंचावलेलं आहे. कॉंग्रेस ला तर नवसंजीवनी मिळाली आहे. भाजप ने ही या निवडणुकीतून बरंच काही शिकण्यासारखं आहे. भाजप ला प्रदेश स्तरावरील नवीन नेतृत्व पुढे आणण्याची गरज सर्वच प्रदेशात भासतेय.
आभासी जगातून वास्तविक जगात भाजपा ला आणण्याचं काम जरी ह्या बिहार च्या निवडणुकांनी केलं तर ते जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही साठी फार मोठं योगदान असेल..!
प्रशांत पोळ