आज दिल्लीला राष्ट्रवादी विचारांच्या लेखकांचा / कलाकारांचा / बुध्दिवंतांचा एक मोठा मोर्चा, अनुपम खेर यांच्या नेतृवात निघाला. यात पुरस्कार परत करणाऱ्यांचा निषेध करण्यात आला.
परवा बुकर पुरस्कार विजेत्या अरुंधती रॉय ह्यांनी पुरस्कार परतीची घोषणा केली. त्या अरुंधती रॉय वर काही वर्षांपूर्वी लिहिलेला हा लेख –
‘अरुंधती रॉय यांचे देशद्रोही लिखाण’
प्रशांत पोळ
अरुंधती रॉय हे नाव आपल्या कानांवरून गेलं असेल अशी शक्यता खूप आहे. बाई इन्टलेक्चुअल वर्तुळात वावरतात. अनेक मासिकांत उलट-सुलट लिहितात. या सर्वांमुळे त्या पत्रकारांच्या लाडक्या. साहजिकच अरुंधती रॉय हे नाव तसं सतत गाजत राहणारं.
१९९७ साली अरुंधती रॉय यांनी लिहिलेल्या ‘द गॉड ऑफ स्माल थिंग्स’ या पुस्तकाला बुकर पारितोषिक मिळाले अन अरुंधती रॉय हे नाव एकदमच प्रकाशझोतात आले. या पुस्तकाचे अनेक भारतीय भाषात अनुवाद झाले. काहींना ते आवडलं. काहींना नाही आवडलं. पण पुस्तक मात्र गाजत राहिलं.
या पुस्तकाशिवाय बाईंच्या खात्यावर दुसरे कुठलेही पुस्तक रुजू नाही. दोन डोक्युमेंटरींची पटकथा अन वेळोवेळी वेगवेगळ्या मासिकांत लिहिलेले लेख (बाईंच्या भाषेत – ‘एसेज’. म्हणजे निबंध!). मात्र तरीही बाई फक्त देशातीलच नाही तर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर अत्यंत आत्मविश्वासाने वावरत असतात. त्या एका पुस्तकाच्या पारितोषिकाची शिदोरी बाईंना अजूनही पुरते आहे!
बाई विचारांनी साम्यवादाकडे झुकणाऱ्या, सेक्युलारीस्ट म्हणवून घेणाऱ्या पंथातील आहेत. अर्थात पत्रकारांच्या मते इन्टलेक्चुअल, विचारवंत, थिंकर वगैरे! मग अर्थातच त्यांच्या भोवती एक वलय निर्माण केलं गेलं. त्यामुळे बाईंनी अनेकदा देशविघातक वक्तव्यं देऊनही, असे लेख लिहूनही भारतीय मिडिया त्यांना डोक्यावर घेतोय! हे असं फक्त आपल्या देशातच घडू शकतं!!
वानगी दाखल ही काही उदाहरणे –
• काही तुरळक अपवाद वगळले तर साऱ्या देशाची ही ठाम श्रद्धा आहे की काश्मीर हा भारताचा अविभाज्य हिस्सा आहे. आपल्या लोकसभेनेही तसा प्रस्ताव पारित केलाय. बाईंना मात्र हे पटत नाही. त्या अगदी खुल्लम खुलला काश्मिरी उग्रवाद्यांची बाजू घेतात. त्यांच्या वतीनं जागतिक व्यासपीठांवर आपली मतं मांडतात. ऑगस्ट २००८ च्या टाईम्स ऑफ इंडिया ने बाईंची एक भली मोठी मुलाखत छापली होती. त्यात बाईंनी अगदी स्पष्टपणे काश्मिरी विघटनवाद्यांना आपला पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. बाईंचे तर्कशास्त्र अगदी सरळ आहे. १७ ऑगस्ट २००८ ला काश्मीर चे स्वतंत्र अस्तित्व असावे असं मानणाऱ्या मुस्लीम संगठनांनी ५०,००० लोकांचा एक मोठा मोर्चा श्रीनगरात काढला. आता इतका मोठा जमाव एकत्र येऊन एखादी मागणी करतो तर तो बरोबरच असेल, नाही कां? लोकशाही मानणाऱ्या अरुंधती बाईंना असं अगदी मनापासून वाटतं. म्हणून ऑगस्ट २००८ च्या ‘टाईम’ साप्ताहिकात त्या स्पष्टपणे म्हणतात, “काश्मीर ला भारताने ताबडतोप वेगळे करून स्वतंत्रता द्यावी!”
(मात्र याच अरुंधती बाईंना गोवंश रक्षणाकरता नागपुरात जमलेल्या लाखाच्या विशाल समूहाला बघून गोवंश हत्या बंदीचा कायदा व्हावा असं वाटत नाही! उलट बाई ह्या सर्व प्रकाराला ‘धार्मिक उन्मादाचा उद्रेक’ म्हणून त्याच्यावर तोंडसुख घेतात!)
• फक्त इतकंच नाही. अरुंधतीबाई चार पावलं अजून पुढे जातात अन अफजल गुरु ला फाशी देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण करतात. २००१ साली भारतीय संसदेवर झालेल्या हल्याचा सूत्रधार मोहम्मद अफजल गुरु याची फाशी रद्द व्हावी म्हणून बाई लेख लिहितात, चळवळ चालवतात, भाषणं देतात.
• १९९८ साली भारताने पोखरण मध्ये केलेला अणुस्फोट बाईंना मुळीच आवडला नव्हता. त्याकाळी नुकतंच त्यांना बुकर पारितोषिक मिळाले होते. त्यामुळे बाई अक्षरशः हवेत होत्या. पोखरण चा स्फोट झाल्यानंतर १९९८ साली बाईंनी ‘द एंड ऑफ इमेजीनेशन’ हा भारताच्या संरक्षण धोरणाची लक्तरं काढणारा लेख लिहिला. त्या काळात परमाणु स्फोटांमुळे शक्तीसंपन्न झालेल्या भारतावर नाराज झालेले अनेक देश होते. त्यांनी ‘ भारतीय बुकर पुरस्कार विजेतीचा’ हा लेख हातोहात उचलला. आता बाहेरच्या देशात काही छापून येतंय म्हणजे ते ग्रेटच असणार असं वाटून भारतीय पत्रकारांनीही बाईंना डोक्यावर घेतलं.
या सर्वांमुळे उत्साहित होऊन बाईंनी १९९९ मध्ये त्यांच्या लेखांचा एक संग्रह
‘द कॉस्ट ऑफ लिव्हिंग’ नावाने प्रकाशित केला. त्यातील जवळपास सर्वच लेख हे
भारतीय शासनाचे वाभाडे काढणारे होते !
• या सर्वांचा फायदा घेत बाईंनी हळू हळू आपली वाटचाल ही आंतरराष्ट्रीय व्यासपीठाकडे चालू ठेवली होती. ऑगस्ट २००६ मध्ये इस्रायेल विरुद्ध बाईंनी अमेरिकन विचारवंत नोम चोमस्की आणि हॉवर्ड झिन सारख्यांना बरोबर घेऊन एक चळवळ उभारली होती.
• मुंबई वर झालेल्या २६/११ च्या हल्ल्याबद्दल ही बाईंची भूमिका तुम्हा आम्हा भारतीयांपेक्षा वेगळी आहे. १३ डिसेंबर २००८ च्या ‘द गार्जीयन’ या वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात त्या म्हणतात कि भारतावरचा २६/११ चा हल्ला हा असा ‘आयसोलेशन’ मध्ये बघता येणार नाही. थोडक्यात, यात भारताच्याही काही चुका असतील. दहशतवादाचा निषेध करून त्या म्हणतात, ‘हा दहशतवाद कां फोफावला हे शोधणं आवश्यक आहे!’
तर अश्या ह्या ४८ वर्षांच्या सुझाना अरुंधती रॉय, परत एकदा चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी छत्तीसगढ मधील दंतेवाड्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या नृशंस आणि बीभत्स हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘आउटलुक’ मध्ये एक लेख लिहिला आहे. ७६ सी आर पी एफ च्या जवानांना ज्या नक्षलवाद्यांनी घेरून मारले, त्याच नक्षलवाद्यांच्या गुप्त तळावर, या हत्याकांडाच्या महिनाभर आधी अरुंधती बाई गेल्या होत्या. ‘आउटलुक’ साप्ताहिकाच्या २९ मार्च च्या अंकात हा लेख प्रकाशित झाला आहे. ४४ पानांच्या या भल्या मोठ्या लेखात बाईंनी नक्षलवाद्यांना ‘समजून’ घेण्याचा प्रयत्न केलाय. आणि क्रूर विटंबना म्हणजे, हा लेख प्रकाशित झाल्याच्या अक्षरशः दहा दिवसांच्या आत नक्षलवाद्यांनी हे भयानक हत्याकांड घडवून आणलंय. याचं ‘टाईमिंग’ बघता हे सारं व्यवस्थित ‘मेनेज’ केल्यासारखं वाटतं. आणि या सर्व नाटकात अरुंधतीबाई एका कुशल नटी प्रमाणे वावरल्या आहेत !
या संपूर्ण लेखात बाईंनी नक्षलवाद्यांना भोळे आदिवासी, कलाप्रेमी, निरागस अश्या स्वरूपात रेखाटलंय. बंदुका लावलेल्या वनवासी बायकांची चित्रं दाखवत बाई कुत्सितपणे लिहितात – “India’s greatest security threat!” अर्थात ही गरीब बिचारी सिधी साधी आदिवासी माणसं म्हणे भारताच्या सार्वभौमिकतेला असलेला सर्वात मोठा धोका आहे!!
लेखाच्या प्रारंभी बाईंनी नक्षलवादी चळवळीची भूमिका मांडली आहे. ही भूमिका म्हणजे एखाद्या नक्षलवादी कार्यकर्त्याने लिहिल्यासारखी आहे. यात बाई, वनवासी लोकांचा संघर्षाचा इतिहास आठवतात. त्यांचं म्हणणं – संघर्ष ही तर आदिवासींची नियतीच आहे. त्यामुळे नक्षलवाद अगदी स्वाभाविकच आहे.
‘सामान्य आदिवासी माणूस हा नक्षलवादी आणि पोलीस प्रशासन या चक्कित भरडला जातोय’ हे विधान त्या ठामपणे खोडून काढतात. नक्षलवादी आणि सामान्य आदिवासी वेगळे नाहितच, असं त्यांचं कन्व्हिक्शन आहे. नक्षलवाद्यांना सर्व आदिवासींचा पाठींबा आहे, ही बाईंची भूमिका आहे. त्यामुळे बस्तर मधील संघर्ष हा त्यांच्यामते सामान्य आदिवासी आणि पोलीस प्रशासन यांच्यातच आहे, असं त्यांना खात्रीनं वाटतंय. बाईंचं स्पष्ट मत आहे की नक्षलवादी हे साधे, भोले आदिवासीच आहेत. मात्र छत्तीसगढ, झारखंड, तेलंगाना, ओरिसा या भागात प्रचुर खान संपत्ती असल्याने मोठमोठ्या कार्पोरेट कंपन्या आणि खान मालकांना, या शानिक आदिवासींना हुसकून लावायचं. अन त्यातूनच हा संघर्ष उद्भवलाय.
लेखात दंतेवाडा परिसराचं सविस्तर वर्णन आहे. सुमारे दहा तासांचा प्रवास करून, नक्षली लोकांच्या सूचनेप्रमाणे बाई रायपुर हून दंतेवाडयाला पोहोचतात. तिथे दंतेश्वरी देवीच्या मंदिरातील नक्षलवाद्या बरोबरीची पहिली भेट बाई खुलवून सांगतात. नक्षलवाद्यांचा तळ असलेल्या दंडकारण्याबद्दलही बाई भरभरून लिहितात.
त्या नक्षलवाद्यांच ते चालणं, ते सुंदर नीटनेटके कॅम्प, ती कॉम्रेड कमला, ते लाल सलाम, ओ धुंद करणारा निसर्ग, त्यांचं ते जेवण, जेवणातला तो लाल भात, रात्री खाली अन्थरायाची ती निळी झिल्ली, रात्रीचं ते चांदण्यांनी भरलेलं आकाश, ज्यांच्या डोक्यावर बक्षिसं आहेत अशी कोवळी कोवळी पोरं पोरी, असं आरच काही…! हे सारं लिहिताना बाई दर पाच / दहा ओळींनंतर बाई उपरोधिक लिहितात (ही कोवळी पोरं म्हणजे भारताचे ग्रेटेस्ट सिक्युरिटी थ्रेट..!)
या पूर्ण लिखाणात बाई एकंच गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने मांडतात, ती म्हणजे, संपूर्ण पोलीस खाते हे चोर, लुटारू आणि बलात्कारी आहे तर नक्षलवादी मात्र गरीब, भोळे, आणि निरागस आहेत! एका ठिकाणी एका १७ वर्षांच्या, पाठीला रायफल लावलेल्या आदिवासी मुलीला बघून त्या लिहितात, ‘ही कोवळी मुलगी जर पोलिसांच्या हातात सापडली तर काय होईल? पोलीस आधी बलात्कार करतील आणि नंतर तिला मारून टाकतील!
या लेखामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात –
1. अतिरंजित विधानं करून, नक्षलवाद्यांबद्दल सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करणं आणि या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी मोठं हत्याकांड घडवून आणणं, ह्या गोष्टी एखाद्या ‘कटाचा’ भाग नाहीत कां?
2. निरपराध आदिवासींना आणि पोलीस / सी आर पी एफ च्या जवानांना मारणं हे कुठल्या तत्वज्ञानात बसतं, आणि याचं समर्थन कसं काय केल्या जाऊ शकतं?
3. एखाद्यानं सतत देशविरोधी लिखाण करूनही आपण त्या व्यक्तीला सम्मान देणं योग्य आहे कां?
4. अरुंधती बाईंच्या देशद्रोही लिखाणामुळे खवळलेल्या काही तरुणांनी उद्या त्यांच्यावर चपला/ जोडे मारले, तर दोषी कोणाला ठरवायचं?
5. बाईंच्या देशद्रोही लिखाणाला, भारातोबरोबर छुपे शत्रुत्व असणाऱ्या विदेशी मिडीयाने प्रसिद्धी देणं हे तर आपण समजू शकतो. पण आउटलूक सारख्या भारतीय साप्ताहिकानेही तेच करावं?
6. राष्ट्रद्रोही भावनांना चिथावणी देणारा लेख छापल्याबद्दल केंद्र शासन, आउटलूक साप्ताहिक आणि श्रीमती सुझाना अरुंधती रॉय यांच्यावर खटले कां दाखल करत नाही?
7. या देशात ख्रिश्चन असणं म्हणजे काहीही बोलण्याचा / लिहिण्याचा परवाना असणं असतं काय? (संदर्भ – शशी थरूर प्रकरण)
सध्यातरी हे प्रश्न अनुत्तरीत आहे. मात्र या अरुंधती रॉय सारख्यांना या देशात मिडिया उचलून धरत असेल तर ही माध्यम जगताकरता निश्चितच चिंतेची बाब आहे!
प्रशांत पोळ