आज पहाटे ‘शोध’ ही कादंबरी वाचून संपवली आणि बऱ्याच दिवसांनंतर एखादी छान, मस्त आणि उत्कंठावर्धक कादंबरी वाचल्याचा फील आला.
साधारण १० दिवसांपूर्वी माझ्या फ्रेंकफर्ट मध्ये राहणाऱ्या मुलाने, इंद्रनील ने, मला या कादंबरी विषयी सांगितले. राजहंस प्रकाशनाचे ई-कॉमर्स साईट नाही. त्यामुळे माझ्या पुण्याला राहणाऱ्या मुलीने मला हे पुस्तक कुरियर केले, आणि आज पहाटे मी ते वाचून संपवले.
नाशिक च्या मुरलीधर खैरनार ह्यांची ही कादंबरी. कदाचित त्यांचे हे पहिलेच पुस्तक. पण नवखेपणाची एकही खूण नाही. डेन ब्राऊन ची शैली पुरेपूर वापरलेली. पण लोकमत मधील लेखात खैरनारांनी तशी प्रांजळ कबुलीही दिलेली. डेन ब्राऊन, फेड्रिक फोरसिथ आणि जॉन ग्रिशम हे त्यांचे आवडते लेखक. माझेही..!!
कादंबरी ची कल्पना तशी भन्नाट. शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा (म्हणजे १६७० मधे) सुरत लुटली तेंव्हा लुटलेला अर्धाज ऐवज स्वराज्यात पोहोचला. आता आपण लवकरच मोंगलांच्या ताब्यात जाणार, हे लक्षात आल्यावर उरलेला खजिना राजांच्या विश्वासू सरदाराने नाशिक जवळ कुठेतरी लपवून ठेवला. त्या खजिन्याच्या शोधाची ही कादंबरी. ऐतिहासिक नसलेली, तरी इतिहासाच्या पार्श्वभूमीवर घडणारी. रहस्य, रोमांच, कूट प्रश्न, उत्कंठा, यांनी भरपूर असलेली. मराठीत अश्या ‘ऑफ-बीट’ कादंबऱ्या तशा कमीच. त्यामुळे ही ह्या ‘शोध’ चे महत्त्व वाढते.
ही कादंबरी प्रकाशित होऊन महिनाभर ही झालेला नाही. तरी मिळेल तिथून ही अवश्य वाचा. मुरलीधर खैरनारांचे आणि राजहंस प्रकाशनाचे अभिनंदन..!