भारतीय ज्ञानाचा खजिना – १ बाण स्तंभ

इतिहास हा फार चकवणारा विषय आहे. आणि इतिहासाचा मागोवा घेता घेता आपण एखाद्या अश्या जागी येऊन उभे राहतो की मन अक्षरशः थक्क होऊन जाते. हे असं शक्य आहे कां, या विषयी मनात गोंधळ उडतो. दीड हजार वर्षांपूर्वी हे इतकं प्रगत ज्ञान आपल्यापाशी होतं यावर विश्वासच बसत नाही.
गुजराथ च्या सोमनाथ मंदिरापाशी येऊन आपली अशीच परिस्थिती होते. मुळात सोमनाथ मंदिराचा इतिहासच विलक्षण. बारा ज्योतिर्लिंगांतील हे एक देखणं, वैभवशाली शिवलिंग. इतकं समृध्द की उत्तर पश्चिमेतून येणाऱ्या प्रत्येक आक्रमकाचं लक्ष सोमनाथ कडे गेलं आणि अनेकवार सोमनाथ लुटल्या गेलं. सोनं, नाणं, चांदी, हिरे, माणकं, रत्न. . . सर्व गाडे भरभरून नेलं. आणि इतकी संपत्ती लुटल्या जाऊन ही दर वेळी सोमनाथ चं शिवालय परत तश्याच वैभवानं उभं राहायचं.
मात्र फक्त ह्या वैभवासाठी सोमनाथ महत्वाचं नाही. सोमनाथ चं मंदिर भारताच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावर आहे. विशाल पसरलेला अरबी समुद्र रोज सोमनाथाचे पादप्रक्षालन करत असतो. आणि गेल्या हजारो वर्षांच्या ज्ञात इतिहासात ह्या सागराने कधीही सोमनाथाचा उपमर्द केलेला नाही. कोणत्याही वादळामुळे सोमनाथाचे गौरवशाली मंदिर कधी उध्वस्त झाले नाही.
ह्या सोमनाथाच्या मंदिराच्या आवारात एक स्तंभ आहे. हा ‘बाण स्तंभ’ म्हणून ओळखला जातो. हा केंव्हापासून त्या ठिकाणी आहे, हे सांगणं अवघड आहे. इतिहासाचा धांदोळा घेत घेत मागे गेलो की कुठेतरी सहाव्या शतकापाशी आपण पोहोचतो, जिथे ह्या बाण स्तंभाचा उल्लेख आढळतो. पण म्हणजे हा सहाव्या शतकात उभारल्या गेलाय असं सिध्द होत नाही. हा स्तंभ किती जुना आहे, याबद्दल नक्की सांगणं शक्य नाही.
हा बाण स्तंभ म्हणजे दिशादर्शक स्तंभ आहे. यावर एक बाण उभारलाय आणि खाली लिहिलंय –
‘आसमुद्रान्त दक्षिण धृव पर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग’
याचा अर्थ असा – या बिंदुपासून दक्षिण धृवा पर्यंत सरळ रेषेत एकही अडथळा नाही. अर्थात या मार्गात एकही जमिनीचा तुकडा नाही.
ज्याक्षणी सर्वप्रथम मी हा स्तंभ बघितला अन हा शिलालेख वाचला, तो वाचून डोक्यात त्याचा अर्थ जाता क्षणीच अंगावर काटा उभा राहिला ! हे ज्ञान इतक्या पूर्वी आपल्याला होतं..? कसं शक्य आहे हे? आणि जर हे खरच असेल तर किती समृध्दशाली ज्ञानाचा वैश्विक वारसा आपण बाळगतोय..!
संस्कृत मधे कोरलेल्या ह्या एका ओळीच्या अर्था मधे अनेक गूढ अर्थ सामावलेले आहेत. ह्या ओळीचा सरळ अर्थ आहे, सोमनाथ मंदिराच्या त्या बिंदुपासून दक्षिण धृवा पर्यंत (म्हणजे अन्टार्टिक पर्यंत) एक सरळ रेघ ओढली तर मधे एकही भूखंड लागत नाही. आता हे खरं कश्यावरून..? आजकालच्या ह्या तंत्रज्ञानाच्या युगात हे शोधणं सोपं व्हावं. मात्र हे तितकंसं सोपं नाही. गुगल मेप वरून बघितलं तर वर वर बघता भूखंड दिसत नाही. मात्र तो मोठा भूखंड. एखादा लहान भूखंड शोधायचा असेल तर त्या पूर्ण मार्गाला ‘एन्लार्ज’ करत करत पुढे जायचे. हे तसं किचकट काम. मात्र संयम ठेऊन, चिकाटीने हळू हळू बघत गेलं की मार्गात एकही मोठा भूखंड, म्हणजे 10 Km X 10 Km चा, लागत नाही. त्या खालचा भूखंड हा विशेष तंत्रज्ञानानेच शोधावा लागेल. थोडक्यात, तो संस्कृत श्लोक खरा आहे असं धरून चालू.
पण मूळ प्रश्न तसाच राहतो. अगदी सन ६०० मधे हा बाण स्तंभ उभारला असं जरी म्हटलं, तरी त्या काळात पृथ्वीचा दक्षिण गोलार्ध आहे, हे ज्ञान कुठून मिळालं ? बरं, दक्षिण गोलार्ध माहीत होता हे गृहीत धरलं तरी सोमनाथ मंदिरापासून दक्षिण धृवापर्यंत सरळ रेषेत गेलं की मध्ये कोठेही एकही भूखंड येत नाही, हे ‘मेपिंग’ कोणी केलं ? सारंच अद्भुत..!
याचाच अर्थ, बाण स्तंभ उभारण्याच्या काळात, भारतीयांना पृथ्वी गोल आहे हे माहीत होतं आणि फक्त तितकंच नाही, तर ह्या पृथ्वीला दक्षिण धृव आहे (म्हणजेच अर्थात उत्तर धृव ही आहेच), हे ज्ञान ही होतं. हे कसं काय शक्य झालं ? त्यासाठी पृथ्वीचा ‘एरियल व्ह्यू’ घेण्याचं काही साधन होतं कां ? नसल्यास पृथ्वीचा नकाशा त्या काळी अस्तित्वात होता कां ?
नकाशाशास्त्र (इंग्रजीत ‘कार्टोग्राफी’ – मूळ फ्रेंच भाषेतून उचललेला शब्द) हे फार प्राचीन शास्त्र. ख्रिस्तपूर्व सहा ते आठ हजार वर्षांपूर्वी गुहेत कोरलेल्या आकाशस्थ ताऱ्यांचे नकाशे मिळाले आहेत. मात्र पहिल्यांदा पृथ्वीचा नकाशा कोणी काढला, यावर एकमत नाही. भारतीय ज्ञानाचे पुरावे मिळाले नसल्याने ‘एनेक्झीमेंडर’ ह्या ग्रीक शास्त्रज्ञाकडे हा मान जातो. ख्रिस्तपूर्व ६११ ते ५४६ हा त्याचा कालखंड. मात्र त्याचा नकाशा हा अत्यंत ढोबळ आहे. त्या काळात जिथे जिथे ज्ञात मनुष्यवस्ती आहे, तो भाग या नकाशात दाखविण्यात आलेला आहे. या नकाशात उत्तर आणि दक्षिण धृव दिसण्याचं ही काही कारण नाही.
आजच्या वास्तविक जगाच्या जवळ जाणारा पृथ्वीचा नकाशा हेनरीक्स मार्टेलस ने साधारण सन १४९० च्या आसपास केलेला आढळतो. असं म्हणतात, कोलंबस ने ह्याच नकाशा चा आधार घेतलेला होता.
‘पृथ्वी गोल आहे’ हे मत युरोपातील काही शास्त्रज्ञांनी ख्रिस्तपूर्व काळात व्यक्त केलेले आढळते. एनेक्झीमेंडर ने ख्रिस्तपूर्व ६०० वर्षांपूर्वी पृथ्वीला एका ‘सिलेंडर’ च्या स्वरूपात बघितले होते. एरिस्टोटल ने ही पृथ्वीला गोल म्हटलेले आहे.
मात्र भारता जवळ हे ज्ञान फार आधीपासून होते ह्याच्या अनेक खुणा मिळतात. याच ज्ञानाच्या आधारावर सन ५०० च्या आसपास आर्यभट्ट ने फक्त पृथ्वी गोल आहे, हेच सांगितले नाही, तर पृथ्वीचा व्यास ४,९६७ योजने आहे (म्हणजे नवीन मापना प्रमाणे ३९,९६८ कि. मी.) हे देखील ठासून सांगितले. आज सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून पृथ्वीचा काढलेला व्यास ४०,०७५ कि. मी. आहे. अर्थात आर्यभट्ट च्या आकलनात चूक होतेय ती फक्त ०.२६ %. सोळाशे वर्षांपूर्वी आर्यभट्ट जवळ हे ज्ञान आले कोठून..?
सन २००८ मधे जर्मन इतिहासतज्ञ जोसेफ श्वार्टझबर्ग ने हे सिध्द केले की ख्रिस्तपूर्व दोन / अडीच हजार वर्षांपूर्वी पासून भारतात नकाशाशास्त्र अत्यंत विकसित होते. नगर रचनेचे नकाशे तर त्या काळात उपलब्ध होतेच, पण नौकानयना साठी आवश्यक असे नकाशे असल्याचे ही पुरावे आढळतात.
भारतात नौकानयन शास्त्र फार पूर्वीपासून विकसित होतं. संपूर्ण दक्षिण आशियात ज्या प्रकारे हिंदू संस्कृतीच्या पाउलखुणा आढळतात, त्यानुसार भारताची जहाजं पार पूर्व टोकापर्यंत, म्हणजे जावा, सुमात्रा, यवद्वीप ओलांडून जापान पर्यंत समुद्रात विहार करत होती याचे भरभक्कम पुरावे मिळाले आहेत. १९५५ साली शोधण्यात आलेल्या गुजरात च्या लोथल मधे अडीच हजार वर्षांपूर्वीचे अवशेष सापडले आहेत. यात भारताच्या प्रगत नौकानयना विषयी अनेक पुरावे दिसतात.
अर्थात सोमनाथ मंदिर उभारण्याच्या काळात दक्षिण धृवापर्यंत चे दिशादर्शन त्या काळातील लोकांना असेल हे निश्चित. दुसरा अजून एक विचार समोर येतो की दक्षिण धृवा पर्यंत सरळ रेषेबाण स्तंभ - सोमनाथत जमीन नसलेला समुद्र आहे हे नंतर शोधून काढण्यात आलं की दक्षिण धृवापासून जमीन नसलेल्या सरळ रेषेची सांगता भारतात जिथे होते, तिथे सोमनाथ हे ज्योतिर्लिंग उभारण्यात आलं..? त्या बाण स्तंभावर लिहिलेल्या ओळीत उल्लेख केलेला आहे, (‘आसमुद्रान्त दक्षिण धृव पर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग’) तो ज्योतीर्मार्ग म्हणजे नेमकं काय..?

सध्या तरी हे गूढच आहे..!

प्रशांत पोळ

Author: प्रशांत पोळ

I am an Engineer by profession. Consultant in Telecom and IT. Interested in Indology, Arts, Literature, Politics and many more. Nationalistic views. Hindutva is my core ideology.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s