अकरा जानेवारीला पेरीस मधे इतिहास घडत असताना शार्ली एब्दो च्या इमारतीबाहेर लाखोंचा जमाव जमला होता. ही सर्व माणसं ‘शार्ली एब्दो च्या मागे आम्ही भक्कमपणे उभे आहोत’ हे सांगण्या करता जमली होती. एका स्वरात समूह गर्जना होत होती – शार्ली.. शार्ली.. ‘ला फ्रांस, इस्ट शार्ली’ (पूर्ण फ्रांस शार्ली बरोबर आहे). या उत्तेजित जमावाला पुढे काय करावं तेच कळत नव्हतं. अन तश्यातच त्या जमावाची नजर, इमारती च्या गच्चीवर उभ्या असलेल्या पोलिसावर गेली. जमावानं हात हलवले अन त्याला प्रतिसाद म्हाणून पोलिसाने जमावाला सेल्युट केला. झालं. जमाव अक्षरशः पागल झाला. तो पोलीस फ्रेंच स्वातंत्र्याचे, प्रशासनाचे आणि अभिव्यक्ती चे प्रतीक बनला. लाखोंचा तो जमाव त्या पोलिसाकडे बघून शार्ली.. शार्ली.. अश्या आरोळ्या ठोकत होता आणि त्या पोलिसाने दर पाच-पाच मिनिटाला सेल्युट केला की उसळत होता. ’थेंक यू मिस्टर पोलीसमन’ असं ओरडत होता.
ही घटनाच फ्रेंच जनतेचा मूड सांगते. कडाक्याच्या थंडीत, पंधरा लाखांपेक्षा जास्त लोकांचा जमाव पेरीस च्या रस्त्यांवर येतो. दहशतवादाच्या विरुध्द बुलंद गर्जना करत अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी एकजूट असल्याचा संदेश देतो. पन्नास पेक्षा जास्त देशांचं नेतृत्व, फ्रेंच राष्ट्रपती फ्रान्क्वा ओलांद ला पाठिंबा देण्यासाठी पेरीस मध्ये येते. तेथे इस्राईल चे पंतप्रधान असतात तसेच पेलेस्ताइन चे ही. हे सारंच अद्भुत आहे. इतिहासाला एक मोठं वळण देण्याची ताकत ह्या प्रसंगात आहे. राष्ट्रपती ओलांद च्या म्हणण्याप्रमाणे रविवारी ११ जानेवारी ला पेरीस ही जगाची राजधानी झालेली होती.
पेरीस च्या ह्या ‘मिलियन मार्च’ ने जगाला आणि विशेषतः मुस्लिम जगताला फार स्पष्ट आणि कडक संदेश दिलेला आहे की हा धार्मिक कट्टरपणा, हा दहशतवाद मुळीच सहन केला जाणार नाही. शनिवारी आणि रविवारी फ्रांस च्या जवळपास प्रत्येक शहरात मोठमोठे मोर्चे निघाले. शनिवारी पेरीस वगळता उर्वरित फ्रांस मधे सात लाखांपेक्षा जास्त लोकं रस्त्यावर आले. नीस, लिले सारख्या शहरांमध्ये तर ही संख्या मोठी होतीच, पण मार्सेलिस ह्या फ्रांस च्या दुसऱ्या क्रमांकाच्या अन मुस्लिम प्रभावाखाली असलेल्या शहरातही तीस हजारांचा मोर्चा निघाला. पावणे सात कोटी लोकसंख्या असलेल्या फ्रांस मधे २२ ते २५ लाख लोकं फक्त दोन दिवसात रस्त्यावर येणं हे अभूतपूर्व आहे.
फक्त फ्रान्सच कशाला ? पूर्ण युरोपात शार्ली एब्दो वरील हल्ल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. जर्मनी, इटली, निदरलंड, इंग्लंड, स्पेन वगैरे देशांमध्येही मोठमोठे मोर्चे निघाले. मात्र सर्वात महत्वाची घटना म्हणजे पन्नास देशांचे प्रमुख ह्या घटनेचा निषेध करण्या साठी पेरीस मध्ये एकत्र जमले. इतक्या संख्येने राष्ट्रप्रमुख एकत्र येतील अशी कोणीच कल्पना केली नव्हती. प्रारंभीचा अंदाज १० ते १५ राष्ट्रप्रमुखांचा होता. अगदी रविवार दुपार पर्यंत चाळीस देशांचे प्रमुख येताहेत असं टी व्ही चेनल्स वर सांगितल्या जात होतं. मात्र प्रत्यक्षात आले ते पन्नास पेक्षा जास्त देशांचे प्रमुख.
पेरिस च्या ह्या ‘मिलियन मार्च’ मधे अजुन एक गोष्ट ठळकपणे उठून दिसली. इस्त्राईल चा इतर देशांद्वारे होत असलेला बहिष्कार, किमान या घटनेच्या संदर्भात तरी, संपला असं म्हणता येईल. दहशतवाद्यांनी पेरीस मधे ज्युईश बाजारावर केलेला हल्ला आणि त्यात मरण पावलेले ४ नागरिक, यामुळे इस्त्राईल च्या बाजूने सहानुभूती निर्माण झाली. फ्रांस चे राष्ट्रपती ओलांद स्वतः इस्त्राईल चे प्रधानमंत्री बेन्जामिन नेतान्याहू यांना सिनेगॉग मधे घेऊन गेले. हा सुध्दा मुस्लीम जगताला दिलेला कडक इशाराच होता की आम्ही इस्त्राईल ला वाऱ्यावर सोडणार नाही.
सध्या सारा युरोप ढवळून निघालाय. इस्लाम विरुध्द मोठ्या प्रमाणावर धृवीकरण झालेले आहे. त्यामुळे इस्लाम विरुध्द ख्रिश्चन (किंवा इतर) असा संघर्ष न पेटो ही चिंता प्रत्येक राष्ट्रप्रमुखाला आहे. म्हणुन राष्ट्रपती ओलांद सहित प्रत्येक राष्ट्रप्रमुख आपापल्या नागरिकांना एकजूट राहण्यास सांगताहेत, धार्मिक तेढ कमी करावी असा संदेश देताहेत. इस्लाम हा शांती चा धर्म आहे आणि त्याचं दहशतवादाशी काही एक घेणं देणं नाही असं सांगण्यात येतंय. पण प्रत्यक्षात युरोपियन नागरिकांमध्ये आणि विशेषतः फ्रेंच नागरिकांमध्ये, इस्लाम म्हणजेच दहशतवाद हे समीकरण घट्ट होत चाललंय.
याला कारणही आहे. शार्ली एब्दो च्या हल्ल्यानंतर, युरोप ने दाखवलेली भक्कम एकजूट बघूनही रविवारी, अकरा जानेवारी च्या (म्हणजे ‘मिलियन मार्च डे’ च्या) सकाळी जर्मनीच्या हंबर्ग मार्गेनपोस्ट ह्या दैनिकावर हल्ला झाला. ह्या हल्ल्याचे कारण म्हणजे या दैनिकाने शार्ली एब्दो च्या व्यंगचित्राचे पुनर्मुद्रण केले होते. रविवारी संध्याकाळीच बेल्जियम च्या दैनिकाला बॉंब हल्ल्याची धमकी मिळाली, कारण त्यानेही शार्ली एब्दो चे व्यंगचित्र छापले होते. ह्या घटनांची प्रतिक्रिया पण होतेय. युरोपात दहशतवादी हल्ल्यातच नव्हे, तर इतरही गुन्ह्यात जे आरोपी पकडले गेले आहेत, त्यांच्यात मुसलमानांची सख्या जास्त आहे. एकट्या फ्रांस मधेच, तुरुंगात बंदी असलेल्या एकूण कैद्यांपैकी ७०% कैदी मुस्लीम आहेत. शार्ली एब्दो च्या निमित्ताने ह्या सर्व गोष्टी लोकांसमोर येताहेत आणि यामुळे ध्रुवीकरण अधिकच बळकट होतेय. ७ जानेवारी च्या हल्ल्यानंतर फ्रांस मध्ये काही मशिदींवर हल्ले झाले. आणि मुस्लीम विरोधाची ही भावना बळकट होताना दिसतेय. अकरा जानेवारी ला पेरीस मधील मार्च मध्ये अनेक नागरिकांच्या ज्या मुलाखती दाखवल्या, त्यातूनही हे दिसून येत होतं.
हे सर्व कुठपर्यंत चालणार? सामान्य जनतेचा उत्साह पुढच्या सात-आठ दिवसात थंड होणार. मग हे संपूर्ण प्रकरण इतिहासाचा एक भाग म्हणुन पुस्तकात बंद होऊन राहणार का..?
सध्या तरी तसे दिसत नाही. हे प्रकरण धुमसत राहणार हे निश्चित. युरोपियन देशातील राष्ट्रप्रमुख, राजकीय नेतृत्व आणि प्रशासक गंभीरपणे विचार करायला लागले आहेत की अमेरिके ला दहशतवाद्यांकडून इतक्या धमक्या मिळत असतानाही, ९/११ नंतर अमेरिकीत एकही दहशतवादी हल्ला करणे अतिरेक्यांना शक्य झाले नाही. मग युरोपियन देशांमधे काय चुकलं, की असा हल्ला झाला. यामुळे, यापुढे सर्वच युरोपियन देशांत सुरक्षा व्यवस्था अधिक जास्त आवळल्या जाणार हे निश्चित.
ज्याप्रमाणे जगाच्या इतिहासात अमेरिके वरील ९/११ चा हल्ला महत्वाचा ठरला, त्याचप्रमाणे हा अकरा जानेवारी चा हल्ला ही युरोप च्या इतिहासात एक ‘टर्निंग पॉइंट’ बनताना दिसतोय.
प्रशांत पोळ
जबलपुर
०९४२५१ ५५५५१